महाकाय जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी

महाकाय जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी

भारतातील अनेक शहरे त्रासदायक वाहतूक कोंडीसाठी कु-प्रसिद्ध असली, तरी त्याचा परिणाम तेलाच्या जागतिक किमतीवर होत नाही किंवा लक्षावधी डॉलर्सचा फटका त्यामु

फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार
एनसीबीला “छाप्या”बाबत विचारले जावेत असे काही प्रश्न
राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता

भारतातील अनेक शहरे त्रासदायक वाहतूक कोंडीसाठी कु-प्रसिद्ध असली, तरी त्याचा परिणाम तेलाच्या जागतिक किमतीवर होत नाही किंवा लक्षावधी डॉलर्सचा फटका त्यामुळे बसत नाही. मात्र, सध्या सुएझ कालव्यात झालेल्या जहाजांच्या वाहतूक कोंडीमुळे मालाच्या आंतरखंडीय मालवाहतुकीला चांगलाच फटका बसत आहे. गेल्या अनेक तासांपासून एव्हर गिव्हन नावाचे महाकाय जहाज अडकून बसल्यामुळे कालव्यात कोंडी झाली आहे आणि या जहाजामागे अनेक जहाजांची रांग लागली आहे, असे एका शीपिंग न्यूज वेबसाइटच्या बातमीत म्हटले आहे.

सुएझ कालवा हा रेड सी आणि मेडिटेरेनियन सी (भूमध्य समुद्र) यांना जोडणारा एक अरुंद जलमार्ग आहे. या कालव्यामुळे आशिया व पूर्व आफ्रिकेतील जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा न घालता अटलांटिकमध्ये प्रवेश करता येतो.

एका तैवानी कंपनीच्या मालकीचे एव्हर गिव्हन हे जगातील सर्वांत मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक असून, एका वेळी २०,००० कंटेनर्स वाहून नेण्याची जहाजाची क्षमता आहे. हे जहाज अडकल्यामुळे सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी झाली आहे. कालव्यात वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे जहाज मोकळे करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत. जहाजाच्या आजूबाजूला किमान सहा टगबोट्स असून, त्यांच्याद्वारे जहाज सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आणखी शंभरेक जहाजे सुएझ कालव्यात प्रवेश करण्यासाठी प्रतिक्षेत आहेत, असे एएफपीच्या बातमीत म्हटले आहे, तर नऊ जहाजांनी पूर्वीच कालव्यात प्रवेश केला आहे आणि आता ती कोंडी सुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत, असे आणखी एका स्रोतातर्फे कळवण्यात आले आहे.

सुएझ कालवा इजिप्तद्वारे चालवला जातो. हा कालवा १८५९ मध्ये बांधण्यात आला आणि १८६९ सालापासून याद्वारे वाहतूक सुरू आहे. २०१० साली विस्तार व अद्ययावतीकरणाचे मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आता कालवा १९३.३ किलोमीटर लांब, २४ मीटर खोल आणि २०१५ मीटर रुंद झाला आहे. यामधून जाणाऱ्या जहाजांना कमाल ७७.५ मीटर्सची रुंदी मिळू शकते. २०१० सालापासून उपलब्ध आकडेवारीनुसार, कालव्यातून दररोज ४७ जहाजे जातात. २०२० या एका वर्षांत इजिप्त सरकारने या कालव्याद्वारे ५ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावल्याचे समजते.

एव्हर गिव्हन जहाजावरील यंत्रे अचानक बंद पडल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू कालव्याच्या काठांवर आदळल्या व ते अडकून बसले, असे इजिप्तमधील एका न्यूज वेबसाइटवरील बातमीत म्हटले आहे. प्रशासनाने क्रेन्सद्वारे जहाज जेथे अडकले आहे, तेथील माती काढण्याचे काम सुरू केले आहे. हे पुरेसे ठरले नाही, तर जहाजावरील भार कमी करून ते कालव्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही  सूत्रांनी सांगितले.

एव्हर गिव्हन चीनमधून निघून २३ मार्च रोजी तेवफिक बंदरावर पोहोचले. हे जहाज ३१ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता नेदरलॅण्ड्समधील रोटरडॅममध्ये पोहोचणे अपेक्षित होते.

सुएझ कालवा हा कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने व एलएनजी शिपमेंट्ससाठी मोक्याचा मार्ग आहे आणि समुद्रमार्गे होणाऱ्या एकूण तेलव्यापारापैकी १० टक्के, तर जागतिक एलएनजी व्यापारापैकी ८ टक्के या कालव्यामार्फत होतो. त्यामुळे एव्हर गिव्हन बंद पडल्यामुळे न्यूयॉर्कमधील ऑइल फ्युचर्सच्या किमती १.३ टक्के वाढल्या आहेत. अर्थात हा परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचा असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: