सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्याला पर्याय नाही: डॉ. मुलीयील

सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्याला पर्याय नाही: डॉ. मुलीयील

डॉ. जयप्रकाश मुलीयील हे देशातील नावाजलेले साथरोगतज्ञ असून पूर्वी वेल्लोर मेडिकल कॉलेजचे प्रमूख होते. त्यांनी अनेक वर्ष संसर्गजन्य रोगांवर काम केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian council of Medical Research)च्या सल्लागारपदी ते कार्यरत राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची सोमेश झा यांनी घेतलेली मुलाखत.

कोरोनावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गुणकारी नाही : रिपोर्ट
न्यू यॉर्क टाइम्समध्ये सुमारे लाख कोरोना मृतांची यादी
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती

– २१ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने पुढील उपाय योजनांचा आराखडा तयार करावा असे सरकारला वाटते. या पुढील टप्प्यातील आपली कार्यपद्धाती कशी असावी?

निव्वळ लक्षणे असणाऱ्या अधिकाधिक रुग्णांची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केल्याने विषाणूचा प्रसार रोखणे शक्य नाही त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्याचा मुद्दा निकालात निघतो. यानंतर काय करता येऊ शकते? काही प्रमाणात समाजात लोकांना रोगाची लागण होत राहणार आणि जे आजारी पडतील त्यांना सरकारला वैद्यकिय सेवा देत रहावी लागणार, हे आपण मान्य करायला हवे.  पण यात एक मेख आहे. ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता उपलब्ध हॉस्पिटल्समध्ये आपल्याला सर्व रुग्णांवर उपचार करणे अशक्य आहे.

या परिस्थितीत काय करता येऊ शकते? २००९ मध्ये एच वन इंफ्ल्यूएन्झाची साथ आली. २,३ महिने राहिली आणि अचानक निघून गेली. त्यावेळी आपण ज्या काही उपाय योजना केल्या त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. अचानक निघून गेलेल्या साथीमागचे कारण काय असावे? रोगाच्या प्रसारामुळे लोकांमध्ये सामुहिक प्रतिकारशक्ती तयार झाली. याही विषाणूमुळे अशा प्रकारची  सामुहिक प्रतिकारशक्ती तयार होईल अशी आपल्याला आशा आहे. परंतु दुर्दैवाने ही सामुहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किती टक्के लोकाना करोना विषाणूची लागण झाली पाहिजे, हे आपल्याला माहित नाही. समजा आपण ही टक्केवारी ५० ते ६०% आहे असे गृहीत धरले, तरी यासाठी यंत्रणांकडून अचूक आकडेवारी मिळणे आवश्यक आहे. ती न मिळाल्यास अनोळखी शत्रूशी युद्धात लढणे कठीण आहे. तसेच सामुहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी ६०% लोकाना रोगाची लागण होणे गरजेचे आहे, असे मानले तरी त्यातील किती लोकांना यादरम्यान आपला जीव गमवावा लागेल?

या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण लोकांमध्ये याचे स्वरूप सौम्य आहे तर ६० वर्षावरील लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. भारताच्या लोकसंख्येतील १२.५% जनता ही ५५ वर्षांच्या वरील आहे आणि ८७.५% लोकं ही तरुण वर्गात मोडतात. समजा ५५ वर्षांच्यावरील वृद्धांची विशेष काळजी घेऊन तरुण वर्गात याचा प्रसार सौम्य स्वरूपात होऊ दिला तर सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवता येऊ शकते. अनेक लोकांची गर्दी टाळून, विलगीकरणाची पथ्य पाळून, उधोगधंदे आणि शेतीची कामे सुरु करता येऊ शकतात; तोपर्यंत तरुण लोक आजारातून बाहेर आलेली असतील. सामुहिक प्रतिकारशक्ती वाढून तिने विशिष्ट पातळी गाठली की समाज सुरक्षित होईल आणि त्यावेळी साथ कमी झाल्याचे आपण म्हणू शकू.

निव्वळ सामुहिक प्रतिकारशक्तीवर अवलंबून राहून साथीचे नियंत्रण करणे शासनाला शक्य आहे का?

दूसरा काही उपाय आहे का? असल्यास जरूर सुचवावा

साउथ कोरिया सारख्या देशांनी तपासण्याची संख्या वाढवली, त्याबद्दल काही…

एका तपासणीसाठीची किंमत ४५०० आहे. रुग्ण आणि निरोगी अशा सगल्याना तपासायचे ठरवले तरी १३० कोटी लोकांची  तपासणी कसे शक्य आहे? आपण सर्वानी एक लक्षात घ्यायला हवे. आपल्याला आवडो अथवा न आवडो, कितीही तपासण्या केल्या तरी समाजात रोगाची लागण होत राहणार, बहुतांश लोकांना कोरोनाची सौम्य लागण आत्ताही झालेली आहे.

युनायटेड किंगडमने  सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवून साथीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही. याबद्दल तुमचे मत काय?

