वर्षाऋतूतील वृक्षोत्सव

वर्षाऋतूतील वृक्षोत्सव

मृगाचा पहिला पाऊस आणि त्यामुळे दरवळणारा मृद्गंध आपल्या मनाला जसा मोहून टाकतो तसाच तो सृष्टीलाही भुरळ घालतो. पहिल्या पावसाचे थेंब मोत्यासारखे मिरवत सृष्टी नटते आणि तिथपासून पुढे हिरव्याकंच पडद्यासमोर निसर्गाच्या नेत्रसुखद नाट्याचा अंक सुरू होतो.

केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन
मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
मॉन्सूनचा उतारा

वैशाख वणव्याने काहिली झालेली पृथ्वी, उन्हाने आणि उकाड्याने वैतागलेले जीव मेघराजाला आर्त साद घालतात आणि तोही धरित्रीला ह्या जाचातून सोडवण्यासाठी हजर होतो! भारतीय उपखंडाला लाभलेलं हे ‘पावसाळा’ ह्या ऋतूचं वरदान खरंच अलौकिक आहे.

‘पावसाळा’ हा ऋतू आवडत नसेल असा माणूस सापडणं कठीणच!

तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच पावसाळ्यात हिरव्यागार झालेल्या निसर्गाच्या कुशीत फेरफटका मारून यायला आवडतं. मृगाचा पहिला पाऊस आणि त्यामुळे दरवळणारा मृद्गंध आपल्या मनाला जसा मोहून टाकतो तसाच तो सृष्टीलाही भुरळ घालतो. पहिल्या पावसाचे थेंब मोत्यासारखे मिरवत सृष्टी नटते आणि तिथपासून पुढे हिरव्याकंच पडद्यासमोर निसर्गाच्या नेत्रसुखद नाट्याचा अंक सुरू होतो.

आपण सारे, पशुपक्षी, झाडं-झुडुपं, कीटकवर्ग सगळे सगळे आनंदतात आणि आपापल्या पद्धतीने पावसाळ्याचं स्वागत करू लागतात.

दुरंगी बाभूळ (Dichrostachys cinerea) छायाचित्र - जे. एम. गर्ग

दुरंगी बाभूळ (Dichrostachys cinerea) छायाचित्र – जे. एम. गर्ग

आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या कळून येतं, की आपल्या साऱ्या सृष्टीसाठी वृक्षवल्ली ह्या पाठीच्या कण्यासारख्या आहेत. पशुपक्षी, इतर सर्व जीवजंतू आणि आपण मनुष्यप्राणी सारेच जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे वृक्षवल्लींवर अवलंबून असतो. ह्या वृक्षवल्लींना पावसाळ्यात जो साज चढतो त्याकडे जर आपण डोळसपणे पाहिलं तर त्या आपल्याला खूप काही सांगत असतात. त्यांच्या अंगाखांद्यावर फुलं, फळं, कोवळ्या पालवीसह आनंदाने खेळू लागतात. आपल्याला सुगंध आणि रानमेवा देतात, अगदी निस्वार्थ भावनेने. त्यांना आपण ह्या पावसाळ्यात जर जाणून घेतलं तर आपली आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट होईल, नाही का?

चला तर ! जाणून घेऊया आपल्या काही वृक्षमित्रांना आणि पावसाळ्यात त्यांच्यात घडून येणाऱ्या सुंदर बदलांना..

पारिजातक (Nyctanthes arbor-tristis)

प्राजक्त

प्राजक्त

मराठी साहित्यात अनेक कलाकृतींच्या मर्मस्थानी असलेलं हे फूल आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आणि अनुभवलेलं असेल. त्याचं लोभस रूप आणि तितकाच मोहक सुगंध साक्षात श्रीकृष्णालाही प्रिय आहे. तो सुगंध, ६-७ शुभ्र पाकळ्या आणि एखाद्या गोजिऱ्या लहानगीने टिकली लावावी तसा मध्यभागी देठाचा शेंदरी रंग हे प्राजक्ताच्या फुलाचं वर्णन! ह्या झाडाखाली पावसाळ्याच्या

महिन्यांमध्ये हमखास फुलांचा सडा पडलेला असतो आणि हे आपल्याला कोणी सांगावं लागत नाही. ते झाडंच आपल्याला सुगंधावर स्वार करून तिथवर घेऊन येतं. केवळ फुलंच नाही तर ह्या झाडाची साल, स्पर्शाला किंचित खरखरीत पानं आणि साधारण एक रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराची चपटी फळं हे सारं ताप, संधिवात, खोकला, स्त्रियांमधील वंध्यत्व, पोटदुखी इ. विकारात औषधी आहे.

चंदन (Santalum album) छायाचित्र - विनयराज

चंदन (Santalum album) छायाचित्र – विनयराज

बाभूळ (Acacia nilotica)

दातांच्या आरोग्याचा विषय निघाला, की आपण सगळ्यांनीच आजी आजोबांकडून बाभळीच्या काड्या दंतमंजनासाठी पूर्वी वापरल्या जात असल्याचं ऐकलं असेल.

हीच ती बाभळ ! आपण रक्षाबंधनाला पारंपरिक राखीमध्ये एकच गोंडा असलेली राखी पाहिली असेल. ह्या बाभळीचं फूल अगदी नेमकं त्यातल्या पिवळ्या गोंड्यासारखं दिसतं. ह्या फुलाला सुगंध नसतो. एखाद्या मण्यांची घट्ट ओवलेली माळ असावी तशी त्यांना पुढे जाऊन शेंग येते. लहान आणि एका देठाच्या दोन्ही बाजूला समांतर अशी बारीक संयुक्त पानांची रांगच इथे आपल्याला बघायला मिळते. ह्या झाडाला भेटायला जाताना मात्र थोडीशी सावधगिरी बाळगावी लागते, कारण हे झाड जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी काटे बाळगून असतं. ह्या झाडाच्या डिंकाचेही अनेक औषधी उपयोग आहेत. पुढच्यावेळी डिंकाचे चविष्ट लाडू खाताना ह्या झाडाची नक्की आठवण काढा, कारण ते डिंकही ह्याच बाभळीच्या भावंडांनी आपल्याला दिलेलं असतं !

दुरंगी बाभूळ (Dichrostachys cinerea)

आपण वर ज्या बाभळीबद्दल बोललो, तिचंच भावंडं म्हणजे ही दुरंगी बाभूळ. ह्या दोन्ही वनस्पती लाजाळूच्या कुटुंबातील आहेत. बाभळीपेक्षा उंचीने कमी असलेल्या ह्या झाडाचा पर्णसंभार काहीसा बाभळीसारखाच असतो. काटेही तसेच असतात. शेंगा मात्र काहीशा वळलेल्या आणि कमी दाटीवाटीने बिया घेऊन येतात. मुख्य फरक म्हणजे फुलं! पूर्ण फुललेली दुरंगी बाभूळ पाहणं हे अतिशय नेत्रसुखद असतं. हिच्या फुलाचा देठाकडचा भाग गुलाबी तर टोकाकडचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. फूल जसजसं उमलत जातं तसतसा गुलाबी भाग पांढरा पडत जातो. अशी ही गुलाबी – पिवळी मुलायम तंतुमय फुलं संपूर्ण झाडावर इवल्याशा कंदिलांप्रमाणे लटकून झाडाची शोभा वाढवतात. ह्या झाडाचे काही भाग त्वचा, मूत्रपिंड, यकृत, पोट आदींच्या विकारांवर गुणकारी आहेत.

चंदन (Santalum album)

चंदन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन देवपूजेचा प्रसंग उभा राहतो. चंदनाची उटी सर्व देवतांनाच काय तर आपल्यालाही प्रिय असते. उगाळलेलं चंदनाचं लाकूड सुगंधाने मनाला थंडावा देतंच, पण ते स्पर्शाला आणि प्रकृतीलाही शीतल असतं. अत्तरं, उदबत्त्या, सौंदर्यप्रसाधनं, औषधं इ. मध्ये चंदनाच्या लाकडाचा आणि त्यापासून काढलेल्या तेलाचा वापर होतो. पण मित्रांनो, ह्या चंदनाच्या फुला-फळांना विसरून कसं चालेल? पावसाळा सुरू होताच चंदनाच्या झाडांना लालचुटुक फुलं येतात आणि पुढे त्याला लहान करवंदाएवढी चकाकणारी काळी फळं धरतात. ही गोड फळं पक्ष्यांना जणू मेजवानी असते. पानं चकाकत्या हिरव्या रंगाची आणि खालच्या बाजूने पांढुरकी असतात. विशेष म्हणजे लहानपणी चंदनाची झाडं परजीवी असतात. ती शेजारच्या झाडाच्या मुळांपासून जीवनरस मिळवतात. तर आता चंदनाच्या झाडाला भेटायला जाताना अधिक व्यापक दृष्टीने बघणार ना?

चिंच (Tamarindus indica)

चिंच (Tamarindus indica) छायाचित्र - सई गिरधारी

चिंच (Tamarindus indica) छायाचित्र – सई गिरधारी

चिंच ! विषय निघाला तरी तोंडाला पाणी सुटतं ना? पण मित्रांनो ह्या चिंचेच्या फुलांकडे ह्यापुढे नक्की निरखून पहा. ‘हे फुल सुंदर फुलांच्या आपल्या डोक्यातल्या यादीत का नाही?’ असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. झुपकेदार समूहात येणारं हे नाजूक फूल, त्याच्या खाली झुकणाऱ्या तीन पांढऱ्या पाकळ्या, उभ्या तीन पाकळ्यांवरची नाजूक लाल- जांभळ्या रंगाची नक्षी आणि मोराच्या तुऱ्याप्रमाणे छानसे पुंकेसर लेवून दिमाखात उभं असतं. चिंचेची पानंही चवीला आंबटसर असल्याने रुचकर लागतात. ही लहान आकाराची लंबगोलाकार पानं लहान देठाच्या दोन्ही बाजूला समांतर अशी येऊन मोठ्या देठावर संयुक्तपणे तयार होतात. ह्या चिंचेचे स्वयंपाकातले उपयोग तर सांगायलाच नकोत, शिवाय अनेक वैद्यकीय उपयोगदेखील आहेत. ह्या झाडाच्या भागांचा वापर पोटदुखी, मलेरिया, मधुमेह आणि इ. अनेक विकारांवर होतो.

मित्रांनो, ही आणि अशी अनेक झाडं आपल्याला त्यांच्या वागण्यातून काही सांगत असतात. आपल्या सभोवतालच्या वातावरणात होत असलेला बदल, ग्लोबल वॉर्मिंग ह्या समस्या काही आपल्यासाठी नवीन नाहीत. पण निसर्ग आपल्याला हे सगळं झाडांच्यामार्फत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. झाडं ही नुसती आरसा नाहीत तर भविष्यवेत्ती सुद्धा आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या झाडातल्या बदलांचं आणि प्रजननाचं चक्र आपण अभ्यासलं तर आगामी काळात निसर्गसंवर्धनासाठी किती तातडीने आणि कुठल्या उपाययोजना करता येतील ह्याचं गणित बांधता येऊ शकतं.

‘आपण अभ्यासलं तर?’ होय! घाबरून जाऊ नका. आपण सगळेच सीझनवॉचच्या माध्यमातून ह्या कार्याला हातभार लावू शकतो. सीझनवॉच हा एक सामान्य नागरिकांना शास्त्रज्ञाच्या भूमिकेत शिरण्याची संधी देणारा प्रकल्प आहे. आपण आपल्या सभोवताली दृष्टीस पडणाऱ्या झाडांची जी माहिती ह्या ॲपमध्ये नोंदवतो तिचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्न योग्य दिशेला नेण्यासाठी होतो.

ह्याच प्रयत्नांना स्पर्धात्मक स्वरूप देऊन वृक्षनिरीक्षणातली रंगत वाढवण्यासाठी सीझनवॉचतर्फे १५ ते ३१ ऑगस्टच्या दरम्यान ‘ऑगस्ट ट्री फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये प्रत्येक आठवड्यात १०० निरीक्षणं नोंदवणे आणि सीझनवॉचवर उपलब्ध असलेल्या फायकसच्या (उदा. वड, पिंपळ, उंबर, इ.) ५ पैकी किमान २ प्रजातींच्या १० झाडांची निरीक्षणं नोंदवणे अशा आव्हानांमधून विजेते निवडून त्यांना बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. ह्या वृक्षोत्सवाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी https://www.seasonwatch.in/event/august-tree-festival-2022/ ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

ॐकार काणे, वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरणाचे आब्यासाक आहेत.

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0