सुधीर बेडेकर :  निस्पृह क्रांतिकारी विचारवंत

सुधीर बेडेकर :  निस्पृह क्रांतिकारी विचारवंत

सुधीर बेडेकरांची माझी प्रत्यक्ष भेट झाली १९८० च्या सुरुवातीला. मुंबईहून माझी बदली पुण्यात झाल्यावर. तत्पूर्वी मार्क्सवादाशी माझी ओळख दोन वर्षांची तर ‘

राणे कार्ड खेळून शिवसेनेला चेकमेट 
९ हजार कोटींची जलयुक्त शिवार योजना कोरडीच
राहुल गांधी स्पायवेअरच्या संभाव्य लक्ष्यस्थानी

सुधीर बेडेकरांची माझी प्रत्यक्ष भेट झाली १९८० च्या सुरुवातीला. मुंबईहून माझी बदली पुण्यात झाल्यावर. तत्पूर्वी मार्क्सवादाशी माझी ओळख दोन वर्षांची तर ‘तात्पर्य’शी एकदीड वर्षाची. ‘तात्पर्य’ माझा दृष्टिकोन पार मुळापासून बदलून टाकत होते! पत्ता बदल करण्यासाठी संपादक सुधीर बेडेकरांना फोन केला. ‘या एकदा भेटायला’ म्हणाले. गेलो. नंतर गेली ४२ वर्षे मी आणि विनया त्याला भेटत राहिलो. सुधीर व मी एकत्र काम आणि वैचारिक देवघेव करत राहिलो. २४ मार्चला सकाळी, त्याच्या मृत्यूपूर्वी २०-२२ तास आधी, अगदी शेवटची भेट झाली तोवर.

तो माझ्याहून दहा वर्षांनी मोठा, पण त्याचा आग्रह आणि ‘मागोवा’ गटाची संस्कृती यामुळे पहिल्या भेटीपासून त्याला अरे-तुरे म्हणू लागलो. मला आनंद झाला एक ‘गुरू’, मित्र-मार्गदर्शक मिळाल्याचा.  विविध धर्म आणि विचार, समाज आणि संस्कृती, तात्त्विक-‘आत्मिक’ तसेच जीवनविषयक प्रश्न यांची उत्तरे शोधायला मार्क्स विचारच मदत करू शकतो हे तोवर मला स्पष्ट होऊ लागले होते. पण ते समग्रपणे आणि खोलवर कसे होऊ शकते, ते किती सर्जनशीलपणे आणि वैज्ञानिक शिस्तीने होऊ शकते याचे पहिले सुंदर दर्शन सुधीरने घडवले. त्यालाही आनंद झाला आणखी एक असा रस असलेला युवक मिळाल्याचा!

‘मार्क्स इन हिज ओन वर्ड्स,’ हे अफलातून पुस्तक त्याने माझ्या हातात ठेवले आणि मग काय? युवा मार्क्सच्या ‘क्लिष्ट’-तात्त्विक लिखाणापासून ते जगातले क्रांतिकारक, विचारवंत आणि विविध ज्ञानशाखा यामध्ये बुडून जाण्याचा नादच मला लागला. दुसरीकडे, मासिकाची बरीच कामे तो पुरूषोत्तम पानसेच्या मदतीने स्वत: करे. बॅंकेनंतर वेळ मिळेल तशी मी मदत करत असे. तिथे माझे मासिक, प्रकाशन व सामाजिक कार्य याचे सुरुवातीचे प्रशिक्षणही होत गेले. या कामामुळे महाराष्ट्रभरचे डावे-पुरोगामी वाचक-लेखक-साहित्यिक-विचारवंत-कार्यकर्ते-सहानुभूतीदार यांचे नेटवर्क माझ्या समोर एकदम खुले झाले. पुढे पुस्तक लिहिणे, शिबिरे संयोजन व मांडणी करणे याचेही पहिले प्रशिक्षण मिळाले.

मार्क्सवादी विचारवंत आणि समीक्षक दि के बेडेकर यांचा मुलगा म्हणून काही एक दृष्टी आणि वैचारिक वारसा सुधीरला मिळाला. पण दि कें च्या योगदानाबरोबरच त्यांच्या वैचारिक-राजकीय मांडणीतील कच्चे दुवेही पाहू शकणारी आणि आणखी पुढे जाणारी मार्क्सवादी दृष्टी त्याने स्वत: विकसित केली. जगभरात १९२० नंतर – विशेषत: लेनिननंतर – १९५० पर्यंत मार्क्सवादाची एक यांत्रिक व आर्थिक-नियतिवादी संकल्पना प्रभावी होती. यात समाजबदल आणि क्रांती हे ‘सरळरेषीय प्रगती’ मानले जाई. विज्ञान-तत्त्वज्ञानाबाबतची समजही प्रचलित पध्दतीची असे.

डी. डी. कोसंबी, दि.  के.  बेडेकर आदी मंडळी इतिहास, समाजविचार, धर्म-तत्त्वज्ञान व विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य आणि कला इत्यादी अंगांनी मार्क्सवादाची वेगळी मांडणी करू लागले होते. याच काळात एकीकडे सोविएत समाजवादी रचनेत घडणार्‍या घटनांनी भारतात व जगात अस्वस्थता होती. तोवरच्या भांडवली चौकटीतील ‘कल्याणकारी राज्या’बाबत भ्रमनिरास होऊन असंतोषही निर्माण होऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर १९६८ मध्ये युरोप-अमेरिकेसह जगभर युवकांचे आणि कामगारांचे उठाव झाले. दुसरीकडे आपापल्या प्रवाहातील प्रस्थापितांविरुध्द आपल्या देशात, महाराष्ट्रात दलित पॅंथर, युक्रांद आणि मागोवा हे ‘उठाव’ घडले.

‘मागोवा’ गटात शहरी, उच्चशिक्षित, उच्च व कनिष्ठ मध्यमवर्गीय युवा सहभागी होते. तसेच शहादा चळवळीमध्ये [धुळे जिल्हा],‘श्रमिक संघटने’त यांच्याशिवाय आदिवासी शेतकरी-शेतमजूर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते. यात लोकशाही व सामूहिक कार्यपध्दती आणि प्रेम व सहकार्य यावर आधारित नवी संस्कृती उभी करण्याविषयी विविध प्रयोग आणि प्रयत्न झाले. ‘मागोवा’ गटाचे अंतर्गत व बाहेर ट्रॉट्स्की[त्रोत्स्की]वादी व एम एल म्हणजे नक्सलबारी उठावानंतर उदयाला आलेला प्रवाह यांच्याशी वैचारिक-राजकीय लढाई होत असे. ही जुळणी आणि लढाई करण्यात सुधीरचा पुढाकार असे.

मार्क्स विचाराची नवी मांडणी करणारा दुसरा टप्पा साधारण १९५० – ६०  ते १९८० – ९० चा.  महाराष्ट्रात हा दृष्टीकोन व व्यवहार घडवण्याचे काम मागोवाने व सुधीरने केले. भांडवली अर्थवादाची पायाभूत समीक्षा आणि इतिहासाची भौतिकवादी व द्वंद्वात्मक मीमांसा पध्दती, मार्क्सविचाराचा मानुष व सर्जनशील गाभा हे पुढे आणले. सांस्कृतिक घटक व मानवी जाणिवेचे महत्त्व, प्रचलित  विज्ञान-तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान व कल्पनाप्रणाली याविषयी नवी मांडणी  केली.  वंश, जात, लिंगभाव, पर्यावरण या पैलूंचे वर्गीयतेशी असलेले जैव नाते शोधले जाऊ लागले.

‘मागोवा’ गट, मासिक व प्रकाशन तसेच नंतर ‘तात्पर्य’ मासिक यांनी १९७० पासून पुढे सुमारे दोन दशके सर्व डाव्या म्हणजे सीपीएम, सीपीआय, लानिप, शेकाप, विविध एमएल गट, सुट्या-स्वतंत्र डाव्या व्यक्ती एवढेच नव्हे तर आंबेडकरवादी आणि लोकशाही समाजवादी यांच्यात चैतन्य निर्माण केले. महाराष्ट्राच्या वैचारिक-सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात एक नवा जीव भरला. महाराष्ट्रात तसेच देशपातळीवर आणि केवळ युवा पिढीमध्ये नव्हे तर बुजुर्ग मंडळींमध्ये सुधीर बेडेकर या तरूण मार्क्सवादी विचारवंताचा एक दबदबा तयार झाला.

सुधीरने व चित्राने परिचय-विवाह केला आणि त्यांनी अत्यंत जाणिवपूर्वक जात आणि वर्ग यांना ओलांडून हे नाते  जोडले. चित्राने विज्ञान संशोधकाची नोकरी सोडून लेखन, अनुवाद आणि सुधीरच्या कामाला तसेच शांतता व विज्ञान चळवळीला मदत करण्याचे काम केले. तिचे लेखन-अनुवाद यामध्ये स्वाभाविकपणे सुधीरचेही सहकार्य होते.

‘मागोवा गटा’चे आणीबाणीनंतर डाव्या चळवळीतच पण चार दिशांनी विसर्जन झाले – सुधीरसह अनेक कार्यकर्ते हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात [सीपीएम] वा त्याबरोबर गेले, काहींनी श्रमिक मुक्ती दल ही नवी संघटना उभी केली, अगदी मोजक्या व्यक्ती लाल निशाण पक्षात गेल्या आणि बरेचसे लोक बाहेर स्वतंत्रपणे कार्यरत राहिले. पहिल्या टप्प्यातील म्हणजे यांत्रिक मार्क्सवादी विचारसरणी आणि संघटनात्मक कार्यपध्दती याची छाया आणि काही छटा सुधीरमध्ये होत्या असा मित्रांचा-सहकार्‍यांचा आक्षेपही होता! सुधीरने पुढे ‘तात्पर्य’ मासिकाच्या आणि समाज विज्ञान अकादमीच्या माध्यमातून डावे प्रबोधनकार्य जारी ठेवले.

सुधीरने प्रथमपासून दलित पॅंथर-नामदेव ढसाळ, युक्रांद-गांधीवादी आणि विविध पुरोगामी विचारवंत व प्रवाह यांच्याशी वैचारिक-सांस्कृतिक व व्यवहारातही सतत संवाद ठेवला व देवघेव केली. नारायण सुर्वे, बाबुराव  बागूल, गं.  बा. सरदार, अ. रा. कामत, नलिनी पंडित, रा. प. नेने, सुलभा ब्रह्मे, एन. डी. पाटील, राम  बापट, रावसाहेब कसबे, शांताराम गरूड, मोईन शाकीर, छाया दातार, सुहास परांजपे, कुमार शिराळकर, अनंत फडके, गेल ऑम्वेट, भारत पाटणकर आदि मंडळी तसेच कम्युनिस्ट पक्षांचे व समाजवादी वर्तुळातील नेते-विचारवंत आणि अकादमिक अभ्यासक यांच्याशी सुधीरचे विशेष नाते असे.

सुधीरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे योग्य व्यक्तीशी संवाद करून तिला पूर्णवेळ कार्यकर्ता बनवणे. यात अनेकांना संस्था-संघटनांच्या माध्यमातून वा वैयक्तिकपणे आर्थिक आधारही तो उपलब्ध करून देत असे. मी बॅंकेतील नोकरी सोडून १९८३ पासून पूर्णवेळ सामाजिक कार्यात आलो ते सुधीरच्या प्रोत्साहनामुळेच.

महाराष्ट्राच्या डाव्या-पुरोगामी वैचारिक-सांस्कृतिक जीवनात सुधीरचे योगदान हे निवडक अशा उंचीचे. सुधीर स्वत: शिबिरे,अभ्यासवर्ग आणि कार्यकर्ते यांच्यात रमत असे. जाहीर कार्यक्रम तो टाळत असे. साध्या राहणीचा त्याचा आटापिटा असे आणि वैयक्तिक व सामाजिक-राजकीय जीवनात त्याने अखेरपर्यंत तत्त्वनिष्ठा टिकवली. दिखाऊपणा व उथळपणाविषयी त्याला तिटकारा होता. पण हे तो अत्यंत सौम्य रीतीने व्यक्त करत असे. विचारात व्यापकतेचे प्रगल्भ भान असले तरी व्यवहारात त्याच्या काटेकोरपणाचे व तत्त्वनिष्ठेचे रूपांतर काहीवेळा संकुचितपणामध्ये होई. पण मुळात ‘प्रेम आणि क्रांती’ यावर ‘मागोवा’चा आणि त्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे चळवळीत कुठेकुठे आढळून येणारी औपचारिकता,‘करीअरिस्ट’ वृत्ती आणि द्वेषबुध्दी हे त्याला आवडत नसे.

विज्ञान तसेच सांस्कृतिक चळवळीबाबत सुधीरला अतिशय आस्था होती. लोकविज्ञान संघटना आणि ‘भारत ज्ञान विज्ञान समिती’ यांच्या स्थापनेत त्याचा सहभाग व अनेक प्रकारे मदत होती.अनेक प्रकारच्या संस्थात्मक कामाला उदा., ग्रामीण व वंचित भागात शाळा, आरोग्य व अन्य विकास व्यवस्था उभी करणे इत्यादीला तो मदत करत असे. स्वत:ची वैयक्तिक साधने व मालमत्ता ही चळवळीसाठीच उपयोगी पडावी अशीच त्याची इच्छा असे.

सुधीरची दोन पुस्तके प्रसिध्द आहेत–‘हजार हातांचा ऑक्टोपस’ आणि ‘विज्ञान, कला आणि क्रांती’.  त्याने काही पुस्तिका लिहिल्या, अनुवाद केले. पण मार्क्स व मार्क्सवादाची नवी मांडणी यावर त्याचे पुस्तक वा स्वतंत्र लिखाण नाही. ‘मागोवा’ गटाचे कार्य व दस्तावेज, मासिकांमधील त्याचे लिखाण, शिबीर/अभ्यासवर्ग यातील मांडणी, संस्था व चळवळी यांमधील त्याचा दृष्टीकोन व व्यवहार आणि कार्यकर्ते-संघटना-अन्य विचारप्रवाह यांच्याशी झालेले त्याचे संवाद आणि वाद, मार्गदर्शन आणि उपक्रम यातून ते उलगडते. त्यामुळे आता तातडीने त्याचे सर्व महत्त्वपूर्ण लिखाण हे लेख-संग्रह रूपात प्रकाशित होणे आवश्यक आहे.

जगाने १९९० च्या आसपास एक नवी कलाटणी घेतली. सोविएत गट आणि समाजवादी व्यवस्था कोसळली, नवउदार जागतिकीकरण गतिमान झाले. भांडवलाचे संरचनात्मक आणि पर्यावरणीय अरिष्ट तीव्र झाले. नवी आव्हाने समोर येऊ लागली. सामाजिक-राजकीय जीवनात क्रांतिकारी दृष्टी व कार्य याविषयीची तळमळ तसेच डाव्या चळवळीचा दीर्घकालीन विचार हे काहीसे मंदावत चाललेले पाहून तो अतिशय व्यथित होत होता. अशावेळी मार्क्सवादाची आणखी एक – तिसर्‍या टप्प्याची – फेरमांडणी होणे गरजेचे बनले. पण नेमके इथे ‘तात्पर्य’ मासिक बंद झालेले. सुधीर कमी क्रियाशील राहीलेला. त्याच्याकडून असंख्य लोकांची असलेली वैचारिक-राजकीय योगदानाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. हे कार्य पुढे नेणे आणि त्याचे लेखन प्रसिध्द करणे हीच त्याला आदरांजली ठरेल.

दत्ता देसाई, हे लेखक आणि विचारवंत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: