राहुल कुलकर्णी निर्दोष – मुंबई पोलिस

राहुल कुलकर्णी निर्दोष – मुंबई पोलिस

१४ एप्रिलला वांद्रे येथे परगावी जाण्यासाठी हजारो मजूर जमल्यानंतर मराठीतील प्रसिद्ध वृत्त वाहिनी एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राहुल कुलकर्णी याना अटक करण्यात आली होती.  

भारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार
माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कोरोनाचा हल्ला!
कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक

मुंबई : १४ एप्रिलला मजुरांसाठी विशेष रेल्वे चालवली जाणार असल्याची ‘फेक न्यूज’ ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीवरून प्रसारीत झाली होती, त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक येथे हजारो जणांचा जमाव जमला होता, या कारणावरून पोलिसानी दुसऱ्या दिवशी एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राहुल कुलकर्णी यांना अटक केली होती. आता ४ महिन्यानंतर त्या आरोपातून मुंबई पोलिसानी कुलकर्णी यांना निर्दोष ठरविले आहे.

पोलिसांनी ८३ पानांचा केस बंद करण्याचा (क्लोजर रिपोर्ट) अहवाल बांद्रा १२ व्या मेट्रोपॉलिटन न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केला. कुलकर्णी यांच्या बातमीमध्ये विशेष रेल्वे कुठून आणि केंव्हा सुटणार याचा उल्लेख नव्हता. “लोकांनी राहुल कुलकर्णी यांची बातमी चुकीच्या पद्धतीने घेतली आणि गैरसमज करून घेतला”, असे अहवालात नमूद करण्यात आले असून, पोलिसानी दाखल केलेली तक्रार ‘वस्तुस्थितीवर आधारीत नव्हती’, असे पोलिसानी मान्य केले.

या खटल्यातील ११ साक्षीदारांची निवेदने, तक्रारदार आणि वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या लोकांची चौकशी आणि तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात केस बंद करण्यासाठी अहवाल सादर केला.

१४ एप्रिलला कुलकर्णी यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीवरून असा दावा केला होता, की दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी लवकरच रेल्वे सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. हे वृत्त सकाळी ९ ते ११. ३० या वेळेमध्ये वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आली होती. साधारण ४.४५ च्या सुमारास एका ठिकाणी गर्दी जमण्यास सुरुवात झाली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सोशल मिडियावर फिरविण्यात आलेल्या एका मेसेजनुसार ही गर्दी जमा झाली. हे लोक जवळच्या शास्त्री नगर, कुरेशी नगर इत्यादी भागातील होते. लोकांना पांगविण्यासाठी पोलिसानी लाठीमार केला होता.

जमा झालेले लोक वांद्रे स्थानक परिसरात राहणारे आणि उत्तरेकडील राज्यांमधले होते. ते कुलकर्णी यांची वृत्त वाहिनी पाहणारे नव्हते आणि लोकांच्या सांगण्यावरून जमा झालेले होते. वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकावरून लोकल ट्रेन धावतात आणि दुसऱ्या वांद्रे टर्मिनसवरुन लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. पण लोक लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात, त्या स्थानकावर जमा झाले नव्हते, हे पोलिसांनी मान्य केले.

गर्दी जमा झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एबीपी माझा या वाहिनीवर आणि कुलकर्णी यांच्यावर अफवा पसरविण्याचा आरोप केला होता. कुलकर्णी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये आणि साथ रोग नियंत्रण कायद्या अन्वये गोंधळ निर्माण करून साथ सुरू असताना लोकांचा जीव धोक्यात आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. उस्मानाबाद येथील रहिवासी असणाऱ्या कुलकर्णी यांना तेथून अटक करून मुंबईला आणण्यात आले होते.

केस बंद करण्याच्या अहवालामध्ये पोलिसांनी आता अफवा पसरविण्याचा आरोप विनय दुबे यांच्याकडे वळविला आहे आणि आरोप केला आहे, की लोक कुलकर्णी यांच्यामुळे नव्हे, तर दुबे यांच्या भडकवण्यामुळे जमले होते.

साथ सुरू असताना महाराष्ट्रामध्ये कुलकर्णीच नव्हे, तर १५ इतर पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, इतर दोन डझन पत्रकारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या संदर्भात ‘द वायर’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘कोविड-१९’ची लागण झालेल्या सामान्य लोकांच्या अडचणींची आणि शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या चुकीच्या कामांचे वृत्तांकन केल्याबद्दल बहुतांशी पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या सरकारचा छोट्या वृत्तपत्रांतील आणि वाहिन्यांमधील पत्रकारांवर रोख असून, त्यानं टार्गेट केले जात आहे. सरकारला प्रश्न विचारल्याबद्दल शिक्षा करणे आणि सरकारकडून धमकावण्याचा हा प्रकार असल्याचे अनेक पत्रकारांनी ‘द वायर’शी बोलताना सांगितले.

दोन दशके पत्रकारीता करणारे कुलकर्णी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि प्रेस कौंसीलकडे राज्यशासनाच्या गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईविरोधात दाद मागितली आहे. रेल्वे विभागातून मिळालेल्या अधिकृत आणि विश्वसनीय पत्रव्यवहारावर आधारीत वृत्त प्रसारीत करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.

कुलकर्णी म्हणाले, “पोलिस आणि गृहमंत्रालयाने वृत्ताची सत्यता पडताळून पाहण्याची काळजी घेतली नाही आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला. ज्यांना मुंबई माहीत आहे, असे कोणीही सांगेल की लांब पल्ल्याच्या गाड्या वांद्रे स्थानकावरून जात नाहीत. स्थलांतरीत मंजुरांचा प्रश्न हाताळण्यात झालेली चूक मान्य करण्याऐवजी सरकारने मला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न केला. तुरुंगात पाठवून मला अपमानास्पद वागणूक दिली.”

मुळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0