‘भारतविरोधी घोषणा दिल्याने पाकिस्तानात जा म्हणालो’

‘भारतविरोधी घोषणा दिल्याने पाकिस्तानात जा म्हणालो’

मुझफ्फरनगर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीवरून हिंसाचारग्रस्त मेरठ शहरात शहर पोलिस प्रमुख अखिलेश नारायण सिंह काही स्थानिक मुस्लिम समाजातील नागरिकांना, ‘पाकिस्तानात चालते व्हा’, ‘तुम्हाला येथेच ठीक करेन’, ‘खाणार येथले व गाणार दुसऱ्याचे’ अशा धमक्या देताना दिसले. ही घटना २० डिसेंबरची असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उ. प्रदेश पोलिसांची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आली आहे.

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अखिलेश नारायण सिंह यांनी या व्हिडिओच्या सत्यतेविषयी कोणताही प्रश्न उपस्थित न करता सांगितले की, ‘मेरठमधल्या लिसारी गेटच्या नजीक आम्ही गेलो असताना काही चारपाच मुलांनी आम्हाला पाहताच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरवात केली व ते गल्लीत पळून गेले. त्यावरून आम्हाला लक्षात आले की हीच चार-पाच मुले दंगा करत आहेत. त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे हे चुकीचे असून जर पोलिसांना पाहून तुम्ही पाकिस्तान झिंदाबादच्या अशा घोषणा देत असाल ,भारताबद्दल तुमच्या मनात घृणा असेल, तुम्ही दगडफेक करत असाल तर तुम्ही पाकिस्तानात चालते व्हा,’ असे मी त्यांना उद्देशून म्हणालो.

पण या व्हिडिओत अखिलेश नारायण सिंह दंगलखोर मुलांना नव्हे तर लिसारी गेटच्या भागात उभ्या असलेल्या चारपाच मुस्लीम नागरिकांना उद्देशून बोलत होते.

‘ये जो काली और पीली पट्टी बांधे हुए हैं इनसे कह दो पाकिस्तान चले जाओ… फ़्यूचर काला होने में लगेगा सेकेंड भर, एक सेकेंड में सब काला हो जाएगा. देश में नहीं रहने का मन है, चले जाओ भैया. खाओगे यहां, गाओगे कहीं और का. बताओ#####.. नहीं-नहीं फ़ोटो ले लिया हूं, बताऊंगा इनको. इनको बता देना#####.. इस गली को मैं… गली मुझे याद हो गई है, याद रखना मुझे याद हो जाता है तो नानी तक मैं पहुंचता हूं. याद रखिएगा आप लोग.. ###तुम लोग भी क़ीमत चुकाओगे.” असे अखिलेश नारायण सिंह या नागरिकांना उद्देशून बोलत होते.

या व्हिडिओत आणखी एक अधिकारी याच मुस्लिम नागरिकांना ‘अगर कुछ हो गया तो तुम लोग कीमत चुकाओगे…हर एक आदमी को जेल में बंद करूंगा.’ अशी धमकी देताना दिसला.

दरम्यान या घटनेनंतर मेरठचे पोलिस उपमहासंचालक प्रशांत कुमार यांनी काही समाजकंटक दगडफेक करत होते, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या जात होत्या. काही घोषणा भारताविरोधी होत्या. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावाची होती. ही परिस्थिती शांत असती तर असे वर्तन पोलिसांनी केले नसते. तरीही पोलिस संयमाने काम करत असून गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मूळ बातमी

COMMENTS