केरळमध्ये कन्नूर मशिदीला पोलिसांची नोटीस अयोग्य : मुख्यमंत्री कार्यालय

केरळमध्ये कन्नूर मशिदीला पोलिसांची नोटीस अयोग्य : मुख्यमंत्री कार्यालय

निलंबित भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून देशभरात गोंधळ सुरू असताना, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एका मशिदीला मायिल पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याने नोटीस बजावली होती.

तिरुअनंतपुरम: केरळ सरकारने बुधवारी स्पष्ट केले की राज्याच्या मशिदींमध्ये कोणताही जातीय प्रचार केला जात आहे, असे वाटत नाही. पोलिसांनी कन्नूर जिल्ह्यातील जामा मशिदीला जारी केलेली नोटीस देखील अयोग्य असल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान धार्मिक फूट पाडणारे प्रवचन देण्यापासून दूर राहावे, असे म्हटले होते.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अशी कोणतीही नोटीस पूर्णपणे अनुचित आणि डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे, की मायिल पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सरकारी धोरण समजून न घेता चुकीची नोटीस बजावली होती आणि या घटनेबद्दल राज्य पोलिस प्रमुखांनी त्यांना पदावरून हटवले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मायिल पोलिस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) बिजू प्रकाश यांनी स्थानिक मशीद समितीला नोटीस बजावली होती. परिसरात जातीय सलोखा बिघडवणारे कोणतेही द्वेषयुक्त भाषण करू नये, असे त्यात म्हटले होते. अशी भाषणे देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे एसएचओने नोटीसमध्ये म्हटले आहे. मात्र, या नोटिशीला विविध मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता.

पोलिसांच्या या कारवाईला विरोधकांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने हे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) उपाध्यक्ष व्हीटी बलराम यांनी अलीकडेच एका मंदिरात ज्येष्ठ नेते पीसी जॉर्ज यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणाचा संदर्भ देत, एलडीएफ सरकारने द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी मंदिर समित्यांना नोटिसाही बजावल्या होत्या का, असा प्रश्न विचारला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या निवेदनात या नोटिशीच्या संदर्भात सरकारच्या विरोधात अपप्रचार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. काही स्वार्थी लोक राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा वेळी विविध धर्म, धार्मिक संस्था आणि सामान्य लोकांमध्ये मैत्री आणि शांतता राखणे महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS