वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १

वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १

नरेंद्र मोदी यांचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो, त्यांच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते... हे समजून घ्यायचे असेल, तर आधी मोदींचे भाषिक-वैचारिक स्वरूप जाणून घेतले पाहिजे...

आपण इतके रक्तपिपासू का होतोय?
‘संघा’वर बंदी घालण्याची अकाल तख्तची मागणी
पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण देण्याचा अजिबात कंटाळा नाही. ते सतत बोलतच असतात. कधी ‘चाय पे चर्चा’ करतात, कधी ‘मन की बात’ करतात, कधी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधित करतात आणि सतत प्रचारसभांत भाषणे देत असतात. एके काळी या देशात असा कोणताही कानाकोपरा नव्हता की जेथून लता मंगेशकरांचा सूर ऐकू येत नसे. आज देशातील कोणतेही असे घर नाही की जेथील टीव्ही वा रेडिओसंचातून मोदींचा आवाज कानावर पडत नाही.
राज ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल दुमत असू शकते, परंतु त्यांच्यातील कलाकारात असलेली ध्वनी, रंग, रुप यांविषयीची जाण कोणी नाकारू शकत नाही. या राज यांनी एकदा मोदींच्या आवाजाची तुलना ‘फॉर्म्युला वन रेस’मध्ये धावणा-या वाहनांच्या आवाजाशी केली होती. तो काही फार कर्णसुखद आवाज आहे असे नाही. मुंबईतील गुजराती व्यापारी मंडळींचा लोकल प्रवासातील संवाद ज्यांनी ऐकला असेल, त्यांच्या हे लक्षात येईल की मोदींच्या आवाजातही तो खास गुर्जरी लहेजा आहे; एक कोरडी व्यावहारिकता आहे. तशात ते वाक्यातील शेवटचे शब्द घशातून, काहीसे खर्जात रेकल्यासारखे लांबवत नेतात. असे असतानाही भारतीय राजकारणात आज त्यांच्या तोडीचा अन्य वक्ता नाही असे म्हणतात. तशी उत्कृष्ट वक्तृत्वशैली तर काँग्रेसचे नेते आणि लेखक शशी थरूर यांच्याकडेही आहे. मुस्लिमनेते असदुद्दीन औवैसी यांची वक्तृत्वशैलीही त्यांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारी आहे. पण मोदींची गोष्ट काही वेगळीच आहे.
याचे एक कारण आहे मोदींची भाषा. शशी थरूर हे प्रामुख्याने इंग्रजी वक्ते आहेत. अस्खलित प्रवाही इंग्रजी बोलण्यात मधूनच नित्याच्या वापरात नसलेले अवघड शब्द पेरून चमत्कृती निर्माण करून आपल्या उच्चभ्रू श्रोत्यांना भारावून टाकणे ही थरूर यांची खासीयत. अभिजाततेतून श्रोत्यांच्या तर्कबुद्धीला केलेले अंतिम आवाहन हे त्यांचे वैशिष्ट्य! तर ओवैसी यांचे आवाहन असते ते प्रामुख्याने भावनांनाच. फारसी-अरबी-उर्दू शब्दांची पेरणी असलेले त्यांचे भाषण ऐकताना श्रोत्यांना भारावलेपण येत असले, तरी त्यामुळेच त्यांचा श्रोतृवर्ग मर्यादीत होऊन जातो.
मोदी वेगळे ठरतात ते येथे. सर्वसामान्यांना सहज समजणा-या, सहसा संस्कृतप्रचूरतेपासून दूर असलेल्या हिंदीत ते बोलतात. त्यामुळे त्यांचे आवाहनही सर्वदूर जाते. आपणांस श्रोत्यांपर्यंत पोचविण्याच्या विचारांचे, भूमिकांचे, भावनांचे माध्यम असते भाषा. प्रत्येक भाषेला एक अंगभूत लय असते. हिंदी भाषेची ती लय मोदींच्या भाषणात अभावानेच आढळते. उलट अनेकदा तर त्यांची हिंदी उग्र भासते. पण त्याची कमतरता ते शाब्दिक चमत्कृती करून मोठ्या चलाखीने भरून काढतात. मोदींना शब्दांची लघुरूपे बनविण्याची खोडच आहे असे म्हणतात. पण ती खोड नसून ती युक्ती आहे त्यांची. अलीकडेच मीरत येथील एका सभेत त्यांनी सपा, राजद आणि बसप यांची आद्याक्षरे घेऊन ‘सराब’ असा परिवर्णी शब्द तयार केला होता. हे तिन्ही पक्ष म्हणजे शराब आहे, असे त्यांना सांगायचे होते. वरकरणी हा बालीश खेळ वाटतो. मोदींचे टीकाकार हसतात त्याला. खिल्ली उडवतात. पण त्यातून दिसते ते हेच की मोदींची चलाखीच त्यांच्या लक्षात आलेली नाही.
एखादी गोष्ट कायमची लक्षात राहावी यासाठी आपण सगळेच लहानपणापासून अशा आद्याक्षरसंज्ञा वापरत असतो. उदाहरणार्थ घराबाहेर पडताना ‘पेरूचा पापा’ घ्यावा असे पूर्वी म्हणत असत. पेन, रुमाल, चावी, पाकिट आणि पास यांची आठवण राहावी यासाठी आद्याक्षरसंज्ञांनी बनविलेले हे विनोदी वाक्य. असे चमत्कृतीपूर्ण शब्द नक्कीच खोल मनात कोरले जातात. मोदी हाच प्रयोग आपल्या भाषणातून करत असतात.
भाजपमधील अन्य नेतेही याबाबत मोदींचा कित्ता गिरवताना दिसतात. उदाहरणार्थ २०१७ मध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसचा क, समाजवादी पक्षाचा सा आणि बसपमधला ब घेऊन ‘कसाब’ हा शब्द तयार केला होता. विरोधकांना शराबची, दारूची उपमा देणे अशा गोष्टींतून मोदी प्रोपगंडातील बदनामकरणाचे तंत्र वापरत असतात. पण कदाचित त्यांच्याही न कळत ते भाषेच्या उपमा या अलंकाराचा पूर्ण क्षमतेने वापर करीत असतात. एखाद्या गोष्टीला उपमा दिली जाते ती नेहमीच्या माहितीतल्या बाबीची. एखाद्या गोष्टीला उपमा दिली जाते ती अनोळखी गोष्ट ओळखी-समीप आणण्यासाठी. श्रीयुत अलाणे फलाणे म्हणजे धर्मराजाच म्हटल्यानंतर अलाणे फलाणे यांचे व्यक्तित्वच आपल्यासमोर उभे राहते. कोणतीही अमूर्त बाब यातून मूर्त करणे, सादृश करणे सोपे असते. मोदींच्या भाषिक प्रोपगंडात या अलंकाराचा वापर सातत्याने आढळतो तो त्यामुळेच.
मोदींच्या भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाषणात आपणांस क्वचितच जडजंबाल शब्द दिसतात. ते वापरतात ते लहान-लहान सोपे, नेहमीच्या वापरातले शब्द. अनेकदा त्यांच्या वाक्यांमध्ये एक नाद असतो, शाब्दिक वारंवारता असते आणि त्याचबरोबर चित्रमयताही असते. सामान्य बुद्धिमत्तेच्या श्रोत्यांपर्यंत पोचण्यासाठीची ही सारी भाषिक-अस्त्रे.
तर हे झाले भाषेविषयी. भाषा महत्त्वाचीच. परंतु तेवढीच महत्त्वाची असते भाषणशैली, वक्तृत्वगुण. सर विन्स्टन चर्चिल, अडॉल्फ हिटलर यांना या वक्तृत्वगुणांचे मोठे कौतुक. ‘मनुष्यप्राण्याला मिळालेल्या सगळ्या गुणांमध्ये वक्तृत्वाइतका मौल्यवान गुण अन्य कोणताही नाही. ज्याच्याकडे तो आहे त्याच्याकडे राजाहूनही अधिक टिकाऊ स्वरूपाची सत्ता असते. तो या जगातली एक स्वतंत्र शक्ती असतो. त्याच्या पक्षाने त्याला सोडून दिले, मित्रांनी विश्वासघात केला, त्याचे पद गेले, पण तरी ज्याच्याकडे ही क्षमता आहे तो महाशक्तिशालीच असतो.’ चर्चिल यांचा १८९७ सालातला एक निबंध आहे ‘स्कॅफोल्डिंग ऑफ -हेटरिक’ नावाचा. त्याची सुरुवात या वाक्यांनी झालेली आहे.
पण हे वाक्पटुत्व अंगभूत असते की ते कमवावे लागते? चर्चिल सांगतात, ‘वक्ता खरा असतो. वाक्चातुर्य अंशतः कृत्रिम असते.’ याचा अर्थ काही प्रमाणात ते कमवावे लागते. काही अंशी ते वक्त्याच्या स्वभावातच असावे लागते. मोदींचे वाक्चातुर्य समजावून घेताना हा स्वभावाचा भाग लक्षात घ्यायला हवा. मोदींच्या स्वभावात एक नाटकीपणा आहे. वस्तुविक्रेत्याचा, सेल्समनचा नाटकीपणा. तो कदाचित त्यांच्या भवतालातील गुजराती व्यापारी वातावरणातून उतरला असेल, पण एक नक्की की त्यांच्यात ही अभिनयकला अंगचीच आहे.
मोदींच्या भाषणशैलीवर उत्तराखंड विद्यापीठात एक प्रबंध सादर करण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री के रूप में नरेंद्र मोदी की भाषिक प्रभावोत्पादकता’ हे त्याचे शीर्षक. त्याचे लेखक आहेत दिनेश शर्मा. ते सांगतात, की ‘नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि आयोजनाशी संबंधित असल्यामुळे लहानपणापासूनच मोदींच्या भाषेवर नाट्यमयतेची पुटे चढू लागली होती.’ केवळ भाषेवरच नव्हे, तर मोदींच्या एकंदरीतच वर्तणुकीचा तो एक हिस्सा आहे. अन्य राष्ट्रांच्या प्रमुखांशी आपली जवळीक दाखविण्यासाठी त्यांना मिठ्या मारण्यासारखी कृती असो, संसदेत पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा प्रवेश करण्यापूर्वी संसदेच्या पाय-यांसमोर नतमस्तक होणे असो वा सफाई कामगारांचे पादप्रक्षालन करण्यासारखा प्रकार असो, त्यातून मोदींच्या स्वभावातील हा नाटकीपणाच दृगोचर होतो. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींना ते भलतेच झोंबले होते.
पण केवळ नाटकीपणा हाच मोदींचा स्वभाव नाही. चर्चिल सांगतात, ‘वक्ता हा अनेकांच्या मनोविकारांचे, उन्मादाचे मूर्तरूप असतो. तो लोकांना प्रेरित करण्यापूर्वी स्वतःच प्रेरित झालेला असतो. लोकांच्या मनातील घृणा जागृत करण्यापूर्वी त्याचे स्वतःचे काळीज संतापाने भरलेले असते. लोकांना रडायला लावण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असतात…. त्याची मते बदलू शकतात… पण प्रत्येक वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याचा स्वतःचा त्या बोलण्यावर विश्वास असतो. तो अनेकदा विसंगत असू शकेल. पण तो कधीही जाणीवपूर्वक अप्रामाणिक नसतो.’ मोदींच्या वागण्या-बोलण्यात अनेक विसंगती आढळतात. विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करणारे मोदी पुढे स्वतःच जीएसटी आणतात. तेसुद्धा संसदेत त्याचा मोठा इव्हेन्ट करून. परकी गुंतवणुकीला आधी विरोध करणारे नंतर स्वतःच त्यासाठी पायघड्या अंथरतात. काँग्रेसच्या अपयशाचे थडगे म्हणून मनरेगावर टीका करणारे मोदी पुढे मात्र ती योजना तशीच सुरू ठेवतात. निवडणूक प्रचारात शरद पवारांवर टीकेचे घणाघात करतात आणि प्रचाराचे वारे गेले की पवार हे त्यांना गुरुस्थानी असतात. अशा प्रकारची विसंगती अन्य कुणाच्या वर्तनात आढळती, तर लोकांनी ती मनोविकृती मानली असती. मोदींच्या भक्तांना तसे वाटत नाही. त्याची कारणे वेगळी आहेत.
एक खरे की मोदी असे विसंगत असले तरी ते अप्रामाणिक नक्कीच नाहीत. याचा अर्थ असा, की त्या-त्या वेळी ते जे-जे बोलतात त्यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. त्यांच्यातील त्या विश्वासाने त्यांचे अनुयायी एवढे दिपून गेलेले असतात की त्यांना मोदींमधील विसंगती दिसतच नसते. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे मोदी हे त्यांच्या अनुयायांच्या मनोविकारांचे, न्यूनगंडांचे, भयाचे, उन्मादाचेच मूर्त रूप म्हणून पुढे आलेले असतात.
मोदी हे जेव्हा लोकांच्या मनातील सांस्कृतिक-धार्मिक पूर्वग्रहांना चेतवत असतात, द्वेषपूर्ण शब्दयोजनेतून लोकांच्या मनात विरोधकांबाबत तिरस्काराची भावना निर्माण करीत असतात, तेव्हा त्या सर्व भावनांनी ते स्वतःच आधी प्रेरित झालेले असतात हे विसरता कामा नये. हे मोदींचे भाषिक आणि वैचारिक रुप आहे. त्यांची भाषणे ‘पाहताना’ ते लक्षात घ्यायला हवे. मोदींचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो आणि मोदींच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते हे समजून घेण्यासाठी ते अत्यावश्यक आहे.

या लेखाचा भाग येथे पहावा.

विसोबा खेचर, सर्व घटनांवर लक्ष ठेऊन असणारे, पट्टीचे लेखक आणि पत्रकार आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: