मोदींच्या सुरक्षिततेला काँग्रेसकडून धोका: भाजप

मोदींच्या सुरक्षिततेला काँग्रेसकडून धोका: भाजप

नवी दिल्लीः पंजाबच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा वाहनांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे २० मिनिटे अडकल्याने सुरक्षिततेच्या का

महाराष्ट्रात काँग्रेसनेच काँग्रेसचा घात केला
सायबर छळाच्या तक्रारीनंतर भाजप नेते कल्याणरामन यांना अटक
भाजपकडून मोफत वीज; सपाकडून कर्जमुक्तीचे आश्वासन

नवी दिल्लीः पंजाबच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा वाहनांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे २० मिनिटे अडकल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून त्यांना पंजाब दौरा रद्द करावा लागला. या घटनेनंतर पंजाब सरकार व केंद्र सरकार यांच्यात तणाव वाढला असून पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पंजाबमधील काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

सुरक्षा ताफा फ्लायओव्हरवर २० मिनिटापेक्षा अधिक खोळंबल्याने मोदी बठिंडा एअरपोर्टकडे परत गेले व तेथून ते दिल्लीस रवाना झाले.

मोदींचा दौरा हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी होता आणि ते बठिंडा एअरपोर्टवर आले. तेथून हेलिकॉप्टरद्वारे ते हुसैनीवाल येथे पोहचणार होते. पण या दरम्यान पाऊस व धुके आल्याने दृश्यमानता खराब झाली. हे वातावरण बदलेल म्हणून ते २० मिनिटे थांबले होते पण तरीही हवामान न बदलल्याने त्यांनी रस्त्याच्या मार्गाने हुसैनीवाल येथे जाण्याचा निर्णय घेतला. हे अंतर रस्त्याने सुमारे २ तास दूर होते. अचानक पंतप्रधानांचा दौरा बदलल्याने पंजाब पोलिस महासंचालकांनी योग्य त्या सुरक्षिततेची खात्री करत त्यांच्या ताफ्याला रस्त्याने जाण्यास परवानगी दिली. मोदींचा ताफा ३० किमी अंतर गेल्यानंतर एका फ्लायओव्हरपाशी थांबला. कारण या रस्त्यावर काही आंदोलकांनी धरणे धरले होते. त्यामुळे हा संपूर्ण ताफा १५-२० मिनिटे खोळंबला. या ताफ्याला मध्येच अडथळे येणे हा पंतप्रधानांच्या सुरक्षितता व्यवस्थेतील गंभीर चूक होती, असे केंद्रीय गृहखात्याचे म्हणणे होते. त्यानंतर पंजाब व केंद्र यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. केंद्रीय गृहखात्याने या संदर्भातील अहवाल पंजाब सरकारकडून ताबडतोब मागितला असून या प्रकरणी फिरोजपूरच्या पोलिस अधिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

भाजपच्या नेत्यांचे काँग्रेसवर आरोप

मोदींना पंजाब दौरा रद्द करावा लागल्याने भाजप आक्रमक झाला. बुधवारी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांनी आपला फोन घेतला नसल्याचा आरोप केला. पंजाबमध्ये हजारो कोटी रु.चे विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी पंतप्रधान येत होते पण त्यांच्या दौऱ्यात अडथळे आणल्याचा आरोप नड्डा यांनी केला. अशी गलिच्छ मानसिकता पंजाबच्या विकासाला मारक ठरू नये. पंजाबच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डा यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही काँग्रेस पंतप्रधानांच्या संरक्षण व्यवस्थेत अडथळे आणत असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

मोदींच्या सभेत गर्दी नसल्याने त्यांना आपला पंजाब दौरा रद्द करावा लागला असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी लगावला. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी एक पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो. त्यांचे बठिंडा येथे स्वागत करायचे होते पण माझ्यासोबत काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आपण पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी गेलो नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. बुधवारी येथील हवामान खराब होते आणि आंदोलन सुरू असल्याने आम्ही पंतप्रधान कार्यालयाला दौरा स्थगित करण्यात सांगितले होते. पण मोदींनी अचानक आपला मार्ग बदलला व त्याची माहिती पंजाब सरकारला दिली नाही. तरीही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नव्हती. भाजपने याचे राजकारण करू नये, मोदींना कोणताही धोका पोहचलेला नाही, या दौऱ्यात त्रुटी आढळल्यास त्याची चौकशी केली जाईल, असे चन्नी यांनी स्पष्ट केले. मोदींच्या सभेत ७००० खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात ७०० पेक्षा कमी लोक उपस्थित असल्याचेही चन्नी यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0