नवी दिल्लीः ३७० कलम हटवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरूवात केल्याची प्रशंसा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्य
नवी दिल्लीः ३७० कलम हटवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरूवात केल्याची प्रशंसा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात केली. भारतात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आता केवळ उपचार म्हणून केला जात असतो. असे मिश्रा म्हणाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला २८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते बोलत होते.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी असताना याच अरुण मिश्रा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चतुरस्त्र, दूरदृष्टीचे नेते असून ते वैश्विक विचार करतात आणि स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करतात, अशा शब्दांत प्रशंसा केली होती.
मिश्रा यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याच्या व या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या अमित शहा यांच्या निर्णयाचीही प्रशंसा केली.
अरुण मिश्रा यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवाधिकारवरून राजकारण करणार्यांवर निशाणा साधला. असे केल्याने लोकशाहीला धोका पोहचतो. काही लोक काही घटनांवरून मानवाधिकाराचा भंग झाल्याचे म्हणतात पण अशाच प्रकारच्या घटनांकडे ते दुर्लक्ष करतात. मानवाधिकाराकडे राजकीय दृष्टीने पाहिल्यास ते मानवाधिकाराचे उल्लंघन ठरते, असे मोदी म्हणाले.
अरुण मिश्रा यांच्यावर ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी असताना सरकारधार्जिणे निर्णय दिल्याने व मोदींची जाहीर प्रशंसा केल्याने त्यांना जून महिन्यात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्याची टीका झाली होती.
COMMENTS