आधुनिक ‘हाँग काँग’

आधुनिक ‘हाँग काँग’

जस जशी आमची प्रवासी बोट ‘मकाऊ’कडून ‘हाँग काँग’कडे धावत होती, तस तसा प्रसार माध्यमांमध्ये वाचलेल्या हाँग काँग तेथील सामजिक राजकीय गोष्टी डोळ्यासमोर उभ्

हाँगकाँग : वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात अडीच लाख तरुण रस्त्यावर
मकाऊ – आशियातील कुबेर नगरी
धगधगता व अस्वस्थ हाँगकाँग

जस जशी आमची प्रवासी बोट ‘मकाऊ’कडून ‘हाँग काँग’कडे धावत होती, तस तसा प्रसार माध्यमांमध्ये वाचलेल्या हाँग काँग तेथील सामजिक राजकीय गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या.

बोट फेरी टर्मिनल जवळ पोहचू लागली तशी मोठी मालवाहू जहाजे दिसू लागली. कंटेनर उतरवणारे चढवणारे उंचच्या उंच क्रेन्स लक्ष वेधून घेऊ लागल्या. शहरातील मोठमोठ्या इमारती आ वासून आमच्या कडे पाहत आहेत असे भासू लागले. जागतिक व्यापाराचे केंद्र म्हणजे ‘हाँग काँग’ असं का म्हटलं जातं, ते दिसू लागलं.  पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांना जोडणारे हे महत्वाचे बंदर आणि शहर आहे.

‘ एक देश दोन व्यवस्था’ असं ज्या प्रदेशाबद्दल म्हंटलं जातं ते ‘हाँगकाँग’ ब्रिटिशांनी १९९७ साली हाती सोपवलं. त्यामुळे एथे एक वेगळीच व्यवस्था दिसते. या प्रदेशाचं राजनैतिक धोरण ठरविणे हे संपूर्णतः चीनच्या हातात आहे. पोलीस स्थानिक आहेत, परंतु सैन्य चीनचे आहे. ‘हाँग काँग’ पूर्णतः चीनच्या ताब्यात नसल्याने निदान सोशल मीडिया किंवा इतर काही गोष्टी आपण स्वतंत्रपणे वापरू शकतो. अलीकडेच दहशतवाद आणि फुटीरतावाद थोपविण्यासाठी नवा सुरक्षा कायदा आणण्याचे काम चीनने केले. परंतु या कायद्याचा नेमका मसुदा किंवा तरतूद काय आहे स्पष्ट केलेले नाही. देशातील जनता या संरक्षण कायद्यास आणि चीनच्या अनाठायी हस्तक्षेपास पूर्ण विरोध करत आहे. ब्रिटिशांनी पन्नास वर्षांची स्वायतत्ता (२०४७ पर्यंत) देऊनही, चीनची ही बळजबरी येथील जनतेला मान्य नाही.

आमची प्रवासी बोट ‘हाँग काँग’ फेरी टर्मिनलवर पोहचली. तेवढ्यात सत्तरीच्या दशकातील अमिताभच्या फिल्मची आठवण यावी अशी एक काळी अलिशान चार चाकी आम्हाला घ्यायला आली.  ड्रायव्हर कुणाला तरी खेकसत बडबड करत आमचे सामान गाडीत टाकु लागला. स्थानिक भाषेत नेमका तो कुणाला बोलत होता असे विचारले तेव्हा म्हणाला, “अहो नेहमीची नाटके आहेत साहेब. पैसे देऊन, पार्किंग फी भरूनही हे चौकीदार घाई करत असतात, गाडी लवकर हलवा म्हणून. आणि हे बाकीचे पैसेवाले, इतर मोठ्या गाडीवाले, उलटे धंदे करणारे लोक तासनतास गाडी थांबवुनही हे त्यांना काही बोलत नाहीत, जो कष्ट करून कमावतो त्यालाच रुबाब झाडतात हे रखवालदार.” हा चालक रतन, मूळचा राजस्थानचा होता, वीस वर्षांपूर्वी ‘हाँग काँग’मध्ये आला. आता चालक आणि गाईड आशा दोन्ही जबाबदाऱ्या तो निभावत आहे.

गाडी टर्मिनल बाहेर पडली, संध्याकाळची वेळ होती दोन पदरी तीन पदरी रस्ते, चिनी लिपीतील वाहतूक सूचना देणारे फलक आणि स्तिमित करणाऱ्या टोलेजंग इमारती. प्रत्येकजण आपापल्या कामावरून घरी जाण्याच्या घाईत. प्रचंड परंतु शिस्तबध्द वाहतूक. हवामान काहीसे ढगाळ होते. रतन भारतीय असल्याने तो मनमोकळा बोलत होता. तो आम्हाला शहर दाखविणार होता. महाबळेश्वरला जाताना जसा रस्ता लागतो, तसा वळणावळणाचा घाट चढून आम्ही विक्टोरिया टेकडीवर पोहचलो. धुक्याने या टेकडीवर पांघरूण घातले होते. ‘हाँग काँग’चे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या टेकडीवर गर्दी करतात. येथे काही रेस्टॉरंट्स आहेत जिथे भोजन घेत तुम्ही उंचावरून शहर पाहू शकता. आम्ही पुढे गोल्डन बौहिनिया स्क्वेअरकडे निघालो.  १९९७ साली ब्रिटिशांनी ‘हाँग काँग’ चीनकडे सोपवले तेंव्हा चीनने हस्तांतर झाल्यानंतर बौहिनिया (Bauhinia) या झाडाच्या फुलाचे सोनेरी शिल्प ‘हाँग काँग’ला भेट दिले होते. हे शिल्प सहासष्ट फुटी उंच आहे. याच ठिकाणी जवळच समुद्र किनारी सिंफनी ऑफ लाईट शो आहे. हा शो विक्टोरिया बंदरावर होतो. बंदराला लागून असलेल्या अलीकडच्या आणि पलीकडच्या एकूण ४२ इमारतींचा या शोमध्ये सहभाग असतो. प्रत्येक इमारतीवर रंग-बिरंगी लेसर लाइट्स बसवलेल्या आहेत. विशिष्ट संगीतावर या दिव्यांचे नृत्य सुरू होते. पंधरा मिनिटांचा हा शो रोज सायंकाळी आठ वाजता सुरू होती. पर्यटन विभागाने आयोजित केलेला हा शो शहरात विविध ठिकाणी उभे राहून पाहता येतो. दृष्टीक्षेपात येणाऱ्या हाँग काँग मधील सर्व इमारती यावेळी विविध रंगाच्या छटा धारण करतात.

‘हाँग काँग’ म्हणजे समुद्र आणि जमिनीचे नक्षीकाम केलेले जाळे आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे म्हटले, तर समुद्राअंतर्गत बोगदे तयार केलेले आहेत. परंतु तुम्ही गाडीत बसला असाल, तर तुम्हाला जाणवणार नाही, की हा बोगदा डोंगरातून जात आहे की समुद्रातून जात आहे. जमीन कमी असल्याने हॉटेलच्या रूम्सही अगदी मुंबईतील चाळीतील खोलीसारख्या एकदम छोट्या अरुंद. आम्ही ‘त्सिम शा त्सुई’ या नोलुनच्या भागात राहत होतो. हा भाग खरेदीसाठी आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळखला जातो. हाच भाग ‘हाँग काँग’चा सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखला जातो. विविध रंगबिरंगी रोषणाईने हा भाग सतत उजळलेला असतो. अनेक रेस्टॉरंट्स, कपड्यांची, वस्तूंची दुकाने लक्ष वेधून घेत असतात. ‘हाँग काँग’मध्ये इतर भागांमध्ये प्रवास करण्यासाठी स्टार फेरी वापरली जाते. बहुतांशी लोक वाहतुकीपासून सुटकेसाठी समुद्र मार्गाचा अवलंब करताना दिसतात. आम्ही मात्र मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ‘हाँग काँग’ जास्तीत जास्त स्थानिक लोकांप्रमाणे अनुभवता आले.

अॅबेरडिन फ्लोटिंग व्हीलेज (Aberdeen Floating Village) हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहण्यासारखे आहे. इथे पाच हजारांच्या आसपास लोक स्वतःच्या बोटींमध्येच राहतात आणि पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. जुन्या रुढी परंपरा आणि आपली संस्कृती हे लोक टिकवून आहेत. विकसित प्रदेशामध्ये अशा पद्धतीचा एक समूह (Tanka Community) एक वेगळेच जीवन जगताना दिसतो. त्यातल्या एकाने आम्हाला आपल्या बोटीतून फिरवले. तेंव्हा एक तरंगते ‘ताई पॅक’ ( Tai Pak) नावाचे रेस्टॉरंट दिसले. हे एक मोठे जहाज असून, तेच रेस्टॉरंट आहे. “स्टॅन्ली हो’ या कॅसिनोच्या जनकाचे ‘जंबो किंग्डम’  नावाचे एक हॉटेलही तिथे दिसते. येथे राणी एलिझाबेथनेही भेट दिली आहे. अशी तरंगणारी अनेक हॉटेल्स इथे दिसतात.

ओशन पार्क (Ocean Park) नावाचे एक ठिकाण आहे. हे ठिकाण डिजनी आणि युनिव्हर्सल स्टुडिओ या थीम पार्क्सपेक्षाही रोमांचकारी आहे. हृदय धडधडायला लावणाऱ्या विचित्र राईडस आणि केबल कारचा चक्रावून टाकणारा प्रवास लक्षात राहणारा आहे. सव्वा दोनशे एकरावरील हा पार्क समुद्राला लागून आहे. याच ठिकाणी एक निळेशार मत्सालय आहे, जिथे आपल्याला समुद्रातील अगदी छोट्या माशापासून मोठ मोठे अवाढव्य समुद्री मासे पाहायला मिळतात. मनोरंजनाबरोबरच शिक्षणाचाही आनंद घेण्याची इथे सोय आहे. डॉल्फिन समूहाचा एक नयनरम्य शोही इथे अनुभवायला मिळतो. आशियातील विविध जंगली प्राणी, दुर्मिळ पांडा येथे पाहायला मिळतात.

ट्राम ही ‘हाँग काँग’च्या सौंदर्यात भर घालते. शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावरून छोट्याश्या रुळावरून धावणारी ट्राम ब्रिटिश काळाची आठवण करून देते. डबल डेकर असणारी ही ट्राम एकदा अनुभवायला हवी. आम्हीही एका स्टेशनवरून ही ट्राम पकडली आणि वीस मिनिटांची राईड घेतली. ट्रामच्या वरील भागातील डब्यात बसून फिरताना ‘हाँग काँग’ वेगळेच आणि विलक्षण दिसते. अगदी मोठे वयस्कर, तरुण जोडपी, पर्यटक या ट्रामची राईड घेताना दिसतात.

नोलुन (Kowloon) भागातच ‘हाँग काँग म्युझियम ऑफ हिस्टरी’ आहे. ‘हाँग काँग’ या बेटाचा प्राचीन इतिहास या म्युझियममध्ये दाखविण्यात आला आहे. या बेटाची प्रगती कशी होत गेली, सर्वसाधारण असणारे हे मासेमारीचे बेट, एक विकसित राष्ट्र कसे बनले. ‘लोकल ते ग्लोबल’ हा प्रवास कसा हॉट गेला, याचे अगदी छोटे छोटे तपशील येथे पाहायला मिळतात. बेटाचे पर्यावरण नेमके कसे बदलत गेले. ‘हाँग काँग’ची लोककला व त्या विषयीचा इतिहास काय होता, या सर्व गोष्टींचा लेखा-जोखा येथे पाहायला मिळतो. अभ्यासता येतो. थोडक्यात भूशास्त्रीय (Devonian) कालखंडापासून ते अगदी अलीकडे १९९७ मधील ‘हाँग काँग’च्या हस्तांतरणापर्यंतचा प्रवास इथे पाहायला मिळतो. हे म्युझियम नसून एक छोटेसे गावच आहे, असे म्हणायला हरकत नाही.

पावसाचे सावट असल्याने लंताऊ आयलंड (Lantau Island) येथे जाता येईल का नाही, अशी धाकधूक होती. इथे अचानक पाऊस येऊ शकतो आणि इथे आल्यावर त्याची सवय होते. लंताऊ आयलंडला पोहचून आम्हाला तेथून केबल कारने ‘तियान तान बुद्धा’ (Tian Tan Buddha) पाहायला जायचे होते. लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देत असतात. साधारण हाँग काँग पासून तासाभराच्या अंतरावर लंताऊ आयलंड आहे. बाहेर प्रचंड पाऊस बरसत होता. वाहन चालकाने आम्हाला हाताच्या इशाऱ्यानेच केबल कारचे स्टेशन दाखविले, तिकिटे हातात दिली आणि काही विचारायच्या आतच गाडी चालू करून तो निघूनही गेला. केबल कार स्टेशनवर पोहचताच असे कळाले, की पावसामुळे केबल कार काही वेळ बंद राहणार आहे. कधी सुरू होईल, असे विचारले असता, काही सांगता येत नाही, असे उत्तर मिळाले. पाऊस थांबायचे नाव घेईना, म्हणून जवळच असणाऱ्या सेव्हन इलेवेन या स्टोअर मधून आम्ही एक छत्री घेतली. लंताऊकडे जायला बस वगैरे आहे, का अशी चौकशी केली. परंतु घाटातील रस्ताही बंद आहे असे समजले. केबल कार सुरू झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने, आम्ही नोङ्ग पिंग (Ngong Ping) या उंच पठारावरील पो लीन (Po Lin) हा विहार (monastery) पाहण्यासाठी पोहचणार होतो. या अर्ध्या तासाच्या केबल कार प्रवासामध्ये खाली छोटी गावे, निळाशार समुद्र, एअरपोर्टवरून भरारी घेणारी विमाने अशी एक ना अनेकविध दृश्ये दिसतात. ज्या मार्गाने केबल कार रोप वे वरून जात होती त्याच्या खालोखाल एक पायवाट दिसत होती ती देखील याच पर्वतावर जाते असे कळाले, अनेक बौद्ध भिक्खू या पायवाटेने बुध्द दर्शनाला जातात. येथे बुद्धाचा ४ मीटरचा ब्राँझचा भव्य पुतळा आहे. भगवान बुध्दाचा चेहरा चीन देशाच्या दिशेला आहे. अतिशय निसर्ग रम्य, हिरव्या गार टेकडीवर धुक्याचे शुभ्र पांघरूण होते. वाऱ्याच्या झोक्याने पांढरे शुभ्र मखमली धुके बाजूला झाल्यावर शांत चित्त रूप धारण केलेला बुद्ध दिसत होता आणि पुन्हा धुक्याआड नाहीसा होत होता.

इथला विहार १९०६ साली बांधला गेला आहे. अतिशय बारीक लाकडी नक्षीकाम केलेला विहार लक्ष वेधून घेतो. एखाद्या पौराणिक काळातील राज्यात आल्याचा अनुभव इथे येतो.

एकाच ‘हाँग काँग’मध्ये एका बाजूला श्रीमंती दिसते. प्रचंड लगबग दिसते. लोक सतत काम करताना दिसतात. ब्रिटिश संस्कृती दिसते आणि अदृश्य चीनही दिसतो. एका बाजूला आधुनिक शहर तर एका बाजूला पारंपरिक जीवन दिसते आणि बुद्धही दिसतो!

धनंजय भावलेकर, हे सिने-नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सावनी विनिता, माध्यमविषयक अभ्यासक असून, सेंट मीरा महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या व्याख्यात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0