दिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले

दिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले

गेल्या रविवार संध्याकाळपासून दिल्लीमध्ये दंगली चालू आहेत. आत्तापर्यंत ३८ जणांनी आपला जीव गमावला आहे. अनेक लोक जखमी आहेत. या दंगलींचे वार्तांकन कराय

निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!
माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू
‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक

गेल्या रविवार संध्याकाळपासून दिल्लीमध्ये दंगली चालू आहेत. आत्तापर्यंत ३८ जणांनी आपला जीव गमावला आहे. अनेक लोक जखमी आहेत.

या दंगलींचे वार्तांकन करायला गेलेल्या कित्येक पत्रकारांनाही दंगलखोरांनी मारहाण केली आहे. त्यांचे फोन, कॅमेरे हिसकावून घेतले आहेत, तोडले आहेत. अनेकांना शिवीगाळीचा सामना करावा लागला आहे. एक पत्रकार बंदुकीच्या गोळीने जखमी झाला आहे.

आकाश नापा, जेके २४

मौजपूर येथे वार्तांकन करत असताना आकाशवर जमावाने गोळीबार केला. त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल केले गेले. “गोळी आत अडकली आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती काढण्यात धोका आहे असे सांगितले आहे,” त्यांच्या भावाने न्यूजलॉंड्रीला सांगितले.

सौरभ शुक्ला आणि अरविंद गुणशेखर, एनडीटीव्ही

सीएए समर्थकांच्या एका गटाने या दोघांना प्रचंड मारहाण केली. NDTV च्या बातमीनुसार जमावाने गुणशेखर यांना घेराव घातला आणि तोंडावर मारले. “त्यांच्या डोक्यावर लाठी पडणारच होती, तेवढ्यात त्यांचे सहकारी सौरभ शुक्ला मध्ये पडले.” ती लाठी सौरभ यांना लागली. “त्यांच्या पाठीवर-पोटावर ठोसे बसले, पायावर मार बसला…अरविंद यांचे तीन दात पडले.”

हा हल्ला झाला तेव्हा एक जमाव गोकुळपुरीमधले धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करत होते, त्याला आग लावत होते आणि सौरभ आणि अरविंद त्याचे चित्रीकरण करत होते. जमावातील काही लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना सर्व चित्रीकरण पुसून टाकायला लावले. नंतर सौरभ यांच्या कार्डवर त्यांचे नाव पाहिले तेव्हा त्यांनी मारहाण थांबवली आणि म्हटले, “तुम्ही आमच्यातले आहात. तुम्ही असे करता कामा नये. याचे चित्रीकरण करू नका.”

रुनझुन शर्मा, सीएनएन न्यूज १८

मंगळवारी त्या सुद्धा सौरभ आणि अरविंद यांच्याबरोबर होत्या. जमावाने हल्ला केला तेव्हा त्या तिथेच होत्या.

“त्यांनी अरविंदला मारहाण केली,” त्यांनी सीएनएन न्यूज १८ ला सांगितले. “ते आम्हाला आमचा धर्म विचारत राहिले. आम्हाला त्यांच्या समोर हात बांधून उभे रहावे लागले. पुन्हा पुन्हा आम्हाला जाऊ द्या म्हणून आम्ही विनंती करत राहिलो, तेव्हा त्यांनी आम्हाला सोडले.”

इस्मत आरा, स्वतंत्र पत्रकार

फर्स्टपोस्ट मध्ये लिहिताना आरा यांनी मौजपूर येथील भयानक अनुभवाचे वर्णन केले आहे. एक हिंदू पंडित “वरून आदेश आला आहे, मुस्लिमांना मारा” अशी सूचना एका जमावाला देत होता. आरा यांनी त्याबद्दल त्याला विचारले तेव्हा जमावाला त्यांच्याबद्दल संशय आला आणि त्यांनी ओळखपत्र मागितले. त्यांनी खोटी ओळख सांगितली, प्रेसचे कार्ड लपवले.

पण पुढे एका गल्लीत आरा यांना जमावातील काही लोकांनी थांबवले आणि म्हटले, “मीडियातून आली आहेस तर सांग ना तसं. खोटं बोलून आमच्या पंडितजींबद्दल का विचारत आहेस?” विटा, बॅट, लाठ्या-काठ्या, सळया, कुऱ्हाडी घेतलेले ते लोक तिच्या मागे मागे येत राहिले. “जवळपास कुठेही सीआरपीएफ किंवा पोलिस नव्हते. या लोकांना माझी ओळख कळली तर ते मला पत्रकार म्हणून छळतील, एक मुलगी म्हणून अत्याचार करतील आणि मुस्लिम म्हणून ठेचून मारतील या भीतीने माझा थरकाप उडाला होता.”

शिवनारायण राजपुरोहित, इंडियन एक्स्प्रेस

त्यांना कारावाल नगर मध्ये एका जमावाचा सामना करावा लागला. जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा फोन हिसकावला आणि चष्मा तोडला. त्यांची डायरी काढून घेऊन जळत्या सामानात टाकून दिली. तीन वेगवेगळ्या जमावांनी वेगवेगळ्या वेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना घेराव घातला. “त्यांनी माझे प्रेस कार्ड तपासले. ‘शिवनारायण राजपुरोहित, हं. हिंदू हो? बच गये.’ पण त्यांचे समाधान झाले नव्हते. मी खरंच हिंदू असल्याचा आणखी पुरावा त्यांना हवा होता. ‘बोलो जय श्रीराम!’ मी गप्प राहिलो.”

विजया लालवानी, स्क्रोल

स्क्रोलमधील, लेखामध्ये त्यांनी एक गट “जय श्रीराम” आणि “भारत माता की जय” ओरडत कसा उभे होता त्याचे वर्णन केले आहे. त्या गटाने पत्रकारांना ताकीद दिली की कुणीही छायाचित्रे घ्यायची नाहीत किंवा चित्रीकरण करायचे नाही. आम्ही पत्रकारांनाही सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.

तनुश्री पांडे, इंडिया टुडे

त्यांना मौजपूर येथे सोमवारी धमक्या आणि शिवीगाळ यांना तोंड द्यावे लागले.

परविना पुरकायस्थ, टाईम्स नाऊ

सीएए समर्थकांच्या एका गटाने मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ परविना यांना शिवीगाळ केली. त्यांनी द प्रिंटला सांगितले, “मौजपूर मेट्रो स्टेशनच्या एका कोपऱ्यात मी सुरक्षित जागी होते, आणि एकटी नव्हते. तिथून मला सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये चालू असलेली चकमक दिसत होती…अचानक सीएए समर्थकांच्या एका गटाची नजर माझ्यावर पडली. पाच-सहा लोक काठ्या घेऊन आले आणि म्हणाले, “आम्ही मारू,” मला अक्षरशः गुडघे टेकून त्यांची मनधरणी करावी लागली की मला मारू नका, मला जाऊ द्या.

श्रेया चटर्जी, स्वतंत्र पत्रकार

सोमवारी, चटर्जी मौजपूर इथे एका पत्रकारांच्या गटाबरोबर होत्या, जेव्हा त्या सगळ्यांनाच कसलेही वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांनी द प्रिंटला सांगितले, सीएए समर्थकांच्या एका गटाने त्यांना मारहाणीची धमकी दिली. “हिंदूंची लढाई आहे, आम्हाला साथ द्या, रेकॉर्ड करू नका, आम्ही अडकू,” असे ते म्हणत होते.

शांताश्री सरकार, रिपब्लिक टीव्ही

त्यांना सोमवारी भजनपुरा येथे वार्तांकन करत असताना धमक्या आणि शिवीगाळ यांना तोंड द्यावे लागले.

अनिंद्य चट्टोपाध्याय, टाईम्स ऑफ इंडिया

टाईम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार अनिंद्य चट्टोपाध्याय यांच्यावरही जमावाने हल्ला केला आणि धक्काबुक्की केली. त्यांनी त्याबाबत टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिले आहे. “मौजपूर मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडताना अचानक हिंदू सेनेचा एक सदस्य माझ्यापाशी आला आणि माझ्या कपाळावर तिलक लावू का विचारू लागला. तिलक लावला तर तुमचे काम सोपे होईल म्हणाला. तुम्ही हिंदू आहे ना, भैय्या. मग हरकत काय आहे, म्हणाला.”

आग लावलेल्या एका इमारतीचे फोटो काढत असताना बांबू आणि लोखंडी सळया हातात असलेल्या काही लोकांनी त्यांना घेराव घातला. त्यांचा कॅमेरा हिसकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या सहकारी साक्षी चंद मध्ये पडल्या आणि जमाव निघून गेला. पण नंतर पुन्हा काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. “फार शहाणपणा करत आहेत. हिंदू आहेस की मुसलमान?” एकाने विचारले.

सौम्या पिल्लई, अन्वित श्रीवास्तव आणि फरीहा इफ्तिकार, हिंदुस्तान टाईम्स

एका बातमीत त्यांनी म्हटले आहे, एका जमावाने त्यांच्या कारला घेराव घातला आणि नंतर बाईकवरून पाठलाग केला. “जमाव आमच्या कारच्या भोवती जमला. आम्ही कसेबसे तिथून सुटलो तर दोन बाईकस्वारांनी आमचा पाठलाग केला. त्या भागातून बाहेर पडल्यानंतरच ते आम्ही त्यांच्या तावडीतून सुटलो,” पिल्लई यांनी लिहिले आहे.

श्रीवास्तव यांनी त्याच बातमीत म्हटले आहे, की त्यांनी त्यांची धार्मिक ओळख सिद्ध करेपर्यंत त्यांना मारहाण करण्याची जमावाने धमकी दिली. “मी हिंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी मी काही दाखवू शकतो का असे ते मला विचारत होते. मी माझे ओळखपत्र दाखवू शकतो म्हटले, पण त्यांना धार्मिक गंडेदोरे, पेंडंट किंवा तिलक यापैकी काहीतरी हवे होते. माझ्याकडे काही नव्हते, तेव्हा त्यांनी मी तिलक का लावत नाही असे विचारले. नंतर माझे आयकार्ड तपासल्यावर काही जणांनी मला जाऊ दिले,” असे त्यांनी लिहिले आहे.

मंगळवारी रात्री एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्यांनी पत्रकारांवरील हल्ल्याबाबत “गंभीर चिंता” व्यक्त केली आहे.

अरिफा खानम शेरवानी, द वायर

द वायरच्या पत्रकार अरिफा खानम शेरवानी यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातत्याने धमक्या आणि छळ यांना सामोरे जावे लागते. त्याची दखल घेऊन द कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेने एक निवेदन प्रसिद्ध करून भाजप नेत्यांना अशा ऑनलाईन छळाला प्रोत्साहन देणे थांबवावे असे आवाहन केले आहे.

त्यांच्यासारख्या पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांकडे गांभीर्याने पहावे अशी मागणीही कमिटीने केली आहे.

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रीती गांधी यांनी अरिफा खानम यांना लक्ष्य केल्याचेही कमिटीने अधोरेखित केले आहे.

मालवीय यांनी प्रथम शेरवानी बोलत असलेली एक ४२ सेकंदांची क्लिप शेअर केली, आणि असा आरोप केला की त्यामध्ये त्या खलिफत निर्माण करण्याच्या रणनीतीची चर्चा करत आहेत. प्रत्यक्षात तो शेरवानी यांच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका दीर्घ भाषणातील तुकडे संपादित करून तयार केलेला व्हिडिओ होता. Alt Newsने तपासलेल्या तथ्यांनुसार त्यामध्ये शेरवानी शांततामय निदर्शनांबद्दल बोलत होत्या.

हा व्हिडिओ हजारो लोकांनी रिट्वीट केला. “भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे हे अत्यंत बेजबाबदार आणि धोकादायक वागणे आहे,” असे जीपीजेच्या वरिष्ठ संसोधक अलिया इफ्तिकार यांनी निवेदनात म्हटले आहे.

आपल्याला ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हत्या आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे शेरवानी यांनी सीपीजेबरोबर बोलताना सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0