मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’

मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’

पवार, जेटली ही व्यक्तिमत्वेच अशी आहेत की त्यांच्याकडे निट लक्ष ठेवले तर आपल्यालाही भविष्याची चाहुल लागू शकते. पवारांची राष्ट्रीय स्तरावरील वाढलेली लगबग आणि जेटलींना पक्षातील वाचाळवीरांचा नव्याने झालेला साक्षात्कार याचा अर्थ लोकसभेचे निकाल भाजच्या दृष्टीने धक्कादायक असतील असा काढावा लागतो.

मोदी सरकार तुमच्यावर पाळत ठेवतंय का? मग हे पाच प्रश्न नक्की विचारा.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन
इलेक्ट्रोरल बाँडवर जेटलींचा सल्ला मोदींनी मानला
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

निवडणूक जिंकण्याची शक्यता दिसत असेल तर पक्षातले प्रमुख नेते ‘संभाव्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करता येईल’, ‘मित्रपक्षातील कोणत्या नेत्यांना किती महत्व द्यावे लागेल’, याच्या तयारीला लागतात. आपला पक्ष जिंकण्याची शक्यता नाही, असे जर वाटत असेल तर नेते आपल्या पराभवाची कारणे शोधण्याच्या तयारीला लागतात. सतराव्या लोकसभेसाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अरूण जेटली यांना त्यांच्या पक्षात अनेक वाचाळवीर असल्याची कबुली द्यावीशी वाटली.  (इंडियन एक्स्प्रेस, ८ एप्रिल २०१९) हे त्यांना पराभव दिसत असल्याचे लक्षण मानावे काय? आपल्या पुढ्यात बसलेला क्लायंट निर्दोष आहे की गुन्हेगार आहे हे चाणाक्ष वकिल पहिल्या काही मिनिटातच ओळखतो आणि मग तशा पद्धतीने पुढील बोलणी करतो. जेटली तर नुसतेच चाणाक्ष नाही तर धूर्त वकील आहेत, त्यांना भविष्याची चाहुल लागली असेल तर ते साहजिकच म्हटले पाहिजे.
जेटली जेव्हा भाजपमध्ये अनेक वाचाळवीर असल्याची कबुली देतात तेव्हा त्यात त्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि स्वतःचा समावेश केला असण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्यांच्या मनातली भीती जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेव्हा त्यांना ही दोन नावे वाचाळवीरांच्या यादीत घ्यावीच लागतील. गेले काही महिने नव्हे तर साडेचार वर्षे भाजपमधील हे वाचाळवीर तोंडाची वाफ दवडत आहेत. तेंव्हा त्यातल्या एकाच्याही तोंडाला आवर घालण्याची बुद्धी या वरिष्ठ नेत्यांना झाली नाही.

कलाकारांच्या सौजन्याने साभार

कलाकारांच्या सौजन्याने साभार

खुद्द मोदींनीच ‘नाल्यात पाईप घालून त्या गॅसवर चहा बनवता येतो’ अशी बनवाबनवी केली होती. तेव्हा अनेक भक्तांनी त्यात शास्त्रीयदृष्ट्या तथ्य असल्याच्या ‘वैज्ञानिक पोस्ट’ फेसबुकवर टाकल्या होत्या. पाठोपाठ अनेक भाजप कार्यकर्ते देशातील शेकडो शहरांतील हजारे नाल्यांच्या काठांवर चहाच्या आणि वडा-पाव, पकोड्यांच्या गाड्या टाकतील आणि पंतप्रधांनांनी देशाला दिलेले रोजगारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यास मदत करतील असे वाटले होते. परंतु नाले बिचारे आपल्या उद्धाराची वाट बघत तसेच घाण आणि कचरा घेऊन वाहात आहेत. त्यापूर्वी मोदींनी ‘आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरी होती’ असेही संशोधकांसमोर सांगितले होते. परंतु जेटली तूर्तास तरी मोदींना वाचाळवीरांच्या यादीत घेणार नाहीत. परंतु २३ मे नंतरही त्यांची ही भूमिका कायम राहिलच असे काही सांगता येत नाही. कदाचित म्हूणूनच आत्ता जेटलींनी वाचाळवीरांचा केवळ उल्ल्ख केला, त्यांची नावे घेतली नाहीत. परंतु आपण थोडा प्रयत्न केला तर असे वाचाळवीर सहज आठवतील.

  • केंद्रात राज्यमंत्री असलेल्या अनंतकुमार हेगडे यांनी भाजप सरकार घटना दुरुस्ती करुन आपल्या घटनेतील सेक्युलर हा शब्द काढून टाकेल अशी घोषणा केली होती.
  • केंद्रातले दुसरे एक मंत्री गिरीराज किशोर यांनी तर ज्यांना मोदी नको असतील त्यांनी पाकिस्तानात निघून जावे, असे सांगून लोकशाहीची तिरडीच बांधायची तयारी केली होती. सोनिया गांधी जर गोऱ्या कातडीच्या नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले नसते, अशी मुक्ताफळे उधळणारेही हेच महाशय होते.
  • हरिद्वारचे  भाजप खासदार रमेश पोखरियाल यांनी विज्ञान हे थोतांड असून, ज्योतिष हेच केवळ खरे शास्त्र आहे, असा दावा केला होता. त्यांची स्वतःची मुले शाळेत विज्ञान शिकत होती की हस्तसामुद्रिकाचा अभ्यास करत होती हे पाहिले पाहिजे.

ही जबाबदार मंडळी जाहीरपणे भाजपच्या विचारसरणीचे असे प्रदर्शन करत असताना जेटलींनी कधी कुणाला झापल्याचे दिसले नाही. गाय दूध देते तोवर लाथा गोड मानायच्या आणि दूध आटायला आले की गाय मारकुंडी असल्याच्या तक्रारी करायच्या असेच हे आहे. जेटली अशा पलट्या मारण्यात मास्टर आहेत.
वाजपेयींच्या काळात जेटली वाजपेयीचे खास होते. तुलनेने खूपच तरूण असूनही त्यांना वाजपेयींशी थेट संपर्क साधण्याची व्यवस्था होती. पुढे भाजपने मवाळ मुखवटा टाकून आक्रमक चेहरा धारण केला आणि मतदारांना त्या चेहऱ्याची भूरळ पडते आहे हे लक्षात येतातच जेटलींनी पक्षातल्या पक्षात पक्ष बदलला आणि हळूच अडवाणींचा हात धरला. कुठलीही नशा सुरूवातीला सौम्य असते आणि मग तीची तीव्रता वाढल्याशिवाय झिंग येत नाही. सौम्य हिंदुत्वाची नशा चढत नाही, अडवाणी त्यात कमी पडत आहेत आणि आता मोठा डोस घेतल्याशिवाय कीक बसणार नाही हे जेटलींच्या लक्षात आले. असा मोठा डोस मोदींनी गुजराथमध्ये दिला होता, तोच आता देशभरच्या लोकांना हवा आहे हे जेटलींनी ताडले. पावसाच्या आधी जसा हवेत ओलावा येतो तसा राजकीय यशाचा सुगंधही काहींना येत असतो, तसा तो जेटलींना आला आणि अडवाणींच्या धोतराचा सोगा सोडून त्यांनी मोदींचा सदरा धरला.
खरे तर इंग्रजीत बोलणारे,  इंग्रजीत विचार करणारे आणि सँडविचसदृश्य लेचेपेचे पदार्थ खाणाऱ्यांचा अमित शहा यांनी तिटकारा आहे. परंतु मोदींनी आणि शहांना ज्याला इंग्रजी बोलता येते आणि यशस्वी नेत्यांशी जो प्रामाणिक राहतो असा कोणी हवा होता. जेटली इथेही फिट बसले.  खरे तर ते भाजपमधील ‘शरद पवार’ आहेत!
मुळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यातून पुढे आलेले जेटली अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनले ते व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना म्हणजे जनता दलाच्या काळात! राज्यसभेत  २००९ साली त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली ती लालकृष्ण अडवाणी यांनी. २०१४ मध्ये त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली ती नरेंद्र मोदींनी. आता २०१९ ची निवडणूक उंबरठ्यावर असतना त्यांना गेल्या साडेचार वर्षात पक्षात अनेकांनी जीभा सैल सोडल्या होत्या त्याची आठवण झाली.
पवार, जेटली ही व्यक्तिमत्वेच अशी आहेत की त्यांच्याकडे निट लक्ष ठेवले तर आपल्यालाही भविष्याची चाहुल लागू शकते. पवारांची राष्ट्रीय स्तरावरील वाढलेली लगबग आणि जेटलींना झालेला हा साक्षात्कार याचा अर्थ लोकसभेचे निकाल भाजच्या दृष्टीने धक्कादायक असतील असा काढावा लागतो. अन्यथा गेली चार-पाच वर्षे ‘चायसे ज्यादा केटली गरम’ या नात्याने मोदींपेक्षाही अधिक कडवे, अधिक आक्रमक होऊन विरोधकांवर तुटून पडणाऱ्या जेटलींना अचानक पक्षातले बेताल बडबड करणारे खुपले नसते.
मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’ असण्याचे दिवस संपणार असल्याची ही चिन्हे आहेत, असे म्हणावे का?

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0