मुंबई वातावरण कृती आराखडा जाहीर

मुंबई वातावरण कृती आराखडा जाहीर

मुंबई: बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराचे वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामांना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी

मुंबईत ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रम
मुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न
बी.डी.डी.चाळ पुनर्विकासात पोलिसांना १५ लाखांत घर

मुंबई: बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराचे वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामांना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका निर्मित ‘मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल’चे लोकार्पण रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ठाकरे म्हणाले, मुंबई महानगराच्या तापमानात देखील अलीकडे मोठा फरक दिसून येतो. मुंबई महानगराचा विकास होताना त्याचे रूपांतर जणू काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. विकास नेमका कशासाठी हवा याचा विचार आता फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण जगाने करण्याची वेळ आली आहे. मुंबई महानगराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई पिंजाळ प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यासाठी पाच लाख झाडांची किंमत मोजावी लागणार होती. त्यामुळे तो प्रकल्प रद्द केला. कारण पाणी मिळवण्यासाठी पर्यावरण गमावून चालणार नाही. आरे वनक्षेत्र वाचवणं हे देखील माझं कर्तव्यच होतं. कारण दुर्घटना घडल्यावर अश्रू गाळून उपयोग नाही. जीव वाचवण्यासाठी वेळीच कृती केली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या वातावरण कृती आराखड्यातून ही कृती सुरू झाली आहे. त्याचा आदर्श देशातील इतर शहरे देखील घेतील, अशी अपेक्षा करू या, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई कृती आराखडा हा उंच इमारतीपासून झोपडपट्टीपर्यंत आणि शासनापासून समाजापर्यंत सर्व गोष्टींमध्ये शाश्वत विकासाचा दृष्टिकोन प्रदान करणारा आहे. टप्पेनिहाय अंमलबजावणी करताना राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल हा येत्या काही दशकांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खरे पर्यावरणवादी नेते आहेत. आरेचे ८०८ एकर जंगल वाचवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई वातावरण कृती आराखडा पुढील प्रमाणे:  

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने’मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल’ (Mumbai Climate Action Plan – MCAP) तयार केला आहे. भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपादीत केला आहे.
  • वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया आणि सी४०सिटीज नेटवर्क यांनी त्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरवले आहे.
  • हा आराखडा अहवालhttps://mcap.mcgm.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • विविध विशेषज्ञ, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक सल्लागार यांचेदेखील आराखडा बनविण्याच्या प्रक्रियेत योगदान लाभले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग, इतर प्रशासकीय विभाग आणि संबंधित खात्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे.
  • सन २०५० पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करणे हे मुंबई वातावरण कृती आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईच्या वातावरण बदलासंदर्भातील परिणामांना तोंड देणाऱ्या, तीव्रता कमी करणाऱ्या उपाययोजना करणे आणि वातावरण बदलानुसार अनुकूलता मिळवणे यासाठी सर्वसमावेशक धोरण म्हणजे हा आराखडा आहे.
  • ऊर्जा आणि इमारती, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, शहरातली हरित क्षेत्र आणि जैवविविधता, हवेची गुणवत्ता, पूर व्यवस्थापन व जलस्त्रोत व्यवस्थापन अशा प्रमुख सहा क्षेत्रांवर ह्यामध्ये भर देण्यात आला आहे.
  • पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी सन २०७० हे नेट-झिरोचे उद्दिष्ट वर्ष असल्याची घोषणा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सीओपी२६) ग्लास्गो येथे केली होती. असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्याद्वारे मुंबईसाठी नेट-झिरोचे उद्दिष्ट, भारत सरकारच्या सन २०७० या निर्धारित वेळेपूर्वीच गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आणि वातावरणातून काढून टाकलेले उत्सर्जन या दोहोंमध्ये संतुलन साधणे यास नेट-झिरो असे संबोधले जाते.
  • बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने असुरक्षिततेचे मूल्यमापन, गत सहा महिन्यांतील हरितगृह वायूंच्या (Green House Gases) स्रोतांची निश्चिती आणि सद्यस्थिती, नैसर्गिक हरित आच्छादनाची सद्यस्थिती याचा आढावा घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
  • सद्यस्थितीचा आढावा घेताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे भविष्यात करावयाच्या कृतीचे नियोजन करणे, या नियोजनानुसार महत्वाचे प्रकल्प राबवताना मनुष्यबळ आणि इतर संसाधने यांची योग्य अंमलबजावणी करणे यादृष्टीने सदर अहवाल म्हणजे भविष्यवेधी आणि महत्त्वाचा धोरणात्मक दस्तावेज ठरणार आहे.
  • आधारभूत वर्ष २०१९ मध्ये एकूण २३.४२ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन (CO2e) किंवा प्रतिव्यक्ती १.८ टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन मोजण्यात आले आहे.
  • आधारभूत वर्ष (२०१९) मधील हे उत्सर्जन लक्षात घेता, सन २०३० पर्यंत उत्सर्जनात ३० टक्के घट, २०४० पर्यंत ४४ टक्के घट आणि २०५० पर्यंत नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.
  • मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये भविष्यातील उत्सर्जनाचे विश्लेषण तीन परिस्थितीनिहाय मांडण्यात आले आहे.
  • कोणतीही कार्यवाही न करता आजची दैनंदिन परिस्थिती कायम राहिली तर सन २०५० पर्यंत उत्सर्जन ६४.८ दशलक्ष टन प्रति वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला आहे. याचा अर्थ २०१९ आणि २०५० या कालावधीत ते २.७ पटीने वाढेल.
  • ब) विद्यमान आणि नियोजित (existing and planned) परिस्थिती, ज्यामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी विद्यमान स्थानिक, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय उपाय, धोरणे आणि कार्यक्रमांचा समावेश आहे, त्यानुसार सन २०५० पर्यंत उत्सर्जन ५१.३ दशलक्ष टन प्रति वर्ष अपेक्षित आहे. आधारभूत वर्षाच्या उत्सर्जनापेक्षा त्यामध्ये ११९.४ टक्के वाढ दिसते.
  • मात्र, मुंबई वातावरण कृती आराखडा अंमलबजावणी करताना मुंबईसाठी‘महत्वाकांक्षी’ परिस्थितीत, उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट हे सन २०३० पर्यंत २७ टक्के आणि २०५० पर्यंत ७२ टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: