सुमित्रा भावे यांचे निधन

सुमित्रा भावे यांचे निधन

दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ७८ होते. सुमित्रा भावे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या धाटणीचे

गुजरातमध्ये कोविड मृतांबाबत लपवाछपवी
गेल्या वर्षात भारताची ऑक्सिजनची दुप्पट निर्यात
भाजपचे बालेकिल्ले ढासळत आघाडीचा ‘महा’विजय

दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ७८ होते.

सुमित्रा भावे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आणि अनेक कलाकार, दिग्दर्शक घडवले.

१२ जानेवारी १९४३ ला पुण्यात सुमित्रा यांचा जन्म झाला. त्या मूळच्या सुमित्रा उमराणी. पुण्याच्या आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण आणि फर्ग्युसन महाविद्यालयातुन कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.

त्यांनी रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदनही केले.

१९६५ सालापर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन केले. या काळात सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध त्यांनी सादर केले. उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र, मुंबईच्या कास्प-प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पावर त्यांनी संचालक म्हणून काम केले. पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले.

त्यानंतर त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या. सामाजिक काम करताना चित्रपट माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल, या विचारातून त्या चित्रपट मध्यमाकडे वळल्या. त्यांनी ‘बाई’ हा लघुपट सुरवातीच्या काळात तयार केला.

त्यानंतर सुनिल सुकथनकर यांनी त्यांच्याबरोबर सहकारी म्हणुन काम सुरू केले. या दिग्दर्शक द्वयीने ‘ दोघी’, ‘वास्तूपुरूष’ यासारखे गंभीर विषय हाताळून समांतर चित्रपटालाही वेगळा आयाम दिला. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु, दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनी केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कर्नाटकातील कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला होता. कासव या चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळाले होते.

सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ‘माझी शाळा’ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी – बलराज सहानी प्रतिष्ठानतर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले होते’.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0