मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून काय मिळालं?

मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून काय मिळालं?

‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना मोदींच्या आधीच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेचाच कल्पनाविस्तार…आता ‘मेक इन इंडिया’ या घोषणेत त्यांनी ‘मेक फॉर वर्ल्ड’ही जोडून टाकलं.

सरकारचा अजेंडा जनतेसमोर ठेवण्यासाठी सरकारला वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध असली तरी ते जे महत्त्व लाल किल्ल्यावरच्या पंतप्रधानांच्या भाषणाला आहे ते कशालाच नाही. लाल किल्ल्याच्या प्राचीन तटबंदीवरून पंतप्रधान संपूर्ण देशाला संबोधित करतात. भारताच्या इतिहासाशी नातं सांगत भविष्याकडे नजर ठेवण्यासाठी यासारखं दुसरं व्यासपीठ असूच शकत नाही. यावेळी देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्यानं पंतप्रधानांच्या भाषणाची उत्सुकता इतर वेळेपेक्षा तुलनेनं अधिक होती. पंतप्रधान म्हणून मोदींचं हे सलग ७ वं भाषण होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधान सलग इतका काळ या पदावर राहण्याचीही ही पहिलीच वेळ. त्यांच्या भाषणाची काही ठळक वैशिष्ट्यं-

१.   २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक वेळी मोदी लाल किल्ल्यावरून काही ना काही विशेष घोषणा करत आले आहेत. २०१४ साली ‘स्वच्छ भारत मिशन’ची घोषणा त्यांनी याच व्यासपीठावरून केली होती, नंतर लाल किल्ल्यावरूनच त्यांनी घराघरात शौचालय बनवण्याचं जाहीर केलं. लाल किल्ल्यावरूनच ‘आयुषमान भारत’ची घोषणा झाली होती. मागच्या वर्षी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर्षीच्या भाषणातली तशा अर्थानं सर्वात महत्त्वाची घोषणा कुठली हे पाहिलं तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन हे असेल. या निमित्तानं प्रत्येक भारतीयाला एक आरोग्य कार्ड देण्याचा निर्धार आहे. हे काहीसं आरोग्य आधार कार्ड म्हणावं लागेल. पण यात त्या व्यक्तीची सगळी हेल्थ हिस्ट्री समाविष्ट असेल असं म्हटलं आहे. याच्या अंमलबजावणीला कुठली तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. पण ते कशा पद्धतीनं होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

२.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा सोहळा पार पडत होता. त्याचं भान राखत देशात कोरोनाच्या लसीची प्रगती कुठपर्यंत आली आहे याचीही माहिती त्यांनी देशवासियांना दिली. देशात एक दोन नव्हे तर तीन तीन ठिकाणी लसींचं काम वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. ज्या वेळी त्याच्या वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील त्यानंतर वेगानं ही लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आराखडा तयार असल्याचा विश्वास त्यांनी देशवासियांना दिला. या तीन लसीचं काम ज्या ठिकाणी चालू आहे ती ठिकाणं म्हणजे भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट, कॅडिला झायडस असू शकतात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान कोरोनाच्या लसीची घोषणा करतील ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. १५ ऑगस्टपर्यंत ही लस तयार करा, असं पत्र जूनच्या अखेरीस आयसीएमआरनं लिहिल्यानं या डेडलाईनवरूनही बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती. पण सुदैवानं लसीबाबत कुठलंही बढाईखोर विधान पंतप्रधानांनी केलं नाही.

३.   प्रत्येक घरात शौचालय, गावागावात वीज देण्याच्या घोषणेप्रमाणेच पायाभूत गरजांबद्दलची आणखी एक घोषणा त्यांनी यावेळच्या भाषणात केली. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाचं पाणी देण्याचं. आज प्रतिदिन १ लाख घरांत हे कनेक्शन पोहोचवलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय मागच्या वर्षात २ कोटी लोकांच्या घरात नळाचं पाणी पोहोचल्याचाही त्यांनी दावा केला.

४.   जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखला पूर्णपणे वेगळं करण्यात आलंय. लडाख थेट केंद्रशासित प्रदेश तर जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असणार आहे. पण गेल्या वर्षभरापासून तिथे लोकनियुक्त सरकारचं अस्तित्व नाही. ओमर अब्दुल्ला यांची काही महिन्यांपूर्वी सुटका झाली, पण मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासह अनेक नेते अजूनही तुरुंगात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये मतदारसंघ पुर्नरचनेचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे लवकरच निवडणुका होतील, लोकांना त्यांचा आमदार, त्यांचा मुख्यमंत्री निवडता येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. यातला मतदारसंघ पुर्नरचनेचा भागही महत्त्वाचा आहे. म्हणजे लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून बाजूला झाल्यानंतर आता हिंदूबहुल जम्मू आणि मुस्लीमबहुल काश्मीर हे दोनच भाग उरलेत. अशात मतदारसंघाची पुर्नरचना करताना खोऱ्यातली राजकीय ताकद कशी नियंत्रणात ठेवता येईल याचा विचार होणार हे उघड आहे.

५.   सॅनिटरी पॅडचा उल्लेख- लाल किल्ल्यावरच्या भाषणात पंतप्रधानांनी सॅनिटरी पॅड्सचा उल्लेख केला. याआधी शौचालयासारख्या गोष्टीचा उल्लेख करून त्यांनी एक वेगळा पायंडा पाडला होता. त्याच धर्तीवर आता लाल किल्ल्यावरच्या भाषणात त्यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या या विषयाचा उल्लेख केला. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून गरीब महिलांसाठी १ रुपयात सॅनिटरी पॅड्स द्यायला आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. ६० हजार केंद्रांच्या माध्यमांतून आत्तापर्यंत १ कोटी सॅनिटरी पॅडसचं वाटप झाल्याचा दावा त्यांनी केला.

६.  चीन सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. थेट नाव न घेता त्यांनी लडाखमध्ये आपले जवान काय करू शकतात, भारताच्या सार्वभौमत्वाकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना जशास तसं उत्तर कसं देऊ शकतात हे साऱ्या जगानं पाहिल्याचं म्हटलं. यातही लाईन ऑफ कंट्रोल ते लाईन ऑफ अक्चुल कंट्रोलपर्यंत आपले जवान सतर्क आहेत हे सांगून त्यांनी पाकिस्तान, चीनचं नाव न घेताच त्यांना इशारा दिला. संपूर्ण भाषणात याचवेळी त्यांचा स्वर अगदी टिपेला पोहचला होता.

७.    लाल किल्ल्यावरच्या भाषणात राम मंदिराच्या नावाचाही उल्लेख मोदींनी प्रथमच केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल देशानं शांततेनं स्वीकारला, या संपूर्ण काळात देशवासियांनी दाखवलेली वर्तणूक ही कौतुकास्पद आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारी आहे असं मोदींनी म्हटलं. आता भविष्यासाठी प्रेरणा या गोष्टीचा अर्थ नेमका काय काढायचा अशी चर्चा सुरू झाली. कलम ३७०, राम मंदिर झाल्यानंतर आता भाजपच्या कोअर आयडॉलॉजीमधला कुठला विषय़ अजेंड्यावर आणणार याचीही चर्चा त्यामुळे सुरू झाली.

८.   ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा उल्लेख मोदींनी लॉकडाऊनच्या काळातच केला होता. खरंतर मोदींच्या आधीच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेचाच हा कल्पनाविस्तार…आता चीनसोबत बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी मोहीमेला दिलेली ही नवी फोडणी. ‘मेक इन इंडिया’ या घोषणेत त्यांनी आता ‘मेक फॉर वर्ल्ड’ही जोडून टाकलं. पण त्यात आत्मनिर्भर म्हणजे विदेशीला पूर्ण बंदी नाही हेही त्यांनी दाखवून दिलं. कुटुंबात मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला वडीलधारे सांगतात, आपल्या पायावर उभा राहा. तसंच आता देशाला इतक्या वर्षानंतर आत्मनिर्भर व्हायची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं. पण मुळात ही आत्मनिर्भरता अंमलबजावणीच्या वाटेवर कशी चालते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

९.   एनसीसीच्या विस्ताराचीही घोषणा मोदींनी यावेळी लाल किल्ल्यावरून केली. लष्करी सेवा खासगी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षासाठी खुली करण्याचा विचार सरकार दरबारी सुरू असल्याचं मागे बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची आहे. सीमा भागात एनसीसीचा विस्तार करून देशभरात एक लाख एनसीसी कॅडेट्सची संख्या वाढवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. नौदल, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शाळकरी वयात लष्करी शिस्तीचं महत्त्व वाढवण्याचा किंवा खासगी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अधिकारी पदं ३ वर्षांसाठी खुली करण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल असू शकतं.

१०.  मोदींचं यावेळचं भाषण हे ८६ मिनिटांचं होतं. २०१६मध्ये त्यांनी ९६ मिनिटांचं भाषण केलं होतं. यावेळचं त्यांचं भाषण हे त्यांच्या आजवरच्या ७ भाषणांत लांबीच्या दृष्टीनं पाचव्या क्रमांकावरचं. मनमोहन सिंह हे त्यांच्या एकूण १० वर्षांच्या कारकीर्दीत कधी ५० मिनिटांपेक्षा जास्त बोलले नव्हते. वाजपेयींनी तर २००२ आणि ०३ मध्ये अवघ्या २५ मिनिटांचंच भाषण केलं होतं. पण मोदींचं सर्वात लहान भाषण हे २०१७ सालचं होतं, ५६ मिनिटांचं. गेल्या सात वर्षात मोदींच्या भाषणांची लांबी ही साधारण ८० ते ९० मिनिटेच राहिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साजरा होत असल्यानं अनेक बाबी यावेळी पहिल्यांदाच दिसत होत्या. एरव्ही जे व्हीआयपी उपस्थित असतात त्यांपैकी केवळ २५ टक्केच यावेळी उपस्थित होते. जवळपास 4 हजार शाळकरी मुलं उपस्थित असायची ती संख्याही काही शेकड्यांवरच आली.

हे झालं पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं विश्लेषण. पण हे केवळ त्यांच्या भाषणाचं विश्लेषण आहे. त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केवळ भाषणावरून करता येणारच नाही. कारण यातल्या किती गोष्टी प्रत्यक्षात आल्यात, किती स्मार्ट सिटीसारख्या हवेत विरल्यात याचा विचार करायला गेलो तर तो स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकेल.

प्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित प्रतिनिधी आहेत.

COMMENTS