फिल्म अजून अपूर्णच आहे!

फिल्म अजून अपूर्णच आहे!

नर्मदा आंदोलन, गेली ३४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. या आंदोलनाने आणि नर्मदेने या काळात अनेक वळणे पहिली. हा प्रवास टिपणारा ‘लकीर के इस तरफ’, हा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने माहितीपटाचा प्रवास सांगणारा हा लेख.

राम मंदिराच्या निधीसाठी उ. प्रदेश सरकारचे बँक खाते
संसदेच्या आवारात निदर्शने, धरणे, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
५०० व २ हजार रु.च्या नकली नोटांचे प्रमाण वर्षभरात वाढले

फिल्म बनण्याच्या प्रक्रियेतली सर्वांना माहित असणारी गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाची आरोळी – लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन. नर्मदा आंदोलनावर आधारलेला माहितीपट बनवण्याची माझी प्रक्रिया ह्या मान्यतेच्या संपूर्ण विरोधी दिशेची होती. कारण मी दिग्दर्शनासोबत, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, संशोधन, शूटिंगच्या संदर्भातलं आयोजन, आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनात स्वतःला घुसवणे, माणसे शोधून त्यांच्या मुलाखती घेणे, नंतर संकलन करणे, निवेदन लिहिणे, स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करणे, ह्या सर्व भूमिका मी स्वतःहून, स्वतःवरच ओढवून घेतल्या होत्या. त्यामुळे ती दिग्दर्शकीय आरोळी देणार तरी कुणाला?

कारण, फिल्म बनवणे सुरु करायच्या आधीच मी दोन गोष्टी निश्चित केल्या होत्या. एक म्हणजे, ह्या फिल्मचा प्रत्येक शॉट न शॉट मी स्वतः शूट करणार, म्हणजे नंतर कोणी शंका उपस्थित केली तर मला ठामपणे सांगता येईल, की हे मी स्वतः बघितलं आहे, दुसऱ्या कुणीही घेतलेला हा शॉट नाही. त्यामुळे त्याच्या सच्चेपणाची संपूर्ण जबाबदारी माझी राहते आणि दुसरं म्हणजे कुठलीही फ्रेम मी सेट करणार नाही. म्हणजे, कोणालाही इथं उभे रहा, तसं बोला, इथं उजेड कमी आहे तर बाहेर या वगैरे सांगणार नाही. त्यामुळे माझ्या आरोळीची इथं गरजच नव्हती. सगळीकडे एक्शन च एक्शन होती. जे, जसं, जिथं घडतंय, ते फक्त कॅमेऱ्यात टिपायचं होतं.

नर्मदा

फिल्ममधून आपल्याला काय काय दाखवायचं आहे, वगैरे सुरुवातीला काहीच निश्चित नव्हतं. आंदोलनाच्या खळाळत्या लाटांवर, आपली छोटीशी डुंगी ठेवायची आणि प्रवाह नेईल तिकडे जात, सगळं आत घेत राहायचं असं ठरवलं. आंदोलन कदाचित असंच सुरु झालं असेल. कारण ऐंशीच्या दशकात मेधाताई नर्मदेच्या खोऱ्यात एका वेगळ्याच सामाजिक कामासाठी गेल्या होत्या. तिथं गेल्यावर त्यांना जी लूट, अन्याय, भ्रष्ट शासन, अजाण आणि निष्पाप आदिवासी दिसले, त्यानं त्यांचं मन कासावीस झालं असेल. मेधा पाटकर आणि नर्मदा खोऱ्यातले आदिवासी यांनी मिळून, १९८५ साली, महाराष्ट्रात नर्मदा बचाव आंदोलन सुरु केलं. मग हळू हळू ते मध्यप्रदेशाच्या निमाड प्रांतात पसरत गेलं. बुडितात, एकूण २४५ गावं जाणार आहेत हे नंतर कळलं. ते देखील आंदोलनानं केलेल्या अभ्यासामुळं, शासनाकडून काहीच तयारी नव्हती. कुठलेच आकडे नव्हते. सर्व धुरा सांभाळत आंदोलन वाढतच गेलं, अजून सक्षम होत गेलं. आज परिस्थिती अशी आहे की नर्मदा बचाव आंदोलन ही एक मोठ्ठी नदी वाटते. त्यात मिसळत येणाऱ्या उपनद्या म्हणजे इतर आंदोलनं. त्यामुळे, ह्या सगळ्याचा व्याप आणि कालखंड इतका मोठा आहे की आपल्याला हे पेलेल का ही धाकधूक होतीच. पण उडी घेतल्याशिवाय पोहता येणार नाही.

