असहमतीचे आवाज

असहमतीचे आवाज

भारताच्या इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये रोमिला थापर हे नाव सुपरिचित आहे. केवळ घटना आणि व्यक्तींच्या बाबतीत तथ्ये शोधून काढणे एवढ्यापुरता त्यांचा इतिहास मर्यादित नाही. समाजशास्त्र, राज्यशास्त्राच्या अंगाने इतिहासाचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. २०१९ मध्ये दिल्लीमध्ये त्यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांचे संपादन करून सिद्ध केलेला त्यांचा निबंध ‘Voices of dissent – An Essay’ सीगल बुक्स यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित केला. याच पुस्तकाचा, मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला मराठी अनुवाद नोव्हेंबर २०२१ मध्ये पपायरस प्रकाशनाने ‘असहमतीचे आवाज’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.

फसलेला पुस्तकी डाव
राजीव गांधींचा खून का झाला?
फॅमिली डॉक्टरची गोष्ट

असहमतीची संकल्पना परकीय नाही

आज जगभर, आणि विशेषतः भारतातील सामाजिक वर्तुळांमध्ये विविध मतप्रवाहांना असलेला अवकाश आणि विविध मतप्रवाहांबद्दलचा आदर या गोष्टींचा संकोच होताना दिसत आहे. बहुसंख्यांक आणि अन्य यांतील ‘अन्यां’नी व्यापलेली जागा हळूहळू कमी होत आहे. अशा वेळी, विशेषतः लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांकडूनच असहमतीचे आवाज दाबले जात असताना, इतिहासाचा धांडोळा घेत मागच्या अनेक शतकांमध्ये असहमतीच्या या आवाजांचे काय स्थान होते आणि इतिहास घडताना या आवाजांचा काय प्रभाव होता याचे महत्त्वपूर्ण विवेचन या निबंधामधून रोमिला थापर यांनी केले आहे. असहमती ही संकल्पना पश्चिमेकडून आयात केली आहे असे जे म्हटले जाते ते त्यांना पूर्णपणे अमान्य आहे, आणि भारताच्या इतिहासातली वेगवेगळ्या कालखंडातली उदाहरणे घेऊन त्यांनी ते स्पष्ट केले आहे.

सुरुवातीलाच त्यांनी व्यक्तीचे वा व्यक्तींचे दुसऱ्यांसोबत मतभेद असणे किंवा अधिक सार्वजनिक स्तरावर पाहता, जीवनपद्धती नियत करणाऱ्या काही संस्थांशी मतभेद असणे म्हणजे असहमती अशी असहमतीची एक साधी व्याख्या केली आहे. कोणताही समाज किंवा संस्कृती अहसमतीच्या आवाजांशिवाय विकसित होऊच शकत नाही असे त्या सांगतात. असहमती हीच सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचा गाभा असते. भारतीय संस्कृती ही जणू एक एकसंध गोष्ट होती अशा रितीने आज तिचा गौरव केला जात असला, इतिहासातील विविध मतप्रवाहांमधील संघर्षाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असले, तरीही भारतीय संस्कृतीमधल्या अनेक गौरवशाली गोष्टी, मुख्यतः त्यातले ज्ञान हे विविध विचारप्रवाहांमधील आदानप्रदान आणि वादविवाद यांच्याशिवाय विकसित होऊ शकले नसते. खरे तर भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अशा प्रकारची देवाणघेवाण, वादविवाद यांची मोठी परंपरा आहे. त्यासाठी कोणत्या पद्धती कशा प्रकारे वापरायच्या याची चर्चा आहे. त्यामुळेच एकमेकांशी मतभेद असणाऱ्या विविध प्रवाहांची उपस्थिती आणि त्यांचा एकमेकांमधील संघर्ष हा भारतीय संस्कृतीला नवीन नाही.

असहमतीची ऐतिहासिक उदाहरणे

या निबंधामध्ये, भारताच्या इतिहासातल्या असहमतीची चर्चा करत असताना रोमिला थापर यांनी विविध कालखंडांतील दासी-पुत्र ब्राह्मण, श्रमण आणि भक्तीमार्ग चोखाळणारे संत आणि सूफी पीर अशी तीन महत्त्वाची ‘अन्यां’ची उदाहरणे घेतली आहेत. यापैकी अनेकांनी प्रस्थापित मूल्यव्यवस्थेला प्रश्न विचारले, संघर्ष केला आणि समाजाच्या वैचारिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात या तीनही उदाहरणांबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे.