लोकांची ये जा जितकी अधिक तितका रोगाचा प्रसार अधिक. सामान्यत: रोगांच्या साथी कशा पसरतात हे आपण समजून घेतले पाहिजे. जेव्हा एखाद्या नवीन विषाणूची साथ पसरते, त्याविरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये प्रतिकारशक्ती नसते. ती हळूहळू तयार होऊ लागते. यातील बहुतेक लोकांना रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे त्यांना विलग करणे शक्य नसते. रोगप्रतिकारशक्ती तयार झालेल्या लोकांची संख्या एका विशिष्ट पातळीला जाऊन पोहोचली, की विषाणूच्या वाढीला अटकाव बसतो. अर्थात ही पातळी प्रत्येक विषाणूसाठी वेगवेगली असते. गोवरच्या बाबतीत ९०% लोकांना लसीकरण होणे गरजेचे असते. इंफ्ल्यूएन्झाच्या बाबतीत हा आकडा ४०% आहे. ही प्रतिकारक्षमता तयार होण्याचा वेग वाढवून रोगाचा प्रसार कमी केला पाहिजे जेणेकरून आपण रुगनाना अधिक प्रभावीपणे उपचार देऊ शकू आणि मृत्युची संख्या कमी करू शकू.

भारतात जागेचा अभाव असताना वृद्ध लोकांना तरुणांपासून सुरक्षित ठेवणे कसे शक्य आहे?

आपल्याला वृद्ध व्यक्तींना एकमेकांपासून फ़क्त २ मीटर लांब ठेवायचे आहे. हे करूनही कदाचित त्यांना लागण होइल पण आपण त्याची शक्यता कमी करत आहोत. झोपड़पट्ट्यामध्ये अडचण जाणवू शकते पण तिथे वृद्ध व्यक्तींचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

कोरोनाबाधितांचा चढ़ता आलेख थोड़ा सपाट करणे आणि वैद्यकीय साधनाच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे हे लॉकडाऊन करण्यामागचे प्रमुख उद्देश होते. तुमच्या मते याचा उपयोग झाला आहे का?

काही लोकांच्या सल्ल्यानुसार ३ आठवडयासाठी ही पद्धत आपण आजमावून पाहिली. या कालावधीत कोरोना विषाणू, त्यापासून रक्षण कसे करावे आणि विलगीकरणाच्या महत्वाविषयी लोकांचे प्रबोधन झाले. या तीन आठवडयात आपण लोकशिक्षण करू शकलो आहोत. पण जेव्हा लोक एका ठिकाणाहून दुसरया ठिकाणी प्रवास करू लागतील, तेव्हा हा विषाणू परत डोक वर काढणार. याला इलाज नाही. आपण या भीतीने चंद्रावर पळ काढू शकत नाही. लोकांनी आपल्या वागणूकीवर नियंत्रण ठेवूनच याचा प्रसार रोखू शकतो.

– लॉकडाऊन जेव्हा संपेल तेव्हा लोकांचे वर्तन कसे असावे?

लॉककडाऊन नंतर रुग्णांची संख्या वाढेल. आपल्याला त्यांना सेवा द्यावी लागेल. व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असला तरी ऑक्सीजन देऊन काही प्रमाणात आपण उपचार देऊ शकतो. आपली आरोग्य यंत्रणा अमेरिकेएवढी सक्षम नाही. आपल्याकडे व्हेंटीलेटर्स वापरण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित व्यक्तींची कमतरता आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात आपल्याला अड़चण येणार आहे. रोगाची समाजात पसरलेली भीती आपल्या कामात अडचणी निर्माण करत आहे. ५५ वर्षाच्या खालच्या लोकांमध्ये रोगाचे स्वरूप सौम्य आहे. त्यामधील काहींचा दुर्दैवी मृत्यू होइल पण त्याची तक्कीवारी कमी असेल. घरातील वृद्धाची काळजी घ्या, विलगीकरणाचे नियम पाळा .

तुम्हाला असे म्हणायाचे आहे का, की हे लॉकडाऊन त्वरित उठवले पाहिजे आणि लोकांनी त्यांचे पूर्वीचे व्यवहार होते तसे सुरु केले पाहिजेत?

मी तुम्हाला ठोबळ आराखडा सांगितला. आपण बसमध्ये पूर्वीसारखीच गर्दी करणार का, आपण क्रिकेट सामने आयोजित करू शकतो का? सर्व व्यवहारांचा वेग आपल्याला मंद करावा लागेल. कोरोनाची लागण लोकांना होतच राहणार हे आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. विषाणूचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे दिवस गेले. आपली सगळी भिस्त ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर आहे आणि हे करताना आपल्याला वृद्धांचे मृत्यू आटोक्यात ठेवायचे आहेत.

हा लेख ६ एप्रिलला Business Standard मध्ये आला होता. त्याचा हा मराठी अनुवाद.   

अनुवाद- चारुता गोखले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0