नसिरुद्दीन शहांचे वक्तव्य: कयास आणि विपर्यास

नसिरुद्दीन शहांचे वक्तव्य: कयास आणि विपर्यास

नसिरुद्दीन शहा यांनी तालिबानच्या रानटी आणि प्रतिगामी मूल्यांच्या संदर्भाची जोड देत प्रत्येक मुसलमानाला रिफॉर्म आणि आधुनिकतेची गरज आहे असे म्हणणे देखील काही जणांना खटकलेले आहे. तसे पाहता सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात रिफॉर्म आणि आधुनिकता यांची गरज सगळ्याच समाजाला आहे.

दानिश यांची तालिबानकडून क्रूरपणे हत्या
तालिबानला पाठिंबा द्यावा की नाही; भारतापुढे पेच
तालिबानची स्त्रियांच्या अभिनयावर बंदी

नुकतीच चित्रपट अभिनेते, नाट्यकर्मी नसिरुद्दीन शहा यांची, अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबद्दल जल्लोष व्यक्त करणाऱ्या भारतीय मुस्लिम बांधवांची कडक शब्दात निर्भत्सना करणारी, एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर या क्लिपवर तीव्र स्वरूपाच्या उलटसुलट प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये आल्या. नसिरुद्दीन शहा यांचे म्हणणे आणि त्यावरील प्रतिक्रिया यामधून काही गुंतागुंतीचे तसेच वादाचे मुद्दे अधोरेखित झाले.

सुरुवातीला नसिरुद्दीन शहा काय म्हणाले हे समजावून घेऊयात. ते म्हणाले की, “अफगाणिस्तानात परत एकदा तालिबान राजवटीचे येणे हा जगभरात काळजीचा विषय आहे. रानटी आणि क्रूर अशा तालिबानची राजवट आल्याबद्दल काही भारतीय मुस्लिमांनी जल्लोष व्यक्त करणे हे त्यापेक्षाही जास्त भयानक आहे. प्रत्येक भारतीय मुसलमानाने स्वतःला हा प्रश्न विचारावा की त्याला स्वतःच्या धर्मात रिफॉर्म आणि आधुनिकता हवी आहे की मागील शतकातली रानटी मूल्ये हवी आहेत. मी हिंदुस्तानी मुसलमान आहे आणि मिर्झा गालिब यांनी सांगितल्याप्रमाणे माझे अल्लाहशी थेट असे जिव्हाळ्याचे नाते आहे. मला सत्ताकांक्षा बाळगणाऱ्या धर्माची कसलीच गरज नाही. हिंदुस्तानी इस्लाम नेहमीच जगभरच्या इस्लामपेक्षा निराळा राहिलेला आहे. ईश्वर करो आणि त्याचे हे रूप पूर्णपणे पालटून जाण्याची वेळ न येवो.”

नसिरुद्दीन शहा यांच्या म्हणण्याचे बऱ्याच जणांनी स्वागत आणि समर्थन केले. यामध्ये जसे सुधारणावादी लोक होते तसेच उजव्या विचारसरणीचे लोकही होते. काही जणांनी,ज्यामध्ये काही लिबरल मुस्लिम धुरीणपण होते, नसिरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याबद्दल असहमती व्यक्त केली. OpIndia या उजव्या विचारांना वाहिलेल्या वेबपोर्टल वर लिहिलेल्या एका लेखात उच्चशिक्षित आणि लिबरल मुसलमान सुद्धा नसिरुद्दीन शहा यांच्या सुधारणावादी विचारांवर कसे टीका करत आहेत असा मुद्दा मांडणारा एक प्रचारकी थाटाचा लेखही छापून आला. त्यात त्यांनी सबा नक्वी, रिफात जावेद, आरफा खानम शेरवानी यांच्या ट्वीटसचे स्क्रीन शॉट्स जोडलेले दिसतात. इतरही अनेक लोकांनी नसिरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यातील काही मुद्द्यांशी असहमती व्यक्त केली किंवा आक्षेप घेतले. नसिरुद्दीन शहा हे केवळ बॉलीवूडमधील सेलिब्रिटी नसून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर गंभीरपणे विचार करणारे आणि मते मांडणारे कलावंत आहेत, ज्यामुळे त्यांचे म्हणणे विविध स्तरातल्या लोकांकडून गंभीरपणे घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबद्दलच्या असहमतीची आणि आक्षेपांची चर्चा करणे आवश्यक आहे.

पहिला मुद्दा आहे चुकीच्या सरसकटीकरणाचा आणि अन्यायकारक स्टिरीओटाईपची बळकटी करण्याचा. मुळात नसिरुद्दीन म्हणताहेत त्याप्रमाणे जल्लोष करणारे लोक अगदीच क्षुल्लक म्हणावेत इतक्या संख्येचे आहेत. त्यांचे एकंदर प्रमाण बघता ते कुठल्याही धर्मामध्ये आढळणाऱ्या टोकाची मते बाळगणाऱ्या लोकांच्या प्रमाणाइतकेच आहे असे लक्षात येईल. हल्ली ज्याप्रकारचे मुस्लिमद्वेष पसरवण्याचे वातावरणनिर्माण केले जात आहे ते पाहता या अत्यल्प लोकांच्या चुकीच्या आणि निषेधार्ह वागणुकीचे कोलित हाती घेऊन एकंदरीतच मुस्लिम लोकांबद्दल चुकीची प्रतिमा तयार करण्याचे खटाटोप केले जाणार हे स्पष्ट आहे. तसेच अशा अत्यल्प लोकांच्या कारवायांचा निषेध करण्याची एक प्रकारची सक्तीच अदृश्य पद्धतीने केली जात असल्याचे दिसून येते. सोशल मीडियाचा आणि कब्जात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून काही लोक सतत चुकीच्या परसेप्शनचा दांडपट्टा फिरवत राहणार आणि तुम्हाला नाईलाज म्हणून त्या पट्ट्याचे फटके चुकवण्यासाठी सतत माना हलवत राहावे लागणार असा हा एकूण खेळ आहे. मूठभर कडव्या लोकांचा निषेध करत असताना त्याच भरात समस्त मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजण्याचे वक्तव्य करून नसिरुद्दीन शहा एक प्रकारे या खेळात सामील झाले आणि अशा खेळाला प्रोत्साहन देते झाले असे टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात सर्वसामान्य मुस्लिमांचे मत काय असते आणि टोकाची मते बाळगणारे कसे संख्येने अत्यल्प असतात या संदर्भात Pew Research Centre (प्यू) या संस्थेने वेळोवेळी केलेल्या विविध सर्वेक्षणामधून गोळा केलेली आकडेवारी पाहणे नक्कीच उद्बोधक आहे. २०१३ मध्ये पीआरसीने जगभरातल्या ३९ मुस्लिमबहुल देशात सर्वेक्षण करून “The World’s Muslims: Religion, Politics & Society” या नावाने एक रिपोर्ट  प्रकाशित केला. या रिपोर्टचा एक महत्वाचा निष्कर्ष असा होता की या सगळ्याच देशातल्या बहुसंख्य मुस्लिमांनी वाढत्या धार्मिक कडवेपणाबद्दल काळजी व्यक्त केलेली आहे. ‘प्यू’ने २०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात केवळ सहा टक्के लोकांनी तालिबानबद्दल सहानुभूती दाखवली होती असे दिसते. या सर्वेक्षणामध्ये भारताचा समावेश नसल्यामुळे भारतातील नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी पाकिस्तानच्या आकडेवारीवरून आपण एक अंदाज नक्कीच बांधू शकतो.

अशा प्रकारे बहुसंख्य मुस्लिमांचे मत तालिबानसारख्या कडव्या संघटनांचा धिक्कार करण्याचे असतानाही अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर त्याचा निषेध करण्याची एक प्रकारची सक्ती अप्रत्यक्षपणे आणि अदृश्यपणे निर्माण केली जाणे हा एका विशिष्ट रणनीतीचा भाग आहे आणि नसिरुद्दीन शहा या रणनीतीचे शिकार झाले असे काही राजकीय जाणकारांना वाटणे स्वाभाविक आहे. नव्या तालिबान सरकारला अमेरिका, रशिया आणि चीनसारखे दिग्गज देश स्वतःच्या देशाचा स्वार्थ केंद्रस्थानी ठेवून अधिकृत मान्यता देत आहेत हे ध्यानात घेता तालिबान-धिक्कारावर आधारित राजकारण करणे किती लघुदृष्टीचे आहे हेही खरे तर लक्षात घेतले जाणे आवश्यक आहे.