माझी टीम म्हणजे मी आणि कॅमेरा. बस. ट्रायपॉड (Tripod) पण नव्हता कारण नर्मदेच्या खोऱ्यात पोचणं हे मोठं दिव्य आहे. बसनं संपूर्ण रात्रभराचा पुण्यापासून शहाद्यापर्यंतचा प्रवास, मग काळीपिवळीनं धडगाव, मग दुसऱ्या जीपनं सिंदुरी, किंवा उडद्या नाल्यापर्यंत, मग चालत नदीत, मग नावेत, तास, दोन तास, मग किनाऱ्यावर उतरून, पुन्हा समोरचा डोंगर चढून जायचं. त्यात माझ्या पाठीला एक बॅग, ज्यात कपडे, पेस्ट, ब्रश, साबणासारख्या वस्तू आणि पोटाशी दुसरी लहान बॅग, ज्यात कॅमेरा, चार्जर, बॅटऱ्या आणि एक छोटा रेकॉर्डर. बस!

फिल्म सुरु करण्याआधी काही मित्रमंडळी मदतीला धावली आणि खूपच थोडे पैसे हाताशी असताना काम सुरु करायचं ठरवलं. एक फिल्म बनवायला लागतील इतके पैसे मिळेपर्यंत थांबणं शक्यच नव्हतं. कारण मग फिल्म कदाचित कधीच सुरु झाली नसती. पुढच्या ४ वेळा नर्मदेच्या खोऱ्यात जाणंयेणं करता येईल इतके पैसे नक्कीच मिळाले होते.

आयुष्य खूप फिल्मी आहे ह्यावर माझा खरंच विश्वास आहे. त्याला योगायोग पण म्हणता येईल. या फिल्मच्या शूटिंगचा पहिला दिवस, मेधाताईंसोबत मणिबेली इथं होता आणि शेवटचा दिवस मेधाताईंसोबतच, केवडिया इथं. म्हणजे आंदोलनाचा संघर्ष जिथून सुरु झाला, तिथं फिल्म सुरु झाली आणि आंदोलनाला सर्वात मोठा धक्का ज्या जागेतून मिळाला, तिथं फिल्मचा शेवटचा शॉट मी घेतला. जलाशयाच्या बाजूनं सरदार पटेलांच्या पुतळ्याचा. फिल्मचं नाव ‘लकीर के इस तरफ’ असं मनात आल्यापासूनच मनात निश्चित केलं होतं, की शूटिंग धरणाच्या फक्त ‘इस तरफ’ कडूनच करायचं. त्या पलीकडे जाऊन, गुजरात सरकारच्या पर्यटनाच्या नावाखाली केल्या गेलेल्या अत्याचाराला समर्थन देऊन, म्हणजे तिकीट काढून, पुतळ्याचा शॉट घ्यायचा नाही.

ही फिल्म करायला मला आंदोलनानं सांगितलं नव्हतं, कुणीही म्हणालं नव्हतं. माझीच खोड होती, आणि फिल्ममधे सगळं आंदोलनाच्या बाजूचंच दिसणार होतं. कारण मी स्वतःच आंदोलनाच्या बाजूनं होते. वर्षानुवर्ष. ह्या लकीरच्या ‘उस तरफ’चेच जास्त लोक मला सतत भेटत असतात. ही फिल्म बघून सुद्धा काही जणांनी विचारलंच की सरकार ची बाजू का दाखवली नाहीस? माझं उत्तर ठाम होतं. मी लोकांच्या बाजूनं आहे, मला तीच बाजू पटते आणि म्हणून तीच बाजू दाखवली. वाद करायला अनेक मुद्दे असतात. जसं, सरकारी फिल्म्स मधे इकडची बाजू असते का? आजकाल बातम्या दोन्ही बाजू दाखवतात का? मग उगाच आपला शहरी मध्यमवर्ग, स्वतःला सोयीस्कर गोष्टींची बाजू घेऊन चर्चा करत बसतो. त्यांना आधाराला सत्य, न्याय, डोळ्यांनी बघून मग विश्वास ठेवणं वगैरे गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. ‘तू त्या पाटकर च्या बाजूनी आहेस?’ हा तुच्छताभावानं भरलेला प्रश्न मी गेली दोन दशकं माझ्या सख्ख्या कुटुंबाकडून ऐकते आहे. किंवा, लोकांना हटवता येतं पण धरणाची जागा नाही बदलता येत, ह्या सारख्या संवेदनाहीन वक्तव्यांना सतत सामोरं जातेय. मग मीच का दोन्ही बाजू मांडायच्या? मी लोकांची बाजू मांडणार. जे बघितलं ते. तेव्हढंच!

आंदोलन

आंदोलन

आंदोलनाकडे फिल्लमवाल्यांसाठी एक मोठ्ठा खजिना आहे. नीट डोळे, कान उघडून बघितलं तर विस्थापित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे निदान साठ हजार कहाण्या तरी नक्कीच मिळतील, बुडणाऱ्या साठ हजार कुटुंबांच्या. पण हे सगळं खूप क्लिष्ट आहे. सगळं काही कागदांवर अवलंबून आहे. पुनर्वसन ही गोष्ट शासनाला वाटली तितकी सहज नव्हती. त्यातही ही लोकं न्याय, हक्क, जमिनीच्या बदल्यात जमिनी, घरासाठी प्लॉट ह्यासारख्या मागण्या करत लढा देत बसले. शासनाला हे अपेक्षित नव्हतं. जसं इतर धरणं किंवा खाणी किंवा कंपन्या किंवा अणुप्रकल्पांसाठी आजवर ते करत आले होते, तसंच इथं पण करू असं त्यांना वाटलं असेल. अडीच लाख तर लोक आहेत, जातील कुठेतरी, देऊ थोडेफार पैसे. ते अशिक्षित आहेत, सधन नाहीत, त्यांच्याकडे कुठलीच सत्ता नाही, ते जोरजोरात ओरडून आपलं म्हणणं मांडत नाहीत त्यामुळं शासनानं ह्या एवढ्या मोठ्ठ्या सरदार सरोवर प्रकल्पाचं स्वप्न बघितलं. शहरांना यथेच्छ वीज आणि कच्छ, सौराष्ट्राला पाणी पुरवण्याचं अमिष दाखवत. पण त्यांचा हा प्लान मात्र फसला. कारण तिथली लोकं शासनापुढे उभी राहिली, स्वतःच्या हक्कांसाठी. कचरा म्हणून फेकून टाकू द्यायला ती तयार नव्हती. आज परिस्थिती अशी आहे की मध्यप्रदेशातल्या बुडितात येणाऱ्या हजारो कुटुंबांना गुजरातमधे वसवण्याची योजना आहे. मध्यप्रदेशात ८५ वसाहती बनत आहेत, ज्यात १९३ गावचे लोक वसणार आहेत. महाराष्ट्रात १३ वसाहती होत आहेत. पण या सर्व डोंगरापासून दूर, नर्मदेपासून दूर, शहराच्या जवळ होत आहेत. ही नव्यानं निर्माण होणारी कृत्रिम, तत्काळ गावं आहेत. त्यामुळं शहरात असतात त्या सोयी पण यांना मिळायच्या आहेत. नव्या वसाहतींमध्ये माणूस राहू शकेल अशा कुठल्याच गोष्टी अजून नाहीत. पाणी नाही, वीज नाही, साधी गटार व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, मग दवाखाने, शाळा, हे तर फार दूर राहिलं. शासनानं दिलेलं कुठलंच वचन पाळण्यात आलेलं नाही. अजून नव्या वसाहती अपूर्ण आहेत.

मेधा पाटकर आणि सुनीती सु.र.

मेधा पाटकर आणि सुनीती सु.र.

तिकडे गुजरातनं सरदार सरोवराचे दरवाजे पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ह्या अजस्त्र जलाशयात पाणी साठून ते गावात पोचलं आहे. भुतांच्या फिल्ममधे दिसतं तशी विराण, चिखल साठलेली, रस्त्यांवर हिरवा गाळ साठलेली गावं आत्ता बघायला मिळत आहेत. पण ही गावं रिकामी नाहीत, कारण त्या त्या घरांमध्ये राहणारी माणसं जाणार तरी कुठं? त्यांना अजून घरं मिळाली नाहीत, जमिनी तर नाहीच नाही. मग ही लाखो माणसं राहणार कुठं? तिकडे गुजरात आणि केंद्र शासनाच्या क्रौर्याची सीमाच नाही. आपले पंतप्रधान आनंदून लोकांना पर्यटनासाठी आमंत्रित करताहेत. खरं पर्यटन ह्या गावांमध्ये केलं पाहिजे. माणुसकीची जाग मनात ठेऊन इतकं तरी केलंच पाहिजे की ह्या सर्व लोकांना जोवर घरं मिळत नाहीत तोवर धरणाच्या पाण्याची पातळी वाढू देऊ नये. पण दुर्भाग्य हे की आंदोलन म्हणजे विकासाचा विरोध करणारे, शासनाला नाकी नऊ आणणारे, उगाचच मोर्चे काढणारे, रस्ते अडवणारे असा समज पसरवला जातो आणि आपल्या मध्यम वर्गाला तो नीट रिचवता येतो, कारण तो त्यांच्या पथ्यी पडणारा असतो.

ही एवढी पार्श्वभूमी मनात ठेऊन, मी फिल्म बनवायला निघाले. पण हे खूप जड होतं, अवघड होतं, गुंतागुंतीचं होतं, आणि ह्या सर्वाला एक खूप मोठा इतिहास होता. अगदी स्वातंत्र्यापूर्वीचा, जेव्हा ह्या धरणाची संकल्पना राज्यकर्त्यांच्या मनात आली होती. नदी प्रमाणेच फिल्मला पण अनेक वाटा फुटत जातात आणि अनेक उपनद्या येऊन मिळत राहतात. त्यामुळे, आपल्या मूळ वाटेनं जात राहणं हे जिकिरीचं होऊन बसतं. कधी इकडे जावसं वाटतं तर कधी ती वाट खुणावते. कधी पात्र सोडून बाहेर पसरावंसं वाटू लागतं तर कधी आहोत तिथं धरण घालून वाहतं पाणी तिथंच थांबवून, फिल्म संपली असं ओरडून सांगावंसं वाटतं. पण ह्यातलं काहीही केलं तरी नदी मरते, तशी फिल्म देखील सैरभैर होऊ शकते. धरल्या वाटेपेक्षा वेगळीच दिशा पकडली तर ज्यांना हवं असेल त्यांना पाणी मिळणार नाही, आणि उगाच नको असेल त्यांना मिळालं तर ते त्याचा दुसराच उपयोग करतील, किंवा दुर्लक्ष करतील. पात्र सोडून बाहेर आलं तर पूर येतो आणि धरण बांधलं तर…तर काय होतं ह्याचीच तर गोष्ट मी सांगू पाहत होते.

ती आधीची नर्मदा, आणि आताचा सरदार सरोवर जलाशय. ती आधीची अवखळ, वाहणारी, चंचला नदी आणि आताचा तो मठ्ठ, बसका, संथ, अवघडून उभा असलेला जलाशय. कितीदा तरी ऐकलं की आता ते नारी रूप बदलून नर रूप झालंय, त्याची पूजा कोण करणार! हे सगळं फिल्ममधे कसं दाखवायचं? लोक भसाभस बोलून जातात, त्या क्षणी ते टिपलं पाहिजे नाहीतर, नंतर ते कृत्रिम वाटू लागतं.

शूटिंगला नुकतीच सुरुवात केली होती. काही सभा, काही गाणी, एका शाळेत चित्रीकरण केलं होतं, पण अजून काहीच चित्र स्पष्ट होईना. भादल ह्या मध्य प्रदेशातल्या टोकाच्या गावी गेलो होतो. शूटिंग साठी म्हणून मुद्दामून कुठेही जाण्याचं आयोजन करणं मला टाळायचं होतं. त्यामुळे, आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसोबत, त्यांच्या ठरवलेल्या कार्यक्रमानुसार मी माझं शूटिंग जमवत होते. तर भादलला पोचलो, तेव्हा शाळा भरली होती. आदिवासी मुलं, मुली शांतपणे, शाळेबाहेरच्या झाडाखाली बसून पाढे म्हणत होती, पाटीवर गणितं सोडवत होती. आणि दुसरीकडे एक वर्ग, गाणी म्हणत होता. गोखरू सोलंकी, आंदोलनाचे, पहिल्या फळीचे कार्यकर्ते, शाळेचा उंबरठा न ओलांडलेले, समोर बसून, मुलांना सांगत होते की आंदोलन म्हणजे काय. आपले हक्क कोणते आणि त्यासाठी का लढायला हवं. हे सगळं तसंच्या तसं कॅमेऱ्यात यायला हवं होतं. मी हळूच, शांतपणे त्यांच्या बाजूला जाऊन बसले. झाडाखाली. मुलांच्या समोर, गोखरू भाई च्या बाजूला. आणि कॅमेरा सुरु केला. दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल एवढा लहान माझा कॅमेरा. हळूच गोखरू भाई समोर खाली जमिनीवर रेकॉर्डर ठेवला आणि शुटींग केलं. त्या क्षणी मला तिथल्या भागात काम करायची किल्ली सापडली. साधारणपणे प्रश्नाला उत्तर असतं, मी इथं त्यांच्या उत्तराला प्रश्न विचारणं सुरु केलं आणि माझं काम एकदम सोपं झालं. संवादातून लोकांना बोलतं केलं तर फिल्म बघणारा प्रेक्षक, पण ते रस घेऊन ऐकून घेतो. नाहीतर बोजड शब्दबंबाळ माहितीचा लोंढा आला, की प्रेक्षकाची पळापळ होऊन तो आधीच दूर गेलेला असतो.

आदिवासी म्हंटले की कला ही आलीच. मग कोणी गाणारा समाज असतो, कोणी चित्र काढणारा, कोण मातीकला, बाम्बूकला करणारा तर कोणी पावा, ढोल ह्यासारखे विशेष वाद्य वाजवणारा. पण सर्व आदिवासी नाचतात. आणि तो नाच टिपणं हे फिल्मवाल्यांसाठी मेजवानी असते. त्यात पण होळी म्हंटली की रंग, उजेड-अंधार ह्यांची उधळण. त्यामुळे होळीला शूटिंग तर नक्कीच होतं, पण बऱ्याच फिल्म्स मधे असतो, तसा होळीवर फिल्म चा शेवट मला करायचा नव्हता. कारण ते फारच टिपिकल होईल. सुरुवात आणि शेवट ही फिल्म ची खरी कसोटी असते. अनेक फिल्म्स खूप रंगत जातात, पण शेवटाला मार खातात. अनेकदा फिल्म्स चा शेवट स्पष्ट असला की मधला आशय चांगला बांधता येतो. होळीचं शूट झालं, नाच, वेगवेगळी गाणी, गावांतले शॉट्स, शहरातले शॉट्स, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ह्या तिन्ही राज्यांमध्ये भटकले, शूटिंग केलं, मुलाखती घेतल्या, अजून शेवट काही सापडत नव्हता.

बुडालेले गाव

बुडालेले गाव

मोड नावाच्या नव्या वसाहतीत जाण्याचा सल्ला मेधाताईंनी दिला. नूरजी चांगलं बोलेल असं सगळेच सांगत होते. नूरजीशी बोलून, शोधत, लोकांना विचारत मोड ह्या गावी पोचलो. तिशीतला तरुण नूरजी. सगळ्या वसाहतीच्या वतीनं, सरकारी लोकांशी वाटाघाटी करत होता. त्यांना थोडा वेळ थांबायला सांगून माझ्याशी बोलायला आला, तेव्हा उन्हं चांगलीच माथ्यावर आली होती. माझी एकच काळजी होती. सूर्याकडे पाठ करून नूरजी उभा राहिला तर मागचा सगळा भाग पांढराफेक दिसेल. आणि कुठे बघ, कसं चाल हे मी सांगणार नव्हते. पण नूरजी खणखणीत बोलला, नीट प्रकाश, सावली ह्याचं भान ठेऊन, योग्य त्या दिशेला चालत, योग्य त्या गतीनं, दोन वाक्यांमध्ये योग्य ती जागा ठेवत कमाल बोलला. नूरजी सारखा हुशार माणूस, आदिवासी भागात, क्षणोक्षणी सापडतो. नूरजीची मुलाखत झाली आणि मला शेवट सापडला. नर्मदेत वाहून आलेला मोठ्ठा दगड, जेव्हा खाली वाहत वाहत येतो, तेव्हा तो गोल होत होत लहान होत जातो. तो मार खाल्लेला दगड असतो, घट्ट झालेला असतो म्हणून त्याला काही होत नाही असं नूरजी सांगत होता आणि आंदोलनाचा पस्तीस वर्षांचा काळ, मी ज्याच्याबद्दल फक्त ऐकून होते, झरझरत माझ्या मनातून फास्ट फोरवर्ड झाला.

एखाद्या दगडाला काही होत नाही, म्हणून मारत राहायचं का? एखादं झाड कुरबुर करत नाही म्हणून उपटत राहायचं का? एखादा समाज देत राहतो म्हणून घेत राहायचं का? एखादी नदी थांबत नाही म्हणून तिला बांधून घालायचं का? सगळ्याची एक मर्यादा हवीच. फिल्म कधीच संपत नाही. आपण ती थांबवतो. तशी, धरणाच्या ह्या बाजूनं जाऊन, जगातल्या सर्वात उंच मूर्तीचे शॉट्स मी घेतले आणि स्वतःला सांगितलं की आता ह्या फिल्म चं शूटिंग संपलं. पण बहुतेक ते खरं नव्हतं. फक्त चित्रीकरण म्हणजे फिल्म नव्हे. संकलन, ध्वनी, नामावली हे सगळं झालं की ती फिल्म पूर्ण होते. तशी ती झाली. एकानंतर एक, वेगवेगळ्या गावात, शहरात त्याचे अनेक प्रयोग लागले, अजून खूप लागताहेत. लोक भारावून ती बघतात, आम्हाला आंदोलनाबद्दल ही कल्पना नव्हती म्हणतात, काही भावूक पण होतात. पण नूरजीनं केलेल्या शेवटातून अजून पुढचा प्रश्न जन्मतो.

जसं पुनर्वसन जोवर होत नाही, तोवर धरण पूर्ण झालं असं म्हणता येत नाही, तसंच माझ्या फिल्म बद्दल मला वाटतं. जोवर आंदोलन सुरु असेल, तोवर ही फिल्म पूर्ण झाली असं मी मानणार नाही. इकडे मी फिल्मचे अनेक ठिकाणी प्रयोग करतेय, आणि तिकडे मेधाताई उपोषणाला बसल्यात. अनिश्चित उपोषण. मागण्या खूप सध्या आहेत. मानवी आहेत. मुख्य म्हणजे जोवर लोकांना घरं मिळत नाहीत तोवर त्यांना बुडवू नका. त्यांची जलहत्या करू नका. इतकं साधं आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर हे लाखो लोक बुडणार नाहीत ह्यासाठी मेधाताई उपोषणाला बसल्यात. शासनाच्या हट्टापुढे न नमता, आपल्या अहिंसक मार्गावर विश्वास ठेऊन, हक्कांसाठी लढण्याचा गांधींचा मार्ग. पुढे काय होणार माहित नाही, आंदोलकांच्या मागण्या मान्य होतील का माहित नाही. धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडलं जाईल का ठाऊक नाही. हे सगळं शूट करायला हवं, ह्याची पण फिल्म बनवायला हवी. कारण अजून धरण पूर्ण झालेलं नाही, पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही, आंदोलन अजून सुरूच आहे, लढा अजून उभाच आहे. त्यामुळे ही फिल्म अजून अपूर्णच आहे अशी भावना मनात सलते आहे.

शिल्पा बल्लाळ, या डॉक्युमेंटरी दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: