खेळपट्टी की आखाडा

खेळपट्टी की आखाडा

जेव्हा सरदार पटेल स्टेडियम या नावाऐवजी दुसरे नाव लोकांनी पाहिले त्यावेळीच सर्वांना धक्का बसला होता. भारताचा तिरंगा ध्वज स्टेडियमवर नेण्यास बंदी घातली गेली होती. त्याबाबतही प्रेक्षकांना काहीच कळत नव्हते. जेव्हा अशी भयानक खेळपट्टी त्यांनी पाहिली, त्यावेळी फसवले गेल्याची जाणीव त्यांना झाली.

२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?
अहमदाबाद व नरेंद्र मोदी – प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न
‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण?

अवघ्या १४० षटकांचा (८४२ चेंडूंचा) सामना. अहमदाबादच्या मोटेरा गावातील स्टेडियमचे कायापालट करून उभारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाच्या स्टेडियमवर हा इतिहास घडला. या स्टेडियमवर प्रदर्शनीय सामना व्हावा अशा थाटाची ही कसोटी. ५ दिवसांची कसोटी अवघ्या पावणे दोन दिवसांत संपली. १९३५ नंतर एवढा अल्पजीवी कसोटी सामना झाला नव्हता. तो विक्रम या सामन्याने आणि पर्यायाने स्टेडियमनेही मोडला. यजमान संघ जिंकण्यासाठी स्वतःच्या क्षमतेला अनुसरून अनेक गोष्टी करून घेतात. मात्र जिंकल्याच्या हव्यासापाई या थराला गोष्टी जाऊ शकतात याचे आश्चर्य वाटते. पंचतारांकित सोईसुविधा काय कामाच्या? ज्या खेळपट्टीवर सामना होणार तीच निकृष्ट दर्जाची. कोरोनामुळे आयसीसीने स्वतःचेच पंच, सामनाधिकारी नेमण्याच्या सुविधांचा यजमानांनी पुरेपूर लाभ घेतल्यास आश्चर्य वाटायला नको, पण डीआरएसच्या युगात तिसरा पंच फक्त एखाद-दुसर्या कॅमेर्याच्या चित्रीकरणाच्या आधारे निर्णय देत होता, हे मात्र अनाकलनीयच होते. इंग्लंड व्यवस्थापनाने याबाबत सामनाधिकार्यांकडे अधिकृत विचारणा केली होती. कारण रोहित शर्मा व शुभमन गिल यांना नाबाद ठरवण्याच्या निर्णयाबाबत घेतलेल्या आक्षेपांमध्ये तथ्य दिसत होते.

खेळपट्टीबाबत तर काय बोलावे? सभोवतालचे मैदान उत्कृष्ट दर्जाचे वाटत असताना २२ यार्डचा तुकडाच कसा नित्कृष्ट दर्जाचा होऊ शकतो? की खेळपट्टी तशी करण्याचे आदेश दिले गेले? रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून या गोष्टी सातत्याने घडायला लागल्या. भारतीय संघ भारतात आखाडा खेळपट्ट्या करून अधिक वेगात जिंकायला लागला. परदेशात मात्र आपल्या गोलंदाजांचे आणि प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांचे पितळ उघडले पडायला लागले.

खेळपट्टीवर कमी पाणी मारणे, पाणी मारण्याचे थांबवणे, कमी रोलिंग करणे अशा गोष्टींमुळे दर्जा घसरत चालला, आतापर्यंत आयसीसीच्या खेळपट्टी समितीचा प्रतिनिधीही देखरेखीसाठी असायचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुणीही कुठे जात नाही. ही गोष्ट अशा गोष्टी करणार्यांच्या पथ्यावरच पडली आहे. कुणीही पाहायला नाही. कुणीही जाब विचारणारा नाही.

त्यापेक्षा आश्चर्य वाटते ते सुनील गावसकरांपासून अनेक दिग्गज कसोटीपटूंच्या समालोचनाचे. प्रत्येक जण या खेळपट्टीचे गुणगान गात होते. खेळपट्टी किती योग्य आहे. परंतु फलंदाजांचा माइंड सेट चुकीचा असल्यामुळे असं घडत आहे, हे क्रिकेटरसिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता. खेळपट्टी कशीही असूदे, त्यावर स्वतःच्या तंत्राला जुळवून घेऊन फलंदाजाने उभे राहिले पाहिजे, असा युक्तिवाद केला जात होता.

यावर एका माजी कसोटीपटूंनी सांगितले, १९७३च्या चेपॉकवरील रणजी अंतिम सामन्याची खेळपट्टी अशीच भयानक होती. दोन दिवसांत अंतिम सामना संपला. त्या ‘चॅलेंजिंग’ खेळपट्टीवर कुणी किती किती धावा काढल्या ते स्कोअरकार्डवर पाहा.

अहमदाबाद खेळपट्टीपेक्षा फलंदाजांना दोष देणारे सुनील गावस्कर यांनी १९७३च्या रणजी अंतिम सामन्यातील अशाच खेळपट्टीवर किती धावा काढल्या? असा सवाल त्याच खेळाडूने मला केला. वेंकट राघवनच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे रथीमहारथी धारातीर्थी पडले. त्यावेळी वेस्ट इंडिज दौर्यावरून विक्रमी फलंदाजी करून आलेल्या गावसकरांनी ‘त्या’ खेळपट्टीवर स्वतःला किती ‘अडजेस्ट’ करून धावा काढल्या होत्या?

अहमदाबादच्या खेळपट्टीवर नॉन रेग्युलर गोलंदाज ज्यो रुट ६ षटकांमध्ये ५ बळी घेतो, त्या खेळपट्टीला आपण दर्जेदार व कसोटी क्रिकेटसाठी योग्य अशी खेळपट्टी म्हणायचे का? मुंबईत २००५ भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीही अशीच दोन दिवसांत संपली होती. त्यावेळीही नियमित गोलंदाजी न करणार्या मायकल क्लार्कने भारतीय फलंदाजांची अशीच कत्तल केली होती. त्यावेळी आयसीसीने मुंबईची कसोटी केंद्र म्हणून परवानगी काढून घेऊ नये अशी विचारणा बीसीसीआयकडे केली होती. यावेळी तेच धाडस आयसीसी दाखवणार का?

याबाबत इंग्लंडच्या कप्तान ज्यो रुटला काय म्हणायचे आहे ते पाहा, ‘स्वगृही कसोटी खेळपट्ट्या तयार करण्याचा यजमानांना लाभ हवाच. मात्र तो घेताना यजमानांनी किती स्वातंत्र्य घेतले आहे हे आयसीसीने पडताळून पाहायला हवे. हवी खेळपट्टी आवश्यक असणार्या दर्जाची होती का? त्याचा निर्णय आयसीसीने घ्यायचा आहे.’

मुक्त व खर्या खुर्या मतप्रदर्शनास मनाई असल्याने चुकीच्या गोष्टींवर देखील खेळाडूंना, कप्तानाला टिप्पणी करता येत नाही. मात्र शंभराहून कसोटी खेळलेले क्रिकेट समालोचक देखील या खेळपट्टीचे कौतुक करताना फलंदाजांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ती बाब मात्र हास्यास्पद वाटत होती.

जेव्हा सरदार पटेल स्टेडियम या नावाऐवजी दुसरे नाव लोकांनी पाहिले त्यावेळीच सर्वांना धक्का बसला होता. भारताचा तिरंगा ध्वज स्टेडियमवर नेण्यास बंदी घातली गेली होती. त्याबाबतही प्रेक्षकांना काहीच कळत नव्हते. जेव्हा अशी भयानक खेळपट्टी त्यांनी पाहिली, त्यावेळी फसवले गेल्याची जाणीव त्यांना झाली.

पाच दिवसांच्या कालावधीतील आयोजित करण्यात आलेली कसोटी अवघ्या १४० षटकांत संपली. दोन सत्रात तब्बल १७ विकेट पडल्या. चेंडू कसेही वळत होते, उसळत होते, वळणार असे वाटत असतानाच सरळ जात होते. कोणत्याही फलंदाजांना अंदाज येत नव्हता. फलंदाजीच्या तंत्राचे चक्क वस्त्रहरण होत होते. मात्र दोष होता निकृष्ट दर्जाच्या खेळपट्टीचा. मात्र यजमान भारत आणि त्याचे समालोचक सामनाधिकारी आणि खेळाडू ही गोष्ट खुलेआम मान्य करत नव्हते. उलट खेळपट्टी कशी चांगली आहे व आम्ही कसे खराब खेळलो हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होते. भारताने पहिल्या डावात अखेरच्या ८ विकेट ४७ धावात गमावल्या. इंग्लंडचा दुसरा डाव ३१ षटकांत ८१ धावांत संपला.

कसोटी क्रिकेटमध्ये हा संघर्ष पाहण्यासाठी लोक येत नाहीत. अखेरच्या क्षणापर्यंत रंगणारी झुंज त्यांना अपेक्षित असते. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ४० ते ४५ हजार प्रेक्षकांचांही त्यामुळे भ्रमनिरास झाला. त्यांना विराट कोहलीविरुद्ध अँडरसन यांच्यातील झुंज पाहायची होती. इंग्लंड आणि भारताच्या फिरकी गोलंदाज आणि उभय संघाच्या फलंदाजांमधील संघर्षाची झिंग त्यांना अनुभवायची होती.

इशांत शर्माला आपल्या १०० व्या कसोटीत उत्तम गोलंदाजी करून छाप पाडायची होती. दुसर्या डावात त्याच्या आणि बुमराच्या वाट्याला एकही षटक आले नाही. इंग्लंडचा कप्तान ज्यो रुट, बेन स्टोक्स यांची फलंदाजी पाहायची होती. अँडरसन, ब्राँड, आर्चर, बुमरा, इशांत शर्मा या जगातील नावाजलेल्या गोलंदाजांची अदाकारी पाहायची होती. प्रत्यक्षात वाट्याला काय आले? अनियमित फिरकी गोलंदाज ज्यो रुटची तसेच अक्षर पटेलची गोलंदाजी. खेळपट्टी क्रिकेट खेळण्याजोगी होती का? याबाबत निर्णय आयसीसी घेईल. पण स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना दर्जेदार क्रिकेट पाहता आले नाही, हे सत्य मात्र मान्य करावेच लागेल. प्रेक्षकांची ती संधी हुकवली सुमार दर्जाच्या खेळपट्टीने, त्यासाठी जबाबदार कोण?

या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे आहे. मात्र दोषींवर कारवाई करणे त्यापेक्षाही कठीण आहे. कारण भारतात क्युरेटर चांगली खेळपट्टी तयार करतात. मात्र प्रशिक्षक, कप्तान आणि काही वेळा बीसीसीआयचे पदाधिकारीच खेळपट्टीच खराब करण्याचे आदेश देतात. ते मानण्याशिवाय पर्यायच नसतो. नाहीतर त्याजागी दुसरा क्युरेट आणला जातो. खेळपट्टी खराब करण्याचा अघोरी उपायांपैकी पहिला सर्वोत्तम उपाय असतो. तो म्हणजे खेळपट्टीवरचे पाणी कमी कमी करणे. खेळपट्टी अधिकाधिक कोरडी राहील याकडे लक्ष देणे. ज्यामुळे माती भुसभूशीत होऊन लवकर मोकळी होईल व खेळपट्टी तुटेल, फाटेल. अर्थातच अशा खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज हात धुवून घेणारच.

दुसरा अघोरी उपाय म्हणजे गुड लेंग्थ स्पॉटवर लोखंडी काटा मारून खेळपट्टी खडबडीत करणे. त्यामुळे चेंडू लवकरच ‘ग्रीप’ होतो. असमान उंची किंवा काही ठिकाणी गवत ठेवणे व काही ठिकाणी मातीचा पृष्ठभाग असणार्या खेळपट्टीवर चेंडूला असमान उसळी मिळते व फलंदाज फसतो. माती भुसभूशीत झाल्यानंतर चेंडू बॅटवर येतानाच्या वेगात आणि फिरकीमध्येही असमानता येते. अशा खेळपट्ट्यांवर प्रारंभी फलंदाजीस येणार्या फलंदाजांना चेंडू नवा असतानाचा खेळपट्टीच्या वेगाचा, तसेच उसळीचा अचूक अंदाज येतो. नंतरच्या फलंदाजाना मात्र खेळवट्टीवर जम बसवता येत नाही.

ही झाली खेळपट्टीची बाब. प्रत्यक्षात स्टेडियमवरील सुविधा इतक्याच क्रिकेट सुविधाही महत्त्वाच्या असतात. डीआरएससाठी मर्यादित कॅमेर्यांचे अँगल आणि संख्या असल्याने तिसर्या पंचाची निर्णय देताना पंचाईत झाली होती. काही चुकीच्या निर्णयांवरही त्यांनी शिक्कामोर्तब केल्याची शंका इंग्लंडच्या संघाने व्यक्त केली आहे.

सरतेशेवटी भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने असे का केले? कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यातील पात्रतेसाठी भारताला अहमदाबाद कसोटीत विजय अत्यावश्यक होता. विजेतेपदाच्या हव्यासापाई भारताने काही संकेत मोडले. कसोटी दोन दिवस संपल्याचे सोयरसुतक कुणालाही नाही. खराब खेळपट्टीच्या आधारे मिळवलेले विजय आणि विजेतीपदे खेळाडूंना, प्रशिक्षकांना, बीसीसीआयला अधिक फायदेशीर आहेत. ‘नीतिमत्ता’, किस चिडियाँ का नाम हैं..

विनायक दळवी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: