जगदीश धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड

जगदीश धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड

नवी दिल्लीः देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार जगदीश धनखड हे शनिवारी निवडून आले. त्यांनी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा सहज पराभव केला. धनखड यांना एकूण ५२८ मते मिळाली तर अल्वा यांना १८२ मते मिळाली. येत्या ११ ऑगस्टला धनखड मावळते उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतील.

शनिवारी सकाळी उपराष्ट्रपतीपदाची मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७२५ मते पडली होती. यातील धनखड यांनी ५२८ मते (७२.८ टक्के), अल्वा यांनी १८२ मते (२५.१ टक्के) व १५ मते (२.१ टक्के) बाद म्हणून नोंदली गेली. विविध पक्षाचे ५५ सदस्य अनुपस्थित होते. यात तृणमूलचे ३४, भाजप-समाजवादी पार्टी व शिवसेनेचे प्रत्येकी दोन व बसपाच्या एका सदस्याचा समावेश होता.

या मतदानाला तृणमूल काँग्रेसने गैरहजर राहण्याचा पहिल्यापासून निर्णय घेतला होता. आमच्याशी चर्चा न करतात उमेदवार निवडल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे विरोधकांमध्ये मोठी फूट पडली होती.

धनखड यांना एनडीए आघाडीतील पक्षांव्यतिरिक्त जनता दल (संयुक्त), वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, अण्णाद्रमुक व शिवसेना आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता.

अल्वा यांना काँग्रेसव्यतिरिक्त आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, तेलंगण राष्ट्र समितीने पाठिंबा दिला होता.

COMMENTS