मारक परीक्षापद्धतीचे बळी

मारक परीक्षापद्धतीचे बळी

एमसीक्यू (MCQ) ही बहुपर्यायी प्रश्नांची पद्धत आज प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात विशेष लोकप्रिय आहे. यातून तात्काळ मुल्यांकन करता येतं. मात्र त्याचवेळी ही परीक्षा पद्धत तुम्हाला सूक्ष्म आणि विश्लेषणात्मक विचार करण्यापासून परावृत्त करत असते.

अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?
जेएनयूच्या चार बंडखोऱ्या
जेएनयू : पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक
जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाचा लोगो

जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाचा लोगो

वारंवार प्रयत्न करुनही विद्यमान सत्ताधारी सरकारला जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी करण्यामध्ये अद्यापी यश आलेलं नाही. “‘राष्ट्रद्रोही विद्यार्थी’ आणि ‘नैतिकदृष्ट्या बेजबाबदार’ असे डाव्या विचारसारणीचे शिक्षक यांची गर्दी असलेला ‘अस्वस्थ’ कॅम्पस” अशा रीतीने सध्या ‘जेएनयू’चे चित्र रंगविले जात आहे. असे असले तरीही, हे विद्यापीठ ही एक अशी जागा आहे जिथे विचार वृद्धिंगत होतात, पुस्तकांवर आवडीने चर्चा केली जाते, सातत्याने वादविवाद होतात आणि नियमित वर्गही भरवले जातात. इथे मार्क्सचीही चिकित्सा केली जाते, त्याच्या सिद्धान्ताना प्रश्न विचारले जातात आणि आंबेडकरांकडेही बिनचूक म्हणून बघितले जात नाही. यामुळेच अध्ययन आणि संशोधन एकमेकांना पूरक ठरतात.
यामुळे स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या टीव्ही चॅनेल्सच्या नकारात्मक प्रचारानंतरही देशभरातले तरुण विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. एक संशोधक म्हणून, तज्ञ म्हणून आपली जडणघडण व्हावी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपला विकास व्हावा, यासाठी त्यांना आजही जेएनय़ू हाच योग्य पर्याय वाटतो.
यावर्षीही हे विद्यार्थी मे महिन्यात ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतील व त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनापासून पूर्वतयारीही करतील. मात्र त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देत असतानाच मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटत आहे. माझे असे बोलणे विचित्र वाटू शकते याची मला जाणीव आहे, म्हणूनच मी असे का म्हणत आहे, यामागचे कारण मी स्पष्ट करत आहे.
कल्पनाशक्ती मारणे : एमसीक्यू (MCQ) पद्धतीची विवेकशून्यता
जेएनयू ही चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देणारी, विविध कल्पनांशी झुंजायला लावणारी आणि जगाची संकल्पानात्मक मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली योग्य भाषा विकसित करणारी, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून देणारे ज्ञानगृह आहे, याची मला एक शिक्षक म्हणून खात्री आहे. दुसर्‍या शब्दांत, जेएनयू आणि अर्थात त्याची उमदारमतवादी परंपरा म्हणजेच अर्थान्वयवादी आकलन, चिकित्सात्मक दृष्टी आणि सर्जनशील मांडणी होय. म्हणूनच इथे जेव्हा एखादा विद्यार्थी कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला/तिला मार्क्सचे मूळ लिखाण वाचावे लागते, त्यावर चर्चा करावी लागते, वादविवादात उतरावे लागते आणि ‘वस्तूलोभस्तोम’ (कमोडिटी फेटीशिझम) यासारख्या विषयावर वादविवाद आणि चर्चा करून एक प्रबंध लिहावा लागतो.
यामुळेच आजपर्यंत जेएनयूची प्रवेश परीक्षा ही गुणात्मकरित्या वेगळ्या प्रकारची चाचणी परीक्षा म्हणून प्रसिद्ध होती. खास करून समाज विज्ञान शाखांच्या बाबतीत, विचार करण्यास प्रवृत्त करणारे, चिंतनशील आणि निबंधाच्या स्वरुपात विचारांची सुसंगत मांडणी करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले जायचे.
समाजशास्त्र विषयाच्या (बहुधा २०१६च्या) एम.ए.च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न मला आठवतो. रविंद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवाद या संकल्पनेचे विवेचन करणाऱ्या निबंधातील उतार्‍याने त्याची सुरुवात झाली; आणि त्यांनंतर विद्यार्थ्यांना टागोरांच्या समकाळात राष्ट्रवाद या संकल्पनेभोवती जे राजकारण सुरु होतं त्याचा संदर्भ देत टागोरांचे विचार स्पष्ट करण्यास संगितले गेले. हा काही सर्वसाधारण पुस्तकी प्रश्न नव्हता. तर विद्यार्थ्याची सर्जनशीलता आणि त्यांची चिकित्सक क्षमता जाणून घेण्यासाठी खास तयार केलेला असा हा प्रश्न होता.
त्यामुळेच ‘जेएनयू’च्या प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करणे हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असायचा. साचेबद्ध एनईटी (NET) परीक्षा, किंवा यांत्रिक युपीएससी (UPSC) परीक्षा (ज्याने प्रत्येक बातमी ‘खेळ’,‘परराष्ट्र व्यवहार’ आणि ‘राजकारण’ यासारख्या विविध संभाव्य प्रश्नांमध्ये विभागून विद्यार्थ्यांचा वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद हिरावून घेतला आहे) यासाठी अभ्यास करण्यापेक्षा हा अनुभव नक्कीच वेगळा होता. या अनुभवाचा पाया दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामध्ये आणि आपली विचारशक्ति तसेच कल्पनाशक्ति वाढवण्यामध्ये होता. यामध्ये एक मजा होती, एक प्रकारचा ज्ञानोत्सव होता.
परंतु यावेळी गोष्टी वेगळ्या पद्धतीने पार पडतील. का नाही? तंत्र्ज्ञान हा आपला नवीन देव आहे आणि म्हणून आपल्याला तंत्रज्ञानाने नियंत्रित ऑनलाइन परीक्षेसाठी तयार राहायला पाहिजे. तसेच, ‘वस्तुनिष्ठता’ आणि ‘गणिती अचूकता’ यांच्या युगात ‘व्यक्तिनिष्ठ’ दृष्टीकोनातून लिहिलेले प्रबंध हे पूर्वग्रह बाळगणार्‍या भावनिक शिक्षकांकडून तपासून घेण्याचे कष्ट का घ्यावे? म्हणूनच, उत्तराच्या बरोबर असलेल्या पर्यायावर क्लिक करण्याचे कौशल्य मिळवा, आणि तत्काळ निकाल देणार्‍या व मान्यवर व्यक्तीकडूनही होणार्‍या छोट्याछोट्या चूकांपासून मुक्त करणार्‍या एमसीक्यू (MCQ) परीक्षा पद्धतीच्या कार्यक्षमतेचे जतन करा, असा सध्याचा माहोल आहे.
या वातावरणात एखादे चांगले पुस्तक वाचण्याचा आनंद घेण्याची गरज नाही किंवा लिखाण आणि वादविवादाची कौशल्ये जोपासण्याची काहीच गरज नाही. मिशेल फुको या विचारवंताने आपले प्रसिद्ध पुस्तक ‘डिसिप्लिन अँड पनिश’ (Discipline and Punish) याची सुरुवात “मनुष्य इतका अपरिहार्यपणे वेडा आहे की, वेडा नसणे हे वेडेपणाच्या दुसर्‍या व्याख्येत बसेल” या पास्कालने दिलेल्या अवतरणाने का केली हे समजून घेण्याची अजिबात गरज नाही.  याऐवजी यूपीएससीसाठी झटणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याशी बोला, स्मार्ट गाइड वाचा आणि ‘वस्तुनिष्ठ’ तथ्यांची माहिती मिळवा. उदाहरणार्थ, लुई द्यूमोंत या विचारवंताने ‘होमो हायरार्किअस हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले, मॅक्स वेबरची ‘आयडियल टाइप’ संज्ञेची व्याख्या काय किवा एम.एन.श्रीनिवास यांच्या नावाशी जोडलेल्या रामपूर गावाचे ठिकाण सांगा.
नाही, आता आर्थिक निर्धारवादाच्या पलीकडे मार्क्स आहे का, जातीव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांधी-आंबेडकर या द्वंद्वातून कसे बघायचे, किंवा उपभोक्तावाद, चंगळवाद पुरुषसत्तेला आकर्षक आणि मोहक बनवत आहे का, अशा प्रकारच्या तत्वज्ञानाच्या कूटप्रश्नांवर वेळ वाया घालवण्याची काहीच गरज नाही. टिकात्मक चिकित्सा ही आता वाईट मानली जात आहे याउलट व्यवस्था सतत तुमच्या कानात कुजबुजत असते की या वास्तवाला ‘दूसरा पर्याय नाही’.
मित्रांनो, मला तुमच्यासाठी वाईट वाटते. तत्वज्ञानाचा मृत्यू. भाषेचा मृत्यू. आत्मचिंतांनाचा मृत्यू. तरीही, तुम्हाला एमसीक्यूची (MCQ)पद्धधत ही तुमची ‘कार्यकारण क्षमता’, तुमच्या विचारांचा वेग आणि तुमच्या विचारांची स्पष्टता तपासते यावर विश्वास ठेवायला सांगण्यात येईल. आनंद आणि विविधरंगी ज्ञानोत्सवाचा अभाव असलेले यंत्र बना. एका परीने आयुष्यच नेस्तनाबूत करणाऱ्या या वाटेकडे तुम्हाला नेल्याबद्दल क्षमा करा.
तरीही, अजून सर्व काही संपलेले नाही
या निराशेच्या कठीण काळात ही मी होतकरु, तरुण विद्यार्थ्यांना दुखवू इच्छित नाही. यापैकी काही विद्यार्थी अंतिमतः ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेतील, त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही अजून संपलेलो नाही, मृत झालेलो नाही. आतापर्यंत तरी आमच्या शिकवण्याच्या पद्धतीत किंवा विद्यार्थ्यांना दिला जाणारा अभ्यास यात हस्तक्षेप झालेला नाही. एमसीक्यू (MCQ) पद्धत सत्रपरीक्षेमध्ये वापरण्याचा प्रयत्न झालेला नाही. ‘वस्तुनिष्ठ’ प्रश्न अजून तरी सत्रामधील असाइनमेंटस् मध्ये विचारले जात नाहीत. म्हणूनच, एकदा हे विद्यार्थी जेएनयू मध्ये आले की त्यांना एमसीक्यू (MCQ) पद्धतीच्या मिथकातून जागे करण्यासाठी आम्ही इथे आहोत.
दार्शनिक अराजकता हा आमच्या आवडीचा विषय आहे. आम्ही वादविवाद आणि अर्थनिर्णयाच्या विविध पद्धतींना प्रोत्साहन देतो. आणि अर्थातच आम्हाला एकच एक अचूक उत्तर देणं या प्रकाराचा, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’जे मध्ये करतो त्याचा तिरस्कार वाटतो. म्हणूनच, आम्ही तुम्हाला या साचेबद्ध विचारपद्धतीतून मुक्त करु. आम्ही तुम्हाला मार्क्सच्या भौतिकवादाव्यतिरिक्त त्याच्या विचाराती अद्धूतरम्यता दाखवू, आंबेडकरांचे मार्क्स आणि बुद्धावरचे लिखाण वाचायला प्रोत्साहन देऊआणि आंबेडकरांचा बौद्ध धर्म आणि गांधींचे गीतेवरचे विचार यांचे तुलनात्मक वाचन करण्याची मुभा देऊ.
आम्ही तुम्हाला प्रत्यक्षवाद, अनुभववाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवू. त्याच वेळी, लिओनार्डो दा विन्सीचे मोना लिसा हे चित्र अनेक अर्थबोधांचा विषय का आहे, किंवा आशीष नंदीसारखे विचारवंत ‘प्रभुत्ववादी विज्ञानाची’ कठोर टीका कशा प्रकारे करतात याबद्दल विचार करायला लावू. दुसर्‍या शब्दांत, आम्ही तुम्हाला अराजकता, अनिश्चितता आणि दार्शनिक प्रश्नांच्या जगात घेऊन जाऊ.  इथे ठराविक आणि शाश्वत असे एकच एक‘अचूक’ उत्तर नाही. वस्तूनिष्ठतेचा मार्ग शेवटी आपल्याला सत्तावादी राजकारणाकडे घेऊन जातो, याची तुम्हाला नोंद घ्यायला लावू.
मित्रांनो, या कठीण क्षणीसुद्धा मी तुम्हाला गाइड, प्रश्नावल्या आणि कोचिंग क्लासमध्ये घोकंपट्टी करुन शिकलेले सर्वकाही विसरायला आणि जेएनयूमध्ये यायला सांगेन.
जेएनयू ही अजूनही एक वेगळी दिशा दाखविणारी शक्यता आहे. त्यांनी ही शक्यता संपवण्याच्या आधी तुम्हाला इथे येऊन तुमची लढाई लढावी लागेल – जी राजकीय असेल, नैतिक असेल, दार्शनिक असेल आणि अध्यापनाच्या क्षेत्रातीलही असेल.

अविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.

अनुवाद – सई पवार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0