युतीसाठी मायावतींशी संपर्क साधला पण त्यांनी दुर्लक्ष केलेः राहुल गांधी

युतीसाठी मायावतींशी संपर्क साधला पण त्यांनी दुर्लक्ष केलेः राहुल गांधी

नवी दिल्लीः उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बसपाच्या अध्यक्ष मायावती यांच्याशी युती करण्यासाठी हात पुढे केला होता व त्या युतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहतील असा काँग्रेसचा प्रस्ताव होता पण मायावतींनी आमच्याशी साधी चर्चाही केली नाही, असा खळबळजनक खुलासा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.

राहुल यांनी आपल्या भाषणात असाही दावा केला की, ईडी, सीबीआय व पेगॅसस मार्फत भाजपकडून मायावतींवर दबाव आणला जात असल्याने त्या दलितांच्या हक्कासाठी, अधिकाऱासाठी लढू शकल्या नाहीत त्यामुळे भाजपला सत्तेचा मोकळा मार्ग मिळाला.

शनिवारी माजी प्रशासकीय अधिकारी व काँग्रेस नेते के. राजू यांच्या ‘द दलित ट्रूथः बॅटल्स फॉर रियलायझिंग आंबेडकर्स व्हिजन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभादरम्यान राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, उ. प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी आम्ही मायावतींना युती करावी अशी विनंती करत होतो. तुम्ही मुख्यमंत्री व्हा असाही आमचा प्रस्ताव होता पण मायावतींनी आमच्याशी साधी चर्चाही केली नाही. उ. प्रदेशात सीबीआय, ईडी व पेगॅससच्या मार्फत राजकीय व्यवस्थांवर नियंत्रण आणले जात आहे. कांशीराम यांनी आपले रक्त आटवून दलितांचा आवाज राजकारणात आणला. त्याने काँग्रेसचे बरेचसे नुकसान झाले. मायावती दलितांच्या आवाजासाठी आपण लढणार नाही असे म्हणत आहे त्याला कारण ईडी, सीबीआय, पेगॅसस असून भाजपला मोकळे रान मिळाले. मला एक जरी रुपया मिळाला असता तर मी येथे भाषण देऊ शकलो नसतो, कोपऱ्यात बसून राहावे लागले असते, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपकडून देशातील लोकशाही संस्थावर सुरू असलेल्या हल्ल्यावरून व त्यांच्यावर नियंत्रण आणण्यावरूनही आरोप केले. भारत हा घटनेवर उभा राहिलेला देश आहे. आणि लोकशाही संस्थांविना घटना अपुरी आहे. आपणा सर्वांना घटनेचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. घटनेचे संरक्षण लोकशाही संस्थांच्या माध्यमातून होते. पण आज आरएसएसच्या हातात सर्व संस्था असल्याचा आरोप त्यांनी केला.

मी सत्ता असताना जन्माला आलो पण मला विचित्र असा आजार आहे की, त्यात अजिबात रस वाटत नाही. अनेक नेत्यांना सकाळी उठल्यावर आपल्याला सत्ता कशी मिळेल असे प्रश्न पडतात. पण मला त्यात इंटरेस्ट नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS