शेती कायद्याशी देणेघेणे नाहीः रिलायन्सचे प्रत्युत्तर

शेती कायद्याशी देणेघेणे नाहीः रिलायन्सचे प्रत्युत्तर

अन्नदाता शेतकरी हा आमचा मायबाप असून त्याचा फायदा कसा आणि कोणत्या पद्धतीने होईल त्यासाठी आमचा नेहमीच शेतकऱ्यांना पाठींबा राहील. करार पद्धतीने शेती करण्यासाठी आम्ही कुठेही जमीन घेतलेली नसून भविष्यातही घेणार नाही तसेच नवीन कृषी कायद्याशी आमचे काही घेणे देणे नाही , असे स्पष्टीकरण देत रिलायन्सने सोमवारी एक पाऊल मागे टाकल्याने शेतकरी आंदोलनाला अजून बळ मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांचे पहिले पान काळे
भारतातील लोकशाहीच्या ऱ्हासाचा न्यूझीलंडमध्ये निषेध
‘कोरोना आटोक्यात आल्यानंतर सीएए लागू’

देशामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पाच आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

या आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांनी सध्याचे नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून यामधून मोठ्या कंपन्यांचा फायदा होणार आहे असा आरोप केला आहे. याच शेतकरी कायद्यांविरोध करणाऱ्यांनी या आंदोलनामध्ये अदानी आणि अंबानी उद्योगसमुहावरही टीका केली असून या कृषी कायद्यांमुळे या दोन्ही कंपन्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे कायदे मागे घेण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

रिलायन्सला विरोध करण्यासाठी पंजाब तसेच हरयाणा आणि अन्य काही राज्यात अनेक ठिकाणी कंपनीच्या जीओचं नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवरचीही मोडतोड केली. हे सर्व प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून आता या सर्व प्रकरणानंतर रिलायन्सने एक अधिकृत पत्रच जारी केलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्री ही आजपर्यंत कधीही काँट्रॅक्ट फार्मिंग क्षेत्रात काम करत नसून भविष्यात सुद्धा आम्ही हा व्यवसाय करणार नसल्याचे या अधिकृत पत्रात म्हटले आहे.

रिलायन्स रिटेल कंपनी कोणत्याही शेतकऱ्यांकडून थेट पद्धतीने माल विकत घेत नाही. शेतकऱ्यांच्या फायदा घेणारी कोणताही कंत्राटं कंपनीने केलेली नाहीत, असा उल्लेख रिलायन्सच्या या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

रिलायन्स किंवा आमची गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही कंपनीने पंजाब अथवा हरयाणा तसेच इतर कोणत्याही राज्यांमध्ये कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी कोणतीही शेतजमीन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकत घेतलेली नाहीय. तसा आमचा कोणता विचारही नाहीय, असं रिलायन्सचं म्हणणं आहे.

निर्धारित किंमतीपेक्षा शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माल विकत घेण्याचा प्रयत्न कंपनीने कधीही केलेला नाही आणि भविष्यातही असा प्रयत्न कंपनीकडून कधीच केला जाणार नाही, असा दावा रिलायन्सने केलाय.

कोटी भारतीयांचे अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला म्हणजेच रिलायन्सचा प्रचंड अभिमान आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे, त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी जे जे काही शक्य आहे ते करण्यासाठी रिलायन्स आणि समुहाशी संबंधित सर्व कंपन्या बांधील आहेत, असं पत्रकात नमूद केलं आहे.

शेतकरी कष्ट घेऊन पिकवत असलेल्या मालाला आणि त्याच्या संशोधनाला व मेहनतीला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे अशी कंपनीची भूमिका असून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जे सर्वार्थाने योग्य आहे आणि शेतकरी त्यासाठी आग्रही असतील तर त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात अनेक राज्यात जिओ आणि रिलायन्स मार्ट सेवा बंद करण्याचे वाढते प्रकार पाहून आणखी जादा नुकसान टाळण्यासाठी रिलायन्स ने एक पाऊल मागे घेतल्याचे मानले जाते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0