विज्ञानातील परी : मेरी क्युरी

विज्ञानातील परी : मेरी क्युरी

मेरीचं आयुष्य म्हणजे समोर यशाचं उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी ती त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढत राहिली.

आजपासून बरोबर ८६ वर्षापूर्वी म्हणजेच ४ जुलै १९३४ ला हे जग सोडून गेलेली, दोन वेळा विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारी, आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षाला, अपमानाला तोंड देऊन प्रत्येक ठिकाणी पहिलं असण्याचा मान मिळवणारी, निराशेला आशेची किनार देणारी, दोन मूलद्रव्यांचा शोध लावणारी, विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक. मेरी क्युरी (Marie Curie).

मेरी क्युरीचा जन्म १८६७ ला वर्साव, पोलंड (Poland) येथे झाला. लहानपणीचे तिचं नाव मारिया स्क्लोडोव्हस्का. पाच भावंडांपैकी ती एक. तिचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तर आई एका खाजगी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका. लहान वयात मारिया शाळेत जरी हुशार असली तरी काहीशी भित्री, शांत पण आपल्या भावंडांची काळजी करणारी होती. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिने शाळेत गोल्ड मेडल ही जिंकलं होतं. त्यावेळेस पोलंडमधील वातावरण फार काही चांगलं नव्हतं कारण पोलंड रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. लहान वयातच मारियाला आई-वडिलांकडून दया, कामातील तत्परता, आत्मनिरीक्षण, तंतोतंतपणा या गोष्टी अवगत झाल्या होत्या. असं जरी असलं तरी तिचं एकंदरीत आयुष्य काही नाट्यमय शोकांतिक घटनेनं भारलेलं होतं, त्याच कारण ती फक्त नऊ वर्षांची असताना तिची मोठी बहीण मरण पावली तर तिच्यावर उत्तम संस्कार, प्रेम करणारी तिची आई तिला कधीही मायेने जवळ करीत नसत याची तिला खंत असे. पण नंतर तिची आई मेल्यानंतर तिला ते कारण समजलं की आईला क्षय (TB) आजार होता त्यामुळेच ती मुलांना काळजीपोटी जवळ करत नसे.

त्यातून मारिया स्वतःला सावरते तोच तिचे वडील रशियन झारच्या अन्यायाच्या विरोधात बोलल्यामुळे आणि गुंतवणुकीत फसगत झाल्याने आर्थिकदृष्ट्या फारच दुर्बल झाले. त्यातूनही सावरुन तिने शिकवणी चालू केली आणि कुटुंबासाठी पैसे कमावू लागली. त्याच दरम्यान तिने कोणालाही न सांगता पोलीशमध्ये वनस्पतीशास्त्र, समाजशास्त्र या विषयांना प्रवेश घेतला त्याचबरोबर तिच्या एका नातेवाईकाची केमिकल लॅबोरेटरी होती तिथेही तिने केमिस्टचं प्रशिक्षण घेतल. तिथेच तिला संशोधनाची आवड निर्माण झाली. आता ती पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात शिक्षणाकडे ओढली गेली त्यामुळे तिला आणि तिच्या दुसऱ्या मोठ्या बहिणीला म्हणजेच ब्रोनीला उच्चशिक्षण घ्यायचं होतं पण तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती मग त्या दोघी बहिणींनी ठरवलं की परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं पण पुन्हा समोर आर्थिक प्रश्न होताच.

त्यातून दोघींनी एक मार्ग काढला. दोघींनी आपापसात एक सामंजस्य करार केला तो असा की पहिल्यांदा मोठ्या बहिणीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मारियाने इथे मायदेशात राहून गव्हर्नेस म्हणून काम करायचं आणि मिळतील ते पैसे बहिणीला पाठवायचे. ठरल्याप्रमाणे मारिया आपल्या बहिणीला पॅरिसला पैसे पाठवत. त्याच दरम्यान गव्हर्नेसचे काम करताना मारिया तिथल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि परत जे व्हायचं तेच झाल. त्यांच प्रेम तेथील व्यवस्थेला मान्य नव्हतं त्यातून तिला कामावरून काढून टाकल आणि पुन्हा एकदा तिच्या हाती निराशा आली त्यात ती खूप खचली. तोपर्यंत, ब्रोनीच पॅरिसमधील शिक्षण पूर्ण झालं होत. तिने तिकडे लग्नही केलं आता त्या दोघींच्या करारानुसार पुढील शिक्षण मारियाचे होते. १८९१ ला मारिया सोरबोन, पॅरिसला गेली. तिथे तिला पॉल लिपमन आणि बाऊंटी यांची व्याख्यान ऐकता आली, काही नवीन गोष्टी शिकता आल्या. तिथे तिची काही भौतिकशास्त्रज्ञांचीही ओळख झाली. त्या विद्यापीठात गेल्यावर मारियाने आपलं नाव मेरी असं रजिस्टर केलं आणि मारियाची मेरी क्युरी झाली. सुरुवातीला काही काळ तिच्या बहिणीकडे राहिली नंतर मुलींच्या वसतिगृहात काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर वसतिगृहाच्या व्हरांड्यात राहू लागली त्या ठिकाणी ती स्वतःची उपजीविका ब्रेड, बटर खाऊन करत. हे सगळं अस असलं तरी त्याचा तीच्या कामावर काहीही फरक पडत नव्हता. १८९३ साली सोरबोन मधून ती ग्रॅज्युएट होऊन पुन्हा वर्सावला नोकरी शोधू लागली पण त्यावेळेस युरोपमध्ये यशस्वी असूनही स्त्रियांना क्वचितच नोकरी मिळे. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा. त्याच दरम्यान तिला एक Aleksandrowiz नावाची शिष्यवृत्ती मिळाली. ती शिष्यवृत्ती परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. ती फेलोशिप घेऊन पुन्हा ती पॅरिसला गेली तिथे ती मॅग्नेटिझम प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोझिशन या विषयावर प्रोफेसर लीपमन बरोबर काम करू लागली पण काही प्रयोग करण्यासाठी तिला प्रयोगशाळेची गरज होती मग लीपमन यांनी तिची भेट फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पेर (Pierre Curie) याच्याबरोबर करून दिली. तो पेर खूपच हुशार आणि श्रीमंत होता. पेर Crystallography वर काम करत होता त्याने Piezoelectric effect चा शोधही लावला होता.

मेरी आणि पेर दोघे एकमेकांबरोबर बोलण्यात खूप वेळ घालवत असत आणि दोघांमध्ये काही वैचारिक साम्य आहे असं त्यांना जाणवलं, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी १८९५ साली लग्न केले. ते दोघे आपल्या दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी लग्नात भेट म्हणून मिळालेल्या सायकलवरून निसर्ग, प्राणी पाहत. त्याचवर्षी जर्मन शास्त्रज्ञ रोंटेजन (Wilhelm Rontgen) याने एक्स-रे चा शोध लावला होता. त्याच्या कामामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काही रसायनामधून विशिष्ट पद्धतीला बाहेर पडत होते हे त्याच्या लक्षात आलं. त्या कामाचा मेरी वर खूपच प्रभाव पडला दरम्यान, हेन्री बेक्वरेलने (Henri Becquerel) युरेनियम मधून काही रेडिएशन्स कसे बाहेर पडतात हे पाहिलं होतं. त्यात मेरीची अजूनच उत्सुकता वाढली मग तिने काही टेस्ट करायचं ठरवलं त्यासाठी तिने पिचब्लेंड (Pitchblende) नावाच मिनरल घेतलं. शास्त्रज्ञांना तिथपर्यंत माहीत होतं की पिचब्लेंडमध्ये युरेनियम आणि ऑक्सिजन हे दोनच घटक आहेत म्हणजेच UO2. पण मेरीन सांगितलं की पिचब्लेंडमधून जेवढे रेडिएशन्स बाहेर पडतात किंवा एनर्जी बाहेर पडते तेवढे एका मुलद्रव्यातून बाहेर पडत नाहीत. नंतर तिच्या अस लक्षात आलं की त्याच्यामध्ये अजून नवीन न शोधलेले मूलद्रव्य असू शकतात. ते काम करण्यासाठी पेरने आपलं हातातलं काम सोडून तिला खुपच मदत केली तिने प्रयोग करायचं ठरवलं आणि सुरुवात केली. एका मोठ्या भांड्यामध्ये पिचब्लेंड घेऊन ते उकळवलं आणि त्याची बारीक पावडर केली त्यामध्ये काही रसायनही घातली नंतर त्यातून काही मूलद्रव्य वेगळी होतात का याचा अभ्यास करू लागली. प्रत्येक दिवशी सकाळी ती प्रयोगशाळेत त्या भांड्यामध्ये मोठ्या लोखंडी रॉडच्या साहाय्याने काही रसायन टाकत आणि मिसळत. खूप अथक परिश्रमानंतर तिला एक मूलद्रव्य सापडलं ते मूलद्रव्य बाकीच्या मूलद्रव्यांपेक्षा चारशे पटीने अधिक रेडिओअॅक्टिव (Radioactive) होतं आता या मूलद्रव्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न तिच्या समोर आला पण विज्ञाननिष्ठ आणि देशभक्त असलेल्या मेरीने त्या मूलद्रव्याला स्वतःचं नाव न देता तिने आपल्या देशाच्या नावावरून, पोलंडवरून पोलोनियम (Polonium) असं नाव दिलं. तिने आपलं काम तसंच चालू ठेवलं, पुढील काही वर्षात तिने अजून एका मूलद्रव्याचा शोध लावला आणि त्या मूलद्रव्याला रेडियम (Radium) असं नाव दिलं. रेडियम पोलोनियम पेक्षा नऊशे पट जास्त रेडिओअॅक्टिव होता नंतर मग रेडिओऍक्टिव्हिटी ही संज्ञा मेरी मुळेच जास्त प्रचलित झाली. खरतरं रेडियम शोधण्यासाठी तिला खूप वेळ खर्च करावा लागला होता त्याच्यात पण एक गंमत झाली होती. एके दिवशी ती रात्रीच्या वेळेस प्रयोगशाळेत गेली असता काचेच्या भांड्याच रूप तिला तेजस्वी पाहायला मिळालं आणि ती चमकलीच कारण ती जी चकाकी होती ती रेडियम मूलद्रव्याची असं तिच्या लक्षात आलं. रेडियम आणि पोलोनियम खूप ऊर्जा किंवा रेडिएशन्स देत होते. इतर शास्त्रज्ञापेक्षा मेरीच मत काहीसं वेगळं होतं ती सांगत होती ऊर्जा ही कोणत्याही पदार्थाच्या पृष्ठभागावरून बाहेर न पडता ती अणुच्या आतून तयार होते. हा तिचा शोध पुढे जाऊन अणुच्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरणार होता.

तिच्या या सर्व कामामधून १९०३ मध्ये तिला डॉक्टरेट ही पदवी मिळाली. तिथेही तिला पहिलं असण्याचा मान मिळाला कारण सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवणारीही ती पहिली महिला वैज्ञानिक ठरली. त्याच वर्षी मेरीला पेर आणि बेक्वरेल यांच्याबरोबर रेडिओऍक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. पण पुन्हा तेच, गुणवत्ता असूनही वाट्याला नाकारलेपण. ती महिला शास्त्रज्ञ असल्याची अडचण. इतर शास्त्रज्ञानाही तोपर्यंत महिला शास्त्रज्ञ असल्याचं रुचत नव्हत. नोबेल समितीने पेर आणि बेक्वरेल या दोघांचीच नाव पुढं केली पण मग पेरने नोबेल समितीला समजावून सांगितल की हे मूळ काम मेरीचच आहे. आजारपणामुळे मेरी आणि पेर पुरस्कार घ्यायला गेले नाहीत. नोबेलची मिळालेली रक्कम तिने पोलंड मधील गरीब लोकांना दान केली.

युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये पेरची प्रोफेसर म्हणून निवड झाली त्याच वेळेस मेरी सुद्धा चीफ असिस्टंट म्हणून काम करू लागली. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात भयंकर घटना घडली, १९०६ मध्ये रहदारीच्या रस्त्यावरून फिरत असताना तिचा नवरा पेरला धावत्या घोडागाडीने उडवलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी पेर आपल्या वैज्ञानिक कामातील आणि आयुष्यातील जोडीदाराला सोडून गेला, त्या दुःखातून सावरण्यासाठी मेरी पुन्हा आपल्या दोन मुलींना सांभाळत विज्ञानाच्या कामात व्यस्त झाली. १९०६ साली मेरी युनिव्हर्सिटीमध्ये महिला प्रोफेसर म्हणून रुजू झाली हे सोरबोनच्या इतिहासात प्रथमच घडत होतं. १९०९ मध्ये पॅरिसला रेडियम इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन झाली त्यातील एका प्रयोगशाळेची ती संस्थापकही झाली. १९११ साली ब्रुसेलला एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती त्या परिषदेला हजेरी लावण्याचा तिला मान मिळाला त्या परिषदेमध्ये ती एकटीच महिला शास्त्रज्ञ होती बाकीचे रुदरफोर्ड, मॅक्स प्लांक, आईन्स्टाईन, लांगेविन वगैरे सगळे पुरुष शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्याच वर्षी म्हणजे १९११ ला पुन्हा तिला नोबेल पारितोषिक देण्यात आले ते तिच्या रसायनशास्त्राच्या कामासाठी. रेडियम, रेडियमची कंपाऊंड आणि रेडियमच धातूसदृश रूप शोधल्याबद्दल. पुन्हा तेच, तिला त्या नोबेलचा आनंद साजरा करण्याअगोदरच विधवा मेरी आणि चार मुलांचा बाप असलेला तिचा प्रयोगशाळेतील सहकारी म्हणजेच लांगेविनच प्रेम प्रकरण आहे अशी काही पत्रकं प्रसिद्ध करण्यात आली. तिच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला. फ्रांससारख्या देशातील लोकं सुद्धा तिच्या चारित्र्यावरून टीका करू लागले. त्यात आईन्स्टाईनने सुद्धा भर घातली, तो म्हणाला मेरी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलीय की तो तिच्या भावनांसाठी पात्र नाही. ती स्वतःचा आनंद किंवा दुःख ही व्यक्त करू शकत नाही. या सर्व दुःखातून सावरण्यासाठी आणि लांगेविनपासून दूर, वेगळं होण्यासाठी तिने त्याला पैसेही दिले. दुःख विसरण्यासाठी ती मुलींना घेऊन पोलंडला गेली ती जरी मानसिकरित्या सावरली असली तरी ती आयुष्यभर आतून दुःखी होती. मेरीचं आयुष्य म्हणजे समोर यशाचं उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी ती त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढत राहिली. तिला वर्साव पोलंडमध्ये संशोधन करण्यासाठी काही आमंत्रण मिळालीत पण तिने तिच्या नवऱ्याच स्वप्न असलेल्या रेडियम इन्स्टिट्यूटला काम करण्याच ठरवल.

पहिल्या महायुद्धात तिने मोबाईल रेडिओग्राफी किट बनवले आणि जखमी सैनिकावर उपचारही केले त्यासाठी तिने काही लोकांना, डॉक्टरांना त्या कामात प्रशिक्षण दिले. १९१८ साली जेव्हा पोलंड देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मेरी वर्साव मधील रेडियम इन्स्टिट्यूटची सक्रिय सभासद झाली. त्या इन्स्टिट्यूटच ध्येय कॅन्सर पेशंटवर उपचार करन होत.

मेरीला दोन मुली होत्या. मोठी इरिन तर लहान ईवा. मुलगी इरिन आणि जावई फ्रेड्रिक जोलीयट यांना आर्टिफिशल रेडिओऍक्टिव्हिटी या शोधाबद्दल १९३४ सालच नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं पण ते पाहायला मेरी नव्हती. खरतर ज्यावेळेस मेरी रेडिओऍक्टिव्हिटी वर काम करत होती त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी तर त्या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब खिशात घेऊन फिरत, रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रावर मध्येही ठेवत. शेवटी व्ह्यायच तेच झाल. मेरीला रेडिओऍक्टिव्हिटीच्या अतिवापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. त्यात ती मरण पावली. एवढच काय मेरी आणि पेरने लिहून ठेवलेल्या नोंदवहीवर सुद्धा रेडिओऍक्टिव्हिटीचा परिणाम झाला म्हणूनच ती वही लेड (Lead)  बॉक्स मध्ये जतन करून ठेवलीय. ६ जुलै १९३४ ला मेरीला तिच्या नवऱ्याच्या, पेरच्या बाजूला पुरण्यात आलं.

प्रश्न असा येतो की मेरीने जगाला काय दिलं ? तिच्या कामाचा उपयोग आज न्यूक्लिअर एनर्जी तसच अनेक कॅन्सरच्या उपचारासाठी करण्यात येतो. तिने ४८३ शोधनिबंध प्रसिद्ध केले तर तर ३४ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मेरी युरोपमधील पहिली महिला होती जिने सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली होती.

तिच्या विज्ञानरूपी कर्तृत्वामुळे ती मृत्यूनंतरही नावाने जिवंत राहिली. रेडियम इन्स्टिट्यूट, पॅरिसच (Radium Institute, Paris) नाव क्युरी इन्स्टिट्यूट करण्यात आलं. तिच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराला १०० वर्ष  झाली म्हणून २०११ हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ केमिस्त्री म्हणून साजर केलं गेलं. जेव्हा १९४४ ला एका नवीन रेडिओअॅक्टिव मूलद्रव्याचा शोध लागला तेव्हा त्याचं नाव क्युरी दाम्पत्य सन्मानार्थ ठेवण्यात आलं- क्युरियम. १९९५ साली फ्रेंच अध्यक्षांच्या विनंतीवरून मेरी आणि पेरचे काही उरलेसुरले अंश फ्रान्सच्या पँथिऑन राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आले.

नंतरच्या काळात आईंस्टाईनच मत तिच्याबद्दल काहीस वेगळ झालं होतं आणि तो असं म्हणाला मेरी अशी एक व्यक्ती आहे जी कधीही प्रसिद्धीमुळे भ्रष्टाचारी झाली नाही, तिच्यामुळे विज्ञानाचीही प्रतिमा बदलेल.

मेरीच योगदान, कर्तृत्व रेडियम सारखं चमकत राहील यात शंकाच नाही.

डॉ. अमोल पवार, हे के. जे. सोमय्या महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

 

COMMENTS