अखेर न्याय झाला : निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

अखेर न्याय झाला : निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषी अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय शर्मा व पवन गुप्ता यांना शुक्रवारी पहाटे ५.३०च्या सुमारास दिल्लीतील ति

सायबर छळाच्या तक्रारीनंतर भाजप नेते कल्याणरामन यांना अटक
‘आजीवली देवराई’चा अपूर्व इतिहास
सत्यशोधक समाजाचे दीडशेवे वर्ष

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषी अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय शर्मा व पवन गुप्ता यांना शुक्रवारी पहाटे ५.३०च्या सुमारास दिल्लीतील तिहार कारागृहात फाशी देण्यात आले. फाशी देण्याअगोदर पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंग व त्यांच्या एका सहकारी वकिलाने सर्वोच्च न्यायालयात पहाटे ३.३० वाजता फाशी रोखण्यासाठी एक याचिका दाखल केली पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या निर्णयामुळे चारही आरोपींचे फाशी रोखण्याचे सर्व प्रयत्न संपले व अखेर त्यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या अगोदर एकाही दोषीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली नाही. या चारही दोषींचे शव त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दरम्यान शुक्रवारी या याचिकेच्या वेळी निर्भयाची आई आशा देवी सर्वोच्च न्यायालयात होत्या पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली तेव्हा त्यांनी न्यायालयाच्या बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या मुलीचा फोटो हृदयाशी धरला आणि अखेर न्याय मिळाला, असे उद्गगार काढले. मी सरकारचे व न्यायव्यवस्थेचे आभार मानते. १६ डिसेंबर २०१२ मध्ये माझ्या मुलीवर अमानुष बलात्कार केला गेला, त्यानंतर १३ दिवस तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. आता तिला विलंबाने पण न्याय मिळाला आहे, असे त्या म्हणाल्या. माझ्या मुलीचा मला अभिमान आहे पण मी तिला वाचवू शकले नाही. या गोष्टीचा मला अखेरपर्यंत पश्चाताप होत राहील. ती आज जिवंत असती तर एक डॉक्टरची आई म्हणून मला ओळखले गेले असते. पण अखेर न्याय मिळाला, या देशातल्या मुलींसाठी आपला लढा सुरूच राहील, अशा शब्दांत निर्भयाच्या आईने आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची सर्व युक्तिवाद अखेरपर्यंत ऐकले

शुक्रवारी ५.३० वाजता चारही आरोपींना फाशी देण्याचे ठरले होते. जशी फाशीची वेळ जवळ येत होती तसे आरोपींकडून फाशी रोखण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पवन कुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह पिटीशन आली होती, आपण अल्पवयीन असल्याचा त्याचा दावा होता. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली. न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, न्या. नरिमन, न्या. आर. भानूमती, न्या. अशोक भूषण, न्या. ए. एस. बोप्पण्णा या सहा न्यायमूर्तींच्या पीठाने ही क्युरेटिव्ह पिटीशन सर्वसंमतीने फेटाळली. न्यायालयाने ही क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळताना २००२च्या ‘रुपा अशोक हुर्रा वि. अशोक हुर्रा व अन्य’ या खटल्यात दिलेल्या निर्णयाचा आधार आरोपींच्या वकिलांना सांगितला.

त्या अगोदर चार आरोपींचे डेथ वॉरंट रोखणारी आणखी एक याचिका स्थानिक न्यायालयात दाखल झाली होती पण तीही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी १९ मार्चला दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयात रात्री सुनावणी

स्थानिक न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. मनमोहन व न्या. संजीव नरुला यांच्या पीठापुढे रात्री ९ वाजता ही याचिका सुनावणीस आली. पण याचिकात अनेक कागदपत्रे नसल्याने व प्रतिज्ञापत्रच नसल्याने न्यायालयाने ही याचिका सुनावणीस घेतली नाही. उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी तुम्हाला मिळाली आहे का, असा सवालही या दोन न्यायाधीशांनी केला. त्याचबरोबर पवन हा अल्पवयीन असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने हाच मुद्दा या न्यायालयात उपस्थित करण्यात काहीच अर्थ उरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात पहाटे वाजता सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींची याचिका सुनावणीस न घेतल्याने  अंतिम पर्याय म्हणून आरोपीच्या वकिलांनी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ही याचिका न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, न्या. नरिमन, न्या. आर. भानूमती, न्या. अशोक भूषण, न्या. ए. एस. बोप्पण्णा या सहा न्यायमूर्तींच्या पीठापुढे आली. या याचिकेत पवन याच्या जन्मतारखेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अक्षयच्या दया याचिकेवर अद्याप निर्णय झाला नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.

आरोपींच्या वतीने आणखी एक वकील शाम्स ख्वाजा यांनी चार आरोपींनी हा गुन्हा ठरवून केला नसावा असा एक मुद्दा मांडला. पण सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद नाकारत याचिका फेटाळून लावली.

राष्ट्रपतींनी सर्व आरोपींची दयेची याचिका फेटाळल्याने या निर्णयावर न्याय पुनर्विलोकन करण्यास मर्यादा असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मांडला. त्याचबरोबर एक आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याचाही विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. त्याचबरोबर आरोपींना मारहाण केली या मुद्द्यावर दयेची याचिका मंजूर करता येत नाही, असेही आरोपींच्या वकिलांना सांगितले.

न्यायालयाच्या बाहेर जल्लोष

एकंदरीत पहाटे ४.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाने आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळल्यानंतर व चारही आरोपींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर न्यायालयाबाहेर जमा झालेल्या लोकांकडून निर्भयाला अखेर न्याय मिळाला अशा प्रतिक्रिया येत होत्या.

तोपर्यंत तिहार कारागृहाच्या बाहेरही लोक जमा झाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास फाशी दिली जाणार असल्याने निर्भयाच्या द्वारकापुरी येथील निवासस्थानापाशीही गर्दी झाली होती. जेव्हा चारही दोषींना फाशी दिल्याचे कळल्यानंतर लोकांकडून आनंद प्रकट केला जात होता.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: