मुंबईः कोविड-१९ महासाथीमुळे राज्य सेवा परीक्षा-२०२१ झाली नव्हती. त्यामुळे अंतिम संधी असलेल्या शेकडो उमेदवारांच्या हाती निराशा आली होती. ही निराशा लक्षात घेऊन राज्य सरकारने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाकडून मंगळवारी घेण्यात आला. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल असे उमेदवार अर्ज सादर करून शकणार आहेत. त्यानुसार फक्त १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करावे असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी २८ डिसेंबर, २०२१ रोजी १७.०० वाजल्यापासून १ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३:५९ वाजेपर्यंत असणार आहे.
COMMENTS