इराणी कुटुंबियांचे गोव्यात हॉटेल नाही, बार परवाना नाहीः दिल्ली हायकोर्ट

इराणी कुटुंबियांचे गोव्यात हॉटेल नाही, बार परवाना नाहीः दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या किंवा त्यांची कन्या जोइशा इराणी यांच्या नावावर गोव्यात कोणताही बार परवाना वा मालकीचे हॉटेल नाही. इराणी कुट

अनैधिकता आणि भाषांतर: बाबुराव बागुलांची कथा
मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल
रुथ बेडर गिंझबर्ग : लिंगसमानतेच्या पुरस्कर्त्या

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या किंवा त्यांची कन्या जोइशा इराणी यांच्या नावावर गोव्यात कोणताही बार परवाना वा मालकीचे हॉटेल नाही. इराणी कुटुंबाने बार परवान्यासाठी अर्जही केलेला नाही असे त्यांनी न्यायालयापुढे सादर केलेल्या पत्रातून दिसत असल्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. एऩडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

स्मृती इराणी यांची मुलगी जोइशा गोव्यात अवैधपणे बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावरून स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांवर २ कोटी रु.चा मानहानीचा दावा केला होता. या दाव्यासंदर्भात सोमवारी उच्च न्यायालयाने सकृत दर्शनीच इराणी यांच्या नावावर गोव्यात हॉटेल व बार असल्याचे दिसत नाही असे स्पष्ट केले. तसेच गोवा अबकारी खात्याने पाठवलेल्या बार परवाना नोटीसीत इराणी कुटुंबियांचे नावही नाही. त्यामुळे कोणतेही पुरावे नसताना काँग्रेसच्या नेत्यांनी इराणी कुटुंबियांविरोधात कारस्थान रचले व त्यामुळे त्यांची बदनामी झालेली दिसते, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने इराणी यांच्या गोव्यातील बार परवाना वा हॉटेल संदर्भात ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले, त्यांना येत्या २४ तासांत ट्विट हटवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने जयराम रमेश, पवन खेरा व नेट्टा डिसूझा या नेत्यांना स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यासंदर्भात समन्सही बजावले होते.

काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीवर खोटे आरोप लावल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर दोन कोटी रु.चा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी गेल्या शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्या. मिनी पुष्कर्णा यांनी इराणी यांच्यावर अवमानजनक व खोटे आरोप लावल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या प्राथमिक माहितीनुसार पुराव्यांची पुष्टी न करता इराणी यांच्यावर निंदनीय आरोप लावण्यात आल्याचे दिसून येते. अशा आरोपांमुळे इराणी यांच्या प्रतिष्ठेला इजा पोहचते. त्यामुळे ज्या काँग्रेस नेत्यांनी जोइशा इराणी यांच्याविरोधात ट्विट, रिट्विट, पोस्ट, व्हीडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर केली असतील ती त्वरित २४ तासांमध्ये हटवण्याचे निर्देश दिले. हे निर्देश न पाळल्यास ट्विटर, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडिया कंपन्यांना तसे आदेश दिले जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

या प्रकरणाची न्यायालयीन पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही दाद मागणार असून इराणी यांनी केलेल्या दाव्याला आमचेही आव्हान आहे, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे. रमेश यांचे हे ट्विट खेरा व डिसूझा यांनी रिट्विट केले आहे.

प्रकरणाचा घटनाक्रम

१५ दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांच्याकडून गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँतील बारचा परवाना हा एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर गदारोळ वाढला होता. यावर आपले स्पष्टीकरण देताना स्मृती इराणी यांनी आपली मुलगी बार चालवत नसून तिचा या रेस्तराँशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. आपली मुलगी १८ वर्षांची असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत आहे, ती कोणतेही हॉटेल चालवत नाही. तिच्या चारित्र्यावर काँग्रेसने शिंतोडे उडवू नये, असा दम काँग्रेसला दिला. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना निशाणा करत आगामी निवडणुका अमेठीतून जिंकून दाखवाव्यात असेही आव्हान दिले. तुम्हाला दुसऱ्यांदा हरवून दाखवेन असेही त्या राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या होत्या.

त्यावर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत स्मृती इराणी यांच्याकडून महिला व बाल कल्याण विकास खात्याचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

त्याला स्मृती इराणी यांनी आपण न्यायालयात अशा आरोपांचे उत्तर देऊ असे स्पष्टीकरण दिले होते. जोइशा इराणी यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाचा रेस्तराँशी व दारुविक्री परवान्याशी कसलाच संबंध नसल्याचा दावा केला. आम्हाला गोवा अबकारी खात्याची नोटीसही आलेली नाही, असे वकील कीरत नागरा यांचे म्हणणे होते.

एवढ्या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियात वाद थांबला नव्हता. त्यामुळे स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, जयराम रमेश, डिसूजा व काँग्रेस पक्षाला मानहानीच्या नोटीसा पाठवल्या होत्या. काँग्रेसने व या नेत्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला होता.

२१ जुलैला गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण एम गाड यांनी जोइश इराणी संचालित सिली सोल्स कॅफे अँड बार या रेस्तराँला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ मध्ये झाला असतानाही परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे नमूद केले आहे. या रेस्तराँने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचाही आरोप या नोटीशीत केला आहे.

या रेस्तराँतील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. वास्तविक अँथनी डिगामा यांचा मृत्यू गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. या पत्रात येत्या सहा महिन्यात परवाना हस्तांतरित केला जाईल असे नमूद करण्यात आले होते.

रेस्तराँकडून झालेल्या कागदपत्र घोटाळ्याची तक्रार एक वकील आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली, त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरू लागली.

रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्तराँची माहिती मागवली व एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी अबकारी खात्यातील अधिकारी व आसगाव पंचायतीतील संबंधित कसे सामील झाले व भ्रष्टाचार कसा झाला याची चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.

रॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्तराँना देता येतो. पण सिली सोल्स कॅफे अँड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम धुडकावून विदेशी मद्य, भारतीयांनी तयार केलेले विदेशी मद्य व देशी दारु विक्रीचे परवाने मिळवले.

त्याच बरोबर मयत अँथनी डिगामा यांच्या नावाचे आधार कार्ड डिसेंबर २०२०मध्ये बनवण्यात आले होते. या कार्डवर त्यांचा पत्ता विलेपार्ले, मुंबई असा आहे.

रॉड्रिग्ज यांनी हा घोटाळा शोधून काढण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर अँथनी डिगामा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेतून मिळाले. हे प्रमाणपत्र मिळल्यानंतर रॉड्रिग्ज आश्चर्यचकित झाले की गोव्यातल्या १२०० चौ. मीटर क्षेत्रफळ आकारावर उभे राहिलेल्या या आलिशान रेस्तराँशी अँथनी डिगामा यांचा संबंध कुठून व कसा झाला?

यूट्यूबवर प्रसिद्ध खाद्य पदार्थ समीक्षक कुणाल विजयकर यांनी जोइश इराणी यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सिली सोल्स हे गोव्यातील खाद्यपदार्थाचे मोठे आकर्षणाचे केंद्र होईल अशी प्रतिक्रिया जोइश इराणी यांनी एका प्रसंगात दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: