अहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे

अहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे

कोरोना बाधितांसाठी गुजरातमधील ज्योती सीएनसी फर्मने केवळ ‘१० दिवसांत’ व्हेंटिलेटर तयार केले, त्याचे मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले पण प्रत्यक्षात हे व्हेंटिलेटर खराब लागले. या फर्ममधील एका प्रमोटर कुटुंबाने नरेंद्र मोदी यांना महागडा सूट भेट म्हणून दिला होता.

अहमदाबाद व नरेंद्र मोदी – प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न
ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश
खेळपट्टी की आखाडा

गुजरातेतील सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार केल्या जाणार्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्या फर्मच्या व्हेंटिलेटरबाबत नकारात्मक मत उपस्थित केले होते त्याच फर्मकडून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ५ हजार व्हेंटिलेटर खरेदी करत आहे. या फर्मचे सध्याचे प्रमोटर व एक माजी प्रमोटर यांचे भाजपमधील अनेक बड्या नेत्यांशी व कमीतकमी एका मोठ्या व्यावसायिकाशी जवळचे संबंध आहेत ज्याने २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागडा सूट भेट म्हणून दिला होता.

या व्हेंटिलेटरची खरेदी एचएलए लाइफ केअरमार्फत केल्याचे गुजरातचे प्रधान आरोग्य सचिव जयंती रवी यांचे म्हणणे आहे. या खरेदीसाठी पीएम केअर्स फंडकडूनही मदत घेतली गेल्याची शक्यता आहे. हा एकूण खरेदी व्यवहार २ हजार कोटी रु.चा असून पीएम केअर्स फंडने ‘मेड इन इंडिया’अंतर्गत ५० हजार व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार असल्याचे मागे म्हटले होते .

गेले काही दिवस गुजरातेतील ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीने अहमदाबाद सिव्हील रुग्णालयाला ‘मेड इन इंडिया’ व्हेंटिलेटर्स मोफत दिले आहेत, त्याची चर्चा सुरू आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराक्रमसिंह जडेजा हे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे जवळचे मानले जातात.

हे व्हेटिंलेटर जेव्हा कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरण्यास सुरवात झाली तेव्हा ते खराब असल्याचे निदर्शनास आले आणि रुग्णांना दुसरे व्हेंटिलेटर देण्यात आले.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडने आपल्या मशीनचे नाव “धमन-१” असे ठेवले आहे. हे व्हेंटिलेटर्स मेड इन इंडिया असल्याचा दावा करण्यात आला आणि हे मोठे यश, कामगिरी असल्याचा गाजावाजा गुजरात सरकारने करत त्याचे मार्केटिंगही सुरू केले.

१८ मे रोजी ‘अहमदाबाद मिरर’ या वृत्तपत्राने एक बातमी दिली. या बातमीत अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी, ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे व्हेंटिलेटर खराब असल्याने त्या जागी पूर्वीचे व्हेंटिलेटर्स पुरवावेत अशी मागणी गुजरात सरकारकडे केली, असा उल्लेख आहे.

सध्या अहमदाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे ६०० जणांचे मृत्यू झाले आहेत.

अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे व्हेंटिलेटर्स सर्वात स्वस्त व ते १० दिवसात तयार केल्यामुळे ते वापरावेत अशी सूचना रुग्णालय प्रशासनाला केली होती. पण रुपाणी यांच्या या सूचनेला गुजरातमधील सरकारी डॉक्टरांनी विरोध केला.

या संदर्भात अहमदाबाद सिविल हॉस्पिटलचे मुख्य भूलतज्ज्ञ शैलेश शहा यांनी पीटीआयला सांगितले की, योगायोगाने आम्ही हे व्हेंटिलेटर्स अगदी मोजक्या रुग्णांना वापरले होते पण त्याचे परिणाम योग्य न दिसल्याने जुने व्हेंटिलेटर वापरणे सुरू केले. पण जेव्हा काहीच मदत मिळत नाही तेव्हा ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे व्हेंटिलेटर वापरू शकता. पण सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने धमन-१ वापरणे योग्य ठरणार नाही, असे शहा यांनी मत व्यक्त केले.

सध्या गुजरात राज्यात ९०० व्हेंटिलेटर्स असून अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २३० व्हेंटिलेटर्स आहेत. या प्रकरणाबाबत राज्य काँग्रेसने न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार मुद्दामून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. या व्हेंटिलेटरमुळे ३०० जणांचा मृत्यू झाल्याचाही त्यांचा आरोप आहे.

गेल्या शुक्रवारी बीबीसीच्या एका पत्रकाराने ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी आरोप केला की, त्यांचा मेहुणा अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित म्हणून दाखल झाला होता. पण त्याचा मृत्यू झाला. त्याला धमन-१ यंत्र लावले होते का, याची माहिती मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती.

अहमदाबाद मिररने असेही आपल्या वृत्तात सांगितले की, या व्हेंटिलेटर्सना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नाही. केवळ एका रुग्णावर चाचणी करून त्याचे उद्घाटन रुपाणी यांच्या हस्ते १५ एप्रिलला करण्यात आले. या कार्यक्रमाला रुपाणी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते.

या लॉकडाऊनमध्ये रुपाणी प्रत्यक्ष एकदाच बाहेर पडले आहेत ते म्हणजे या व्हेटिलेंटरच्या उद्घाटनासाठी. या कार्यक्रमासाठी ते अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते.

जेव्हा हे वादग्रस्त प्रकरण उघडकीस आले तेव्हा ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे हे मशीन व्हेंटिलेटर आहे असे आम्ही म्हटलेच नव्हते असा पवित्रा गुजरात सरकारने घेतला होता. वास्तवात सरकारच्याच जाहीर प्रेस रिलिजमध्ये या मशीनचा ९ वेळा उल्लेख व्हेंटिलेटर म्हणून करण्यात आला होता. शिवाय हे मशीन तयार करून मोदींच्या मेक इन इंडियाचे स्वप्न साकार झाले व ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचा दावा त्या प्रेस रिलीजमध्ये करण्यात आला होता.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडच्या या व्हेंटिलेटरची एवढी हवा तयार करण्यात आली की, काही राज्यांनी त्याची मागणी करण्यास सुरवात केली. पण २० मे रोजी पुड्डूचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी ट्विट करून धमन-१ मशीनची खरेदी रद्द केल्याचे जाहीर केले.

एचएलएल टेंडर, पीएम केअर्स?

२० मे रोजी गुजरातचे आरोग्य सचिव जयंती रवी यांनी धमन-१चे जोरदार समर्थन केले. या मशीनला गुजरात सरकारच्या प्रयोगशाळेने प्रमाणपत्र दिले असून केंद्राच्या उच्चस्तरिय खरेदी समितीने जी चौकट दिली आहे, त्यात या व्हेंटिलेटरची खरेदी योग्य ठरत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी असेही सांगितले की, ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडकडून ५० हजार मशीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एचएलएल लाइफ केअरने मागवली आहेत.

या खरेदीला बहुधा पीएम केअर फंडमधील २ हजार कोटी रु. निधी वापरण्यात आला असावा पण पीएम केअर फंड कोणत्या कंपनीकडून व्हेंटिलेटर घेणार आहेत याची माहिती द वायरला मिळालेली नाही. तसेच पीएमओकडूनही यासंदर्भात खुलासा आलेला नाही. पीएम केअर फंडमध्ये देशातील लाखो नागरिकांनी देणग्या दिल्या आहेत, पण या फंडविषयी कोणतीही पारदर्शकता केंद्र सरकारने दाखवलेली नाही.

राजकीय लागेबांधे

प्रशासनातील डॉक्टरांनी अशा व्हेंटिलेटरविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाही गुजरात सरकार मात्र ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडच्या मशीनची तरफदारी करत आहे. याचे उत्तर राजकीय लागेबंधातून दिसून येते. या कंपनीच्या प्रमोटरचे निकटचे संबंध गुजरातमधील बड्या नेत्यांशी असून हे संबंध अगदी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत आहेत.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे व्हेंटिलेटर्सचे कौतुक विजय रुपाणी यांनी केल्याचे वृत्त फायनान्शियल एक्स्प्रेसने दिले होते. या वृत्तात केवळ १० दिवसांत हे व्हेंटिलेटर तयार केल्याबद्दल रुपाणी यांनी राजकोटच्या उद्योगपतीचे कौतुक केले. या व्हेंटिलेटर्सच्या सर्व चाचण्या झाल्या असून सर्टिफिकेशन झाले व ते शनिवारी रुग्णांच्या सेवेस येतील असे ते म्हणाले होते.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे आपल्याला रोज फोन करतात व आपल्यापासून प्रेरणा घेतात असे ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे सीएमडी पराक्रमसिंह जडेजा सांगतात, असेही अहमदाबाद मिररच्या वृत्तात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी लघु-मध्यम उद्योगांना केंद्राने पॅकेज जाहीर केले त्यावर जडेजा यांच्या प्रतिक्रियेला रुपाणी यांनी थँक्यू असे ट्विटवरून उत्तर दिले होते.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडशी एक बडे व्यावसायिक रमेशकुमार भिकाबाई विराणी यांचे संबंध आहेत. याच विराणी यांनी २०१५मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा भारतभेटीवर आले असताना त्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महागडा सूट भेट म्हणून दिला होता. त्यावर मोदी असे नाव कोरले गेले होते. या सूटवर वादळ निर्माण झाल्यानंतर विराणी यांनी या सूटचा लिलाव केला होता. काँग्रेसने हा सूट १० लाख रु.चा असल्याचे सांगत तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सूट बूट की सरकार असा आरोप केला होता.

या रमेशकुमार विराणी यांची अनेक वर्षे ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडमध्ये आर्थिक भागीदारी आहे. २००३-०४च्या कंपनीच्या विवरण पत्रात भिकाभाई विराणी यांची दोन मुले अनिल विराणी व किशोर विराणी यांचे ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे मोठे भागीदार असल्याचे नमूद केले आहे.

या विराणी फॅमिलीची कार्प ग्रुप नावाची हिर्याच्या व्यवसायाची कंपनी आहे. जेव्हा मोदींच्या महागड्या सूटमुळे राजकारण ढवळून निघाले तेव्हा रमेश विराणी यांनी अनेक प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. त्यात त्यांनी, मोदी आपले लहान भाऊ असून त्यांना आपल्या मुलाच्या स्मित विराणीच्या लग्नाला आमंत्रण देणार असल्याचे म्हटले होते. रमेश विराणी हे सुद्धा कार्पचे संचालक आहे.

या स्मित रमेशभाई विराणी यांचे ३१मार्च २०१९पासून ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडमध्ये २० टक्के समभाग आहेत.

२०१२मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी सुरतला किशोर विराणी यांच्या आमंत्रणावरून लग्नाला गेले होते. हे लग्न किशोर विराणी यांच्या भाचा व भाचीचे होते. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाले होते.

जेव्हा द वायरने ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडचे सीएमडी जडेजा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले विराणी कुटुंबाची या फर्ममध्ये  ४६.७६ टक्के हिस्सेदारी आहे. त्यांना जेव्हा विचारले की तुम्ही नरेंद्र मोदी यांना वादग्रस्त सूट याच विराणी कुटुंबियांकडून दिला का, त्यावर त्यांनी या फर्ममधील हिस्सेदारी थांबवली असून लवकरच नवे विवरण भरले जाणार आहे असे उत्तर दिले आणि ड्रायव्हिंग करत असल्याने फोन बंद केला.

पण नंतर त्यांनी द वायरला ईमेल द्वारे सांगितले की, या घडीला विराणी कुटुंबांची आमच्या फर्ममध्ये कोणतीही हिस्सेदारी नाही. ज्योती सीएनसीने फेब्रुवारी २०२०मध्ये नवे आयकर विवरण पत्र भरले आहे. त्या विराणी यांच्या हिस्स्यासंदर्भात माहिती नमूद करण्यात आली आहे. पण ही हिस्सेदारी कोणाला दिली आहे, या संदर्भात जडेजा यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. हा विराणी कुटुंबियांचा अंतर्गत मामला आहे, असे त्यांनी उत्तर दिले. मी पूर्ण स्वच्छ व्यक्ती असून सर्व माहिती तुम्हाला विवरणात मिळेल, असे त्यांनी उत्तर दिले.

द वायरने स्मित विराणी यांच्याशी हाँगकाँग येथे संपर्क साधला पण त्यांनी आपण भारतात राहात नसून ज्योती सीएनसी संदर्भातील कोणतीही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगितले.

जडेजा यांच्याशी द वायरने नंतर अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही शिवाय आपल्या विवरणपत्राचा खुलासाही केला नाही. एका फोनवेळी त्यांनी आपण मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. नंतर ते म्हणाले राजकोटमधील कार्यालय बंद आहे.

किशोर विराणी यांनीही आपण व्यस्त असून मला मेसेज करा एवढाच संपर्क साधला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: