मतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा

मतदान करण्यापूर्वी टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ वाचा

उजवे हिंदुत्ववादी तुम्हाला ज्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सांगतात त्या कशा चुकीच्या आहेत हे टोनी जोसेफ यांचे ‘अरली इंडियन्स’ अतिशय चांगल्या प्रकारे, पुराव्यानिशी मांडते.

ओबीसी आरक्षण : राज्य सरकार अध्यादेश काढणार
आभासी खोलीतले एक-एकटे
वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर

टोनी जोसेफ यांच्या डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्याअरली इंडियन्सया पुस्तकाबद्दल खरे तर मी जरा उशीराच लिहीत आहे. संपूर्ण देशाच्या पातळीवर इतके महत्त्वाचे असणारे पुस्तक क्वचितच प्रकाशित होते. थोडाफार उशीर मी जाणूनबुजूनच केला आणि आता, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना खरोखरच हीच त्याबद्दल बोलण्यासाठीची सर्वात योग्य वेळ आहे. हा संदर्भ विचारात घेतला तर अरली इंडियन्स हे केवळ वाचून विसरून जावे असे पुस्तक नाही. १९ मेला शेवटचे मतदान होण्यापूर्वीच्या येत्या काही दिवसात हे पुस्तक वाचा, समजून घ्या, त्यावर चर्चा करा, इतरांना त्याबद्दल सांगा आणि त्यामध्ये जे काही लिहिले आहेते पसरवा यासाठी सर्व भारतीयांना घातलेली ती साद आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये टोनी जोसेफ यांच्या लेखांमधून मला त्यांची ओळख आहे. द हिंदू मध्ये लिहिलेल्या हडप्पा संस्कृतीच्या रचेत्यांचे मूळ किंवा आर्यांचे भारतातील स्थलांतर यासारख्या विषयांना हात घालणाऱ्या लेखमालिका तर मला अगदी चांगल्या आठवतात. अरली इंडियन्स वाचल्यानंतर मी त्यांची पार्श्वभूमी काय याचा गूगलवर शोध घेतला आणि ते एखादे शास्त्रज्ञ किंवा विचारवंत नाहीत तर दीर्घकाळ पत्रकार आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम करत आहेत हे वाचून मला आश्चर्य वाटले. लोकसंख्या जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्र यासारख्या विषयांबाबतची बहुसंख्य पुस्तके बहुधा शैक्षणिक संस्थांमधील विद्वानांनी लिहिलेली असतात.
त्यानंतर काही दिवसांनंतर, एका संभाषणाच्या वेळी जोसेफ यांनी मला सांगितले की त्यांना बराच काळ या विषयामध्ये रुची आहे. अरली इंडियन्स हे पुस्तक म्हणजे अनेक वर्षे या क्षेत्रामध्ये केलेले संशोधन, वाचन तसेच वरिष्ठ संशोधकांशी होणाऱ्या चर्चा व संवाद यांचे फलित आहे. त्यांच्या लिखाणाची गुणवत्ता आणि स्पष्टता यातून ते सहज दिसून येते. जोसेफ मान्य करतात की पुस्तकामध्ये आजच्या तारखेला जे शास्त्रीय ज्ञान आहे तेच सादर केले आहे आणि जसजसे आणखी शोध लागतील तसतसे आपली या विषयाच्या बाबतीतली समज आणखी विकसित होत जाईल. मात्र या पुस्तकाने भारतीय इतिहासाच्या लिखाणाबाबत एक पाया रचला आहे – असा पाया जो पुढची कित्येक वर्षे बदलण्याची फारशी शक्यता नाही.
वस्तुतः, हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या संदर्भात अनन्यसाधारण आहे. कारण ते अगोदरच जे पुरातत्त्वशास्त्रीय आणि भाषाशास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये लोकसंख्या जनुकशास्त्रामधून मिळालेल्या, खरोखर निर्विवाद म्हणता येतील अशा पुराव्यांची भर टाकते, आणि ते सगळे एकमेकांमध्ये जोडले जातात. अरली इंडियन्स मध्ये उद्धृत केलेल्या लोकसंख्या जनुकशास्त्रातील अनेक गोष्टी अलिकडच्या, मागच्या दशकातल्याच आहेत. पुस्तकाच्या शेवटी, वाचकाला आपल्या इतिहासाबाबत अधिक चांगली समज निर्माण होते. त्यामधील अनेक महत्त्वाचे निष्कर्ष उजव्या मूलतत्त्ववाद्यांची विचारप्रणाली आणि समजुतींना सुरुंग लावतात.

  • आधुनिक मानव ३००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये निर्माण झाला आणि ६५,००० वर्षांपूर्वी भारतात पोहोचला. आजच्या बहुसंख्य भारतीयांचा – मग ते ब्राम्हण असोत, अन्य कोणत्या जातीचे असोत की आदिवासी असोत – आईच्या बाजूने येणारा (maternally derived) मायटोकॉन्ड्रियल डीएनए सारखा आहे. आणि तो बाकी जगापेक्षा मात्र बराच वेगळा आहे. अशा रितीने, जवळजवळ सर्व भारतीयांचा मातेकडून येणारा जनुकीय आधार केवळ सारखाच नाही तर अनन्यसाधारणही आहे.
  • त्या तुलनेत आपले पित्याकडून येणारे वाय गुणसूत्र अधिक वैविध्यपूर्ण आहे आणि अलिकडच्या काळात आलेल्या स्थलांतरितांपर्यंत त्याचा माग काढता येतो. हे स्थलांतरित दूरवरच्या युरोपियन स्तेपपासून ते इराणमधील झाग्रोस पर्वत आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांमधूनही आले होते. 
  • हडप्पा संस्कृती ही युरोपियन स्तेपमधून आलेल्या ‘आर्यां’पेक्षा जुनी होती. ती स्थानिकरित्या विकसित झाली, पण त्याच्याही हजारो वर्षे आधी झाग्रोस पर्वताकडून आलेल्या स्थलांतरितांनी त्यांना शेतीचा विस्तार करण्यात मदत केली, जी या विकासासाठीची आवश्यक पूर्वअट होती. हडप्पा संस्कृतीतील लिपी अजूनही वाचता आलेली नाही, पण तिची मुळे इराणमधल्या प्रोटो-एलामाईट भाषेमध्ये असण्याची शक्यता आहे. हडप्पातील भाषा ही आजच्या दक्षिण भारतातील द्रविडी भाषांचेच सुरुवातीचे रूप असण्याची शक्यता आहे.
  • संस्कृतचे मूळ युरेशियन स्तेप मध्ये आहे. स्वतःला ‘आर्य’ म्हणवणाऱ्या इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या लोकांनी ती भारतात आणली आणि मग ती इथेच विकसित झाली.
  • सगोत्र विवाह आणि जातीसंस्था या गोष्टी पशुपालक आर्य भारतात आल्यानंतर लगेच सुरू झाल्या नाहीत. वस्तुतः, शेकडो वर्षे सरमिसळ होत राहिली आणि सुमारे २,००० ते २,५०० वर्षांपूर्वी, बहुधा त्या काळातील राजकीय परिस्थितीच्या कारणाने ती बंद झाली. 

गोंधळ निर्माण करू शकतील असे अनेक मुद्दे असूनही इतकी स्पष्टता आणि वाचनीयता असणारे आणि आपल्या मुळांबद्दलच्या कथा रोमांचक बनवणारे सुरेख पुस्तक लिहिल्याबद्दल आपण जोसेफ यांचे आभार मानले पाहिजेत. बाकी काही नाही तरी किमान शास्त्रीय पुरावे किती रोचक असू शकतात हे जाणून घेण्यासाठी तरी प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचले पाहिजे. या पुस्तकातील उतारे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.

जय देसाई, मज्जाविकारतज्ञ आहेत

मूळ लेख

अनुवाद – अनघा लेले 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: