हिंदुत्ववाद्यांनी रणबीर-अलियाला मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले

हिंदुत्ववाद्यांनी रणबीर-अलियाला मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले

नवी दिल्ली: हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी हिंदी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर व अलिया भट यांना मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात प्रवेश

बरोडा बँकेने २१ हजार ४७४ कोटी राईट ऑफ केले
आर्थिक विकासदर १२ टक्क्याने वाढेलःआयएमएफ
शोपियन एन्काउंटरः लष्करी अधिकाऱ्याविरोधात फिर्याद

नवी दिल्ली: हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी हिंदी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर व अलिया भट यांना मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, रणबीर व अलियाला अडवणारे कार्यकर्ते बजरंग दलाचे होते. रणबीर कपूरने गोमांस खाण्याबद्दल केलेली कथित टिप्पणी व त्यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट यांना विरोध म्हणून रणबीर व अलियाला मंदिरात प्रवेश करू दिला नाही, असा दावा कार्यकर्त्यांनी केला.

महाकाळ पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचेही बातमीत म्हटले आहे. रणबीर व अलियाची कार पासिंगसाठी आली असता, कार्यकर्ते ‘जय श्रीराम’चा गरज करत त्यांना अडवत असल्याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर प्रसृत झाले आहेत. पोलिसांनी लाठीमार करूनही कार्यकर्ते हटले नाहीत आणि त्यांनी रणबीर व अलियाला मंदिरात प्रवेश करू दिला नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांनी एका उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यावर भारतीय दंड संहितेच्या ३५३व्या कलमाखाली (सरकारी नोकराला त्याच्या कर्तव्यपूर्तीपासून रोखण्याकरता हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) कारवाई केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे. या कथित कार्यकर्त्याला (पुरुष की स्त्री हे कळू शकले नाही) अटक करण्यात आली की नाही हे स्पष्ट नाही.

“आपल्याला मटन, चिकन व बीफ खायला आवडते असे रणबीरने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यामुळे आम्ही त्यांना (रणबीर व अलियाला) पवित्र महाकालेश्वर मंदिरात प्रवेश करून प्रार्थना करू देणार नाही,” असे बजरंग दलाचे नेते अंकित चौबे यांनी वार्ताहरांना सांगितले.

चौबे म्हणाले, “ज्यांना कोणाला ब्रह्मास्त्र हा चित्रपट बघायला आहे त्यांनी बघावा, ज्यांना बघायचा नाही त्यांनी बघू नये असे अलियाही म्हणाली होती.”

अर्थात अलियाच्या या टिप्पणीत आक्षेपार्ह काय आहे हे कळू शकलेले नाही. अद्याप प्रदर्शितही न झालेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल व्यक्त होत असलेल्या निषेधाबद्दल एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल अलिया असे म्हणाली होती.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ऑनलाइन मोहीम चालवली आहे. #BoycottBrahmastra हा हॅशटॅग खूपच लोकप्रिय झालेला असून, चित्रपट व त्यात काम करणारे अभिनेते यांच्याबद्दलच्या अनेक मुद्दयांवरून विरोध करण्यासाठी हा हॅशटॅग हजारो वेळा वापरला गेला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ऑनलाइन विरोधाला सुरुवात झाली. या ट्रेलरमध्ये रणबीर सिंग हिंदू मंदिरात बूट घालून प्रवेश करताना दाखवल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या दृश्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप आहे.

अलियाच्या भट कुटुंबाला उजव्या विचारसरणीच्या ट्विटर वापरकर्त्यांद्वारे नेहमीच लक्ष्य केले जाते, असे ‘डेली ओ’ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. हिंदुत्ववाद्यांच्या ऑनलाइन शिवीगाळीच्या लक्ष्यस्थानी असलेल्या राणा अयुबला भट कुटुंबियांचा पाठिंबा आहे अशी टीका केली जाते. या कुटुंबातील अनेक सदस्य ‘हिंदूविरोधी’ आहे असा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे.

हिंदी चित्रपट उद्योग हा मुस्लिमांद्वारेच चालवला जातो, असे एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या निनावी अकाउंटद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. #urduwood सारखे तिरस्काराने भरलेले हॅशटॅग्ज सोशल मीडियावर सातत्याने फिरत असतात. चित्रपट उद्योगातील मुस्लिमांविरोधातील सांप्रदायिक दावे प्रसृत करण्यासाठी खोट्या माहितीचा वापर कसा केला जातो हे साहिल मुरली मेघनानी यांनी ‘द वायर’साठी तयार केलेल्या एका व्हिडिओत स्पष्ट केले आहे. आमिर खान अभिनित लालसिंग चड्ढा या चित्रपटालाही या मोहिमेत लक्ष्य करण्यात आले होते.

या सगळ्या निषेधादरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी मंदिरात प्रवेश करू शकले आणि त्यांनी देवतेचे दर्शन घेतले, असे मंदिरातील पुजारी आशीष पुजारी यांनी पीटीआयला सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: