महाजनादेशाचा अन्वयार्थ

महाजनादेशाचा अन्वयार्थ

काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.

पक्षांतर आणि सामान्य मतदार
मुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये
विरोधकांची राष्ट्रपतींना विनंती पण शहा कायद्यावर ठाम

‘विजय मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिले पाहिजे’ महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला भाजप- शिवसेनेने स्वतःला कायम विजयी भूमिकेत पहिले. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सर्वकाळ पराभूत मानसिकतेत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजयाचा आत्मविश्वास त्यांनी कधीही कमी झालेला दाखवून दिला नाही. कायम २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा त्यांचा हा दावा मात्र निकालात प्रतिबिंबित होताना दिसत नाही, तो ही लोकसभेतील प्रचंड यशानंतर व मोठ्या प्रमाणावर भाजप – शिवसेनेत झालेल्या पक्षांतरानंतरही.

या संदर्भात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षांतर केलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या २५ पैकी केवळ १९ सदस्यांनाच या निवडणुकीत यश प्राप्त झाले आहे. पक्षांतर करून केवळ चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या व नंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निकालाने एकप्रकारे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना त्यांना निवडणुकीत मिळालेले यश हे त्यांचे व्यक्तिगत नसते तर संघटना व पक्षाचे असते हे दाखवून दिले आहे.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मानसिक पातळीवर झालेले पक्षांतर जनतेने यातूनच चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. भाजप व शिवसेना युतीला अपेक्षित यश न मिळण्यामागे त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणल्याने तयार झालेली नाराजीसुद्धा कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असताना ज्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे नेते भाजपात व शिवसेनेत उमेदवारी मिळविताना दिसत होते तर ज्यांनी सातत्याने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या  विरोधात आवाज उठविला त्या प्रमुख नेत्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजप- शिवसेनेचा मतदार निश्चितच दुखावला गेला ज्यामुळे त्यांना अपेक्षित यश प्राप्त होताना दिसत नाही.

भाजपला केवळ १०० च्या आसपास जागा मिळाल्यामुळे आता भाजपला कायम शिवसेनेवर विधानसभेत विसंबून राहावे लागेल आणि त्याची पुरेपूर किंमत शिवसेना उठवत राहील हे निश्चितच.

निकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचा ५० : ५०चा आग्रह बरेच संकेत देऊन जात आहे. या शिवाय २०१४च्या निकालानंतर सुरवातीला ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची ऑफर दिली त्यावेळी अल्पमतात असलेल्या भाजपने शिवसेनेस शिरजोर होऊ दिले नाही. उलट त्यांनी सत्तेच्या वाटणीत आपल्या मनाप्रमाणे शिवसेनेला वाकवले. तसे सहकार्य यावेळी शरद पवार यांच्याकडून भाजपला मिळण्याची कोणतीही अपेक्षा नाही. किंबहुना भाजपशी बार्गेनिंग करण्याकरिता शरद पवारांचा वापर यावेळी शिवसेना करण्याची पूर्ण शक्यता आहे. तशी शिवसेनेला मदत यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडूनही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश हे महाराष्ट्राच्या मतदारांच्या प्रगल्भतेचे लक्षण म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही पक्षातून पक्षांतर होऊनही या पक्षांनी आपले संख्याबळ वाढविले आहे. असा जनादेश देताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपेक्षा पक्ष संघटना व वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असते हे जनतेने दाखवून दिले आहे.

सातारचे उदयनराजे भोसले व पक्षांतर करणाऱ्या जवळपास २५ पैकी १९ आमदारांचा पराभव करून जनतेने या नेत्यांची चूक दाखवून दिलेली दिसते.

या निवडणुकीत ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आजारपणात वयाच्या ७९ व्या वर्षी स्वतःला झोकून दिले व आपल्या आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निरुत्तर केले ती निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गौरवाने नोंद घेणारी घटना ठरणार आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत निरस व एकतर्फी वाटणारी निवडणूक शरद पवारच्या प्रचारामुळे शेवटच्या टप्प्यात रंगतदार व उत्कंठावर्धक झाली. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच या निवडणुकीत सर्वाधिक फायद्यात त्यांचा पक्ष असल्याचे दिसून येते.

या निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेतून जात होता. लोकसभेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने आजारीपणात सोनिया गांधींकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आले होते. या निवडणूक काळात सोनिया गांधी या Non Playing Capton सारख्या वाटत होत्या. राहुल गांधी व काही मोजके नेते सोडले तर महाराष्ट्रात देशभरातील कोणीही नेता फारसा प्रचारात दिसला नाही. आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना जबाबदारी देऊन त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला मिळालेले हे यश केवळ प्रामाणिक काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे व मतदाराचे आहे.

या निवडणुकीने सर्वच पक्षांना धडा दिला आहे. भाजपला १००च्या  आसपास जागा देताना त्यांना कायम शिवसेनेच्या गरजेची जाणीव ठेवण्यास भाग पाडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.

प्रा. डॉ. प्रमोदकुमार ओलेकर आर्टस् अंड कॉमर्स कॉलेज, आष्टा येथे  सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: