गोव्यात ७८ टक्के, उत्तराखंडमध्ये ६० टक्के मतदान

गोव्यात ७८ टक्के, उत्तराखंडमध्ये ६० टक्के मतदान

नवी दिल्लीः गोवा, उत्तराखंड, उ. प्रदेश (मतदानाचा दुसरा टप्पा) या राज्यात सोमवारी झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनुक्रमे ७८.९, ५९.६७ व ६०.१८ टक्के मतदान झाले. गोव्यातले मतदान गेल्या विधानसभेतील मतदानाच्या तुलनेत ३.७ टक्के (८२.६) कमी झाले असले तरी निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. गोव्यात ४० विधानसभा जागा असून ३०१ उमेदवार निवडणुकांसाठी उभे होते. उत्तराखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५९.६७ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात १३ जिल्ह्यात मतदान झाले. सर्वाधिक मतदान हरिद्वार जिल्ह्यात ६७.५८ टक्के इतके झाले त्यानंतर उत्तर काशी, उधमसिंह, नैनीताल जिल्ह्यात ६५ टक्क्याच्या आसपास मतदान झाले. सर्वात कमी मतदान अल्मोडा जिल्ह्यात ५०.६५ टक्के इतके झाले.

उ. प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान होते. राज्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६०.४४ टक्के मतदान झाले. सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बदायूं, बरेली, शाहजहांपूर या जिल्ह्यांतल्या ५५ जागांसाठी मतदान झाले. २०१७च्या विधानसभा निवडणुकांत या जिल्ह्यांत सरासरी ६५.३३ टक्के मतदान झाले होते तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ६३.१३ टक्के मतदान झाले होते.

मणिपूर, उ.प्रदेशः प्रचाराच्या यादीत जी-२३ नेत्यांना स्थान नाही

दरम्यान मणिपूर येथे होणारे मतदानाचे दोन टप्पे आणि उ. प्रदेशातील अखेरच्या सातव्या टप्प्यासाठीच्या प्रचारासाठी काँग्रेसने बंडखोर जी-२३ नेत्यांना आपल्या यादीतून वगळले आहे. सोमवारी पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. उ. प्रदेशच्या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या बरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची नावे आहे. तर मणिपूरच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त जयराम रमेश व अन्य ज्येष्ठ नेते आहेत.

उत्तर प्रदेशात सातव्या व अंतिम टप्प्याचे मतदान ७ मार्चला तर मणिपूरला २८ फेब्रुवारी व ५ मार्चला मतदान होणार आहे.

पाच राज्यांचा निकाल १० मार्चला लागणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS