मराठी माध्यमांचे काय करायचे?

मराठी माध्यमांचे काय करायचे?

देशात नेमके काय सुरु आहे, याचा अंदाज मराठी वृत्तपत्रे वाचून आणि मराठी वृत्त वाहिन्या बघून येतो का?

तो माझ्यासाठी तर नाही ना!
युघुर प्रश्न : चीनच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेली समस्या
दिल्ली दंगलीच्या याचिकांची सुनावणी शुक्रवारी

देवेंद्र फडणवीस यांना कसे ५ वर्षे आपल्या मुलीला हॉटेलात घेऊन जाता आले नाही. नांगरे पाटील नावाचे सद्गृहस्थ त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नात कसे नाचले. नाशिकची मिसळ चांगली की कोल्हापूरची! या आहेत सध्याच्या मराठी माध्यमांमधल्या बातम्या.

देशभरामध्ये नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यावरून जोरदार उलथापालथ सुरु आहे. अक्षरशः तीन दिवसामध्ये एका विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाले. जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये पोलीस शब्दशः घुसले आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली. अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली. अतिशय लाजिरवाण्या आणि कोणालाही संताप यावा, अशा गोष्टी घडल्या. यावर किमान नापसंती तरी व्यक्त करायची, पण केवळ काही त्रोटक बातम्या देण्याव्यतिरिक्त मराठी माध्यमांनी काही केले नाही.

देशभरातल्या सुमारे २५ विद्यापीठांमधील विद्यार्थी रस्त्यावर आले आणि देश ढवळून टाकणारी निदर्शने झाली. पण मराठीतील एका वाहिनीमध्ये काय दाखवत होते, तर एबीव्हीपीच्या १०० माणसांनी पुणे विद्यापीठामध्ये केलेली निदर्शने.

सीएए, एनआरसी आणि एनपीआर म्हणजे काय, यामध्ये काय फरक आहे. याचा थेट परिणाम होतो की नाही, मग आंदोलन का सुरु आहे. या सगळ्यावर या तथाकथित मुख्य धारेच्या माध्यमांमध्ये काय येत आहे?

१५० दिवस काश्मीरमध्ये सगळे काही बंद आहे. अनेक मोठे नेते स्थानबद्ध आहेत. आपला काश्मीरशी काहीच संबंध नाही का? की काश्मीर केवळ पर्यटनासाठीच आहे? तिथली माणसे महत्त्वाची वाटत नाहीत का? पण हे सगळे मराठी माध्यमांमध्ये येत नाही.

जामिया विद्यापीठामध्ये, जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील कोणीच शिकत नाही का? मुंबईतील निदर्शने मोठी निदर्शने होती. टीसमधील विध्यार्थ्यानी सर्वात प्रथम आंदोलन केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जे समजते, ते मराठी माध्यमांना का कळत नाही.

सावरकर यांचा मुद्दा अनाठायी तापला, पण सावरकर हा विषय म्हणजे पवित्र गायी सारखा आहे, का ज्यावर काही बोलूच नये? सावरकर या विषयावर समाज माध्यमांमध्ये एवढी चर्चा सुरु आहे, पण त्यावर मराठी माध्यमांमध्ये काही दिसत नाही.

जामियामध्ये एका डिजिटल वाहिनीच्या महिला पत्रकाराला मारहाण झाली. उत्तर प्रदेशात पत्रकाराना मारहाण झाली. पोलीस ठाण्यात पत्रकारांना बसवून ठेवण्यात आले. तिथे हिंसेचे थैमान सुरु आहे. पण याच्या किती बातम्या येतात?

या सर्व माध्यमांच्या डिजिटल आवृत्यांमध्ये काय दिसते? तर तैमुर पुन्हा दिसला, कुठल्या तरी टिनपाट हिरोईनचा बोल्ड अंदाज, कुणाच्या तरी आत्महत्येवरून गेल्या काळातल्या कोणत्यातरी टीव्ही नायिकेने लिहिलेली आपल्या नवऱ्याविषयीची पोस्ट. सलमानच्या आईला सून म्हणून कोण पसंत आहे. कोणत्या ग्रहाचे आणि राशीचे काय भविष्य आहे. कुठेतरी गुलाबी थंडीमध्ये कशा जिलेब्या खाल्ल्या जातात. अगदीच काही नाही तर क्रिकेट ठरलेले.

ज्ञान, मनोरंजन आणि माहिती देणे, हे जर माध्यमांचे काम आहे, मात्र त्यातील फक्त मनोरंजन उचलून माध्यमांचे काम सुरु आहे, असे दिसते. मराठी वृत्तपत्रांच्या छापील आवृत्यांमध्ये हे होणार, ते करणार अशाच बातम्यांची भरमार आहे.

महाराष्ट्रात डिटेंनशन सेंटरसाठी जागा बघण्यात आल्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात येते आणि मराठीमध्ये त्याचा मागोवाही घेतला जात नाही. रामलीला मैदानावर देशाचे पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, पण मराठी माध्यमात त्यावर ब्र काढला जात नाही. वाहिन्यांवर त्यावर चर्चा होत नाही.

उगाच टिळक आगरकरांची नवे घ्यायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची सवय कधी संपणार आहे? गेल्या ६ वर्षांत मराठीतील कोणी कोणती शोध पत्रकारिता केली, की कोणत्या प्रश्नावर एक ठाम भूमिका घेतली?

खरे तर देश एका अतिशय मोठ्या अशा संक्रमण काळातून जात आहे, पण मराठी माध्यमात याचे प्रतिबिंब सोडा, साधे पडसादसुद्धा दिसत नाहीत. तुम्ही नोटबंदीची चर्चा केली नाही, जीएसटी चर्चा केली नाही, झुंडीने लोकांना मारले जात असताना तुम्ही गप्प बसला. बालाकोटवर तुम्ही प्रश्न विचारले नाहीत, अजून किती दिवस असेच गप्प राहणार आहात, की तुम्हीही २०२४ च्या तयारीमध्ये सामील झाला आहात.

महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता गेलेली आहे. ही सत्ता जाताना अनेक संपादकांना वाईट वाटल्याचे दिसत आहे. कारण नवीन सत्ता नुकतीच येत असतांना गेल्या सरकारच्या काळातील या प्रकल्पांचे काय, फडणवीस कसे घर शोधात आहेत, त्यांचे सामान नेणाऱ्या गाडीच्या चालकाशी संवाद, अशा गोष्टी या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.

आपण नेमके कोणासाठी काम करतो, याचा माध्यमे कधी विचार करणार आहेत की नाही? की फडणवीस सरकार गेलेले अजून काही जणांना कळलेले दिसत नाही, की अजूनही केंद्रीय सत्तेचा धाक वाटतोय, की अजून काही व्यावसायिक हितसंबंध आड येत आहेत? वाचक आणि दर्शक या मराठी माध्यमांना महत्त्वाचे कधी वाटणार? की तुम्ही त्या ‘आयटी’तील वाचकाला आणि दर्शकाला एका भ्रमामध्ये राहू देणार आहात, की ‘आयटी’ सेलच्या आणि व्हॉटसअप विद्यापीठाच्या भरवशावर सोडणार आहात?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0