चिगा (सुगरण)

चिगा (सुगरण)

'सुगरण' दिसायला 'चिमणी' सारखीच. पोटाशी पांढरट रंग. चोच थोडीशी जाड. शेपूट आखूड. डोक्यावर पिवळी पिसं. विणीच्या काळात विविध रंगछटा दिसू लागत. पिवळ्या रंगानं माखून गेलेली नर-मादी नवरा-नवरी सारखी शोभून दिसतात. त्यांच्या चिट् चिट् चिट् या आवाजानं सगळा परिसर आनंदून जायचा.

स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन
गुपित महाधनेशाचे
धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

‘इंद्रायणी’ नदीच्या उगमाजवळची पळसाची झाडं, ‘सुगरण’ पक्षाला माहेराहून मिळालेल्या वस्तूंसारखीच आंदण म्हणून मिळालेली. पावसाळी दिवसात या पाखरांचा आवाज नदीतील पाण्यासारखाच ओसंडून वाहतो.  त्यांच्या आवाजानं नदीसह इंद्रायणी माळालाही नवीनता मिळालेली. पळसाची झाडं मूठभर मांस चढल्यासारखीच मान ताठ करून सगळा परिसर एका दृष्टीक्षेपात सामावून घेतात. या झाडांच्या फांदीला सुगरणीची घरटी झुलू लागत. गवताच्या पात्यापासून विणलेली घरटी पाहून मनातला मोर केकावल्या देत नाचत राहायचा. जशी फुलांभोवती फुलपाखरे भिरभिरतात. तसा मी सुद्धा या घरट्याभोवती रेंगाळत असे. चातकाचं पावसाशी असलेलं नातं एकजीव असतं. तशी सुगरणीची पळापळ रानगवताशी एकरूप होते.

‘सुगरण’ दिसायला ‘चिमणी’ सारखीच. पोटाशी पांढरट रंग. चोच थोडीशी जाड. शेपूट आखूड. डोक्यावर पिवळी पिसं. विणीच्या काळात विविध रंगछटा दिसू लागत. पिवळ्या रंगानं माखून गेलेली नर-मादी नवरा-नवरी सारखी शोभून दिसतात. त्यांच्या चिट् चिट् चिट् या आवाजानं सगळा परिसर आनंदून जायचा. माळाच्या पोटाला वाढलेली काटेरी झाडं या पाखरांना घरट्यासाठी जागा पुरवित. बाभूळ, बोर ही झाडं जणू त्यांच्याच मालकीची. कडुलिंब, शेवरी, पळस, विजेच्या तारा, विहीरीच्या काठावरती झाडं या जागाही त्यांच्या आवडीच्या. नारळाच्या झाडावरची त्यांची घरटी अन्  त्यातून डोकावणारी पिलं दाराआड लपणाऱ्या मुलांसारखीच! रानावनात दिसणारी सुगरण गावालगतच्या झाडांवरही सुखानं संसार थाटते. नव्यानं शहरात गेलेल्या एखाद्या जोडप्यासारखी.

नवी पहाट नवा अनुभव घेऊन जन्मास येते. तशी सुगरण मानवी जीवनात डोकावते. विणीच्या काळात सौंदर्याचं लेणं पांघरलेली सुगरण घरातल्या सुगरणीपेक्षा वेगळी कधीच नसते. तिच्या पसंतीला उतरलेलं घरटं इवलूशा चोचीने विणायला सुरूवात करते. बाहेर कितीही बरबटलं तरी स्वतःच्या घराभोवती शेणामातीनं सारवून घेणाऱ्या माय-लेकी सुगरणीच्या वारसदार ठरतात असं मला वाटतं. कारण सुगरण घरट्याजवळच्या किड्या- मुंग्यांना फस्त करून पिलांसाठी आरोग्यदायी अंगण बागडायला मोकळं करून देते.

जसं ‘पीटर स्कॉट’ या पक्षी शास्त्रज्ञानं रानबदकाची अप्रतिम रेखाटने चितारली आहेत. तसं इंद्रायणी माळावर सुगरणीची आणि पळसमैनेची रेखाटने काढता येतात. पावसाळा ‘सुगरण’ पक्ष्यांच्या विणीचा हंगाम. काटेरी झाडासह पळसाच्या झाडावरही या पाखरांची घरटी झुलू लागत तेव्हा कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांच्या सुगरणविषयक कवितेची आठवण येते. काही पळसाच्या फांदीला दोन मजली घरटी (खोपा) वाऱ्यावर हेलकावे घेताना पाहायला मिळतात. काही गावात जशी जुळी भावंडं जन्माला येतात तसंच इथं दुमजली घरटी पाहणं खूप आनंददायी असतं. झाडाचा मांडव हळद लागलेल्या सुगरणीला जागा पुरवितो. तिची पिलं या मांडवाच्या आश्रयानं वाढलेली. पंखात बळ आलेल्या पिलांना लहानपणीची आठवणीची पत्रं येत असतील का ?

मला या पाखरांनी भूरळ घातलेली. त्यांची शेकडो घरटी अनुभवली. घरट्यासाठी लागणारं गवत इथं मुबलक मिळतं. काही मीटर परिसरात एखादी सुगरण किंवा अनेक सुगरणी यांनी गवतावर हक्क सांगितलेला. जवळच्या झाडाला घरटी विणत. गवत खुडताना मानेला हिसका देत. एका पात्याचे दोन भाग करून घेऊन जात. घरट्याचं निरिक्षण करताना ‘तिची इलूशीच चोच, तेच दात तेच ओठ’ या ओळी आठवायच्या. मी काही सुगरण पक्ष्याला नावंही दिलेली. ती फक्त त्यांच्या विणीच्या हंगामापुरतीच. प्रसिद्ध लेखक ‘दत्ता मोरसे’ यांनी ‘झुंड’ कादंबरीत जशी रानगव्यांना नावे दिली आहेत.

सायंकाळची वेळ. सुगरणी जणू गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या स्त्रियाच वाटत. त्यांची लगबग किती वाढलेली! गवताची पाती भरभर घेऊन जात. काही सुगरणी उसाच्या शेतात भटकत. उसाची पाती गवतापेक्षाही लांब असत. त्या पात्यावर बसून चोचीत लहानसा भाग घेऊन हवेत भरारी घेत. तशी उसाची पाती धागा उसवल्यासारखंच उसवत जायची. तेव्हा ही सुगरण ठिपकेवाली मनोलीच वाटते. मला वाटतं गवताच्या पात्याला हा एक पर्याय असावा. उसाच्या शेतातून गेलेल्या विजेच्या ताराला लटकलेली घरटी पाहून आश्चर्य वाटतं. त्या घरट्यासाठी फक्त उसाच्या पात्याचाच वापर केला जाई. तारेला गाठ मारणे किती अवघड! घरट्याचा पांढरट रंग हिरवट होत जातो. कारण वरची बाजू वाळत चाललेली.

अर्धवट विणलेल्या घरट्यातून सुगरण वयात आलेल्या मुलीसारखी चोरून पाहते. खरं तर तो नर असतो. अनेक सुगरणी (मादी) घोळक्याने येत असत. त्या नरासह घरट्याचाही स्वीकार करत. पक्षी विज्ञानातील हा स्वयंवर सोहळाच म्हणावा लागेल. जिथं नर निवडण्याचं स्वातंत्र्य मादीला असतं. ‘कांडीमार’, ‘लांडोर’, ‘चाष’ अशा पक्ष्यांच्या विणीच्या हंगामातील नोंदी खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या अर्धवट विणलेल्या घरट्यातून डोकावणारा नर कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करायचो. वाढलेल्या गवतात लपून त्याच्यावर नजर भिरकावली आणि त्याचा फोटो घेतला. त्यासाठी दोन तासाची मेहनत घ्यावी लागली.

सुगरण पक्ष्याला ‘पिवळी चिमणी’ म्हणूनही ओळखले जाते. लोहारा गावातील निसर्गप्रेमी शेतकरी ‘श्री विठ्ठलराव गणपतराव जाधव’ यांनी या पक्ष्याला ‘चिगा’ हे नाव दिलेलं. हे नाव ऐकून नवल वाटलं. विचारांचा भाला खूप दूरपर्यंत फेकूनही अचूक ठिकाणी पोहोचलाच नाही. चिट् चिट् चिट् या आवाजाचा अपभ्रंश होऊन ‘चिगा’ असं ऐकू येत असावं असं मला वाटतं. परंतु ते लहानपणापासून ‘चिग्याचा खोपा’ म्हणूनच ओळखतात.

मी अगोदर म्हटल्याप्रमाणं काही सुगरण पक्ष्याला नावंही दिलेली. एकाच झाडावर घरटी विणणाऱ्या ‘सगुणा’ आणि ‘निर्गुणा’ पाहून कुतूहल आणि उत्सुकता शिगेला पोहोचत असे. त्यांच्या मनातील विकार कृतीतून डोकावत असत. निर्गुणा सगुणाच्या घरट्यातील गवताची पाती ओढुन स्वतःच्या घरट्याला लावीत असे. ही एक प्रकारची चोरीच होती. पण दाद कुणाकडं मागायची? रानपाखरं एकटी राहू लागली की, शिकारी पक्ष्यांचा धोका वाढतो.

काही झाडावरची अर्धवट अवस्थेतील घरटी पाहून अस्वस्थ होतं. विणकाम करणाऱ्या पक्ष्यांचा अंत, जोडीदार न मिळाल्यामुळे पदरी आलेली निराशा, बहुपत्नी विवाहाची तयारी, नैसर्गिक संकटे का अजून काही? ती घरटी त्यांच्यासारखीच एकटी राहतात.

जशी घरटी विणताना तिची घाई असायची. तशीच पिलांना भरवताना सुद्धा. पण पिलं पाहता येत नाहीत. काही दिवसांनी घरट्याच्या वरच्या बाजूने छिद्र पाडून पिलं बाहेर येत असावीत का? पिलं घरट्यातून बाहेर पडली की, सुगरणीचा रंग फिकट होत जातो. ‘चिमणी’ आणि ‘सुगरण’ सारख्या दिसू लागत. त्यांच्या आवाजामुळे सहज ओळखता येतात.

प्रसिद्ध लेखक ‘उत्तम कांबळे’ यांची काही पुस्तके वाचण्यात आली. एका पुस्तकात सुगरण पक्ष्याविषयीचा ‘शोपिस’ नावाचा लेख माणसाच्या मागासलेपणाचा दाखला देतो. या गोजिरवाण्या पाखरांची घरटी विकत घेऊन बंगल्यात लटकून ठेवायची. त्या माणसांच्या सुंदरतेच्या कल्पनेची कीव येते. शेणातल्या भुंग्यांसारखी यांची डोकी असतात. उत्तम कांबळे सरांचे खूप आभार. त्यांनी या विषयाला वाचा फोडली.

जपानी लेखक ‘ताजीमा शिंजी’ यांची अंतर्मुख करणारी ‘गॉडीचा महासागर’ नावाची कथा खूप आवडली. खरंतर ही एक रूपक कथाच. त्या कथेतील गॉडी कासवाचा आणि माशाचा संवाद सांगणं महत्त्वाचं वाटतं.

“माणसाची कातडी आणि केस सोलून बाजारात चप्पल, ड्रम, दोऱ्या करून विकल्या तर? त्यांच्या लहान-लहान मुलांचे कोवळे, लुसलुशीत मांस आणि म्हाताऱ्यांच्या हाडांचे सूप केले तर…. कसे वाटेल रे ! त्यांतही स्त्री आणि पुरुषांचे वेगळे, वेगळे, वजनानुसार…”

सुगरणीची घरटी विकत घेणाऱ्या माणसांना ही रूपक कथा वाचून दाखवावी वाटते. जसा गॉडी कासवाच्या मनात विचार येतो. तसाच विचार सुगरणीच्या मनातही येत असेलच. मूठभर मास असणाऱ्या रानपाखरांचा कोण विचार करतय ? चिमण्या मारणाऱ्या चीनला नव्यानं चिमण्या विकत घ्याव्या लागल्या हे सर्वश्रुत आहेच.

सुगरण आणि शेतकरी यांचं खूप जवळचं नातं असतं. पिकावर किड आली की, सुगरणी मदतीला येतात. विहिरीच्या काठावर वाढलेल्या बोरीबाभळीवर उतरतात. पिकाचं होणारं नुकसान त्या कशा पाहू शकतील. मला मान्य आहे की, सुगरणीसारखे पक्षी पिकाचं १० टक्के नुकसान करत असतील. परंतु किटक, आळ्या यांच्यामुळं होणारं ५० टक्के नुकसान थांबतं. रानातल्या खोपीला कणसं बांधणारा शेतकरी रानपाखरावर तेवढीच माया करतो. सुगरण पिवळी दिसू लागली की, शेतकऱ्याला पिवळ्या अंगानं सासरी जाणारी मुलगी आठवते.

“मंदिरात अनेक लहान-मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या टांगलेल्या घंटा किणकिणत असाव्यात तशी सुगरणीची घरटी झाडांवर लटकलेली दिसतात.” असं पक्षीनिरीक्षक ‘विद्याधर म्हैसकर’ यांनी लिहून ठेवलय. त्यांच्या ‘पक्षितीर्थ’ या पुस्तकात “खोपा तिने बांधला” या लेखात सुगरणीविषयी सविस्तर वाचायला मिळतं.

परभणीचे पक्षिमित्र ‘उल्हास घन’ यांनी काढलेली सुगरण पक्ष्यांची क्रमवार छायाचित्र पाहायला मिळतात. घरट्यासाठी गवताची निवड करताना, पाती घेऊन जाताना, विणकाम करताना काढलेले फोटो पाहून प्राणीशास्त्रज्ञ ‘जॉय ॲडमसन’ यांनी काढलेल्या रंगीत चित्रांची आठवण येते. ते रंगीत चित्र ‘नैरोबी’ येथील संग्रहालयाची शोभा वाढवितात. तसं ‘उल्हास घन’ यांनी काढलेले फोटो अनेकांच्या घराची शोभा वाढवितात. त्या फोटोची विक्री करून आलेल्या पैशातून अंध मुलीसाठी साहित्य खरेदी करतात. उत्तम पुस्तक आणि उत्तम माणसांची ओळख करून देणं हे खूप अवघड असतं.पण या माणसांमुळे पक्षीविज्ञान समृद्ध होतय.

हिवाळ्यात हरभऱ्याच्या शेतात उतरणार्‍या सुगरणी चिमणीसारख्याच दिसतात. त्यांचा गळा आणि पंखांचं दुर्बिणीतून निरीक्षण केल्यावर त्याच्यातलं वेगळेपण जाणवतं. या वेळीसुद्धा ती थव्यानं वावरते. जशी काही काळासाठी झाडावर झुंबरासारखी सुंदर दिसणारी वस्ती असायची. नव्हे ते नव्यानं वसलेलं गाव असायचं. एखाद्या छावणीसारखं. तात्पुरत्या स्वरूपाचं.

सुगरणीच्या घरात तिच्याशिवाय बाईमाणूस दुसरं कोणी नसतं. दिवस भरत आले की, तिच्याही हालचाली मंदावतात. ती स्वतःचं बाळंतपण स्वतः करते. अंडी उबवते. पिलांना भरवते. मानवी जीवन आणि पाखरांचे जीवन यात साम्यपणा असतोच. तो डोळसपणे अनुभवता येतो. ‘धनेश’ पक्ष्याची मादी स्वतःला ढोलीत कोंडून घेते. काही महिने ती बंदिवासात राहते. नर तिला रसाळ फळं खाऊ घालतो. एखाद्या पुरुषासारखीच. पाखरांचे भावविश्व मानवी जीवनात संक्रमण होताना पाहायला मिळते.

विद्यापीठ परिसरात विहिरीच्या काठावर वाढलेल्या कडुलिंबाच्या झाडावर ४१ घरटी पाहायला मिळाली. जणू महानगरातील वस्तीच! तिथं चोरीचं प्रमाणही अधिक होतं. अगदी शहरातल्या सारखच. ती घरटी वेगवेगळ्या टप्प्यावर होती. सात घरट्यांचं विणकाम अर्धवट झालेलं. बाकीची घरटी पूर्णत्वास गेलेली. कडुलिंबाशेजारी काही टाकळणीची झाडं विस्तारलेली. माळावर जशी दुमजली घरटी दिसायची. कुतूहल वाटायचं. परंतू या झाडांवर आगळं-वेगळं घरटं अनुभवता आलं. दोन घरट्याचं मिळून एकच घरटं विणलेलं. स्वतंत्र दोन प्रवेशद्वार असलेलं. आतमध्ये स्वतंत्र समोरासमोर दोन खोल्यांची जागा. सुगरण आणि तिची पिलं त्या बंगल्यात मोकळा श्वास घ्यायची. एखाद्या कॉलनीत कुणाचंतरी घर टुमदार दिसावं. अगदी तसंच दृश्य या सुगरणीच्या कॉलनीत पाहायला मिळत होतं.

काही सुगरणी विणकामात गुंतलेल्या. काही पिलांना भरविण्यासाठी हिरव्या रंगाच्या अळ्या घेऊन येत. जवळच्या झाडावर उतरत. काही वेळानंतर ती घरट्यात प्रवेश करी. इतरांचा किती गलका असायचा ! कधी-कधी वाटायचं नळावर भांडणार्‍या स्त्रिया तर नव्हे ! तासन्तास गवतात बसून त्यांच्या आवाजाचा अभ्यास करावा वाटे.

जवळच्या झाडावर विसावलेल्या दोन सुगरणी किती हळुवार बोलत! पंखांची उघडझाप करणाऱ्या सुगरणीचा आवाज वाढत चाललेला. चोरी करणाऱ्या सुगरणीला पाहून किती त्वेषानं पाठलाग करायची! तिचा आवाज प्रचंड वाढलेला. रागात आलेल्या माणसासारखाच. बाळाला खाऊ घेऊन येणाऱ्या सुगरणीच्या आवाजातील प्रेमळपणा स्पष्ट जाणवायचा. सहसा तिला कुणी अडथळा करत नसे. पदराआड बाळाला अमृत पाजणार्‍या माय-माऊलीसारखा. लहानपणापासून मामाच्या गावाला जावसं वाटे. अगदी तसंच या सुगरणीच्या गावाला दररोज भेट द्यावी वाटे. ‘संतोष मारकळ’ या मित्रालाही पाखरांच्या गावाचा लळा लागलेला. तो दररोज सुगरणीच्या झाडाला निरखून पाहत असे. त्याची पाखरांविषयीची तळमळ लपून राहत नसे. तो रानपाखराबद्दल भरभरून बोलत असे. त्याच्या मनातील सुगरणीविषयची ओढ झाडांच्या मूळ्यासारखीच पसरत जावी.

विणीचा हंगाम संपल्यानंतर काही घरट्यांचं निरीक्षण केलं. जिथं सुगरण पिलांना भरवते त्याच्या वरच्या बाजूला थोडासा चिखल वाळलेला चिकटून होता. त्यावर कीटक अडकलेले. त्याचं उत्तर मिळालं नाही. सुगरणी ती वस्ती सोडून कधीच निघून गेलेल्या. त्यांची पिलंही मोठी झालेली. नव्या जोड्या, नवा संसार पाहण्यासाठी पुन्हा एकदा पावसाची वाट पहात घराकडे वळालो. पण या रानपाखराचे विचार उसळी घेऊन मनात डोकावत.

अंगावर भंडारा उधळून घेणाऱ्या सुगरणीला पाहण्यासाठी माझ्या डोळ्यातील सगळी घाण निघून जाऊ दे. तिच्या घरट्याला गवताची काडी-काडी मिळू दे. हर एक घरट्यातून पिलांचा चिवचिवाट कानी पडू दे. तिच्या बाळासाठी झाडांच्या फांद्या अंगण होऊन रांगण्यासाठी मिळू दे. आकाश कवेत घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ येवू दे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ही घरटी पाहण्यासाठी, माझे पाय आपोआप रानवाटेकडे वळू दे. हे ईश्वरा एवढं दान पदरात टाक.

माणिक प्रल्हादबुवा पुरी, हे परभणी येथील पक्षी अभ्यासक आहेत. NatureNotes

(ही मालिकानेचर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनद्वारे राबवलेल्यानेचर कम्युनिकेशन्सया प्रकल्पाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0