समस्यांकडे दुर्लक्ष करीत वाढदिवस साजरा

समस्यांकडे दुर्लक्ष करीत वाढदिवस साजरा

पहिल्यांदाच धरण सर्वाधिक पातळीपर्यंत भरण्यासाठी राज्य सरकार मागे लागल्यामुळे धरण वेगाने भरले गेले. मात्र ‘स्फोट झाल्यासारखा’ आवाज ऐकू येत असल्यामुळे आणि जमीन हलल्यासारखी वाटत असल्यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.

भारतीय लोक पैसा देशाबाहेर का घेऊन जात आहेत?
२०११च्या देशद्रोहाच्या खटल्यातून सोनी सोरी निर्दोष
लॉकडाऊनमध्ये देवेगौडांच्या नातवाचे लग्न

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ६९ वा वाढदिवस पुन्हा एकदा गुजरातमधील सरदार सरोवर धरणाजवळ साजरा केला. योगायोगाने याच वेळी, धरण त्याच्या सर्वाधिक पातळीपर्यंत भरण्यात आले आहे.

मात्र ही पातळी गाठल्यानंतर सुरक्षेच्या कोणत्या समस्या निर्माण होतील हे अजूनही स्पष्ट नाही. रविवारी द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, धरणाच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जमिनीमध्ये कंपने जाणवली. स्थानिकांनी ‘स्फोटासारखे’ आवाज ऐकू आल्याची आणि जमीन हलल्यासारखी वाटल्याची तक्रारही केली.

“हे स्फोट इतके मोठे होते, की ते ६-७ किमी अंतरावरूनही ऐकू येत होते. ते खाणीतून येणाऱ्या आवाजासारखे होते, आणि त्यांच्यामुळे पक्षीही उडून जात होते. पुनर्वसन केलेल्या जागांवरही ही कंपने जाणवली. यापूर्वी आम्हाला कधी असा अनुभव आला नव्हता,” एकलबारा येथील एक शेतकरी, भारत मंडलोई यांनी सांगितले.

ही कंपने निर्माण करणाऱ्या घटनेला ‘रिझर्वायर इंड्यूस्ड सेस्मिसिटी’ म्हणजेच मोठ्या पाण्याच्या साठ्यामुळे निर्माण होणारी भूकंपप्रवणता असे म्हणतात. जेव्हा धरणामध्ये पाणी भरले जाते, तेव्हा त्या धरणाच्या क्षेत्रातील जमिनीवर दाब वाढतो. हा दाब कधीकधी इतका जास्त असतो की त्यामुळे पृष्ठभागाच्या खालच्या टेक्टोनिक प्लेटची हालचाल होऊ शकते आणि त्या इकडून तिकडे हलू शकतात.

तसेच पाणीही पृष्ठभागावरील फटी आणि खाचांमधून खाली झिरपत असल्यामुळे या फटी आणि खाचा मोठ्या होतात व पृष्ठभागाच्या खाली अस्थिरता निर्माण करतात. पाणी वंगण म्हणूनही काम करते, व खडकांचे पटल हलणे सोपे होते.

अभ्यासांमध्ये असेही आढळले आहे की जेव्हा धरण पहिल्यांदा भरले जाते तेव्हा भूकंपप्रवणतेमध्ये “निश्चितपणे वाढ” होते. सरदार सरोवर धरण पहिल्यांदाच काठोकाठ भरले जात आहे.

एका अलिकडच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की मागच्या वर्षी केरळमध्ये मोठा पूर आल्यानंतर राज्यातील धरणांसाठी पाणीसाठ्यामुळे निर्माण होणाऱ्या भूकंपप्रवणतेची जोखीम वाढली होती. १९६७ मध्ये महाराष्ट्रातील कोयना परिसरात झालेला मोठा भूकंप हा तिथल्या धरणामुळे होता असे मानले जाते. कोयनेवरील धरण जेव्हा सर्वोच्च पातळीला पोहोचले तेव्हा ७.५ रिश्टर स्केल इतका मोठा भूकंप झाला व त्यात १७७ लोकांचा मृत्यू झाला. मात्र काही अभ्यासांनी हा भूकंप पाणीसाठ्याशी संबंधित नसल्याचेही म्हटले आहे.

दुसरी चिंतेची बाब म्हणजे गुजरात सरकारच्या आग्रहामुळे हे धरण मोठ्या वेगाने भरले जात आहे. धरणाच्या सुरक्षा माहितीनुसार, ४८ तासांमध्ये ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाणी भरता कामा नये. पण धरण काठोकाठ भरण्यासाठी ते ४८ तासांत ६० सेंटीमीटर या वेगाने भरले जात आहे.

धरण जास्त वेगाने भरल्यास त्यामुळे गळती होऊ शकते, कारण बांधकाम केलेल्या सामग्रीला ओले होऊन प्रसरण पावण्यास आणि भरून येण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. कधीकधी यामुळे फटीही तयार होऊ शकतात.

सामाजिक कार्यकर्ते हिमांशू ठक्कर यांच्या मते धरण पूर्ण भरायचे असेल तर ते पावसाळा संपता संपता भरले पाहिजे. नाहीतर पूर येण्याचा धोका असतो. गुजरात खेडूत एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष सागर राबरी यांच्या मते धरण काठोकाठ भरण्याचा काहीही उपयोग नाही. कारण धरणातील पाणी वापरण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाच अस्तित्वात नाहीत. “लोकांना पाणी वापरता यावे हा धरणाचा उद्देश असतो. पाणी नुसतेच साठवून ठेवायचे असेल आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक सुविधाच नसतील, तर त्याचा काय उपयोग?” ते म्हणाले. गुजरात सरकारने आत्तापर्यंत त्यांच्या वाट्याचे पाणीही पूर्ण वापरलेले नाही असेही त्यांनी सांगितले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0