स्वामी नित्यानंदांचे देशाबाहेर पलायन

स्वामी नित्यानंदांचे देशाबाहेर पलायन

एफआयआरमध्ये नाव आल्यानंतर लगेचच त्यांनी देशाबाहेर पलायन केल्याची गुजरात पोलिसांनी पुष्टी केली आहे.

भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात
इरफान : माणूस आणि अभिनेता
लक्षद्वीपमध्ये शाळांची सुटी रविवारी केल्याने संताप

अहमदाबाद येथील स्वामी नित्यानंद यांच्या आश्रमाशी संबंधित एका गुन्हेगारी प्रकरणात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले, त्यांच्या दोन शिष्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध ‘ठोस पुरावे’  मिळवण्यासाठी ते काम करत आहेत.

बुधवारी या वादग्रस्त गुरूंच्या विरोधात मुलांचेअपहरण करून योगिनी सर्वग्यानपीठम् नावाचा त्यांचा आश्रम चालवण्यासाठी देणग्या गोळा करण्याकरिता बंदिवासात ठेवण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल आहे. त्यांच्यावर बलात्काराचा एक गुन्हाही दाखल आहे, तसेच जून २०१८ मध्ये कर्नाटकमधील एका विशेष न्यायालयानेही त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

अहमदाबाद (ग्रामीण) चे पोलिस सुपरिंटेंडंट आर. व्ही. आसारी म्हणाले, नित्यानंद परदेशी पळून गेले आहेत आणि आवश्यक असल्यास योग्य मार्गाने गुजरात पोलिस त्यांचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. “ते भारतात परत आल्यास आम्ही निश्चितच त्यांना अटक करू,” असेही आसारी म्हणाले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, नित्यानंदांना परत आणण्याबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती वा विनंती करण्यात आलेली नाही. ते त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये असल्याची अनधिकृत सूत्रांची माहिती आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले,“आमच्याकडे गुजरात पोलिस किंवा गृह मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच देशात परत आणण्यासंबंधीची विनंती असेल, तर आम्हाला त्या व्यक्तीचे ठिकाण आणि राष्ट्रीयता यासंबंधीचे तपशील आवश्यक आहेत. आमच्याकडे अशी कोणतीही माहिती अद्याप नाही”.

त्यांचे दोन शिष्य, प्राणप्रिय आणि प्रियतत्त्व यांना मंगळवारी अपहरण, बेकायदेशीरपणे कैदेत ठेवणे आणि छळ या आरोपांवरून अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी त्यांना पोलिस कोठडीत पाच दिवसांसाठी पाठवण्यात आले व पोलिस त्यांची चौकशी करत आहेत असे अहमदाबाद ग्रामीणचे डेप्युटी एसपी के. टी. कमारिया म्हणाले.

ते म्हणाले, नित्यानंद यांच्या आश्रमातून गायब झालेल्या महिलेच्या प्रकरणाचा सुद्धा पोलिस तपास करत आहेत. त्या महिलेचे वडील जनार्दन शर्मा यांनी विवेकानंद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

नित्यानंदांच्या आश्रमावर ९ आणि १० वर्षांच्या दोन मुलांना कैदेत ठेवल्याचा आरोप आहे. या दोन मुलांनी पोलिसांना सांगितले, त्यांचा छळ करण्यात आला, त्यांना काम करायला लावले गेले आणि शहरातील एका फ्लॅटवर १० दिवसांपेक्षा जास्त काळ बंद करून ठेवले. अशाच प्रकारचे आरोप आश्रमातून वाचवलेल्या आणखी दोन मुलांच्या पालकांनीही केले आहेत.

बातम्यांनुसार, पोलिसांनी अहमदाबाद जवळच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपलना सुद्धा गुरुवारी अटक केली. नित्यानंद यांचा आश्रम या शाळेने लीजवर दिलेल्या जमिनीवर उभा करण्यात आला होता. पोलिस म्हणाले, प्निन्सिपल हितेश पुरी यांनी जमीन लीजवर आश्रमाला देताना सरकारी अटींचे उल्लंघन केले. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.

“शाळेच्या अधिकाऱ्यांना जमीन लीजवर दिल्याचे पोलिसांना कळवल्याबाबतची कागदपत्रे सादर करता आली नाहीत,” असे कमारिया म्हणाले.

पीटीआय नुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने गुरुवारी गुजरात शिक्षण विभागाकडून शाळेची जागा नित्यानंद यांच्या अहमदाबाद येथील आश्रमाला परवानगीशिवाय कशी देण्यात आली याचे स्पष्टीकरण मागितले. दिल्ली पब्लिक स्कूल हे CBSE शी जोडलेले आहे.

गुजरातचे गृहमंत्री प्रदिपसिंह जडेजा यांनी वार्ताहरांना सांगितले, या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. ते म्हणाले, डीजीपींनी एसपींना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यास सांगितले आहे.

आरोपींवर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अपहरण, कैदेत ठेवणे, हेतुपुरस्सर इजा करणे आणि बदनामीकारक मजकूर असलेल्या छापील किंवा कोरीव वस्तूंची विक्री करणे इ.चा समावेश आहे. त्यांच्यावर बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, १९८६ च्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

त्यांच्या अहमदाबाद आश्रमातील दोन मुलींचा ताबा मिळवण्यासाठी या मुलींच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी या स्वघोषित स्वामी तसेच राज्यसरकारला नोटिस पाठवल्या आहेत.

(पीटीआयकडून मिळालेल्या बातमीवरून)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: