झपाटलेला तपस्वी

झपाटलेला तपस्वी

लोकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान करून असलेल्या 'मुग़ल-ए-आज़म'ला नुकतीच ६० वर्ष झाली. अमरत्वाचे वरदान या चित्रपटाला लाभले आहे. के. आसिफ नावाचा मनस्वी माणूस आणि त्यावर विश्वास, प्रेम , साथ देणाऱ्या सर्व लोकांच्या एकजुटीचा, मेहनतीचा हा सोनेरी इतिहास आहे.

काँग्रेसमध्ये बदल : गुलाम नबी, खर्गे यांना हटवले
उत्पादन ठप्प; सप्टेंबरपर्यंत एकाच नॅनोची विक्री
कर्नाटकः माध्यान्ह भोजनात अंडे-मांस न ठेवण्याची शिफारस

अल्लाहची इबादत करत असतांना बादशहाच्या समोरून स्वतःच्या धुंदीत असलेला मजनू जातो, तेव्हा ते गर्जतात, “अरे मूर्खां, माझ्या इबादतमध्ये तुझ्या येण्याने व्यत्यय आला. तेव्हा मजनू म्हणतो, “आश्चर्य आहे, मी तर लैलाच्या विचारात इतका मग्न होतो की मला खुद्द बादशहा देखील दिसले नाहीत!”

अशा दिवानेपणाची परिसीमा काय असते, हे मजनूच्या वेडाप्रमाणे पडद्यावर मांडू शकणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे करिमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ वरील संवाद आसिफ यांच्या अर्धवट राहिलेल्या ‘लव्ह अँड गॉड’ या चित्रपटातील आहेत.

हे असे एखाद्या गोष्टीसाठी के. आसिफ यांचे पछाडणे, ‘मुग़ल-ए-आज़म’च्या निमित्ताने सर्वपरिचित झाले होते. सारी दुनिया, सिनेजगत त्यांना ‘पागल डायरेक्टर’ म्हणून आजही ओळखते. ‘मुग़ल-ए-आज़म’च्या बाबतीतले त्यांचे अनेक किस्से सर्वश्रुत आहेत. पण के.आसिफ या अवलियाला अशा कोणत्याच कौतुकमिश्रित दूषणाने काहीही फरक पडत नसे. किंबहुना अशा बाबींकडे त्यांचं लक्षच नसायचे, अगदी वरील प्रसंगातील मजनूप्रमाणे…

मेरी दिवानगी पर होशवाले बहस फर्मायें
मगर पहले उन्हे दीवाना बनने की जरूरत है.

आठवी पास असलेल्या या माणसाचा एक शिंपी ते एक महान दिग्दर्शक म्हणून असलेला प्रवास खूप अचंबित करणारा आहे. या कलंदराचा एकंदरीतच अंदाज काही निराळा होता. मनातील संकल्पना साकारायला मिळणं, हे त्याच्यासाठी स्वर्गीय सुख होत. ती स्वप्नेचं जणू त्यांच्या जगण्यातील ऊर्जेचा स्त्रोत होती. पैसा- अडका, नाव- लौकिक यासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीकडे कधीच बघत नसे. अगदी मंटोसारख्या माणसाला त्याची ही दिवानगी अव्यवहारी वाटायची. हे म्हणजे एका फकिराने दुसऱ्या फकिराला तुझ्या झोळीला माझ्या झोळीसारखं छिद्र आहे, हे दाखवण्याप्रमाणे होते. दोन अफलातून नमुने. फरक इतकाच होता मंटोचे वास्तविकतेशी, जगण्यातील दाहकतेशी नाते होते तर आसिफ याचे कल्पनातीत जगाशी.

दिग्दर्शक के. आसिफ

दिग्दर्शक के. आसिफ

आसिफ यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचे कथानक मंटो यांना ऐकवले. ते ऐकून आसिफ यांच्या कथनशैलीवर मंटो जाम फिदा झाले. “केवळ बोलण्याने देखील तू चित्रपट घडवू शकतोस. पण हे कथानक अतिशय बकवास आहे. यावर फिल्म करण्याच्या फंदात पडू नकोस. “असे मंटोनी स्पष्ट सांगितले. ते उत्तर ऐकून आसिफ आनंदित झाले. कारण मंटोला जे रुचले नाही, ते सामान्य लोकांना नक्की भावेल, असा अजब हिशोब आसिफ यांचा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला  ‘फुल’ नावाचा पहिला चित्रपट. हा भारतातला पहिला मल्टीस्टार चित्रपट. या धाडसामुळेच ‘वेडा डायरेक्टर’ ही उपाधी त्यांना मिळाली. केवळ चित्रपट बनविण्यासाठीच या माणसाचा जन्म झाला असावा. सतत वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यात असायच्या, त्यातूनच प्रयोगशीलता निर्माण व्हायची. त्याच्या विचारातच एक प्रकारची भव्यता, दिव्यता असायची. ते पेशानेच नव्हे तर विचारपद्धतीने सुद्धा अव्वल दर्जाचे दर्जी, आताच्या भाषेत फॅशन डिझायनर होते. एखादा अप्रतिम डिझायनर ड्रेस शिवण्यासाठी कपडा, पोत, स्वरूप, आकार, नक्षीकाम समोर ठेवून, कुठे कापायचे- जोडायचे यांची उपजत जाण त्यांना होती. तो प्रभाव चित्रपट बनवत असतांना दिसून येत असे. कोणत्या प्रसंगात काय खुलून दिसेल, त्या प्रसंगाची शोभा वाढवणारी कलाकुसर चटकन त्यांच्या नजरेसमोर येत असे. ती केवळ नेपथ्यापुरती मर्यादित नसायची, तर संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय, प्रकाश योजना, नृत्य या सर्वांची नेमकी दृश्यरूपी कारागिरी त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहायची. मग काय, ती साकारण्यासाठी ते स्वतःबरोबर इतरांना वेठीस धरत असे. ही सर्व प्रक्रिया सृजनात्मक असायची. त्यातून निघालेले निष्पन्न आजही आपल्या डोळ्याचे पारणे फेडते.

‘मुग़ल-ए-आज़म’मधील अकबर-सलीम या पितापुत्रातील युद्धासारखे, एक युद्ध पडद्यामागे नेहमी लढले जात असे. ते युद्ध होत आसिफ आणि निर्माता शापूरजी पालनजी मिस्त्री यांच्यात. आणि अनारकली म्हणजे या चित्रपटाचा प्रोजेक्ट. या दोघांचे नाते ही मोठे गंमतीचे. या दोघांच्या भांडणात तिसऱ्या कोणी नाक खुपसलेले शापुरजीनां चालत नसे. अगदी त्यांच्या मुलाने देखील नाही. त्याचे वादविवाद विकोपाला जायचे. आसिफ नवीन सुपीक कल्पना ऐकवायचे. ती साकारणे का गरजेची आहे, ते अतिशय कळकळीने सांगत बसायचे. शापूरजींनी ऐकले तर ठीक, नाहीतर आसिफ अबोला धरून शूटिंग थांबून ठेवत असे.

एकदा न राहून नौशाद साहेबांनी शापुरजींना विचारले की, “तुमच्या आसिफबद्दल इतक्या तक्रारी आहेत तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याचे कशाला ऐकतात?” त्यावेळी शापुरजीं म्हणाले, “कारण हा माणूस इमानदार आहे. त्याने चित्रपटासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण त्यातील एक पैसा स्वतःच्या खिशात घातला नाही. बाकी सर्व लोकांनी कालावधी वाढला म्हणून कॉन्ट्रॅक्ट बदलून वरचे पैसे घेतले. पण हा पठ्ठ्या जुन्या कॉन्ट्रॅक्ट वर काम करतोय, आजही हा माणूस चटईवर झोपतो, भाड्याच्या घरात राहातो, टॅक्सीने फिरतो, सिगरेट उधारीने पितो. वीस-वीस तास काम करतो. त्याची चित्रपटावर अपार श्रद्धा आहे.”

आसिफ यांना शापुरजी आपला मुलगा मानायला लागले होते.

शापुरजींकडे पैशाची कमी नव्हती, पण ते आसिफ यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे होणाऱ्या अंदाधुंद खर्चाबाबत चिंतित असायचे. इतका खर्च होऊन चित्रपट पूर्ण होण्याचे नाव घेत नव्हता. एकदा त्यांनी चित्रपटाचे पुढील चित्रीकरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक सोहराब मोदीकडे सोपवायचे ठरविले. शापूरजी शीश महलच्या सेटवर सोहराब मोदींना घेऊन आले व म्हणाले, “हे बघ आसिफ, आता चित्रपट मोदी पूर्ण करतील. यापुढे तुझा नि माझा काही संबंध नाही”. यावर आसिफ महाराज आरामात चुटकी वाजवत म्हणाले, “ठीक आहे शेठजी, जशी तुमची मर्जी. पण एक गोष्ट लक्षात असू द्या. या सेटवर दुसरा कोणी डायरेक्टर आला तर  मी त्याची तंगडी मोडून ठेवेन. सारी इंडस्ट्री म्हणते आहे की या सेटवर चित्रीकरण होणे शक्य नाही. सर्व मला वेडा समजतात. पण मी या सेटवर चित्रीकरण करून दाखवेन आणि सर्वाना दाखवून देईन चित्रीकरण कसे केलं जातं ते!”

या दरम्यान सोहराब मोदी शीश महालाचा फेरफटका मारून आले. त्यांनी आसिफ यांना विचारले, “प्यार किया तो डरना क्या…’’ या गाण्याचे चित्रीकरणासाठी तुला किती वेळ लागेल?” असिफ म्हणाले, “जवळपास तीस दिवस.” सोहराब मोदीनी म्हणाले ‘‘सहा दिवसात व्हायला हवे.” आसिफ चटकन उत्तरले, “दोन दिवसांत पण होऊ शकते. नानुभाई वकील (बी-श्रेणीचे दिग्दर्शक) ते जवळच राहतात. त्यांना बोलवलं तर माझा पूर्ण विश्वास आहे की ते दोन दिवसांत पूर्ण करतील.”

त्यावर सोहराब मोदी गप्प बसले. ते एकांतात शापुरजीनां म्हणाले, “आसिफ पैसे कमवण्याच्या नादात चित्रीकरण लांबवतो आहे.” ते ऐकून शापुरजींनी सोहराब मोदींना घरचा रस्ता दाखवला.

तकदीर ये देन है जिसको मिली, मिली
होश आपको मिला, मुझे दिवानगी मिली

शेवटपर्यंत आसिफ आपल्या मतांवर ठाम राहिले. या दोघांच्या अजब नात्याची फलश्रुती असलेला ‘मुग़ल-ए-आज़म’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे सुवर्णपान बनला आहे.

या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी असंभवाला संभव करून दाखवायचे, फक्त आणि फक्त इतकाच ध्यास आसिफ यांना लागलेला असायचा. बड़े गुलाम अली साहब यांनी मागितलेली मोठी रक्कम देऊन, त्यांना मोठ्या सन्मानाने  गाण्यासाठी पाचारण केले. त्यांनी ‘प्रेम जोगन बन…’ हे गाणं गायल्यावर सर्वानी तारीफ केली. पण आसिफ यांना ते वरच्या पट्टीत गायले, असे वाटले. आपल्याला काय स्वरूपाचे गाणं अपेक्षित आहे, ते बड़े गुलाम अली साहेबांना सांगण्याचे धारिष्ट्य दाखवले. सलीम- अनारकली यांचा प्रेमप्रसंग असलेला भाग रात्रभर एडिट करून बडे गुलाम अली साहेबांना दाखवला. त्यातील अपेक्षित असलेली हळुवार उत्कटता आवाजातून कशी यायला हवी, यांची सुस्पष्ट कल्पना द्यायला असिफ जराही कचरले नाही. त्यानंतरचा गुणात्मक परिणाम आपल्या पुढ्यात आहे. तानसेनच्या रूपाने ऐकू येणारा बड़े गुलाम अली साहेबांचा मुलायम स्वर आणि सलीम-अनारकली यांचा काव्यात्मक प्रणय असलेला, विलोभनीय प्रभावाचा हा सीन अजरामर झाला.

या चित्रपटाला सुरवात झाली, तेव्हा मधुबाला अवघ्या २० वर्षाच्या होत्या. सेटवर आल्यावर त्या अवखळ मुलीसारख्या वागायच्या. आसिफ यांनी त्यांना भूमिकेबद्दल गंभीर व्हायला सांगितले. अल्लड मधुबालाच्या ते लक्षात आले नसावे, आसिफ यांनी काहीही न बोलता त्या दिवसाचे शूटिंग रद्द केले. त्यानंतर सलग सहा दिवस रोज असे शूटिंग रद्द करत राहीले. सातव्या दिवशी मधुबाला बिना मेकअप, साध्या वेशात आल्या. वरकरणीच नाही तर त्यांना आतून समजले होते, आसिफ यांना आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे. तसा स्वतःमध्ये बदल करून, या भूमिकेत त्यांनी जीव ओतला.

युद्धाच्या दृश्यात अभिनेता अजित यांचा मरण्याच्या प्रसंगाचे इतक्या वेळा चित्रीकरण केले गेले की अजित म्हणाले, “मी खरोखरीच मेलो तरी हा अतृप्त आत्मा संतुष्ट होणार नाही. “आग्रही, प्रसंगी दुराग्रही वाटणारे आसिफ यांचे वागणे- बोलणे अत्यंत सौजन्यशील असायचे. इतक्या मोठ्या युनिटला घेऊन इतकी वर्षे एकत्रित बांधून ठेवणे, सोपी गोष्ट नव्हती. ते सर्वाना घेऊन अलौकिक फिल्म बनू इच्छित होते. आसिफ यांनी व्यक्तिगत आयुष्यात पैशाला महत्त्व दिले नाही. आपल्याला मिळकतीतले पैसे ते युनिटमधल्या गरीब लोकांच्या मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी आवर्जून पैसे देत असत.

त्याच्या दर्यादिलीचा एक किस्सा के. सी. बोकाडीया यांनी नमूद केला. ‘लव्ह अँड गॉड’ याचे राजस्थानमध्ये शूटिंग सुरू होते. यातील मुख्य कलाकार संजीवकुमार हे मद्रासमध्ये के. सी. बोकाडीयांच्या फिल्मचे शूटिंग करत होते. काही कारणाने ते शूटिंग लांबले. बोकाडीयांनी आसिफ यांना फोन करून विनंती केली की अजून चार- पाच दिवस संजीवकुमारांना उशिरा पाठविले तर चालेल का? त्यामुळे माझ्या गरिबांची फिल्म पूर्ण होईल. माझ्या कारकिर्दीचा प्रश्न आहे. तेव्हा आसिफ यांनी अगदी सहजरित्या परवानगी दिली. खरं तर आसिफ यांचे युनिट फार मोठे असायचे. प्रत्येक दिवसाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्या उपकाराची आठवण ठेवून पुढे बोकाडीयांनी आसिफ यांच्या माघारी अर्धवट राहिलेला ‘ लव्ह अँड गॉड ‘ हा चित्रपट पूर्ण केला.

‘चौदहवीं का चांद हो या आफताब हो…’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांच्या जिवलग मित्राला गुरुदत्तला शीश महल मधली काही सामग्री हवी होती, ती खुल्या मनाने दिली. गंमत बघा, फिल्मफेअरचे बक्षीस ‘चौदवी का चांद…’ या गाण्यातील कला दिग्दर्शनासाठी दिले गेले, ‘मुग़ल-ए-आज़म’ ला नाही. १९६०च्या फिल्मफेअर अवार्डची घोषणा जेव्हा झाली तेव्हा सर्व बक्षीस ‘मुग़ल-ए-आज़म’ ला मिळतील, यांची रसिकांना १०० टक्के खात्री होती. पण केवळ उत्कृष्ट सिनेमाटोग्राफर (आर. डी. माथुर), सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट संवाद लेखन असे अवार्ड मिळाले. त्यातील दोन पुरस्कार स्वीकारले गेले नाहीत. कारण संवाद लेखन – कमाल अमरोही, वजाहत मिर्जा, अमानुल्लाह खान आणि एहसान रिज्वी या चौघांनी एकत्रित लिहिले होते. पण चार ट्रॉफी द्यायला फिल्मफेअरने असमर्थता दर्शविली, केवळ कोणा एकाचे नाव सुचवा, अशी अट घातली. त्यावेळी आसिफ यांनी तसे करायला नकार दिला. इतकेच नाही तर  आसिफ यांनी सर्वश्रेष्ठ पिक्चर अवार्ड स्वीकारले नाही. चित्रपटाला इतर कोणत्याच वर्गात पारितोषिक नसल्याने, हा चित्रपट सर्वोत्कृष्ट कसा काय असू शकतो? असा रोखठोक प्रश्न आसिफ यांनी विचारला. फिल्मफेअर बद्दल एकंदरीतच संशयाचे धुके तयार झाले.

लोकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान करून असल्या या चित्रपटांची नुकतीच ६० वर्ष पूर्ण केली. अमरत्वाचे वरदान या चित्रपटाला लाभले आहे. के. आसिफ  नावाचा मनस्वी माणूस आणि त्यावर विश्वास, प्रेम , साथ देणाऱ्या सर्व लोकांच्या एकजुटीचा, मेहनतीचा हा सोनेरी इतिहास आहे. आसिफ यांचे वैयक्तिक आयुष्य वजा करून त्यांच्या सृजनात्मक अविष्काराबाबत बोलायचे तर एखाद्या हठयोग्यासारखी अवघड तपश्चर्या या माणसाने केली. प्रसिद्धी, पैशापेक्षा केवळ कलात्मक संतुष्टीची तहान असलेला हा तपस्वी. त्यासाठी त्याने केलेली कडकडीत तपश्चर्या. सर्व हाताच्या अंतरावर असून, त्यापासून अलिप्त राहायला केवळ के. आसिफ सारखा फकीर जन्माला यावा लागतो.

कहने को लफ़्ज दो हैं, उम्मीद और हसरत
उनमें निहाँ (लपलेली) मगर इक दुनिया की दास्ताँ है…

(छायाचित्रे – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय. एनएफएआय)

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शक-निर्मात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0