विशेष : मोदींना मिळालेल्या ‘पहिल्या वहिल्या’ कोटलर प्रेसिडेन्शियल प्राईझचे सौदी कनेक्शन

विशेष : मोदींना मिळालेल्या ‘पहिल्या वहिल्या’ कोटलर प्रेसिडेन्शियल प्राईझचे सौदी कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्यात आलेल्या या संशयास्पद पुरस्काराच्या मागे तौसीफ झिया सिद्दिक़ी ही व्यक्ती आहे. विशेष म्हणजे तौसीफ हा भारतात पाय पसरू इच्छिणाऱ्या सौदीच्या एका सरकारी कंपनीचा कर्मचारी आहे.

एम.जे.अकबरांच्या नियुक्तीला पत्रकारांचा विरोध
लोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश
भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेल्या फिलीप कोटलर प्रेसिडेन्शियल पुरस्काराच्या वैधतेवर शंका उपस्थित झाल्यामुळे याबद्दल चौकश्या सुरु झाल्या आणि या पुरस्काराभोवतीचे गूढ वाढायला लागले.

या प्रकारच्या ‘पहिल्या वहिल्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाच्या माध्यामतून प्रधानमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र द वायरच्या वृत्ताप्रमाणे मोदी यांना देण्यात आलेल्या पुरस्काराची प्रक्रिया आणि त्याचे परीक्षक अज्ञातच होते. सुसलेन्स रिसर्च इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट या अलिगढमधील आजपर्यंत कुणाच्या नावीगावीही नसलेल्या एका कंपनीद्वारे वर्ल्ड मार्केटिंग समीट (WMS) इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

द वायरने अधिक खोलात जाऊन या घटनेचा तपास केला असता, डब्ल्यूएमएस (WMS) इंडिया आणि सुसलेन्स या दोन्ही कंपन्या सौदीमधील असून मुख्यत्वे तौसीफ झिया सिद्दिकी या व्यक्तीच्या पुढाकाराने त्या चालवल्या जात असल्याचे समोर आले. सिद्दिकी याने आपल्या ऑनलाईन प्रोफाईलवर स्वतःचे वर्णन साबिक (SABIC) या सौदीमधील सरकारी मालकीच्या पेट्रोकेमिकल कंपनीचा कर्मचारी असे केले आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भारतीय उर्जा उद्योगात मुसंडी मारण्यासाठी आतुर आहे.

संकेतस्थळे बंद 

या संबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यापासून WMS इंडिया आणि सुसलेन्स या दोन्ही संस्थांची संकेतस्थळे बंद आहेत. (१५ जानेवारी पर्यंत ऑनलाईन असणाऱ्या या संकेतस्थळांचे बेसिक वर्ज गुगल कॅशेच्या मध्यातून येथे उपलब्ध आहे.)

जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरु फिलीप कोटलर यांनी WMS18 द्वारे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना आपले नाव देण्याची परवानगी दिली होती. त्यांनीही काही दिवसांपूर्वी ट्वीट करून पुरस्काराबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. मात्र मोदींना मिळालेल्या ‘मानाच्या पुरस्काराची’ ची सर्वप्रथम बातमी देणारे  वर्ल्ड मार्केटिंग समीट (WMS) इंडिया या संस्थेचे ट्वीटर हंड्ल मात्र यानंतर डिलीट करण्यात आले आहे. यामुळे पंतप्रधानांना मिळालेल्या सन्मानाच्या स्वरुपाबद्दलही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सौदी ते सुसलेन्स

तौसीफ झिया सिद्दिकीच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार तो त्या दोन कंपन्यांचा संस्थापक असून, जवळपास ७०% सौदी सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या साबिक (SABIC) या मोठ्या आंतरराष्ट्रीय पेट्रोकेमिकल निर्मात्या कंपनीचा २०१४ पासून कर्मचारीही आहे.

सिद्दिकी याच्या कार्य तपशिलात ‘सस्टेनेबिलिटी स्पेशालिस्ट’ अशी नोंद आहे. तो सौदी अरेबिया येथील दम्माम शहरात वास्तव्यास असल्याची कबुली त्याच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दिली आहे. मात्र सिद्दिकीच्या लिंक्डइन प्रोफाईलमधून त्याचे ‘सुसलान्स’शी असलेल्या संबंधाविषयी माहिती मिळत नाही.

साबिक (SABIC) मध्ये कार्यरत असतानाच सिद्दिकी याने २०१७ साली ‘सुसलेन्स रिसर्च इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. MCA च्या नोंदीनुसार ही कंपनी ०६ सप्टेंबर, २०१७ रोजी सुरु झाली. मात्र कंपनीच्या संकेतस्थळाची नोंदणी अगदी अलीकडची म्हणजे ०३ जुलै, २०१८ ची आहे. ग्लोबल WMS ग्रुपची प्रादेशिक शाखा या नात्याने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या WMS २०१८ या कार्यक्रमाच्या केवळ काही महिन्यांपूर्वी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते. यासाठी अलिगढ येथील पत्ताही देण्यात आला होता. मात्र ते ठिकाण सापडत नसल्याचे वृत्त नुकते एका वाहिनीने दिले आहे.

अपडेट : सिदिक्कीने आपले लिंक्डइन प्रोफाईल डिलीट केले आहे.

तौसीफ झिया सिद्दिकी याच्या सध्या डिलीट केल्या गेलेल्या लिंक्डइन प्रोफाईलचा स्क्रीनशॉट. सौजन्य : लिंक्डइन

परीक्षकांचे परीक्षण

सुसलेन्स मधील सिद्दिकी याच्या सहकाऱ्यांमध्ये कंपनीची संचालक असलेली त्याची बायको एना खान, ‘सुसलेन्स’चा सहसंस्थापक आणि WMS18 (कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार) या कार्यक्रमाचा संचालक फैजल झियाउद्दीन व झुबैर अहमद खान या तीन मंडळींचा समावेश आहे.

एना खान ही दम्माम येथील इमाम अब्दुलरहमान बिन फैजल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका आहेत. प्रधानमंत्री मोदी यांना कोटलर पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असतानाच्या अधिकृत छायाचित्रात तौसीफ समवेत दिसणारी स्त्री म्हणजे एना!

फैजल झियाउद्दीन हा एमएसआय मॅनेजमेंट  कन्सल्टंट्स या कंपनीचा संस्थापक सदस्य आहे. त्याच्या ऑनलाईन प्रोफाईलवर नमूद केल्यानुसार तो सुद्धा सौदी अरेबिया येथे वास्तव्यास आहे.

WMS इंडिया च्या संकेतस्थळावर मोदींना मिळालेल्या प्रेसिडेन्शियल पुरस्कारहून भिन्न अश्या कोटलर मार्केटिंग एक्सेलन्स प्राईज या नावाच्या पुरस्काराच्या ‘निवड समितीची’ माहिती देण्यात आली होती. हा पुरस्कार विशेषतः WNS ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रायोजकांना आणि सहकारी कंपन्यांनाच देण्यात आला होता. पुरस्कारार्थींमध्ये गेल (GAIL), रामदेव बाबांची पतंजली, बिजनेस वर्ल्ड आणि लोकप्रिय संकेतस्थळ विटीफीड (WittyFeed) आदींचा समवेश होता.

निवड समितीच्या सदस्यांपैकी एक असणारे वाल्टर वियेरा हे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  कन्सल्टंट्स  या संस्थेचे सहकारी आहेत. त्यांनी या समितीचा सदस्य होण्याची तयारी दर्शविली होती, मात्र निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे कुठलेही आमंत्रण त्यांना देण्यात आले नव्हते. “त्यांनी मनमानी पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पाडली” अशी माहिती वियेरा यांनी द वायरशी बोलताना दिली. यापूर्वी सिद्दीकिसोबत कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचा  खुलासाही त्यांनी यावेळी केला.

कस्टमर व्हॅल्यू  फाऊंडेशन  इंडिया या संस्थेचे अध्यक्ष गौतम महाजन हे सुद्धा या निवड समितीच्या सदस्यांपैकी एक होते. द वायरशी बोलताना त्यांनीसुद्धा पुरस्कारांच्या निर्णय प्रक्रियेत कधीही सहभागी झालो नसल्याचे सांगितले. या मार्केटिंग पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी यावेळी शंका उपस्थित केली.

याबाबत द वायरने सिद्दिकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला सहकारी तुम्हाला संपर्क करेल असे म्हणत उत्तर देणे टाळले. मोदी यांना दिला गेलेला पुरस्कार हा अत्यंत गुप्त स्वरूपाचा होता, इतकेच ते यावेळी सांगू शकले. भारतात स्वतःची खासगी कंपनी काढण्याची व कोटलर सारख्या पुरस्काराचे आयोजन करण्याची करण्याचा अधिकार सिद्दिकी यांना आहे काय अश्या स्वरुपाचा प्रश्न वायरने सिद्दिकी कर्मचारी असलेल्या साबिक (SABIC) या कंपनीला विचारला असून त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर त्याचा समावेश या लेखात करण्यात येईल.

‘साबिक (SABIC)’चे भारतातील वाढते प्रस्थ

साबिक (SABIC) ने १९९३-९४ साली गुजरात येथील वडोदरा येथे उत्पादन कारखाना सुरु करून भारतात उद्योगाचा श्रीगणेशा केला.

भारतात पेट्रोकेमिकल्सची वाढती मागणी लक्षात घेऊन येथे वेगाने आपले जाळे पसरवण्याची कंपनीची योजना असल्याचे त्यांच्या निवेदन आणि अहवालावरून स्पष्ट होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये रसायन व खत मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया केम २०१८ या प्रदर्शन आणि परिषदेला ‘साबिक (SABIC)’चे सीईओ उपस्थित राहिले होते.

विशेष म्हणजे ‘फिक्की’च्या पेट्रोकेमिकल औद्योगिक समितीचे सह-अध्यक्ष जनार्धनन रामानुजलू हे साबिक (SABIC) इंडिया प्रायवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि प्रदेश प्रमुख आहेत. केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे ‘इंडिया केम २०१८’ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर त्यांच्याशेजारीच बसले होते ‘साबिक (SABIC)’चे उपाध्यक्ष आणि सीईओ युसेफ अल-बेनयान!

मुंबई येथे आयोजित इंडिया केम २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत करताना साबिक (SABIC) चे सीईओ युसेफ अल-बेनयान.

यावेळी आयोजित परिषदेत बोलताना युसेफ अल-बेनयान म्हणाले की, “भारत सरकारशी भागीदारी करणे साबिक (SABIC) साठी गर्वाची गोष्ट असून आमचा जागतिक अनुभव आणि जगातिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग भारतामध्ये पेट्रोकेमिकलसाठी मजबूत व्यवस्था तयार करण्यासाठी निश्चितपणे होईल.” “भारतात अधिग्रहणाच्या संधी” शोधत असल्याचे त्यांनी द हिंदूला सांगितले.

जवळपास ४३० कोटी डॉलरची गुंतवणूक करून OPaL (ONGC Petro additions Limited) मधील ५०% भाग खरेदी करण्याची साबिक (SABIC)ची योजना असल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली. OPaL हा ओएनजीसी आणि गेल (GAIL) यांचा संयुक्त उपक्रम आहे. विशेष म्हणजे गेलही सिद्दिकीच्या WMS18 या आयोजनाची प्रायोजक कंपनी होती. ही कंपनी गुजरातमधील भारताचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल कारखाना चालवते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार २०१७-१८ या वर्षात कंपनीला पहिल्यांदाच कार्यकारी नफा मिळविण्यात यश आले.

सौदी अरामको या सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय पेट्रोलियम कंपनीमध्ये साबिक (SABIC) चे लवकरच विलीनीकरण होणार आहे. रसायन उत्पादनात पेट्रोलियमचा वापर वाढवून भारतासह प्रचंड वेगाने वाढणाऱ्या जगभरातील बाजारपेठात मुसंडी मारण्याच्या उद्देशाने सौदी अरामकोने आखलेल्या योजनेचाच हा एक भाग आहे.

भारतीय उर्जा क्षेत्रात सौदीची मुसंडी

पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा २०१६ साली रियाधला भेट दिल्यापासून भारतात गुतंवणूक करण्यासाठी सौदी अधिकाऱ्यांसोबत वारंवार चर्चा केली जात आहे.

२०१८ साली आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया केम कॉन्फरन्स २०१८’ नंतर केवळ १० दिवसानंतर सौदी अरेबियाचे उर्जा मंत्री खालिद अल फलीह यांनी पंतप्रधान मोदी आणि तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली व भारताची तेलाची वाढती गरज पूर्ण करण्याचे आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात गुंतवणुकीचे जाहीर आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

त्यानंतर पुढील महिन्यात, म्हणजे नोव्हेंबर ३० रोजी ब्युनोस आयरेस येथे भरलेल्या जी२० देशांच्या परिषदेच्यावेळी मोदी यांनी सौदीचे युवराज मुहम्मद बिन सलमान यांची व्यक्तीशः भेट घेतली आणि भारताची उर्जा सुरक्षा आणि सौदी अरेबियाला असलेल्या गुंतवणुकीच्या संधी यावर चर्चा केली.

‘इंडिया एनर्जी फोरम’ मध्ये खालिद अल फलीह यांनी भारतात पेट्रोकेमिकल, कच्च्या तेलाची साठवणूक, ग्राहककेंद्री इंधनाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या साबिक (SABIC) च्या इच्छेवर शिक्कामोर्तब केले. “पंतप्रधान मोदी यांनी दिलेले अच्छे दिन आणण्याचे वचन ते पाळताना दिसत आहेत. अच्छे दिन आले आहेत.” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. “आम्हालाही भारतात चांगले दिवस आले आहेत.” अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली होती.

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.
अनुवाद: समीर दि. शेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0