‘पटेली’ – नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र

‘पटेली’ – नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र

मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वातावरणामध्ये आपले प्रतिबिंब शोधू पाहणाऱ्या अविनाश उषा वसंत या लेखकाला मुंबई एखाद्या पात्रासारखी भेटते. मंटो, भाऊ पाध्ये, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून भेटणारी मुंबईच्या चाळींची प्रतिसंस्कृती ‘पटेली’मध्ये वास्तववादी वळण घेते. आपल्या मूळ स्वभावातूनच प्रस्थापितांना विरोध करणाऱ्या आणि बहुजन सौंदर्यशास्त्राची तळी उचलणारी ही प्रतिसंस्कृती फार वर्षांनी पुन्हा वाचकांसमोर आली आहे.

जम्मू-काश्मीर: पीएम केअर फंडातील १६५ व्हेंटिलेटर खराब
‘वेलकम होम’ : प्लेस आणि स्पेसचा विचार
निवडणूक आयोगाची ममता बॅनर्जींना २४ तास प्रचारबंदी

ज्ञानेश्वर-तुकाराम-चक्रधर वगैरे लोकांचे ग्रंथ मी मन लावून वाचले. सगळं सातेकशे वर्षे जुनं, पण परत वाचावंसं वाटतं. अन नवं एकदासुद्धा वाचवत नाही. ही काय भानगड आहे?”

– अशोक शहाणे, आजचे मराठी वाङ्मय, परिस्थिती आणि इलाज, भारूड १९६५

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये भक्ती चळ्वळीनंतरची एक नवी क्रांती महानगरीय लेखकांनी घडवून आणली. मराठी लेखकांना नव्याने तयार होणाऱ्या शहरांमध्ये आलेल्या तुटकपणा आणि बकाल आधुनिकतेच्या अनुभवातून अस्तित्ववादाकडे जाण्यास प्रवृत्त केले. मुंबईत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडली. महाराष्ट्राच्या अनेक लहान-सहान गावांमधून, वेगवेगळ्या संस्कृतीमधून एका मोठ्या शहरात होणारे स्थलांतर, गिरणी कामगारांची वस्ती आणि चाळ संस्कृती यातून साहित्यातही त्याचे पडसाद उमटले. लघु नियतकालिकांची चळवळ चालवणारे लोक याचे सर्वात संस्‍मरणीय उदाहरण ठरवत. भाऊ पाध्ये यांची ‘वासूनाका’ म्हणजे पुण्यातील एका रुढ साहित्यिक वर्तुळाबाहेर लिहिणाऱ्या माणसाने आपल्या लेखनात मुंबईची स्थानिक भाषा आणि तरुणांकडे आपसूकच चालून येणारा अस्तित्ववाद जसाच्या तसा कादंबरीत उतरवण्याची घटना होती. याने तत्कालीन तथाकथित सारस्वतांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकातील शिव्यांची संख्या मोजून अग्रलेख लिहिले. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या अस्तित्ववादी लेखकांच्या नव्या पिढीत वर अनेक आघात केले. नावानिशी त्यांचा शेलक्या विशेषणांनी समाचार घेतला. पण मराठी साहित्याने आपली कूस बदलली होती. फक्त प्रेम कथा आणि विवाह यांच्या जंजाळात घुसलेल्या मराठी साहित्याने या तरुणांच्या कामातून नवा श्वास घेतला. “साहित्य हे फक्त साहित्यासाठी नसते त्याने जीवनाचे अभिसरण प्रवाहित व्हावे” अशी भूमिका या लेखकांच्या लिखाणात होती. सआदत हसन मंटो यांच्यानंतर पहिल्यांदाच मुंबई शहरातही खरेखुरे चित्रण मराठी साहित्यात उमटले. लोकांनी या साहित्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि मराठी साहित्याचा अस्तित्ववाद आतील प्रवास द्रुतगती वेगाने सुरू झाला मराठी त्यानंतर अशा अस्तित्ववादी लेखनाची चलती सुरू झाली आणि नंतर अशा कादंबऱ्यांची रिघच लागली.

हे आठवण्याचं कारण म्हणजे हे चळवळीतील बंडखोर तरुण एकेकाळी ज्या पायऱ्यांवर बसून भेटायचे, बोलायचे, त्याच पायऱ्यांवर ‘पटेली’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन झाले. लेखक अविनाश उषा वसंत यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिलेली, किंवा तेव्हापासून संपादित करत असणारी ही कादंबरी आपले मुंबईचा चाळींमधील एका मेटालँग्वेजशी, नव्या भाषेची अभिव्यक्ती आहे. या भाषेमध्ये बम्बईया म्हणजे मुंबईत आलेल्या देशातील आणि जगातील विविध समाजांचे अनेक शब्द एकवटून कामगार वर्गाची नवी भाषा तयार झाली. त्या भाषेत सर्वांना सामावून घेण्याच्या मेल्टिंग पॉट संस्कृतीचा अविर्भाव होता. मुंबई शहराच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीला हीच भाषा रोजच्या जगण्यात उपयोगी होती. तिथलाच हा शब्द ‘पटेली’. पटेल समुदायाच्या व्यापार-उद्यम करणाऱ्या लोकांच्या चतुरपणाला किंवा कावेबाज दगलबाजीला उद्देशून हा शब्द वापरला जातो.

या शब्दामागचा अर्थच सामान्य कामगार वर्गातील लोकांसाठी एका वर्गातून वरच्या वर्गात जाण्यासाठी असणारी धडपड व्यक्त करतो. काहीही करून वर्गसंघर्षात सरशी करण्यासाठी उलटसुलट मार्ग अवलंबून धडपड करणाऱ्या चाळीतल्या तरुणांची ही रोजची शर्यत असते. क्लास मोबिलायजेशन किंवा वर्गस्थानांतराच्या प्रक्रियेत नव्याने तयार झालेले नव-उदारमतवादी मार्ग उपलब्ध झालेले असताना कादंबरीचा नायक समुद्र अशाच पोस्ट-फोर्डीझम व्यवस्थेतील आयटी क्षेत्रात कामाला आहे. अशी व्यवस्था जी माणसाच्या व्यक्तित्वातील मूलगामी जीवनमूल्यांपासून त्याला दुरावत नेऊन एका अत्यंत छोट्या प्रक्रियेचा भाग बनवते. या hyper- specialisation ने येणारं एकाकीपण आणि तुटकपणा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. आणि येथे विशेषत्वाने मेटामोरफॉसिसच्या कामावर जाता न येणाऱ्या नायकाचे आणि त्यामागोमाग नायकाची जाणीव तापसणाऱ्या बिट जनरेशनचे संदर्भ येतात.

जॅक केरूएक आणि अमेरिकेतील ६०च्या दशकातील समकालीन लेखकांनी युद्धोत्तर काळात रूढ संदर्भ आणि भाषेची प्रचंड तोडफोड केली. या काळातील संगीत, साहित्य, कविता, शिल्प अशा सगळ्याच सांस्कृतिक परिघात त्याचा प्रचंड प्रभाव पडला. रूढ संदर्भ नाकारून नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र बनवणाऱ्या या पिढीला बिट जनरेशन असे संबोधले जाते. अविनाश यांच्या कवितेतून बिट जनरेशनची ठळक वैशिष्ट्ये दिसून येतातच, तसाच त्याचा प्रभाव कादंबरीवरही आहे. तुंबलेल्या युरोपिय मूल्यांना धक्का लावून स्थानिक अमेरिकन मूलनिवासी, अश्वेत वर्ग आणि दडपल्या गेलेल्या विविध समूहांच्या नजरेतून बिट जनरेशनच्या लेखकांनी आपला वाङ्मयीन इतिहास मांडला. पुढे नावारूपास येऊन जगभर पसरलेली हिप्पी चळवळ यातूनच समोर आली. फक्त सांस्कृतिक नव्हे तर समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीवरही त्यांच्या साहित्याचा प्रभाव पडला. जगभरातील घडामोडींनी व्यथित झालेल्या आणि बदलत्या विस्तारत्या जगाचा अर्थ लावू पाहणाऱ्या गोंधळलेल्या तरुणाईला बिट जनरेशनच्या गाण्यांनी आणि पात्रांनी स्वतःची ओळख दिली. पटेली त्याच नेणिवेतून आपला मार्ग शोधत जाते.

कादंबरीमधून आधुनिकतावादी मूल्यांचे अनेक संदर्भ जागोजागी आढळतात. मराठीच्या आणि पर्यायाने मुंबईच्या वाङ्मयीन इतिहासाचे हे संदर्भ एकेक करून व्यवस्थितपणे कादंबरीत उलगडत जातात. टी. एस. इलियट यांनी मांडलेल्या साहित्याच्या सलग परंपरेशी तुकाराम ते सत्तरीच्या दशकातील मराठी कवींपर्यंत ही सलग परंपरा येऊन पोहोचते. यामध्ये मुंबईत सुरु झालेल्या या लघुनियतकालिकांच्या आणि अनियतकालिकांच्या चळवळीचे, काही उत्तराधुनिक कवी व नव्या सिनेमाचे संदर्भ येत राहतात. एकीकडे अभिजन मानल्या गेलेल्या मराठी साहित्याचा परंपरेशी समांतर अशी तरुणांची वेगळी साहित्यिक परंपरा चालवणाऱ्या या लेखकांची वीण व त्याचे विश्लेषण घट्ट ओवत समुद्र हा नायक कादंबरीतील आपले डिजिटल क्रांती झाल्यानंतरचे जीवन जगत असतो. म्हणून कादंबरीत फक्त घटना घडत नाहीत, त्यांच्या एक थर खाली जाऊन त्या आपल्याभोवती नाजूक संदर्भाचे जाळे विणत राहतात. मुंबई आणि एका आयटी मजुराचे जगणे या पसाऱ्याचा नैसर्गिक भाग बनते. मुंबईची आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक सौंदर्यस्थळे उकलत असणारी आणि जागतिकीकरणाच्या गोंधळलेल्या दशकात वाढलेल्या पिढीची दुखणी सांगत कादंबरी समकालीन राजकीय व सांस्कृतिक व्यवस्थेवरही भाष्य करते. ‘अचानक वैश्विक खेडे झालेल्या जगात आपली नेमकी ओळख काय’ या ग्रामीण स्थलांतरित पिढीला शहरात जाऊन पडलेले सनातन प्रश्न कादंबरीत विस्ताराने चर्चिले जातात. पण या प्रश्नांमध्ये नायक फक्त आपल्या कोशात गुंडाळून बसत नाही. तो लग्नही करतो, प्रस्थापित व्यवस्थेत कामही करतो, डिजिटल युगात वाढलेल्या समाज माध्यमांचा वापरही करतो. इतर मराठी स्थितीवादी नायकांसारखा तो या बदललेल्या आधुनिकतेपासून दूर जात तिला टाळत नाही. उलट त्याचा वापर करून आपल्या तुटक आयुष्यात बदल शोधू बघतो.

भारतात धर्मांध शक्तींचा झालेला उदय, उत्तर आधुनिकतेने वेढलेली दिखाऊ संस्कृती, त्याचा अकादमिक- कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळ्यांवर झालेला असह्य शिरकाव लेखकाने कुशलतेने रेखाटला आहे. मुंबईतल्या नवउदारमतवादी मध्यमवर्गाच्या भ्रांती नाकारून तो पोकळ मूल्यांवर प्रहार करतो. आपली प्रत्येक कृती अनायसे राजकीयच असते याची जाणीव या नायकाला आहे. ‘राजकारणाशी आपल्याला देणंघेणं नाही, किंवा साहित्यव्यवहार हा राजकारणापासून वेगळा असतो’ असे वातावरण असणाऱ्या मराठी भाषिक समूहात ही भूमिका घेणे नाविन्यपूर्ण आहे. भाषेची संरचना आणि तिचा सांगाडा बदलून नवे प्रयोग करणाऱ्या कोलटकरांच्या कवितेलाच एके ठिकाणी पुन्हा रचत लेखक नव्या युगात गरजेच्या असणाऱ्या नव्या मूल्यांची गरज स्पष्टपणे मांडतो.

मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वातावरणामध्ये आपले प्रतिबिंब शोधू पाहणाऱ्या लेखकाला मुंबई एखाद्या पात्रासारखी भेटते. मंटो, भाऊ पाध्ये, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून भेटणारी मुंबईच्या चाळींची प्रतिसंस्कृती पटेलीमध्ये वास्तववादी वळण घेते. आपल्या मूळ स्वभावातूनच प्रस्थापितांना विरोध करणाऱ्या आणि बहुजन सौंदर्यशास्त्राची तळी उचलणारी ही प्रतिसंस्कृती फार वर्षांनी पुन्हा वाचकांसमोर आली आहे.

जॉर्ज नोव्हाक यांनी सांगितल्याप्रमाणे अस्तित्ववाद आणि लोकचळवळींचे लढे आपापल्या मार्गांनी जात असतात, त्यांची एकमेकांशी गल्लत होऊ नये. स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या याच परिस्थितीचा सलग विचार पटेलीच्या नायकाच्या मनोगतातून व्यक्त होत राहतो. कामगारासारखाच त्याचा स्वतःचा संघर्ष शहरातील ब्राह्मणी-भांडवली व्यवस्थेशी आहे. शिवसेना-कम्युनिस्ट चळवळींचे अद्वैत सांगताना “अद्वैताची रेस मी हरलो होतो. मिल कामगार तसाच हरला” असं सांगून तो स्वतःचा अस्तित्ववादी पराभव हा मजुरांच्या अर्थव्यवस्थेत झालेल्या पराभवाशी सहज जोडतो. कृष्णा देसाईंच्या नंतर दोघांचीही बदलत असलेली ओळख आणि परस्परांशी असलेले नाते तो अधोरेखित करत राहतो. आयटी सेक्टर म्हणून सुरू झालेली व्यवस्था ही बकाल गिरणी व्यवस्थेचंच नवीन स्वरूप आहे हे वेगळे सांगायची गरज पडत नाही. बापासोबत गावाकडून महानगरात केलेल्या स्थलांतराचा मध्ये त्याची अनेक मूल्ये बिट जनरेशन सारखीच भरकटली आहेत. पण म्हणून तो नॉस्टॅल्जिक खंडेराव/निहीलिस्ट शशांक बनून स्वतःत भरकटत नाही, बँडस्टँडवरच्या गिटारिस्ट माणसाला बघून हळदीचं सईबाई आठवतो, पण ते मोबाईल क्रांती आणि राजकीय पडझडीत आपली ठाम भूमिका घेऊनच. या स्थलांतरात मानवी मनाला बसणारे धक्के तो आदित्य असरातच्या ‘hi-so’ च्या नायकासारखे पचवत आला आहे. “पोर टिंगार दाखवतंय माणुसकीला” सांगून भोंगळ मानवतावादाचा धिक्कार करतो. “नवनिर्मिती एकट्याने करायची नाही, समूहाने करायची. अशा शहरांमध्ये आल्यानंतर बव्हंशी ब्राह्मणी संस्कृतीच्या वरवंट्याखाली रगडल्या जाणाऱ्या तरुणांना रोमन लिपीत मराठी लिहिणे जवळचं वाटतं. पाश्चिमात्य अस्तित्ववादी लेखनाचे विशेष असताना तो “लोकशाही नव्हे लोकनाट्य!” असा बहुजन पुकारा करतो. मात्र त्याच वेळी बहुजनांच्या संस्कृतीत अचानक आलेल्या सलमान संस्कृतीलाही तो “चाळीत अशे चार-पाच सलमान असल्यानं त्यांचा तिटकाराच” म्हणून नाकारतो. सलमानच्या चित्रपटानंतर दर गल्लीत अचानक उगवलेल्या चारपाच सलमानांचे नाते विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’मधील भांबावून गेलेल्या प्रति-क्रांतिकारी काश्मिरी सलमानांशी सहज जुळते. भांबावून गेलेल्या पिढीच्या टिकटॉक प्रभूती संस्कृतीचा उजव्या दिशेने सहजी होणार प्रवास कादंबरीत रेखाटला आहे. म्हणून ‘पटेली’ कादंबरीचा मधला भाग हा मराठीच्या प्रतिनायकांशी आपली नाळ राखून आहे. आपल्या दैनंदिन धर्म, मानक, मूल्ये, श्रम व्यवस्थेची तो सतत चाचपणी करत राहतो. तो प्रस्थापित मानकांच्या विरुद्ध एक आघाडी बनवू पाहतो पण त्या आघाडीमधील अंतर्गत परस्परविरोध दुर्लक्षित करत नाही जिथे जिथे ते परस्परविरोध दिसतील त्याच्या जागी तो घाव घालत राहतो. केवळ आपल्या लेखन आणि कवितेच्या जोरावर विविध कलाकारांची अशी आघाडी बनवू शकलेल्या  हे ही बीट जनरेशनचेच वैशिष्ट्य आहे. उथळ भांडवली जगण्याचा फोलपणा जाणवत असताना त्यात अस्तित्व शोधण्याची धडपड हा आजच्याही तरुणांच्या आयुष्यावरचा एक टप्पा आहे. तिथून पुढं जाताना कर्त्या नायकाची गरज प्रत्येक कथा-कादंबरीला असणार आहे. ‘पटेली’ त्याची एक शक्यता खुली करून देते.

