माध्यमे आणि विषाणू

माध्यमे आणि विषाणू

चीन-युरोपमध्ये पसरत चाललेली कोरोना विषाणू महासाथ आपल्याकडे वेगाने येत आहे, याचा अंदाज अगदी फेब्रुवारीअखेरपर्यंत भारतातल्या बहुतेकतर वृत्तवाहिन्यांना येत नव्हता. कारण आपल्याकडील हिंदी-इंग्रजी वा प्रादेशिक टेलिव्हिजन पत्रकारिता जगातल्या घडामोडींना फारसे गांभीर्याने घेत नाही. काही थोडीबहुत वर्तमानपत्रे आहेत त्यांमध्ये कोरोना विषाणू संदर्भातील घडामोडी प्रसिद्ध होत होत्या. काही संशोधकांचे, शास्त्रज्ञांचे त्या संदर्भातील लेख प्रसिद्ध होत होते, वुहानमधील परिस्थिती सांगितली जात होती. पण आपली टेलिव्हिजन पत्रकारिता डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतदौरा, दिल्ली दंगल व मध्य प्रदेशातील ‘ऑपरेशन लोटस’मध्ये पुरती मग्न होती. त्यात दिल्ली दंगलीसारखा गंभीर विषय टेलिव्हिजन माध्यमांनी अत्यंत बेजबाबदारपणे हाताळला. प्रस्थापित व्यवस्थेला धार्जिणी अशी वृत्ते देऊन आपण जणू पत्रकारिता सांभाळली असा वृत्तवाहिन्यांचा एकूण पवित्रा होता.

सध्या हिंदू-मुस्लिम नॅरेटिव्ह खेळण्यात उजव्या राजकीय पक्षांपेक्षा टेलिव्हिजन माध्यमांचा हातखंडा अधिक झाला आहे. उजव्या राजकीय पक्षांचा समाजात दुही माजवण्याचा जो अजेंडा असतो तो आता माध्यमे काही सेकंदात कोट्यवधी जनतेपुढे नेतात, त्यावर एकतर्फी चर्चा घेतात, घटना-विषय-प्रकरणे यावर न्याय देऊन रिकामे होतात. सामाजिक दुही माजवण्यात राजकीय पक्षांना पूर्वी काही वर्षे लागत असत, ते आता ही माध्यमे काही मिनिटांत करतात. एकूणात काय तर सत्ताधाऱ्यांना आता आपल्या कार्यकर्त्यांना काम देण्याचे प्रयोजन उरलेले नाही. शक्तीशाली माध्यमे आपणहून सत्ताधाऱ्यांजवळ आलेली आहेत. त्यांनी लोटांगणे घातली आहेत, माध्यमातील पत्रकार नि:ष्पक्ष पत्रकारितेच्या नावाखाली व्यवस्थांच्या बाजूने बोलतात, तेव्हा सरकारला आणखी काय हवे असते!

दिल्ली दंगलीनंतर कोरोनाची महासाथ हा असाच टेलिव्हिजन माध्यमांच्या हातातून बेजबाबदारपणे हाताळलेला विषय आहे. कोरोनाचे गांभीर्य माध्यमांना पहिले कळायला हवे पण आपल्याकडे उलटे झाले. सरकारला थोडे लवकर गांभीर्य कळाले त्यानंतर माध्यमे त्या संदर्भात बोलू लागली पण ती काय बोलू लागली? कोरोनासंदर्भातील जेवढी चुकीची, विपर्यास वृत्ते दिली गेली त्यात टेलिव्हिजन माध्यम आघाडीवर होती. याबाबत एकाही संपादकाला खंत वाटलेली नाही. कोरोनासारख्या महासाथीत पत्रकारितेचा प्रवास समाजाला, देशाला कोणत्या विध्वंसाकडे घेऊन चाललेला आहे, हे साधे प्रश्न संपादक, पत्रकारांना पडेनासे झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जाहिरातदार कमी झाल्याने टीआरपीसाठीची स्पर्धा अधिक कडवट झाली आणि त्यासाठी माहितीची शहानिशा न करता बातम्यांचा रतीब सुरू झाला.

परवा एका मराठी वृत्तवाहिनीने लॉकडाऊनच्या काळात मजुरांना घेऊन जाण्यासाठी ट्रेन सुरू होणार असे वृत्त दिले आणि त्यानंतर मुंबईत वांद्रे स्थानकानजीक हजारो परराज्यातील मजूर जमा झाले. त्याने देशभर खळबळ माजली. या वृत्तामुळे ट्रेन सुरू होणार असल्याची अफवा पसरली म्हणून राज्य सरकारने त्या संबंधित पत्रकाराला ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हे दाखल केले.

बेजबाबदारपणे, कोणतीही शहानिशा न करता, पुरावे हाती नसताना, अपुरी माहिती हाती असताना एखादे वृत्त देणे ही खरी बातमीदारी नसते. संबंधित पत्रकाराने आपल्याकडील रेल्वे प्रशासनाचे एक पत्र पुरावा म्हणून व अन्य वर्तमानपत्रातील वृत्तांचा दाखला दिला. पण त्याने मूळ वृत्त खरे ठरले का? तर याचे उत्तर नाही असे आहे. रेल्वे सुरू होणार आहे, अशी माहिती ज्या रेल्वे अधिकाऱ्याने दिली ती समजा खरी असली तरी ऐनवेळी रेल्वे लॉकडाऊनमुळे ३ मे पर्यंत धावणार नाही असा केंद्र सरकारने उच्चस्तरीय निर्णय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले असेल तर ती बातमी मागे घेण्याची तरी तसदी घ्यायला हवी होती. तसा लगेचच खुलासा तरी करायला हवा होता. अनेकदा ब्रेकिंग न्यूज मागे घेतल्या गेल्या आहेत. टेलिव्हिजन वा इंटरनेट माध्यमातून बातम्यांमध्ये अपडेट सहज करणे शक्य आहे. तो पर्याय का वापरला गेला नाही.

स्पेक्युलेटिव्ह बातम्यांची ही वेळ नाही याचे भान त्या पत्रकाराला व त्या वृत्तवाहिन्याला ठेवता आले नाही. माहिती संदिग्ध असेल तिची शहानिशा होत नसेल तर किमान माहितीतील संदिग्धता ही लोकांपर्यंत आहे तशी नेली असती आणि ते प्रेक्षकांना तसे स्पष्ट केले असते तर चालले असते. पण तसे झाले नाही. माहिती अपुरी असूनही ती पूर्ण असल्याचे चित्र पडद्यावरून गेले आणि गर्दी जमा होऊ नये म्हणून इतके दिवस जे सगळे काही प्रयत्न सुरू आहेत ते फोल ठरले. ब्रेकिंग न्यूजच्या धडपडीत सत्य, वस्तुस्थिती प्रेक्षकांपर्यत पोहचण्यापेक्षा अफवा गेली व सगळा गोंधळ झाला.

आपल्याकडील सर्व वृत्तवाहिन्यांवर ग्राफिक्सचा भडीमार असतो. अनेकदा ग्राफिक्समध्ये सांगितलेली माहिती व पडद्यावरचा अँकर व रिपोर्टर देत असलेली माहिती यामध्ये तफावत होऊ शकते. ग्राफिक्सचा अतिरिक्त वापर हे प्रेक्षकांना आपल्या चॅनेलवर खिळवून ठेवण्याचे एक तंत्र आहे. प्रेक्षकाने केवळ आपल्याच माहितीवर विश्वास ठेवावा याचा अट्टाहास सगळ्याच वृत्तवाहिन्यांचा असतो. या बरोबर उलटे चित्र परदेशी वृत्तवाहिन्यांवर असते. त्यांचा पडदा अगदी साफ असतो. ब्रेकिंग न्यूज कशाला म्हणायचे याची एक चौकट, मर्यादा या वृत्तवाहिन्यांनी स्वत:भोवती आखून घेतलेली आहे. आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज कशाला म्हणायचे याचे काही ताळतंत्रच राहिलेले नाही. एखाद्या बातमीतले नाव जरी चुकीचे लिहिले गेले किंवा उच्चारले गेले तरी या वाहिन्या आपली चूक कबुल करतात. आपल्याकडे बातमी चुकीची असल्याची कबुली किती वृत्तवाहिन्या देतात?

आपल्या मराठी वृत्तवाहिन्यांना कोरोना साथीची भयानकता अद्याप लक्षात आलेली नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या आधुनिक म्हणवल्या जगावर आलेले हे एक महासंकट आहे, हे दुर्दैवाने पत्रकारांना समजलेले नाही. ही युद्धपत्रकारिता तर अजिबात नव्हे की शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्याची बातमी आणता येईल, असे साहस यात आहे! यात सर्वांचा शत्रू एकच कोरोना विषाणू आहे, बुमपुढे बोलणारा माणूस नव्हे. प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे. तो कोणत्या धर्माचा, जातीचा आहे हे प्रश्नच फिजुल आहेत. पण या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना बाधितांच्या, मरणारांच्या धर्माची, जातीची चिकित्सा महत्त्वाची वाटते.

सध्या असे वातावरण आहे, की बरेचसे टीव्ही संपादक टीआरपी घसरत चालला म्हणून चिंतेत आहेत. फिल्डवरच्या आपल्या पत्रकाराला ते ‘कडक’, ‘ब्रेकिंग’ बातमी हवी म्हणून त्याचा जीव धोक्यात घालायला लावतात. ही खरी पत्रकारिता नव्हे, तर अमानुषपणा आहे. कोरोना संदर्भात प्रत्येक बातमी प्रेक्षकाला हवी असा कोणी हट्ट धरला आहे? कोणी पत्रकारांना आपले जीव धोक्यात घालावेत असे सांगितले आहे? ही बाजारपेठ स्पर्धा माणसाच्या जीवापेक्षा मोठी आहे, असे या संपादकांना का वाटते? जगभरातले सर्व देश आपापली कोरोनाची माहिती अपडेट करत असतात. जॉन हॉपकिन्ससारखी संस्था, आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवून आहेत, ते अडव्हायजरी देत असतात. आपल्याकडे राज्य आरोग्य यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन आहे, पोलिस आहेत. अशी व्यवस्था कार्यरत असताना समाजामध्ये केवळ धर्मावरून, वर्गीय भेदावरून फूट, द्वेष, मत्सर निर्माण करणाऱ्या बातम्या देण्यातून कसली सामाजिक बांधिलकी हे पत्रकार सांगत आहेत?

कोरोनाचे संकट सर्वव्यापी आहे यात श्रीमंतापासून गरीबही भरडत निघाला आहे. प्रत्येकाला त्याची झळ बसली आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था बुडत निघाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या प्रेक्षकांसाठी जीवघेणा खेळ खेळत राहायचा हे नक्कीच मानवतावादी आहे का? माणसं जगवणं, ती अधिकाधिक जगवणं, धर्म-जातीच्या पलिकडे जाऊन समाजहितकारी वृत्तांकन करणे, ही खरी पत्रकारिता आहे. पण ही प्रगल्भता दुर्दैवाने दिसत नाही.

कोरोनाची महासाथ ही राजकारण करण्याची बाब नाही हे कळण्याएवढी आपली माध्यमे निर्बुद्ध आहेत, असे म्हणताही येत नाही. कारण याच माध्यमांनी राष्ट्रवादाच्या बेफान झुंडीचे नेतृत्व स्वीकारले आहे. या झुंडीत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिंदू-मुस्लिम, दलित अशा सामाजिक-धार्मिक रेषा स्पष्ट आखण्यात यांना आसुरी आनंद आहे. गेल्या सहा सात वर्षांत अशी कोणती घटना आपण सांगू शकतो, की या वाहिन्यांनी देशाचे ऐक्य, एकात्मता, सलोखा राहावा म्हणून बातम्या दिल्या आहेत. असे किती पत्रकार आहेत की जे दंगलपीडितांच्या, शोषितांच्या बातम्या लोकांपुढे आणू शकले. असे किती पत्रकार आहेत की जे व्यवस्थेला प्रश्न विचारत होते. अशी संख्या दुर्दैवाने कमी आहे.

सध्या बऱ्याच पत्रकारांना बातमीत हिंदू-मुस्लिम रंग दिसला की चेव येतो. वांद्र्यात गर्दी झाली तेव्हा त्याला तसाच रंग दिला गेला. म्हणजे एकतर ट्रेन सुरू होणार, ही बातमी खोटी होती. त्यात तिला जातीयतेचा रंग देत प्रशासन, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रश्न झाले. त्यामुळे ही माध्यमे कुणाच्या इशाऱ्यावरून काम करतात यावर सोशल मीडियात सामान्यांकडून प्रश्न विचारण्यास सुरवात झाली. असे प्रश्न विचारले जाणे म्हणजे सामान्यांमध्ये टेलिव्हिजन माध्यमाच्या पत्रकारितेवरून शंका निर्माण झाली आहे. ही शंका समाजात सर्वत्र इतकी रूजू नये की खऱ्या पत्रकारितेचा यात अंत होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा प्रस्थापित व्यवस्थेला होऊ शकतो.

वांद्र्याच्या घटनेनंतर सामान्य माणूसही हतबल झालेला आहे, त्याला जगायचे आहे, त्याच्या डोळ्यापुढे त्याची लहानपोरे, बायको, आईवडिल मित्र परिवार असं सर्व आहे. या सर्वांना त्याला जगवायचे आहे. स्वत:लाही जगायचे. म्हणून माध्यमांचे या घडीला परमकर्तव्य या देशातील माणूस जगवणे हाच असला पाहिजे.

लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे (फाईल फोटो)

COMMENTS