मुल्ला ओमरचे युद्धग्रस्त जग

मुल्ला ओमरचे युद्धग्रस्त जग

गतसाली तालिबान विषयीचे अहमद राशिद यांचे पुस्तक वाचले. तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर असे वाटून गेले की राशिद यांचे ते पुस्तक म्हणजेच, तालिबानची खरीखुरी कहाणी. पण हा संभ्रम काही महिन्यातच दूर झाला. त्याचे कारण पत्रकार बेट्टी डॅम यांनी लिहिलेले ‘लुकिंग फॉर द एनेमी: मुल्ला ओमर अँड अननोन तालिबान’ हे पुस्तक. त्याचीच ही तोंडओळख...

तालिबान-अमेरिका चर्चा फिसकटल्या
मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता
भूमी कोणालाही वापरू देणार नाहीः तालिबान

एकविसाव्या शतकात ज्या दोन माणसांना या जगात सर्वात घातक समजले गेले, त्यापैकी एक म्हणजे ओसामा बिन लादेन आणि दुसरा म्हणजे मुल्ला ओमर. पण ओसामा बिन लादेन ओमरपेक्षा अधिक सुदैवी. कारण, तो मुळातच श्रीमंत खानदानतला वरून श्रीमंत देशातला. प्रसार माध्यमांचा प्रभाव असलेल्या साधनसंपन्न देशातून पुढे आल्यामुळेसुद्धा असेल, पण बिन लादेनवर सुलभपणे माहिती जगाला उपलब्ध झाली. याबाबतीत मुल्ला ओमर मात्र दुर्दैवी म्हणावा. खरे तर हा माणूस जगातील सर्वात धोकादायक, सर्वांत भयानक मानल्या गेलेल्या तालिबान या इस्लामी संघटनेचा पुढारी, पण या माणसाविषयी आपल्याला शंभर शब्दसुद्धा लिहिता येणार यायचे नाहीत, एवढी ओमरसंबंधांतल्या माहितीची वानवा. प्रस्तुत पुस्तिकेच्या लेखिका मात्र मुल्ला ओमारच्या चरित्राचा चिकाटीने शोध घेतात, हा माझ्या मते आतापर्यंतच्या तालिबानसंबधित विषयावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकावरचा पहिला यशस्वी प्रयत्न. यासाठी लेखिकेला प्रामाणिकपणे श्रेय द्यायला हवे.

मुल्ला ओमारचा जन्म अठराविश्वे दारिद्र्यात झाला. वडिलांचे निधन ओमर लहान असतानाच झाले. आईने दुसरा विवाह केला. त्यामुळे ओमरच्या नशिबी सदैव भटकंती आणि उपेक्षा आली. सावत्र वडील मशिदीत मौलवीचे काम करायचे, त्यामुळे इस्लामचे शिक्षण त्याच्या रक्तात भिनलेले. ओमर लहानपणी इतरापेक्षा अधिक उपद्व्यापी. तो नेहमी दुसऱ्या लोकांचे स्वांग घेई (कुणाला माहित होते, स्वतः स्वांग घेणारा पुढे, स्वांग करण्यावर बंदी घालेल, असो). ओमर अशा ग्रामीण अफगाणिस्तानच्या तालमीत तयार झालेला.

धर्मयुद्धात उडी

१९७९  साली सोव्हिएत रशिया अफगाणिस्तानवर आक्रमण करते आणि मुल्ला ओमरचे चारित्र्य आणि चरित्रच बदलून जाते. अफगाणिस्तानात मुजाहिदीन (व्हाया सीआयए आणि आयएसआय) सोव्हिएत रशियाविरोधात जिहाद पुकरतात आणि ओमर या धर्मयुद्धाचा भाग बनतो. स्ट्रिंगर रॉकेटचा मारा करण्यामध्ये याचा हातखंडा जबरदस्त. अशाच एका युद्धसंघर्षात ओमर आपला उजवा डोळा गमावतो. शेवटी या धर्मयुद्धाला यश येते आणि सोव्हिएत रशिया अफगाणिस्तानच्या भूमीतून माघार घेतो. अमेरिका जे पाहिजे ते मिळवण्यात यशस्वी ठरते आणि अफगाणिस्तानला उघड्यावर सोडून निघून जाते.

शेवटी याचा परिणाम म्हणजे अफगाणिस्तानात गृहयुद्ध सुरू होते आणि कालांतराने अफगाणिस्तानात ठिकठिकाणी युद्धखोर निर्माण होतात. ओमर मात्र आपल्या कंदहार प्रांतातील आपल्या गावात मुल्लाहचे काम स्वीकारून साधे जीवन जगणे सुरू करतो. एकीकडे, हाजी बशीर हा ड्रग माफिया मात्र या गृहयुद्धाने त्रस्त झालेला असतो. एकतर याचे लाखोंचे उत्पन्न बुडत असते आणि वरून जागोजागी अफगाणिस्तानात टोलनाके उभे राहिलेले असतात. या पैशातून टोलमाफिया गडगंज होत जातात. अशात बशीर मुल्ला बनलेल्या ओमरला हाताशी धरतो. पैसे आणि शस्त्रे पुरवून टोल माफियांचा नायनाट करतो. या स्थित्यंतरानंतरच तालिबान (तालिबान निर्माण करण्यात कशाही प्रकारचा सीआयए व आयएसआयचा हात नाही). या कट्टर इस्लामिक संघटनेची  स्थापना झालेली असते.

ड्रग माफियांचे कारनामे

प्रस्तुत लेखिकेच्या मते, ड्रग माफियांशिवाय तालिबान अस्तिवात आला नसता (noTaliban without drugs mafia). अशा प्रकारे ही संघटना हळूहळू सर्व अफगाणिस्तानात आपले हातपाय पसरवते आणि १९९६ मध्ये थेट काबूलवर आपला झेंडा फडकवते. १९९८ मध्ये ओसामा बिन लादेन अफगाणिस्तात पाऊल ठेवतो. आपली समजूत अशी की, कट्टरवादी मुल्ला ओमारने त्याचे आपल्या देशात जंगी स्वागत केले. पण ही गोष्ट धादांत असत्य. मुल्ला ओमर सुरवातीपासून बिन लादेनला ब्याद मानत आलेला. पण दिलदार अफगाण परंपरेने त्याला बांधून ठेवले होते. मात्र पुढे जाऊन ९/११ घडले आणि सर्व काही नष्ट झाले.

याआधी अमेरिकने बिन लादेनला सपूर्द करण्याची मागणी केलेली, पण ओमरचे म्हणणे आधी पुरावे द्या. ओमरचा हाच आडमुठेपणा तालिबानला धोकादायक ठरला. शेवटी बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ घोषित केले आणि यात तालिबानचा सारा डोलारा कोसळत गेला. यात महत्त्वाची बाब म्हणजे तालिबानला बिन लादेनच्या ९/११ या प्रकरणाशी काहीही देणघेणे नव्हते आणि मदतही नव्हती. पण बिन लादेनने हे हल्ले अफगाणिस्तानातून घडवले होते, एवढे मात्र सत्य.

अमेरिकेला खुमखुमी नडली

इकडे, अमेरिकेच्या तालिबानवर हल्ल्यानंतर तालिबान वेगाने माघार घेतो. त्यांना माहीत असते की, आपण युद्धात कमकुवत आहोत. मुल्ला ओमर आपली जबबदारी मुल्ला ओबिदुल्लाह याच्याकडे सोपवून झुबल या प्रांतात निघून जातो. डिसेंबर २००१ मध्ये तालिबान ही संघटना शरणागती पत्करते. पण आता अमेरिकेला पूर्ण तालिबान नष्ट करण्याची खुमखुमी चढलेली, म्हणून त्यांनी ही शरणागती फेटाळली. (अमेरिकेची सर्वात मोठी चूक). त्यानंतर मुल्ला ओमरने झबुल प्रांतात, आपल्या राहिलेल्या आयुष्याची १३ वर्षे बी. बी. सी. रेडिओ ऐकण्यात आणि कुराण वाचण्यात घालवली. कधीतरीच तो आपले राजकीय मत व्यक्त करी. बाकी त्याने सर्व दिवस अलिप्तेत व्यतीत केले. २३ एप्रिल २०१३ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूच्या घटनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१५ मध्ये ही बातमी जगाला कळवली गेली.

मुळात, तालिबान समजून घेण्यासाठी आधी अफगाण समाज समजून घेतला पाहिजे. लेखिकेने हा समजून घेतला आहे. लेखिकेच्या प्रत्येक पानात तिने केलेले कष्ट दिसतात. अफगाण समाज तुमचे मनापासून आदरातिथ्य करील, पण जर का तुम्ही त्यांच्या परंपरेत लुडबुड केली, तर तुमचे हात पोळले म्हणून समजा. आधी ब्रिटिश, नंतर सोव्हिएत रशिया आणि आता अमेरिका याचे ते उत्तम उदाहरण ठरावे. लेखिका मात्र या परपरेंचे पालन करीत मुल्ला ओमरविषयीची माहिती अफगाणी लोकांकडून काढून घेते. ती घडलेल्या घटनांकडे घटना म्हणून पाहते, विचार म्हणून नव्हे. हीच या पुस्तकाची खासियत आणि वेगळेपणही.

लुकिंग फॉर द एनेमी: मुल्ला ओमर अँड अननोन तालिबान
हार्पर कॉलिन्स
पृष्ठे: ३३८
५९९ रुपये.
(१५ जून २०२२ रोजी प्रकाशित ‘मुक्त-संवाद’ नियतकालिकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0