दासीपुत्र ब्राह्मण

‘अन्य’चे त्यांनी घेतलेले पहिले उदाहरण इसवीसनपूर्व दुसरे सहस्त्रक ते वैदिक काळ इतके मागचे आहे. वेदांवर आधारित असलेला धर्म आणि संस्कृती यांचे या काळात वर्चस्व होते. आज वैदिक संस्कृती हीच एकमेव प्राचीन भारतीय संस्कृती होय असे प्रतिपादन आग्रहाने केले जाते. त्या काळात ‘अन्य’चे काय स्थान होते याबाबत फारच कमी माहिती आहे. त्याबद्दल फारसा शोधही घेतला गेलेला नाही. पण त्या काळच्या साहित्यातच ‘आर्य वर्ण’ आणि ‘दास’ किंवा ‘दस्यू’ अशी वर्गवारी केलेली आढळते, त्यावरून हे अन्य अस्तित्वात असल्याचे लक्षात येते. आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे, आणि काही प्रमाणात त्यांना सामावूनही घेणे अशा दोन्ही गोष्टी होत असाव्यात हे समजते.

श्रमण

दुसरे ‘अन्यां’चे उदाहरण त्या देतात ते थोड्या आणखी अलिकडच्या काळातील. इसवीसनानंतरच्या सुरुवातीच्या काळात प्रस्थापितांना विरोध करणारे काही गट उदयाला आले, ज्यांना एकत्रितपणे श्रमण असे संबोधले गेले – हे होते जैन, बौद्ध आणि आजीविक. काहीजण चार्वाकांनाही यामध्ये समाविष्ट करतात, परंतु ते श्रमण नव्हेत असे थापर नमूद करतात. ब्राह्मण आणि श्रमण या दोन्ही प्रवाहांमधील संघर्ष आणि देवाणघेवाण यांनी भारताच्या इतिहासातील मोठा कालखंड व्यापलेला आहे. या ‘अन्य’ प्रवाहांची, त्यांच्या संघर्षाची सविस्तर चर्चा पुस्तकात आली आहे. दोन्ही प्रवाहांमध्ये राजाश्रय मिळवण्यासाठी तसेच जनमानसात स्थान मिळवण्यासाठीही मोठी स्पर्धा होती आणि यामध्ये अखेरीस वैदिक ब्राह्मणांचा विजय झालेला दिसून येतो. मात्र तरीही वैदिक कर्मठपणाला, भेदभावाच्या संस्कृतीला समर्थपणे विरोध करणाऱ्या या गटांना नेहमीच जनमानसात आदराचे स्थान मिळत आले हे त्या आवर्जून नमूद करतात.

सूफी संत आणि भक्ती चळवळ

रोमिला थापर

रोमिला थापर

थापर यांनी दिलेले तिसरे उदाहरण आहे ते म्हणजे पंधराव्या-सोळाव्या शतकातील सूफी आणि भक्ती चळवळींचे. भक्ती चळवळीने काही नवे धर्म स्थापन केले नाहीत. पण पौराणिक हिंदूंच्याच दैवतांची वेगळ्या प्रकारे उपासना करण्याचे विविध मार्ग तिने चोखाळले. पारंपरिक, आणि प्रस्थापितांच्या कर्मठपणाखाली दबलेल्या धर्माला या जोखडातून मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कबीर, रविदास, दादू, आणि चोखामेळा अशा निम्नजातीयांना तसेच मीराबाई आणि लाल देढ यासारख्या स्त्रियांनाही या चळवळीत स्थान होते. इतकेच नव्हे तर आज आपण ज्यांना हिंदू आणि मुस्लिम अशी लेबल लावून विभागतो अशा वेगवेगळ्या पंथातील लोक यामध्ये एकत्र होते. जसे बुल्ले शाह या सूफी संताने कृष्णभक्तीवर अनेक दोहे, कवने रचली आहेत.

गांधींचा सत्याग्रह

या तीन उदाहरणांनंतर त्या असहमतीचे सातत्य मध्ययुगातून आधुनिक युगामध्ये कशा प्रकारे टिकून राहिले याकडे येतात. त्यासाठी त्या गांधींच्या सत्याग्रहाची चर्चा करतात. भारतीय इतिहासातील असहमतीच्या संकल्पनांचेच पडसाद गांधींच्या सत्याग्रहाच्या आकृतिबंधात उमटलेले दिसतात असे त्या म्हणतात. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग या दोन्हींना भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का मिळाला असावा असा प्रश्न उपस्थित करून त्या अशी शक्यता वर्तवतात, की अशा प्रकारच्या असहमतीच्या अंतःप्रवाहाला भारतीय समाजांनी नेहमीच मुभा दिली होती. सर्वसंगपरित्याग करून समाजातून बाहेर पडणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणाची आस्था असल्याचा दावा करणाऱ्या श्रमणांना इथल्या समाजात नेहमीच नैतिक प्रतिष्ठा लाभली आहे. त्यांची शिकवण आणि त्यांचे कार्य यानुसार त्यांना लोकाश्रयही मिळाला आहे. तसेच पुढे सूफी आणि भक्ती परंपरेमध्येही सामाजिक न्यायाच्या शोधाची प्रेरणा होती, त्याचाही धागा भारतीय समाजमनात जिवंत होता. सत्याग्रहाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यामागे हे सातत्य महत्त्वाचे होते असा युक्तिवाद थापर करतात.

असहमतीची आजच्या काळातील अभिव्यक्ती

आपल्या निबंधाच्या अखेरीस थापर यांनी असहमतीचे हे सातत्य आजच्या काळापर्यंत आणून भिडवले आहे. त्यासाठी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स ऍक्ट या दोन्हींच्या विरोधात नवी दिल्ली येथील शाहीन बाग येथे जी निदर्शने झाली त्यांचे उदाहरण समोर ठेवले आहे. अत्यंत शांततेने आणि अहिंसक पद्धतीने चाललेल्या या चळवळीमधील मोठ्या प्रमाणातील स्त्रियांचा सहभाग, आणि धार्मिक परिभाषेचा वापर न करणारी, धर्मनिरपेक्ष अभिव्यक्ती यामुळे या चळवळीची नाळ मोठ्या प्रमाणात वसाहतवादविरोधी राष्ट्रवादाशी जोडलेली होती असे त्यांना वाटते.

अशा प्रकारच्या असहमतीच्या प्रसंगांना शासन कशा प्रकारे सामोरे जात आहे यावरून एक खरे लोकशाहीवादी शासन आणि नागरिकांच्या असहमतीबाबत उदासीन असणारे शासन यातील फरक लक्षात येतो असे त्या म्हणतात. जरी अगदी प्राचीन काळापासून असहमतीचे आवाज ऐकू येत असले तरीही, खऱ्या अर्थाने उदारमतवादी, लोकशाहीवादी समाजातच असहमती व्यक्त करणाऱ्या प्रश्नांचा मोकळेपणाने स्वीकार केला जातो. त्या प्रश्नांची कसून तपासणी करणे आणि चर्चेद्वारे तड लावणे या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. यापुढच्या काळात असहमतीचे आवाज वाढतच जाणार आहेत, मात्र ते आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो की परस्परसंवादाचा मार्ग अवलंबला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतिहासातील अनेक उदाहरणांसह प्राचीन काळापासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर समाजातल्या ‘अन्यां’बद्दलचे हे विवेचन नक्कीच रोचक आहे. ऐतिहासिक समाजाचे यांत्रिक पद्धतीने वर्गीकरण न करता, सरसकट लेबले न लावता त्यातल्या विविध प्रवाहांचा धांडोळा घेतला पाहिजे. आज ज्या प्रकारे लोकांना विभाजित करण्यासाठी इतिहासाचा वापर केला जात आहे त्याला विरोध करण्यासाठी तर हे फारच आवश्यक आहे आणि त्यासाठी हे पुस्तक खूपच महत्त्वाचे आहे. बरेचदा अशी महत्त्वाची मांडणी इंग्रजीतच येत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहते. मिलिंद चंपानेरकर यांनी शक्य तितक्या सोप्या मराठीमध्ये केलेल्या या अनुवादामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0