मुख्यमंत्री बनण्यास नितीश कुमार अनुत्सुक

मुख्यमंत्री बनण्यास नितीश कुमार अनुत्सुक

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूची कामगिरी खराब असल्याने अडचणीत आलेले नितीश कुमार यांनी गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आपला काही दावा नाही, एनडीएने मुख्यमंत्री निवडावा, अशी भूमिका घेतली आहे. पण बिहारमधील भाजपच्या नेत्यांनी नितीश कुमार यांच्याच नावाचा आग्रह धरला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे भाजपने जाहीर केले होते. भाजपने बिहार विधानसभा निवडणुकांत आपल्या जागा अधिक आल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले होते. परवा निकाल लागल्यानंतर भाजपचे संख्याबळ जेडीयूपेक्षा अधिक झाल्यानंतरही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील अशी भूमिका भाजपने घेतली होती. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील व त्यांच्या सोबत आपला पक्ष असेल अशी ग्वाही दिली होती. त्यावर नितीश कुमार यांनी आपले मत व्यक्त केले नव्हते. त्यांनी बिहारची जनता व मोदींचे आभार मानणारे ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे हे स्पष्ट होत नव्हते.

पण गुरुवारी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपण दावा करणार नाही, शुक्रवारी एनडीएतील चार पक्षांची एक बैठक होईल, त्यात एनडीए जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाची शपथ दिवाळीनंतर किंवा छट पूजेनंतर होईल, आमचा पक्ष निवडणुकांतील कामगिरीचा अभ्यास करेल, असे म्हटले.

नितीश कुमार पक्षाच्या खराब कामगिरीवरून नाराज असल्याचे समजते. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने जेडीयूची मते कमावल्याने नितीश कुमार नाराज आहेत. त्यांना पासवान यांच्या पक्षाबद्दल विचारले असता, एनडीएतील घटक पक्षांनी लोजपाला एनडीएत ठेवायचे की नाही याचा निर्णय घ्यावयाचा आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान गुरुवारी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जेडीयू हा राजद व भाजपनंतर तिसर्या क्रमांकावर आलेला पक्ष असून नितीश कुमार यांचा सद्सद्विवेक शाबूत असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडावी, असे विधान केले. तेजस्वी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह व्यक्त केले.

मूळ बातमी

COMMENTS