‘नब्ज’ ईद विशेषांकः एका अभिनव परंपरेची सुरुवात

‘नब्ज’ ईद विशेषांकः एका अभिनव परंपरेची सुरुवात

मराठीत दिवाळी अंक काढण्याची परंपरा शंभर वर्षांहूनही जुनी असताना याच धर्तीवर ईद विशेषांक काढण्याची कल्पना ‘ब्लॅक इंक मीडिया हाऊस’ने प्रत्यक्षात साकारली आणि ‘नब्ज’ या ईद विशेषांकाचे साहित्यविश्वात आगमन झाले. सध्या साहित्य वर्तुळात ‘नब्ज’ या विशेषांकाची जोरदार चर्चा असून या अभिनव आणि अनोख्या प्रयोगाबद्दलची समीक्षा करणारा हा लेख.

२० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान
बीएसएफ, रॉ, लष्करातील अधिकारीही पिगॅससच्या लक्ष्यस्थानी
होमोसेपिअन्सचे वारसदार..

मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. तर आपल्या पश्चिम बंगालमध्ये देखील दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक  प्रकाशित केले जातात. आपल्या देशात ज्या प्रमाणे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात नि आनंदात साजरा केला जातो तद्वतच ईदचा सण सुद्धा पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी आणि ईद हे भारतीय उपखंडातले दोन महत्त्वाचे सण. ते सर्वत्र धुमधडाक्यात साजरे केले जातात. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने देखील या दोन सणांना महत्त्वाचे स्थान दिलं आहे. एक म्हणजे कथानकात आणि दुसरे म्हणजे चित्रपट प्रदर्शित करण्यात. गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळता दर दिवाळी आणि ईदच्या सुमारास मोठ्या बॅनरचे नि आघाडीचे कलावंत असलेले चित्रपट प्रदर्शित व्हायचे. ‘दिवाली के शुभ अवसर पर’ अथवा ‘रमजान ईद के मुबारक मौके पर..’ अशी जाहिरात केली जायची. यावरून हे लक्षात येतं की या दोन्ही सणांना किती महत्त्व आहे ते. उदारीकरणानंतरच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली उत्पादने खपवण्यासाठी या दोन सणांचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. म्हणजे व्यापार-उद्योगांनी या दोन्ही सणांचे महत्त्व जाणून घेत याचा लाभ अधिकचा नफा कमावण्यासाठी कसा करून घेता येईल हे कृतीत उतरवून दाखवले आहे.

मराठीत दिवाळी अंक काढण्याची परंपरा शंभर वर्षांहूनही जुनी असताना याच धर्तीवर ईद विशेषांक काढण्याची कल्पना आता पर्यंत कोणाला सुचली नव्हती किंवा कदाचित कल्पना सुचली असेलही पण ती वास्तवात आणता आली नसावी ! मात्र हा आगळावेगळा नि अभिनव प्रयोग ‘ब्लॅक इंक मीडिया’ या प्रकाशनगृहाने प्रत्यक्षात आणला आहे, ‘ईदोत्सव-२०२१ नब्ज’ या अंकाच्यारुपात. यासाठी सर्वप्रथम ह्या अंकाच्या कर्त्यांचे तहेदिल से शुक्रिया व्यक्त करून मुबारकबाद देऊ या. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार आणि शेखर देशमुख या जोडगोळीने युवा पत्रकार मिनाज लाटकर व अलीम रंगरेज यांच्या सोबतीने हा अतिशय वाचनीय, आशयसंपन्न आणि देखणी निर्मिती मूल्ये असलेला अंक मराठी वाचकांना सुपूर्द केला आहे. चोखंदळ मराठी वाचक या सर्वस्वी निराळ्या उपक्रमाला भरभरून दाद आणि प्रतिसाद देतील याची आशा नव्हे तर खात्री आहे. ईदच्या निमित्ताने मराठीत अंक काढण्याचा प्रयोग हिंदी व उर्दूत देखील झालेला नाहीये, याची विशेषत्वाने नोंद केली पाहिजे. कारण या दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या मराठी पेक्षा कैकपटीने जास्त आहे. असं असतानाही पहिला ईद विशेषांक काढण्याची कामगिरी मराठी भाषेने केलीय ही घटना तमाम मराठी भाषकांसाठी आनंददायी आहे.

‘नब्ज’ म्हणजे नस, नाडी. अंक पाहून नि वाचून झाल्यावर ‘आपने सही नब्ज पकडी है..’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटते. ‘दसरा-दिवाळी हा जसा अभिव्यक्तीचा उत्सव तसाच प्रेम, जिव्हाळा, त्याग, करुणा, सहवेदना, संयम, सहिष्णूता आदी मूल्यांची आठवण करून देणारा ईद हा देखील अभिव्यक्तीचाच उत्सव, या विचारातून आम्ही ‘नब्ज’ विशेषांकाची मांडणी केली आहे. व्यक्ती, संस्था आणि स्थळकाळाच्या माध्यमातून जगण्यातले विविध रंग-ढंग टिपताना वर्तमानातल्या दुखऱ्या नसेवरही आम्ही यातून बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी प्रांजळपणे सांगायचे तर, आपल्याच घरातल्या दुर्लक्षित कोपऱ्याची हाक ऐकण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. डोक्यात कोणत्याही प्रकारचा संशय, शंका आणि संदिग्धता न ठेवता, एकाच भाषेत व्यक्त होणाऱ्या, एकाच संस्कृतीत रुजलेल्या समाजघटकाचे मन जाणून घेण्याचाही हा प्रयत्न आहे’’, अशा शब्दांत ‘नब्ज-ए-हस्ती’ या संपादकीयात हा अंक काढण्यामागची प्रेरणा, भूमिका नि गरज विशद केली आहे.

प्रख्यात कवी, लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्या ‘प्रत्येक भारतीय हा राष्ट्रवादी आहे !’ या लेखाने अंकाचा आगाज (आरंभ) करण्यात आला आहे. सध्या सत्ता पुरस्कृत (state sponsored ) राष्ट्रवाद बोकाळला आहे याचा समतोल आणि निर्भीड भाषेत त्यांनी समाचार घेतला आहे. बहुसंख्यवाद देशाच्या एकसंधपणा उसवून टाकणारा असल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. महामारीचा हा काळ फार दिवस थांबणार नसून तो लवकरच निघून जाणार असल्याचा आशावादही  त्यांनी लेखाच्या शेवटी ‘ये वक्त क्या है…’ या आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे. सुरुवातीलाच ‘मेरी जुबानी’ म्हणून जावेद साहेबांचे विचार वाचल्यावर पुढच्या लेखांच्या जातकुळीचा अंदाज बांधता येतो. उर्दूत म्हणतात त्या प्रमाणे ‘आगाज इतना अच्छा है तो अंजाम कैसा होगा’ याचा प्रत्यय येतो.

रिपोर्ताज या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांचा ‘किसीके दर्द को अपना बनाके ईद मनाए’ हा लेख अत्यंत चित्रमय शैलीत आकारास आला आहे. खास ईदसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतल्या खाद्य पदार्थांच्या ठिकाणांची अतिशय रंजक सफर त्यांनी घडवली असून लेख वाचताना आपण वेगवेगळ्या खाऊ गल्ल्यांमधून मनसोक्त फेरफटका मारत असल्याचा भास होतो. शिवाय निरनिराळ्या खाद्यपदार्थांची नावं ऐकून तोंडाला पाणी सुटतं. वाचताना पुढच्या ईदला या ठिकाणी नक्की भेट द्यायची अशी खूणगाठ मनात बांधली जाते. याच लेखात त्यांनी अत्तरच्या गंधभारल्या विश्वाची सफर घडवून आणली आहे. ईदच्या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची सौंदर्यदृष्टी, कलादृष्टी आणि धर्मातीत प्रेम रमजान ईदला चार चांद कसे लावते याचं मनोज्ञ नि जिवंत दर्शन त्यांनी घडवलं आहे. कोविडमुळे या परिसरात असलेला सन्नाटा नि त्यामुळे आलेली सुन्नता मन दु:खी  करते.

दोन दशकांपूर्वी दंगलीचं शहर अशी कुख्याती असलेलं मालेगावमधल्या काळात चित्रपट निर्मितीसाठी प्रकाशझोतात आलं होतं. यास ‘मोलीवूड’ असं बॉलीवूडच्या धर्तीवर नावं सुद्धा देण्यात  आलेलं आहे. जितेंद्र घाटगे यांनी ‘मालेगावचा Cinematic Happyness इंडेक्स’ या लेखातून इथल्या चित्रपट संस्कृतीचा आणि यंत्रमाग व्यवसायाचा सहसंबंध अतिशय छानपणे उलगडून दाखवला आहे. १९९५-९६ च्या सुमारास काही महिन्यांसाठी मी मालेगावात वास्तव्य केलं असल्याने या लेखाने मला भूतकाळात नेलं. इथल्या कामगार वर्गाचं सिनेमाप्रेम मी जवळून बघितलं आहे. इथली कामगार, कष्टकरी, श्रमजीवी जनता, त्याचं रोजचं जगणं, त्यातले ताणेबाणे, हिंदू-मुस्लीम संबंध, कामगार-मालक यांचं एकमेकांवरचं अवलंबित्व इत्यादी घटकांचा अभ्यासपूर्ण धांडोळा लेखकाने घेतला आहे. तो मुळातूनच वाचायला हवा. त्यांचा हा लेख सामाजिकशास्त्राच्या अभ्यासकांसाठी संशोधनाच्या अनेक वाटा खुल्या करणारा आहे.

सर्वसामान्य भारतीय जनतेचे दोन अत्यंत जिव्हाळ्याचे विषय म्हणजे हिंदी सिनेमा आणि क्रिकेट. यातही हिंदी सिनेमावर लोकांचं प्रेम जरा जास्तच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हिंदी सिनेजगतात अनेक मुस्लीम कलावंतांनी मोलाचं योगदान दिलं आहे आणि आजही देत आहेत. पडद्यावर आणि पडद्याबाहेर सुद्धा. आपल्या समाज जीवनात नेमका किती सर्वधर्मसमभाव रुजला आहे, या विषयी मतभेद होऊ शकतात. पण हिंदी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे असं अभिमानाने म्हटले जायचं. पण अलीकडे या परिस्थितीत झपाट्याने बदल होत असल्याचं दिसून येत आहे. हाच धागा पकडून मुबारक अली यांनी ‘यह कैसी साजीश है, गालिब ?’ या लेखातून या बदलत्या वास्तवाचा आढावा घेतला आहे. हिंदू देव-देवतांचे गुणगान करणारी गाणी-भजन लिहिणारे मुस्लिम गीतकार, भूमिका साकारणारे मुस्लिम  नट, महाभारत या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेचे संवाद लिहिणारे  मुस्लिम लेखक या आणि अशा अनेक उदाहरणांमधून इथं कलावंतांच्या धर्माविषयी कोणाला काहीच देणंघेणं नव्हतं, हे स्पष्ट केलं आहे. पण आताशा मात्र वातावरण दूषित होत चाललं आहे. आमीर खान महाभारतावरील कलाकृतीत कसं काय काम करू शकतो, असं प्रश्न उपस्थित करून विरोध व्यक्त केला जात आहे. याबाबत लेखकाने चितारलेली वस्तुस्थिती सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या प्रत्येकाला काळजी  आणि चिंता करायला लावणारी आहे.

शेखर देशमुख यांचा ‘फैज आणि मिथक…’ हा लेख म्हणजे फैज यांच्या चरित्राचा त्यांनी केलेल्या मराठी अनुवादातली निवडक वेचे आहेत.  २०१६ मध्ये डॉ. अली मदिह हाश्मी यांनी लिहिलेलं फैज यांचं अधिकृत चरित्र ‘लव्ह अँड रिव्होल्युशन’ रूपा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालं आहे. गालिब-इक्बाल-फैज या तीन आधुनिक शायरांनी उर्दू कवितेचं विश्व समृद्ध केलं आहे. फैज अहमद फैज यांनी प्रस्थापित चौकट तोडून उर्दू कवितेला शोषित-पीडितांच्या दु;खाशी जोडून घेत मानवतेची आग्रही भूमिका घेतली, अशी मांडणी लेखकाने केली आहे. हा लेख वाचून फैजच्या चाहत्यांची साधना प्रकाशनामार्फत प्रसिद्ध होत  असलेलं हे अनुवादित पुस्तक वाचण्याची नक्की इच्छा निर्माण होईल.  अलीम रंगरेज यांनी ‘साहीर मिले ना दोबारा’ या लेखातून साहीर लुधियानवी यांच्या हिंदी चित्रपट गीतकार म्हणून कारकीर्दीचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला आहे. तो कसा मानवतावादी, स्त्रीवादी भूमिकेचा पुरस्कर्ता होता याची मांडणी केली आहे. लेख माहितीपूर्ण असला तरी यातून फारशी नवी माहिती वाचकांच्या हाती लागत नाही. कारण साहीरवर मराठीतून भरपूर लिखाण झालं आहे.

‘कोंडी मुस्लिम शिक्षण आणि आरक्षणाची…’ या लेखातून हुमायून मुरसल यांनी एका अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाला वाचा फोडली आहे. सध्या आपल्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. खरं म्हणजे तत्कालीन आघाडी सरकारने निवडणुका नजरेसमोर ठेऊन मराठा आणि मुस्लीम आरक्षण जाहीर केलं होतं. ते सरकार गेल्यावर युती सरकार आलं नि त्यांच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाने मोर्चे काढले होते. पण आरक्षण प्रश्नाबाबत मुस्लिम समाजाकडून फारशी प्रतिक्रिया आली नाही. या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात सच्चर समितीने मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षाही विदारक असल्याचा निष्कर्ष काढून सुद्धा आपल्या राज्यातच नव्हे तर देशाच्या इतर भागातही यावर फार काही घडलं नाही. या मागे मुस्लिम समुदायाची आपल्या हक्कांबाबत उदासीनता दिसून येते. लेखकाची संस्था २००४ पासून या प्रश्नावर काम करते आहे. आपल्या अधिकारांबद्दल अज्ञान, जाणीव-जागृतीची कमतरता, विचारी नेतृत्वाचा अभाव अशी काही कारणे लेखकाने सांगितली आहेत. मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी शिक्षण आणि आरक्षण या दोन घटकांची नितांत गरज असल्याचे लेखकाचे प्रतिपादन पटणारे आहे, यात शंका नाही.

बहुसंख्याकवादी राजकारणाचा बळी ठरलेल्या आपल्या राज्याच्या मराठी मुस्लिम समुदायातल्या संत आणि साहित्यिक परंपरांचा अभ्यासपूर्ण वेध ‘आंखे खोल के देखो भाई’ या लेखातून डॉ. मुफिद मुजावर यांनी घेतला आहे. सुफी परंपरा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळ, सिकंदरलाल अत्तार-सय्यद अमीन-महंमद इस्माईल भालदार-कोल्हापूरचे शाहीर लहरी हैदर-हाकिम मीर महंमद याकुब खान ते शाहीर अमर शेख तसेच फ.म. शहाजिंदे-खलिल मोमीन-मुबारक शेख-  नुकतेच कालवश झालेले इलाही जमादार-जावेद कुरेशी-डॉ. अजीज नदाफ-शफाअत खान-फातिमा मुजावर-डॉ. अलीम वकील यांच्या योगदानाचा यथोचित परामर्श डॉ. मुजावर यांनी घेतला आहे. डॉ. यू. म. पठाण आणि मराठी व्याकरण संदर्भात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यास्मिन शेख यांचा उल्लेख नजरचुकीने राहून गेला असं वाटतं. मुस्लिम मराठी चळवळीसमोर धर्मवेड्या मंडळींचे आव्हान असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले आहे.

यातले भारत-पाक मैत्रीची नवी हूल (जतीन देसाई), रोहिंग्या मुस्लिम जन्माची फरफट (प्रा. डॉ. अरुण वाहूळ ), खाटिक कोण तर हिंदू…त्यात स्त्रियादेखील! (डॉ. रमेश रावळकर), हेरीटेज शॉक (नागनाथ खरात), निसर्ग आणि इस्लाम (अर्शद शेख), सक्सेस क्या है (यमन), आरोग्य गुप्तवार्ता विभाग ही काळाची गरज (संतोष आंधळे), निद्रिस्त ज्वालामुखी (प्रसाद लाड) हे लेख देखील वाचनीय आहेत. खाटिक समाजाबद्दल नवी माहिती वाचकांना मिळते. तेजस ठाकरे आणि जावेद जकारिया यांचं व्यक्तिचित्रण करणारे लेखही चांगले आहेत.

‘ईद-हमारी और आपकी’ यात अनिल अवचट, रझिया पटेल, अरुण म्हात्रे, उर्मिला पवार, फ.म. शहाजिंदे, डॉ. शमशुद्दिन तांबोळी, इंद्रजीत खांबे यांनी आपले अनुभव कथन केले आहेत. तर ‘आंतरधर्मीय ईद’मध्ये आरजू तांबोळी-विशाल विमल, मुमताज शेख-राहुल गवारे, अमर हबीब-आशा अमर ह्या दाम्पत्यांचे दृष्टीकोन विशद केले आहेत.

‘पुरुष सत्तेच्या शत्रू’ या लेखाद्वारे श्रुती गणपत्ये यांनी चळवळीत काम करणाऱ्या सोनी सोरी आणि इतर महिला कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या त्रासाबद्दल मांडणी केली आहे. २०१४ नंतर बदलेल्या परिस्थितीत वाढलेला स्त्री विरोधी विचार, ब्राह्मणी संस्कृतीचा वाढता पगडा, केंद्र सरकारची राजकीय कार्यशून्यता, सोशल मीडियावरचं स्त्रियांना अर्वाच्य-अश्लील-धमकी देणारं विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं वर्तन याचं वस्तुनिष्ठ आकलन उदाहरणे देऊन मांडलं आहे.

सानिया भालेराव यांच्या ‘मिलेनियल गर्ल्स’ लेखातून फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोन संवेदनशील चित्रपट तारकांचा प्रवास वाचकांना घडतो. शिवाय त्या दोघींच्या मैत्रीचे बंध किती अतूट आहेत याचाही प्रत्यय येतो. या शिवाय भावपूर्ण गझला आणि अर्थपूर्ण कविता यांची मौजूदगी आहेच. तसेच इर्शाद बागवान यांच्या ‘तुकडे तुकडे बिस्मिल्ला’ या गुलदस्त्यातल्या लघुकथा वाचकांना अनोळखी विश्वात घेऊन जाऊन अंतर्मुख करतात.

‘नब्ज’ हा उपक्रम प्रयोग न राहता परंपरा व्हावी, ही परंपरा अनेकांना प्रेरणा देणारी ठरावी असं वाटतं. प्रकाशकांनी इथून पुढेही हा अंक निघणार असल्याचं सुतोवाच केलं आहे. याचं स्वागत करून मराठी समाजाने त्यांच्या मागे सर्व प्रकारचे पाठबळ उभं करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाला चळवळीचे स्वरूप दिले तसे देण्याची आवश्यकता आहे.

एकंदरीत करोना महामारीच्या या अतिशय कठीण कालखंडात असा धाडसी प्रयोग केल्याबद्दल ‘ब्लॅक इंक मीडिया हाउस’चे अभिनंदन! या अंकाने या वर्षी ईदचा अनोखा आनंद दिला हे नक्की!

डॉ. प्रवीण घोडेस्वार, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: