मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट

गेल्या शंभरेक वर्षात तरी मुंबईत चक्रीवादळ आलेले नाही. मुंबईत जर ‘निसर्ग’ येऊन थडकले तर ती एक दुर्मिळ घटना असेल.

चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांवर परिणाम
बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे
मुंबईत मोसमातील पावसाचा उच्चांक

‘निसर्ग’ नावाचे वादळ कोकण किनारपट्टीवर घोंघावत आहे व त्याची तीव्रता तासागणिक वाढते आहे. याच वाढत्या तीव्रतेने जर हे वादळ जमिनीवर कूच करून आले तर फार मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व्हायची शक्यता आहे. सजीव हानी कमीतकमी होण्यासाठी सरकार व समाज जितकी काळजी घेता येईल तितकी घेत आहे. आन्फान चक्रीवादळाने कोलकात्याला तीनच आठवड्यांपूर्वी जबरदस्त तडाखा दिला होता. आता बहुदा मुंबईची पाळी आली आहे.

चक्रीवादळांची उत्पत्ती

जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ येते व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती ही अरबी समुद्राच्या तुलनेत तुलनात्मकरित्या जास्त असते. त्या कारणाने तिथे उपसागरात चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या प्रमाणात जास्त आहे. महासागराचे पृष्ठीय तापमान तसेच वातावरणातील तापमान एकमेकांपेक्षा भिन्न झाले तर त्यांच्यात युग्मीकरण होऊन अनेक क्रिया निर्माण होतात. त्यापैकी एक महत्त्वाची जी क्रिया आहे ती आहे चक्रीवादळ.

समुद्राच्या पृष्ठीय तापमानात एकसंघपणा नसतो. काही ठिकाणी पाणी थंड तर इतर ठिकाणी ते गरम असते. त्यामुळे कमीजास्त दाबाचे पट्टे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. जिथे तापमान जास्त असते तिथे सामान्यपणे कमी दाबाचा पट्टा तयार होतो व या पट्ट्याकडे आजूबाजूच्या परिक्षेत्रातून हवा झेप घेत राहते. चक्रीवादळात हवा कमी दाब असणाऱ्या एका बिंदूच्या अवतीभोवती चक्राकार रीतीने फिरत राहते. या फिरण्याचा वेग फार असतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. अशा वादळांचा वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. पण जेव्हा हे वादळ जमिनीला  टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते.

चक्रीवादळांचा मोसम

बंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळ एकापाठोपाठ एक निर्माण होत असतात. मात्र, अरबी समुद्रात चक्रीवादळ हे सामान्यपणे मे-जून व नोव्हेंबर-डिसेंबर असे दोन सत्रात निर्माण होतात. भारतीय हवामान वेधशाळेच्या आकडेवारीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळ मे व ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात दक्षिणपूर्व आणि पूर्व अरबी समुद्रात तयार होतं व जून महिन्यात पूर्वमध्य समुद्रात तयार होतं. त्यांच्या आकडेवारीनुसार असंही निदर्शनात आले आहे की मे महिन्यात निर्माण होणारे वादळ पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने अरबी समुद्रातून कूच करतात व जून महिन्यात निर्माण होणारे वादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकते.

चक्रीवादळ निर्माण होण्याची प्रक्रिया

चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी अस्तित्वात असाव्या लागतात. त्याची एक विशिष्ट अशी जटिल प्रक्रिया आहे. तापमान विसंगतीबरोबरच हवेची दिशा व वाहण्याची गती योग्य प्रमाणात असावी लागते. हवेची दिशा व गती योग्य नसेल तर चक्रीवादळ निर्मितीची प्रक्रिया बाळसे धरत नाही. चक्रीवादळ निर्मितीच्या प्रक्रियेत खरेतर समुद्राच्या पृष्ठ पाण्याचे तापमान अतिशय महत्वाची भूमिका पार पडत असते. पण त्याचबरोबर वातावरणातील ७ ते १२ किमीचा पट्टा, ज्याला ट्रोपोस्फेयर म्हटले जाते, त्याचेही तापमान अगदी योग्य असावे लागते. पाण्याचे पृष्ठीय तापमान व वातावरणातील सरासरी १० किमी उंचीवरील तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी सुयोग्य असले, पण हवेची गती फार कमी व फार जास्त झाली, किंवा हवेचे तापमान व तिच्यातील ऊर्जा कमी किंवा अधिक  झाली तर वादळ निर्माण होण्याची शक्यता विरळ होते. समजा एक चक्रीवादळ निर्माण होण्याच्या उंभरठ्यावर येऊन पोहोचलेले आहे, पण हवेच्या अधिकच्या गतीने हे वादळ पूर्णत्वास येण्याआधीच दुसरीकडे उडून गेलेले असते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त व बाष्पीभवन कमी होत असते. त्याचबरोबर हवेची गती सुद्धा जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठीचे पोषक वातावरण नसते.

बंगाल खाडीतील पृष्ठ पाण्याचे तापमान सामान्यपणे २८ डिग्री सेल्सिअस इतके असते. आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ट्रोपोस्फेयर दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते. अशा ठिकाणची हवा जर शुष्क व कोरडी असेल तर या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. वादळात चक्राकार फिरणारे वारे जेव्हा जमिनीच्या दिशेने सागरातून कूच करत असते तेव्हा तिला मिळणारी ऊर्जा कमी होत जाते. त्यामुळे, या वाफेचे बाष्पीभवन होते व पावसाच्या रूपात हे समुद्राचे पाणी जमिनीवर कोसळते. जमिनीला जेव्हा चक्रीवादळ स्पर्श करते तेव्हा या वादळाला सागराच्या पाण्याची ऊर्जा मिळत नाही व त्यामुळे हे वादळ आपोआप शांत होते.

दक्षिण-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असे म्हटले जाते. या वाऱ्यांचाही वादळनिर्मितीत फार मोठा सहभाग असतो. हे वारे पश्चिम भारतीय महासागरातील विषुववृत्तापासून वाहते झालेले असते. ते अरबी समुद्रावरून संचार करत सह्याद्रीला पार करतात, व नंतर भारतीय उपखंडावरून उडत जातात. हे वारे आपल्याबरोबर समुद्रातील आर्द्रता घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरूपात शिंपडली जाते. बंगाल खाडीतील वादळ या हवेची दिशा बदलू शकतात व मान्सूनला रोखू शकतात. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन मागच्या वर्षी लांबले होते. यावर्षीही मान्सून आंफान व ‘निसर्ग’ चक्रीवादळांमुळे पुढे ढकलला जाऊ शकतो.

अरबी समुद्र व बंगाल उपसागरातील भिन्नता

अरबी समुद्राचे तापमान बंगालच्या खाडीतील पृष्ठीय तापमानापेक्षा एकदोन डिग्रीने कमी असते. या समुद्रात हिमालयातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहते. बंगालच्या खाडीत सुद्धा हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी व खालच्या थरातील थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंग होण्याचा प्रयत्नात असते. त्यामुळे अरबी समुद्राचे पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एकदोन डिग्रीने कमी असते. बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्याशा प्रभावीपणे होत नसते. २८ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याकारणाने अरबी समुद्रावरील वातावरणातील ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळ निर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या तुलनेत इथे कमी प्रमाणात वादळ निर्माण होतात. डिसेंबर २००९ साली फयान आणि २००७ साली क्यार नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते व भारताच्या पूर्व किनारपट्टीला त्याची झळ पोहोचली होती.

अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या का वाढते आहे?

तापमानवाढीची समस्या आपल्या ग्रहाला भेडसावत आहे यात कोणतीही शंका नाही. पण ही तापमानवाढ किती नैसर्गिक व किती मानवी कारणामुळे होते आहे याची कोणतीही आकडेवारी वैज्ञानिकांनी दिलेली नाही जी सर्वमान्य आहे. कोविड-१९ मुळे गेले दोन ते तीन महिने जागतिक स्तरावर बहुतांश औद्योगिक क्रिया बंद पडलेली आहे. काही शास्त्रज्ञांनी प्रतिरूप तयार करून कार्बन डायऑक्सईड सारखे हरितगृह वायू किती प्रमाणात या दोनतीन महिन्यात कमी झाला आहे याची आकडेवारी जमा केली आहे. त्यात असं दिसून आलं आहे की या वायूत फक्त काही टक्केच कपात घडून आली आहे. तापमान कमी होण्यासाठी ही कपात परिणामकारक नाही व हि कपात निरंतर होणे आवश्यक आहे.

तरीही, जागतिक तापमानात वाढ होतं असल्याकारणाने आपल्या ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र तरी कसा अपवाद राहणार? या समुद्रावरून वाहणारे वारे बंगाल उपसागर पेक्षाही जास्त वेगाने वाहत असते. त्यामुळेच अरबी समुद्रात मोठमोठे व नित्यनेमाने चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. काही संशोधनाच्या अहवालानुसार अरबी समुद्रावर वाढते प्रदूषण वादळांना जन्म देते आहे. गेल्या काही दशकातील वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धुळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या समुद्रावर अनेक प्रकारचे एरोसोल मिसळलेले आहेत. हे धुळकण काळ्या व तपकिरी ढगांच्या रूपात अरबी समुद्रावर विहरताना सर्वांना दिसतात.

या धुळकणांचा प्रभाव वाऱ्याच्या गतीवरसुद्धा होत असतो. प्रदूषणामुळे साचलेल्या धुळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढलेली आहे. प्रदूषणापूर्वी हवेचा वेग जास्त होता, पण धुळीकणांमुळे हा वेग आता मंदावलेला आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथले हवामानसुद्धा बदलत चालले आहे. धुळकणांमुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो व त्यामुळे समुद्र पृष्ठाचे तापमान कमी राहते.

पूर्वीची अरबी समुद्रातील वादळे

१९९८ मध्ये गुजरातला अरबी समुद्रातील एका चक्रीवादळाने तडाखा दिला होता ज्यात किमान ३००० लोकांचा मृत्यू झाला होता. २००७ साली गोनू नावाचे वादळ इराणपर्यंत पोहोचले होते. ही घटना तशी दुर्मिळ आहे. फेट नावाचे वादळ पाकिस्तान व ओमान येथे २०१० साली धडकले होते. २०११ ते २०१८ सालांदरम्यान अरबी समुद्रात पुढील वादळ निर्माण झाले होते: किला (ऑक्टोबर, २०११), मार्जाण (ऑक्टोबर, २०१२), नानौक (जून, २०१४), निलोफर (ऑक्टोबर, २०१४), अशोबा (जून, २०१५), चपळ (ऑक्टोबर, २०१५), मेघ (नोव्हेंबर, २०१५), सागर (मे, २०१८) आणि मेकुनू (मे, २०१८). या साऱ्या वादळांमुळे तिथल्या प्रशासनाला करोडो रुपयांचे नुकसान झेलावे लागले होते.

मुंबईत जर ‘निसर्ग’ येऊन थडकले तर ती एक दुर्मिळ घटना असेल. गेल्या शंभरेक वर्षात तरी इथे चक्रीवादळ आलेले नाही. पण पाण्यातील उलथापालथींमुळे किनारपट्टीला व तिथल्या बीचला धोका संभवत असतो. पुळणची वाळू अनेक नैसर्गिक प्रक्रिया पार पाडून तयार होत असते व किनारपट्टीलगत जमा होत असते. पण वादळाच्या शक्तीमुळे ही वाळू विखुरली जाते व समुद्राच्या लाटा व प्रवाह त्यांना बाहेर फेकून देतो किंवा पाण्यात घेऊन जातो. क्यार वादळामुळे सिंधुदुर्गची किनारपट्टी फार मोठ्या प्रमाणावर बदलली होती. अरावली बीचची वाळू फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती.

आज ‘निसर्गा’ची भेट जमिनीबरोबर कुठे होणार त्याच्यावर नुकसान किती होणार हे अवलंबून आहे.

प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: