सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय झालेला नाही : देसाई

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय झालेला नाही : देसाई

मुंबई: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीक

सुपर मार्केट, वॉक इन स्टोअरमध्ये वाईन मिळणार
मद्याच्या ऑनलाइन विक्रीस परवानगी घातक!
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही

मुंबई: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

२२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने या बाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केट मधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

वाईन विक्रीच्या निर्णयाचा इतिहास

गेल्या जानेवारीत महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप (Shelf in Shop) या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.

या संदर्भात महाविकास आघाडी सरकारचे असे म्हणणे होते की, राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतूने राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच, वाईनचे परिणामकारक विपणन (Marketing) होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते. ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.

सध्या सुपर मार्केटशी संलग्न बीअर व वाईन विक्रीचा (नमुना एफएल/बीआर-II अनुज्ञप्ती) परवाना देण्यात येतो. आता वाईन विक्रीसाठी पूरक म्हणून सुपर मार्केट किंवा वॉक-इन-स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉपची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये (स्वतः स्वयंसेवेने खरेदी करण्याची सुविधा असलेले) कुलूपबंद करता येईल अशा कपाटामधून नमुना एफएल-एक्ससी परवानाधारकास, सीलबंद बाटलीमध्ये वाईनची विक्री करण्याकरिता नमुना ई-4 परवाना मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी किमान १०० चौ. मी क्षेत्रफळ असणाऱ्या आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७च्या कलम ६ अन्वये नोंदणीकृत असलेलेच सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअर पात्र ठरणार आहेत. या ठिकाणी २.२५ घन मीटर इतके कमाल आकारमानाचे एकच कुलूपबंद कपाट ठेवता येणार आहे.

या निर्णयानुसार वाईन विक्री करणाऱ्या सुपर मार्केट आणि स्टोअर्सना देखील शैक्षणिक व धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहतील. नमूना ई-४ अनुज्ञप्तीचे ५ हजार इतके वार्षिक अनुज्ञप्ती शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी आहे अशा जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0