अन्यथा टांगा पलटी घोडे फरार…

अन्यथा टांगा पलटी घोडे फरार…

बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही पाच वर्षे इतका दीर्घकाळ भाजप मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणार का? आणि कमी जागा असताना मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट नितीश कुमार दीर्घकाळ मस्तकी मिरवणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट
बिहार एक्झिट पोलः महागठबंधनाला कौल
‘बिहार मे भाजपा बा…’

दमछाक करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा रथ कसा तरी सत्तेपर्यंत पोहोचला असला तरी हा रथ कधीही पलटी होण्याची शक्यता अनेक राजकीय जाणकारातून व्यक्त होत आहे. कारण सत्तेचे सारथ्य करणाऱ्याने जर ऐनवेळी पलटी मारली तर भाजपची अवस्था टांगा पलटी घोडे फरार.. अशी होण्याची दाट शक्यता आहे. एनडीएला १२५ जागा मिळूनही नितीशकुमार यांनी माध्यमांपुढे येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र बुधवारी संध्याकाळी त्यांनी एक ट्विट करून बिहारच्या जनतेचे व मोदींचे आभार मानले. पण अशा त्रोटक प्रतिक्रियेने या बिहारी बाबूच्या मनात नेमके काय शिजत आहे ? या विचाराने भाजपमध्ये अस्वस्थता पसरत आहे.

बिहार निवडणुकीत नेहमीच दोन नावे चर्चेत असतात त्यामध्ये राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि संयुक्त राष्ट्रीय जनता दलाचे नितीश कुमार या दोन नावाभोवतीच गेली २० वर्षे निवडणूक लढवली जाते. नितीश आणि लालू यांचा पुराना याराना अनेकदा पाहण्यात आला आणि त्याचो झलक सर्वानी पाहिली. समाजवादी विचारसरणी असलेले नितीश यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले. पलटी मारण्यात माहीर असलेल्या नितीश कुमार यांना एकेकाळी पंतप्रधानपदाची स्वप्नेही पडत होती. पण असे असूनही ते नेहमीच राज्याच्या राजकारणात सुखावले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी दोनदा केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. १९९६ आणि २०१६ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपबरोबर काडीमोड घेऊन आपण काहीही करू शकतो हे दाखवले होते.

आता झालेल्या निवडणुकीत भाजप तर्फे नितीशकुमार हेच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असून तेच ही जबाबदारी सांभाळतील असे सांगण्यात येत असले तरी राजकीय पटलावर मात्र विविध घडामोडी वेगाने घडत आहेत. ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे किमान सूत्र आघाडी किंवा युतीमध्ये पाळले जाते. मग त्यातून राजकीय कुरघोडी सुरू होतात. मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून कधी त्याचा गेम करता येईल याची पद्धतशीर व्यूहरचना केली जाते. मग ते महाराष्ट्र असो की बिहार. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजप ७२ जागा घेऊन मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. तर मुख्यमंत्री बनणारे नितीश कुमार यांच्याकडे केवळ ४२ आमदार आहेत.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो को सर्वाधिक जागा मिळूनही पाच वर्षे इतका दीर्घकाळ भाजप मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणार का? आणि कमी जागा असताना मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट नितीश कुमार दीर्घकाळ मस्तकी मिरवणार का? या दोन कळीच्या प्रश्नांचे त्रांगडे कायम राहिले आहे.

नितीश कुमार हे समाजवादी विचारसरणीचे पण सत्तेसाठी त्यांनी विचारसरणी बासनात गुंडाळून ठेवली. तर भाजपने नेहमीच पक्ष वाढीसाठी आणि सत्तेसाठी विविध राज्यात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. बिहार निवडणुकीत सुरुवातीपासून नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे जरी सांगण्यात आले असले तरी त्यांचे पंख कापण्यासाठी चिराग पासवान यांना रसद पुरविण्यात आली. रामविलास पासवान यांच्या नंतर पहिलीच निवडणूक सांभाळणाऱ्या चिराग यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे एक सराव सामना होता. पण चिराग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने नितीश कुमार यांचे अनेक उमेदवार टिपले. विशेष म्हणजे लोक जनशक्ती पार्टीच्या तिकिटावर उभे असलेले अनेक उमेदवार हे संघाचे कार्यकर्ते होते हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा एनडीएला बहुमत मिळाले तेव्हा चिराग यांनी मोदींमुळे एनडीए सत्तेवर आली असे विधान केले. असे असेल तर चिराग पासवान यांना नितीश कुमार इतके व्यर्ज का ठरले?

शह-प्रतिशहाच्या या बुद्धिबळात भले नितीश कुमार यांना कमी जागा मिळाल्या असल्या तरी भाजपलाही मिळालेल्या जागा त्यांनाच अडचणीच्या ठरू शकतात. नितीश कुमार यांचा विचार केला तर कमी जागा असताना मुख्यमंत्रीपद स्वीकारणे नितीश कुमार यांना डोकेदुखी ठरणार आहे. कारण गृह, महसूल, तसेच काही मलाईदार खाती आणि उपमुख्यमंत्रीपद हे भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार. मग नितीश यांच्यासाठी हे पद केवळ कचकड्याची बाहुली ठरू शकते. भाजपच्या संपूर्ण दबावाखाली राज्यशकट चालविणे खूप जिकिरीचे ठरणार आहे. आणि कोणतेही निर्णय अधिकार नसलेले हे मुख्यमंत्रीपद नितीश स्वीकारणार का ? आणि स्वीकारले तर किती काळ ती घुसमट सहन करणार हे महत्त्वाचे.
आणि या विषयावरून सध्या नितीश यांच्या पक्षातील निवडून आलेल्या विद्यमान आमदारांनी तेजस्वी किरणाकडे लक्ष द्यावे असा घोषा लावल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपबरोबर केवळ कुंकूवाचा नवरा होण्यापेक्षा तेजस्वीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुखाने राहू असा एक मत प्रवाह पक्षात व्यक्त होत आहे. या पूर्वीही नितीश यांनी राजद बरोबर हनिमून केला आहे. अनेकदा लालू यांच्यासाठी सोयीची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळेच पक्षात एक मोठा गट अशी भूमिका घ्यावी यासाठो आग्रही आहे.

दुसरीकडे ७२ जागा प्राप्त करून मुख्यमंत्रीपदावर पाच वर्ष पाणी का सोडायचे अशा विवंचनेत भाजप आहे. निवडणुकीत आश्वासन दिल्यामुळे नितीश यांना मुख्यमंत्री करावे लागणार आहे. पण मुख्यमंत्रीपदाविना सत्ता असणे हे न रुचणारेच. त्यामुळे भाजप बिहार प्रदेशाध्यक्ष यांनी नितीश हेच मुख्यमंत्री असतील असे सांगितले असले तरी अन्य नेते मात्र खासगीत आपलाच मुख्यमंत्री हवा असा आग्रह धरत आहेत. त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची पंचाईत झाली आहे. दिलेले आश्वासन पाळले तर पाच वर्षे मुख्यमंत्रीपद नाही. मग उपयोग काय असे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार अशी भाजपचीच सध्या अवस्था झाली आहे.

इकडे नितीश कुमार यांनी निवडणूक प्रचारात आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले आहे. आणि आता ज्या परिस्थितीत त्यांना हे मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणार आहे. हे पद ५ वर्षे जरी निभावले तरी एनडीएचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारच असणार आहेत. हे भाजपला परवडणार का हाही प्रश्न आहे. भाजपने आताच सत्ता स्थापनेमध्ये गडबड दिसू नये याची पूर्णतः खबरदारी घेतली आहे. प. बंगालच्या निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून पक्ष कार्यकर्त्यांमधील जोश कायम राहावा अशी ही रणनीती असू शकते. घाईगर्दीत मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी टाकलेले पाऊल आपल्याला सत्तेपासून दूर ठेवू शकते, ही काळजी मोदी-शहा-नड्डा-रवीशंकर प्रसाद सारख्या नेत्यांनी घेतली हे समजून येते. मोदींनी भाजपचे अध्यक्ष नड्डांना बिहारमधील विजयाचे श्रेय दिले व त्यांना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अमित शहा व अन्य वरिष्ठ नेत्यांनी उभे राहून अभिनंदन केले. नड्डा यांना पुढे वाटचाल करण्यास मोकळीक मिळाली आहे.

मोदींनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच सरकार काम करेल असे पुन्हा सांगितले. नितीश कॅम्पकडून काही प्रतिक्रिया येण्याअगोदर बिहारच्या राजकारणाचे नेपथ्य भाजपने रंगवण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या बिहारविजयी कार्यक्रमात नितीश कुमार उपस्थित नव्हते. वास्तविक एनडीएचे घटक पक्ष म्हणून नितीश यांची उपस्थिती महत्त्वाची होती.

एकंदरीत या निवडणुकीत तेजस्वी यादव हा सामनावीर ठरला असला तरी आता नितीश कुमार हे सध्या एकूणच सत्ता संघर्षात किंग मेकर ठरणार आहेत. त्यांची कोणतीही भूमिका ही बिहारचे राजकारण बदलवणारे असणार आहे हे निश्चित.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: