शेहलाबाबतचा वृत्तांत पक्षपाती: एनबीडीएसएद्वारे झी न्यूजची कानउघाडणी

शेहलाबाबतचा वृत्तांत पक्षपाती: एनबीडीएसएद्वारे झी न्यूजची कानउघाडणी

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थिनी शेहला राशीद यांच्याबाबत, ३० नोव्हेंबर २०२० रोजी झी न्यूजवर प्रसारित वृत्तांत, नि:पक्षपाती न

पक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र
अल्पवयीन लैंगिक शोषणः नागपूर खंडपीठाचा निर्णय रद्द
‘आवश्यक सर्व झाडे कापली’

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थिनी शेहला राशीद यांच्याबाबत, ३० नोव्हेंबर २०२० रोजी झी न्यूजवर प्रसारित वृत्तांत, नि:पक्षपाती नव्हता आणि या वृत्तांताच्या माध्यमातून केवळ एका पक्षाची बाजू मांडण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टॅण्डर्ड्स अॅथोरिटीने (एनबीडीएसए) काढला आहे. झी न्यूजची वेबसाइट, यूट्यूब चॅनल्स व अन्य सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हा वृत्तांत हटवण्याचे निर्देश एनबीडीएसएने झी न्यूजला दिले आहेत, असे लाइव्हलॉच्या बातमीत म्हटले आहे.

३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजता प्रसारित झालेल्या या वृत्तांबाबत शेहला यांनी तक्रार नोंदवली होती. या वृत्तांतात शेहला यांच्या वडिलांची मुलाखत दाखवण्यात आली होती आणि त्यांनीशेहला, त्यांची आई आणि बहिणीवर आरोप केले होते. शेहला दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या कारवायांमध्ये गुंतल्याचा असल्याचा आरोपही यामध्ये केला गेला होता.

या वृत्तांतात शेहला यांच्या वडिलांनी तिच्यावर केलेले आरोप दाखवून वाहिनीने प्रकरणाची केवळ एक बाजू सर्वांपुढे आणली, असे एनबीडीएसएने ३१ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. प्रसारणकर्त्यांनी तक्रारदाराची (शेहला) बाजू जाणून घेण्यासाठी प्रसारणापूर्वी कोणताही प्रयत्न केलेला नाही. केवळ शेहला यांनी हे आरोप नाकारल्याचा उल्लेख वृत्तांतात करण्यात आला आहे. अशा पद्धतीने केवळ एक बाजू मांडणे पुरेसे नाही, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एनबीडीएसएचे अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) ए. के. सीकरी म्हणाले, “तक्रारदाराच्या (शेहला) वडिलांनी तिच्यावर लावलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीला जेएनयूशी संबंधित फुटेज दाखवण्याची काहीच आवश्यकता नव्हती. शेहला राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत असे हा कार्यक्रम बघून कोणालाही वाटेल.”

झी न्यूजला दिलेल्या आदेशामध्ये एनबीडीएसएने म्हटले आहे- एकंदर सरसकटीकरणावर आधारित असलेल्या वृत्तांतामध्ये नि:पक्षपातीपणाच्या आचारसंहितेचे तसेच प्रसारण मानकांचे उल्लंघन झाले आहे असे प्राधिकरणाचे मत आहे. प्रसारणकर्त्यांनी भविष्यकाळात अशा प्रकारचे वृत्तांत प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ देऊ नये.

मात्र, प्राधिकरणाने केवळ प्रसारणकर्त्यांना ताकीद देऊन सोडून दिले हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शेहला राशीद यांनी दिली आहे. प्राधिकरणाने प्रसारणकर्त्यांना सार्वजनिक माफी मागण्याचे किंवा भरपाई देण्याचे आदेश देणे आवश्यक होते, असेही त्या म्हणाल्या.

“हा वृत्तांत एकतर्फी व पक्षपाती आहे या निष्कर्षावर प्राधिकरण आले असेल, तर त्यांनी वाहिनीला माफी मागण्यास न सांगणे आश्चर्यकारक आहे. हे प्रसारण माझी मानहानी करणारे होते हे प्राधिकरणाला मान्य आहे. झी न्यूजने हे वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माझ्याशी संपर्कही साधलेला नाही,” असे शेहला यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

“आज देशात स्वायत्त समजल्या जाणाऱ्या यंत्रणांची ही स्थिती आहे. लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई करण्यास या यंत्रणा कचरत आहेत. माझ्या आयुष्यावर या बातम्यांचा खूप वाईट परिणाम झाला आहे. मला करिअरमधील अनेक संधी अशा बनावट बातम्यांमुळे गमावाव्या लागल्या आहेत. माझ्या आरोग्यावरही याचा परिणाम झाला आहे,” असेही शेहला यांनी नमूद केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0