नसिरुद्दीन शहा यांनी तालिबानच्या रानटी आणि प्रतिगामी मूल्यांच्या संदर्भाची जोड देत प्रत्येक मुसलमानाला रिफॉर्म आणि आधुनिकतेची गरज आहे असे म्हणणे देखील काही जणांना खटकलेले आहे. तसे पाहता सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात रिफॉर्म आणि आधुनिकता यांची गरज सगळ्याच समाजाला आहे. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर करून धर्माधारित कट्टरपणा वाढवण्यासाठी केले जाणारे खटाटोप पाहता अशा उपदेशाची गरज अनेक भारतीय समूहांना आहे हे स्पष्ट आहे. पण तालिबानचा संदर्भ देत केवळ सबंध मुस्लिम समाजाला असा उपदेश करणं हे अपुरं आहे आणि मुसलमानांचा जो एक ‘मागासलेले लोक’ असा स्टिरीओटाईप केला जातो त्याला पुष्टी देणारं आहे. न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभर कसे इस्लामी दहशतवादाचे नॅरेटिव्ह रचले गेले आणि त्यामुळे सरसकट इस्लामी संस्कृतीची आणि मुस्लिम समाजांची कशी ‘आधुनिकताविरोधी आणि जुनाट विचारांच्या विळख्यात अडकलेले’ अशी संभावना केली गेली याचा उहापोह महमूद ममदानी यांनी त्यांच्या ‘गुड मुस्लिम बॅड मुस्लिम’ या पुस्तकात केलेला आहे. आधुनिक काळातला तथाकथित इस्लामी दहशतवाद निष्पन्न होण्यास केवळ इस्लाममधील तथाकथित विपरीत घटक कारणीभूत नसून शीतयुद्ध काळात एकमेकावर कुरघोड्या करण्यासाठी महासत्तांकडून अशा घटकांचा वापर करून केले गेलेले नीतीशून्य राजकारण कारणीभूत आहे असे त्यांनी मांडले आहे. ऐंशीच्या दशकात उगम पावून नंतर सगळीकडे पसरत गेलेल्या दहशतवादाची कारणमीमांसा करताना राजकीय आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून तपासणी करणे आवश्यक आहे हे ममदानी यांचे म्हणणे महत्वाचे आहे. असे असताना त्रोटक विधाने करून प्रचलित मुस्लिमविरोधी प्रचाराला आणि शिक्केबाजीला खतपाणी घालणे चुकीचे आहे असे काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे.

प्रचंड मोठ्या मानवी समुदायाकडून धारण केल्या जाणाऱ्या कुठल्याच धर्मात मानवताविरोधी तत्वे नसतात पण प्रत्येक धर्मातील तत्वे, रूढी किंवा चिन्हे यांचा गैरवापर राजकीय कारणांसाठी तसेच सत्ताप्राप्तीसाठी केला जात असतो हे ऐतिहासिक सत्य आहे. राम या संकल्पनेचा वापर सर्वसामान्य माणसे एकमेकाला नमस्कार करण्यासाठी ‘राम राम!’ असे म्हणून करतात. त्याच संकल्पनेचा वापर, मोहम्मद इक्बाल सारखा इस्लामप्रेमी “राम हे भारताचे इमाम आहेत” असे म्हणताना, हिंदू-मुस्लिम सौहार्द्र दर्शवण्यासाठी करतो. तोच राम ‘आता कशातच काही राम राहिला नाही’ असे म्हणताना भाषेतील अर्थवहनासाठी प्रकटतो. पण हल्ली काही लोक याच रामाचा उपयोग कानठळ्या बसवणाऱ्या त्वेषपूर्ण आवाजात ‘जय श्रीराम’ नामक आरोळी ठोकून वर्चस्वाची भावना व्यक्त करण्यासाठी पण करताना दिसतात. शेवटी जो तो धर्म ज्या त्या काळातल्या तो धर्म आचरणाऱ्या लोकांच्या वकुबानुसार ज्या त्या काळातप्रकटत असतो हेच खरे.

मुसलमान समाज हा एक आधुनिकपूर्व काळात गोठला गेलेला मागास समाज आहे असा प्रचार हल्ली मुस्लिमद्वेषाची तरफ वापरून संघटन वाढविण्यासाठी होताना दिसतो. याच्यापलीकडे जाऊन या सगळ्या मागासपणाचे मूळ इस्लाममध्येच अनुस्यूत आहे असेही ठसवण्याचे प्रयत्न केले जातात. इसवी सनाचे ८ वे शतक ते ११ वे शतक अशी अडीचेकशे वर्षे इस्लामी संस्कृतीने जगाचे बौद्धिक नेतृत्व केले होते हे लक्षात घेता, असे ठसवले जाण्यातली विपरीतता ध्यानात येऊ शकते. खरं तर त्या काळात ज्ञानाच्या सगळ्याच क्षेत्रात मुस्लिम विचारवंतांनी केलेली कामगिरी अद्वितीय होती. त्या विचारवंतांनी प्लेटो आणि अरिस्टॉटल यांचं तत्वज्ञान, स्टॉईक मत आणि नव-प्लेटोमत ही दर्शनं आत्मसात केली होती. त्याच्या आधारे कुराणप्रणीत श्रद्धेला त्यांनी दार्शनिक रूप दिलं होतं. अल्जेब्राचा जनक अल ख्वारेज्मी हा वंशाने तुर्की, पर्शियन भाषेत काम करणारा आणि सध्याच्या उझबेकिस्तानातजन्मलेला विचारवंत असो की मानववंशशास्त्राचा जनक समजला जाणारा अल बिरूनी असो हे आणि यांच्यासारखे अनेक जण त्या काळात ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवी शिखरे गाठत होते. जगभरातले विविध भाषांमधले मौलिक ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित केले जात होते. इस्लामच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बांधणीत मुळातच जर दोष असते तर अशी अद्वितीय कामगिरी इस्लामच्या सुरुवातीच्या काळात होऊ शकली असती काय असा प्रश्न एखाद्या व्यक्तीला तेव्हाच पडू शकतो, जेव्हा हा सगळा पूर्वेतिहास तिला माहित असतो आणि द्वेषमूलक प्रचाराच्या धुरळ्याने तिची नजर दूषित झालेली नसते.

या संदर्भात मे. पुं. रेगे यांनी व्यक्त केलेले मत उद्धृत करणे औचित्याचे ठरेल. “मुस्लिम समाज हा एक रांगडा, धर्मांध, असंस्कृत, आततायी समाज आहे असे एक चित्र अनेक सुशिक्षित हिंदूंच्या मनात असते. सौम्य, सुसंस्कृत, समंजस मुस्लीम व्यक्ती प्रत्यक्षात आढळल्या तर नियम सिद्ध करणारे अपवाद म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. तिचे एक कारण असे की सुशिक्षित हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये सामाजिक दळणवळण जवळजवळ अजिबात नाही….भारतीय पंडितांनी जर भारतातील मुस्लिम उलेमांशी संवाद साधला असता तर त्यांचा केवळ इस्लामी तत्त्वज्ञानाशीच नव्हे तर त्याच्यामार्फत ग्रीक बौद्धिक वारशाशी संपर्क आला असता आणि भारतीय तत्वज्ञानात जे साचलेपण निर्माण झाले होते ते दूर होऊन ते प्रवाही बनले असते आणि भारतीय तत्त्वज्ञानाने जागतिक विचार मंचावर पदार्पण केले असते. एवढी मोठी इस्लामी जमात भारतात परंपरेने वसत असतानाही तिच्या बौद्धिक सांस्कृतिक संचिताशी बहुसंख्य हिंदूंनी परिचयही करून घेतला नाही हे त्यांच्या बौद्धिक दुबळेपणाचे लक्षण आहे. भारतात जर एकात्म समाज निर्माण व्हायचा असेल तर भारतीयांनी मुस्लिम सांस्कृतिक वारसा हा आपल्या सामाईक वारशाचा भाग आहे असे मानून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे असे मला वाटते.” (मे. पुं. रेगे यांचे तत्वज्ञान, पृष्ठ १९४, १९५)

नसिरुद्दीन शहा यांच्या‘हिंदुस्तानी इस्लाम कसा वेगळा आहे’या विधानाला मात्र कोणी हरकत घेतलेली दिसत नाही. ‘हिंदुस्तानी इस्लाम’ म्हणजे हिंदुस्तानी लोक आचरत असलेला इस्लाम असा अर्थ नसिरुद्दीन यांना अभिप्रेत असावा असे त्यांनी या वक्तव्यानंतर दिलेल्या मुलाखतीवरून (नसिरुद्दीनची बरखा दत्तने घेतलेली मुलाखत) दिसते. भारतातील मुसलमानांमध्ये हिंदूंप्रमाणेच जाती आहेत, भारतातील सुफी परंपरा इथल्या भक्ती परंपरेशी संयोग पावलेली आहे, इथले वेगवेगळ्या प्रांतातले मुसलमान त्या त्या प्रांतातल्या खाण्यापिण्याच्या, पेहरावाच्या आणि वागण्याच्या सवयी बाळगून आहेत यासारखे पुरावे इथल्या मुसलमानांचे खास भारतीयपण अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत.प्यूच्या (Pew Research Centre) अगदी अलीकडे जून २०२१ साली प्रकाशित झालेल्या “भारतातील धर्म: सहिष्णुता आणि विलगता” या शीर्षकाच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की कर्मसिद्धांतावर विश्वास असण्याचे प्रमाण हिंदूमध्ये जितके आहे (७७%) तितकेच मुसलमानांमध्ये (७७%) आहे आणि २७% भारतीय मुस्लिमांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे (हिंदूंमध्ये हे प्रमाण ४०% इतके आहे). कर्म आणि पुनर्जन्म या गैरइस्लामी समजुती असल्याचे लक्षात घेता सर्वेक्षणात आढळून आलेले प्रमाण लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे या सर्वेक्षणानुसार भारतीय संस्कृती ही इतर कुठल्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ८५% मुस्लिमांनी म्हटलेले आहे तर आपण भारतीय असल्याचा आभिमान बाळगत असल्याचे ९५% इतक्या मुस्लिमांनी म्हटले आहे.

सध्याच्या घुसळणीच्या तसेच सोशल मीडियामार्फत विष पसरवले जात असण्याच्या काळात कुठल्याही विधानांचे काय अर्थ काढले जातील आणि कशा प्रकारे विपर्यास केला जाईल याचा काहीच भरवसा नसतो. लोकांचे आटलेले अटेन्शन स्पॅन्स लक्षात घेऊन केली जाणारी त्रोटक विधाने सहजच अशा विपर्यासाला बळी पडू शकतात. त्यामुळे अशी विधाने करताना खबरदारी बाळगणे फारच आवश्यक झाले आहे. सतत ऐरणीवर ठेवले जात असल्याचा अनुभव घेणाऱ्या भारतीय मुसलमानांसाठी तर अशी खबरदारी जास्तच महत्वाची आहे. त्यामुळेच तुष्टीकरणाचे तोट्यातले धोरण राबवून अखेरीस वंचितताच पदरात घालणारे लोक असोत की बगलेत पितृभू आणि पुण्यभूच्या आग्रहाची सुरी बाळगत मुखाने ‘नेशनफर्स्ट’ चा नारा देणारे लोक असोत, नसिरुद्दीन शहासारख्या विचारी सेलिब्रिटीजना या सगळ्यांची राजकीय आणि तत्ववैचारिक व्यूहरचना समजावून घेत सावधगिरीने विधाने करणे भाग आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: