कांचन ननावरेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटिस

कांचन ननावरेच्या तुरुंगातील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटिस

पुणे/मुंबई : येरवडा तुरुंगातील कविता ननावरे हिच्या मृत्यू प्रकरणी मुंबई न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना नोटिस बजावली आहे.

१६ फेब्रुवारी २०२२२ रोजी न्या. पी. बी. वरळे आणि न्या एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाने कविता ननावरे हीचा पती अरुण भेलके याने दाखल केलेल्या याचिकेवरून अतिरिक्त पोलिस महानिदेशक, तुरुंगाचे महानिरीक्षक आणि येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यांना नोटिस जारी केली आहे.

अंडरट्रायल असलेली महिला कैदी कांचन ननावरे, वय ३६ हिचा, मेंदूवरील एका शस्त्रक्रियेनंतर २४ जानेवारी २०२१ रोजी मृत्यू झाला. ही शस्त्रक्रिया करण्याआधी त्याच तुरुंगात ठेवलेल्या तिच्या पतीला कळवण्यात आले नाही किंवा त्याची संमती घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे टी शस्त्रक्रिया अनधिकृतरित्या केल्याचे भेलके यांचे म्हणणे आहे. तुरुंगातील अधिकाऱ्यांद्वारे पुरेसे वैद्यकीय उपचार पुरवण्यात अपयशी झाल्यामुळे महिला कैद्याचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत.

नेमके काय घडले

कांचन ननावरे आणि तिच्या पतीला २०१४ मध्ये पुणे येथे अटक झाली. त्यांच्यावर आयपीसीखाली तसेच यूएपीए कायद्याखाली अनेक गुन्हे दाखल होते. त्यांना तेव्हापासून पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. कांचनला अनेक आरोग्य समस्या होत्या आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांना त्याची कल्पना होती. १९९६ आणि २०१३ मध्ये तिच्यावर अगोदरच हृदयाच्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. २०१४ ते २०२१ या कालावधीत कोठडीमध्ये असतानाही तिला गंभीर आजाराची लक्षणे होती. २०२० पर्यंत तिचा आजार खूपच वाढला आणि तिला हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. मात्र पुन्हा पुन्हा तिला वैद्यकीय सुविधा आणि जामीन नाकारण्यात आला. अखेरीस २०२० मध्ये रुग्णालयात दीर्घकाळ भरती केल्यानंतर तिला सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय व फुफ्फुसाचे रोपण करण्याची गरज आहे असा सल्ला देण्यात आला. मात्र तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तिला हे उपचार उपलब्ध करून दिले नाहीत व तिला पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात भरतीही केले नाही.

पुणे सत्र न्यायालयाद्वारे तिचे जामीन अर्ज सातत्याने नाकारले जात असल्यामुळे कांचन ननावरेने तिचे आरोग्य चिंताजनकरित्या ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयाने तिच्या वैद्यकीय स्थितीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पॅनेल नेमले. त्यांनी असा निष्कर्ष काढला की दीर्घकाळ हृदयविकारामुळे तिचे सर्व अवयव अशक्त झाले आहेत. तिला हृदय आणि फुफ्फुसाचे रोपण करण्याची शिफारस करण्यात आली आणि उशीर झाल्यामुळे तिच्या यकृतावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. २५ सप्टेंबर २०२० रोजी उच्च न्यायालयाने तुरुंगातील कैद्यांच्या प्रति व विशेषतः कांचनच्या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या “निष्ठुर” दृष्टिकोनाबद्दल ताशेरे ओढले.

मुंबई उच्च न्यायालयासमोर चालू असलेल्या सुनावणीच्या दरम्यानच कांचनवर सब-ड्यूरल हिमाटोमासाठी ससून हॉस्पिटलमध्ये अत्यंत जोखमीची मेंदूवरील शस्त्रक्रिया करावी लागली. या सबंध कालावधीत तिच्या ढासळत चाललेल्या आरोग्याबद्दल तिचा पती अरुण भेलके याला अंधारात ठेवले गेले. त्याला त्याच तुरुंगात ठेवले आहे हे तुरुंगातील अधिकाऱ्यांना माहिती होते, तरीही शस्त्रक्रियेच्या वेळी मृत्यू होण्याच्या जोखमीकरिता त्याच्याकडून संमती घेण्यात आली नाही. त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जावर सुनावणी चालू असूनही यापैकी कशाही बाबत मुंबई उच्च न्यायालयालाही माहिती देण्यात आली नाही.

१६ जानेवारीला शस्त्रक्रिया झाल्यानंतर कांचन ननावरेच्या आरोग्यामध्ये अनेक गुंतागुती विकसित झाल्या आणि उजव्या बाजूला कार्डिअॅक फेल्युअर झाले. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी ही माहिती तिच्या पतीपासून लपवली. अरुण भेलकेला तिच्या शस्त्रक्रियेबद्दल इतर कैद्यांकडून १८ जानेवारी २०२१ रोजी समजले, त्यानंतर त्याला त्याच्या पत्नीला रुग्णालयात भेटता यावे याकरिता त्याच्या वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज केला. अरुण भेलके कांचनला रुग्णालयात भेटला तेव्हा तिने सुसंबद्ध विचार करण्याची क्षमता गमावली होती. तिने त्याला ओळखले नाही किंवा काहीच संवाद केला नाही. त्याच्या पत्नीची अशी स्थिती का झाली याबाबत पुन्हा पुन्हा तुरुंगातील व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतरही त्याला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कांचनवर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तिला कार्डिअॅक फेल्युअर झाले आणि ती मरणाच्या दारात आहे हे त्याला सांगितले नाही. दुसऱ्याच दिवशी, २४ जानेवारी, २०२१ रोजी कांचनचा मृत्यू झाला.

याचिकेमध्ये केलेल्या मागण्या:

कायद्यानुसार, एखाद्या कैद्याचा कोठडीत असताना मृत्यू झाला तर एनएचआरसी (मानवी हक्क अधिकार) मार्गदर्शक तत्त्वांनुसार न्यायिक चौकशी करणे आवश्यक असते. त्यामध्ये मृत्यूच्या कारणाची तपासणी करणे आणि सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब घेणे अनिवार्य असते. कांचन ननावरेच्या प्रकरणामध्ये तिच्यावर उपचार करणारे, तिचे नातेवाईक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचा पती अरुण भेलके याचे जबाब नोंदवणे गरजेचे होते. अशी चौकशी सुरू झाली तरीही अरुण भेलकेला त्याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. तुरुंगातील अधिकाऱ्यांना आणि पुणे येथील सत्र न्यायालयाला पुन्हा पुन्हा विनंती करूनही त्याला त्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली नाही.

वरील परिस्थितीमध्ये अरुण भेलके याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून त्यात त्याने कांचनच्या वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात जबाबदार असणाऱ्या ससून हॉस्पिटलमधील आणि येरवडा तुरुंगातील व्यक्तींची तपासणी करावी आणि कांचन ननावरेच्या कोठडीतील अकाली आणि अनैसर्गिक मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याचिकेमध्ये तुरुंगातील कैद्यांना सार्वजनिक आरोग्यसेवा किंवा मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये योग्य आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी विविध सरकारी परिपत्रके आणि न्यायालयाचे आदेश यांचे पालन केले जावे अशीही मागणी केली आहे, जेणेकरून पुन्हा कोणाही कैद्यावर कांचन ननावरेसारखी परिस्थिती उद्भवणार नाही.

अरुण भेलकेच्या याचिकेवर १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली आणि आता पुन्हा १६ मार्च २०२२ रोजी सुनावणी होणार आहे.

COMMENTS