खेड्याची मूल्ये आणि स्वातंत्र्य या दोघांतील घर्षणातून बनणारी त्याची मूल्ये ‘पठारे’ असूनही त्याला सरंजामी व्यवस्थेचा छुपा समर्थक ‘पाटील वा सातपाटील’ बनवत नाहीत. सर्वच सांस्कृतिक संस्थांचे शहरीकरण पचवून तो ‘स्वातंत्रोत्तर स्थितिवादी मराठा सरंजामी व्यवस्थेचा गावातील भंपक लोकशाही व्यवस्थेचा’ समर्थक बनत नाही. बदलांना प्रवण केले नसले तरी त्यांची शक्यता गोंजारत पुढे जाणे हेही नायकाला जाणवते. तडक बंडखोरी न करता या परस्परविरोधाला समजून घेत त्याच्या आयुष्याच्या खळबळी आत्ता विशीत असणाऱ्या ‘जनरेशन Z’ च्या वाचकांना आपल्याशा वाटतात. शोषण आणि अन्याय यांच्यातील गल्लत करत, समजावत तो आपली वैयक्तिक नातीही चाळीच्या पुनर्रचनेसारखी बदलू पाहतो. इराणी हॉटेलांची प्लॅनेट एमशी असणारी स्पर्धा त्याचं वर्गअस्तित्व मांडत राहते. ते “जाऊं कहाँ बता ए दिल” सारखे उत्तराधुनिक-हिंसक होत नाही, विवेकाने विचार करणारे नवे नायक अवधूत डोंगरे आणि अविनाश अशा नव्या दमाच्या लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये तयार होणे ही जमेची बाजू आहे. एकीकडे पुण्या-मुंबईचे ‘कोबाल्ट ब्लू’ रंग वगळून या नव्या बहुजन लेखकांना ‘अल्ट्रा-रेड’ म्हणून दूर केलं जातं. या दरम्यानचे काही रंग दाखवण्याचा प्रयत्न करणारी पटेली म्हणून नोंद घेण्याजोगी आहे. आधुनिकतेच्या मूल्यांना स्वीकारून पुढं जाताना मराठी साहित्य मध्येच आलेल्या अस्तित्ववादाच्या गर्तेत रुतून बसले आहे. अस्तित्ववाद हा प्रस्थापित सत्ता आणि धुरीणत्वाविरुद्ध असणाऱ्या प्रतिकाराचा एक मार्ग होता, मात्र आता त्याच्या अनेकविध शक्यतांमुळे तो स्वतःत गुंतून पडलेल्या तरुणाईची उत्तर-आधुनिक अभिव्यक्ती बनून राहिला आहे. पश्चिमेच्या ज्या चळवळींमधून हे प्रवाह आशियाई-आफ्रिकन देशांत आले, त्या सर्वांनीच एक टप्प्यावर या अमोघ साधनाचा वापर करून वाचकांना नव्या दिशेने जायला प्रवण केले. त्यानंतर या सर्वच देशांत साहित्याने अस्तित्ववाद मागे टाकून नव्या प्रकारचे साहित्य निर्माण केले. पण भारतीय भाषांतील साहित्यात मात्र कोणतीही मूल्ये, समाजबदलाचे आग्रह आणि परिवर्तनाच्या शक्यता बाजूला सारून हे प्रवाह स्वतःत गुंतून पडले आहेत. ‘पटेली’ ही नवी कादंबरी अशा तुंबून राहिलेल्या साहित्याला प्रवण करण्याचा प्रयत्न आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0