४१ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला….

४१ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला….

टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकाने चार दशके विस्मृतीत गेलेल्या भारताच्या ऑलिम्पिक हॉकीच्या सुवर्णक्षणांची पुन्हा आठवण करून दिली आहे. हा संघ तरुण आहे. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक रिड म्हणतात, ही तर सुरुवात आहे. हे ‘ऍपीटायझर’ आहे. अजून मुख्य मेजवानी यायची शिल्लक आहे.

सोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम
इंधन भडक्यात सरकारची सावकारी लूट
कांचन ननावरेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटिस

तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक पदकाच्या व्यासपीठावर दिसला. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकी संघाचे नाव हॉकी पदक विजेत्यांच्या यादीत प्रथमच झळकले आहे. भारतीयांसाठी हॉकीचे एक पदक १० पदकांच्या समान असेल.

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ संपला आणि देशातील अन्य खेळांनी भारताच्या युवा पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली. क्रिकेट हा खेळ त्यामध्ये अग्रेसर होता. हॉकीपासून दूर दूर जात चाललेल्या युवा पिढीला हे ऑलिम्पिक पदक पुन्हा हॉकी स्टेडियमवर खेचून आणेल का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित लवकर सापडणार नाही. मात्र भारतीयांना आणि युवकांना हॉकी हा खेळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून मात्र यापुढे निश्चित आकर्षित करेल.

टोकियोमध्ये जर्मनीविरुद्ध कांस्य पदकासाठीची लढत तमाम भारतीय क्रीडारसिकांसाठी सुवर्णपदकापेक्षाही मोठी होती. तब्बल ४ दशके गमावलेले हॉकी पदकाचे सुख तमाम क्रीडारसिक शोधण्याचा प्रयत्न करत होते. किंबहुना त्या दुर्मिळ क्षणासाठी प्रत्येक भारतीय आसुसलेला होता. खेळाडूंच्याही भावना त्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. १-३ अशा पिछाडीवरून बरोबरी आणि पुन्हा त्यानंतर आघाडी ५-३ अशी आघाडी अखेरच्या सत्रात टिकेल, ही नेहमीची काळजी आजही भेडसावत होती. जर्मनीने चौथा गोल केला त्या वेळी पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. अखेरच्या क्षणी जर्मनीला मिळालेला पेनल्टी कॉर्नरचा फटका गोलरक्षक श्रीजेशने अडवल्यानंतर करोडो भारतीयांच्या हृदयाचे थांबलेले ठोके पुन्हा एकदा व्यवस्थित पडायला लागले. भारतीय हॉकीपटूंचाही संयम, धीरोदात्तपणा संपला. अश्रू अनावर झाले.

भारतीय हॉकीपटूंप्रमाणेच तब्बल अडीचशे कोटी रु. हॉकी प्रशिक्षणासाठी देणार्या ओडिशा सरकारचे अभिनंदन करायला लागेल. टीका करणारे अनेकजण आहेत आणि होते. परंतु मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासारखे मदतीचा हात पुढे करणारे दुर्मिळ आहेत. २०२३पर्यंत भारतीय हॉकी संघाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्यांचे अनुकरण इतर काही राज्यांनी केल्यास अन्य खेळातही अशी पदके यायला लागतील.

भारतीय हॉकी संघाचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मेहनत फळाला आली. त्यांनी गोलरक्षक श्रीजेश आणि मनप्रीतसिंग या सीनियर खेळाडूंवरही विश्वास ठेवला. मनप्रीतकडे कप्तानपद सोपवले. या दोघांनीही कोचचा विश्वास सार्थ ठरवला. दोघांचेही हे तिसरे ऑलिम्पिक. श्रीजेश गेली १५ वर्षे भारतीय हॉकी संघात आहे, गोलरक्षक हा नेहमीच परिपक्व असायला हवा. रिड यांना त्याची जाण होती. श्रीजेशच्या अनुभवाचा त्यांनी फक्त गोलपोस्टपुरता उपयोग केला नाही तर भारताच्या बचाव फळीला मार्गदर्शन करण्याचे कामही त्याच्यावर सोपवले. गोलरक्षक हा भिंतीसारखा असायला हवा. जेव्हा संघातील आक्रमक फळीलाही विश्वास वाटतो की, आपण केलेल्या मेहनतीचे, गोलांची गोलरक्षक माती करणार नाही, तेव्हाच आक्रमणाची धार अधिक तेज तर्रार होते.

श्रीजेश भारतीय ह़ॉकी संघासाठी अशी तिहेरी मदत करत आहे. २०१२, १०१६, २०२० या तिन्ही ऑलिम्पिकचा त्याचा अनुभव आहे. ३ वर्ल्ड कप, २ एशियन गेम, २ राष्ट्रकुल स्पर्धा, २०१३चा एशिया कप, ४ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी, हॉकी वर्ल्ड लिग अशा सार्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाच्या अविभाज्य भाग बनला होता. भारतीय संघाचेही त्याने नेतृत्व केले आहे. त्यामुळे संपूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारलेला हा खेळाडू आज अंतिम क्षणी गोल वाचवून भारताच्या इतिहासाचा साक्षीदार बनला. श्रीजेशने ४० व्या सेकंदाला जर्मनीने मारलेला शॉर्ट कॉर्नर अडवला नाही तर जर्मन संघाचे आक्रमण विजयी होईपर्यंत रोखले.

कप्तान मनप्रीत सिंगही तीन ऑलिम्पिकचा अनुभव गाठीशी असलेला. या दोघांनीही प्रदीर्घ कारकिर्दीत सर्व स्पर्धा आणि पदकांच्या विजयांचे क्षण अनुभवले होते. मात्र ऑलिम्पिक पदकाचा अनुभव हा किती आगळा वेगळा असतो त्याचा अनुभव आज श्रीजेश व मनप्रीतचा सीनियर खेळाडूंनी घेतला.

हरमनप्रीत, गुरुजीत, वरुण कुमार, सिमरनजीत, हार्दिक सिंग या युवा पिढीच्या अप्रतिम कामगिरींमुळे भारतीय हॉकीचा ऑलिम्पिक पदकापासूनचा नवा प्रवास सुरू झाला आहे.

भारताची युवा पिढी या युवकांच्या कामगिरीमुळे हॉकीकडे आत्कृष्ट होईल अशी आशा आहे. या तरुण खेळाडूंच्या हॉकी संघाच्या कामगिरीमुळे नवी पिढीही पुन्हा हॉकीच्या प्रेमात पडेल असे मानायला हरकत नाही.

हॉकी इंडियाने २०१६ पासून स्थापन केलेल्या हॉकी कोअर ग्रुपच्या मेहनतीला आता कुठे यश मिळायला सुरूवात झाली आहे. ऑलिम्पिकमधील भारतीय १० पैकी ९ गोल स्कोअर्स हे याच कोअर ग्रुपमधून आलेले आहेत.

रिओ ऑलिम्पिकनंतरची पूर्व तयारीची ४ वर्षे आणि वाढलेले एक वर्ष अशी ५ वर्षे ही तरुण मुले एकत्र सराव करताहेत. स्पर्धा खेळताहेत, दौरे करताहेत. या भारतीय संघातील जवळ जवळ निम्म्या संघाला कोरोनाची बाधा झाली होती. ते आजारपण, विलगीकरण, सक्तीची विश्रांती आणि सराव, यामुळे गेले वर्षभर ही सर्व मुले घरीही जाऊ शकलेली नाहीत.

चार दशके विस्मृतीत गेलेल्या भारताच्या ऑलिम्पिक हॉकीच्या सुवर्णक्षणांची त्यांनी पुन्हा आठवण करून दिली. हा संघ तरुण आहे. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक रिड म्हणतात, ही तर सुरुवात आहे. हे ‘अपीटायझर’ आहे. अजून मुख्य मेजवानी यायची शिल्लक आहे.

भारताच्या पुरुष संघाच्या पदकाच्या मिळकतीमुळे उपांत्य फेरीत शुक्रवारी खेळणार्या महिला संघाचाही उत्साह वाढला आहे. उद्याचा सामना अधिक उत्कंठावर्धक व महत्त्वाचा आहे.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वृत्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: